Tuesday 7 July 2020

एका पायावर... विनीत वर्तक ©

एका पायावर... विनीत वर्तक ©

'तुझ्या मदतीसाठी एका पायावर तयार आहे'.... असं आपण अनेकदा बोलून जातो. ह्या शब्दानं मागची भावना हिच असते की एका पायावर आपला तोल सांभाळणं अतिशय कठीण असते. त्या परीस्थितीत सुद्धा मी तुझ्या मदतीला तत्पर, तयार असेन. समजा कधी खरी वेळ आली की जिकडे आपल्याला आपलं आयुष्य एका पायावर तोलावं लागेल? नुसता विचार केला तरी मेंदूला मुंग्या येतील. पण काही माणसे आपल्यामध्ये असलेल्या व्यंगत्वाला किंवा निर्माण झालेल्या व्यंगत्वाला आपलं शक्तीस्थान बनवतात. जे आपल्याकडे कमी आहे किंवा नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्यात सर्वोत्तम जगण्याचा ध्यास घेतात. एक निश्चित असं लक्ष्य ठेवतात. त्या लक्ष्याला मिळवण्यासाठी मेहनतीची पराकाष्ठा करतात. वाटेत अडचणी आल्या तरी त्यांना बाजूला काढून किंवा त्याच्यावर मात करून आपलं लक्ष्य मिळवतात. आपल्या सोबत आपल्या कुटुंबाची, समाजाची, देशाची उंची, मानसन्मान वाढवतात त्यांना यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही.

पेरीवाडगमपट्टी ह्या सेलम, तामिळनाडू जवळ असणाऱ्या एका छोट्या गावात शाळेत जाणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या पायावरून एक बस गेली. तसं बघायला गेलं तर दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे भारतात होणाऱ्या लाखो अपघातांपैकी हा एक अपघात होता. पण ह्या अपघाताने एका मुलाचं आयुष्य पूर्णपणे बदललं ज्याचा प्रभाव देशावर पडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. दारू पिऊन बस चालवणाऱ्या चालकाने ५ वर्षाच्या शाळेत जाणाऱ्या त्या मुलाच्या पायावरून बस नेली. ह्या अपघातात त्या मुलाचा उजवा पाय निकामी झाला. गुढघ्यापासून पायाची वाढ खुंटली. सतरा विश्व दारिद्र आणि एकट्या आईच्या कमाईवर जगणाऱ्या त्या कुटुंबावर संकट कोसळलं. ४ भाऊ आणि एक बहीण अशी सहा भावंड वाढवणाऱ्या त्या माऊलीच दररोज उत्पन्न फक्त १०० रुपये होतं. आपल्या मुलाच्या उपचारासाठी तिने जवळपास ३ लाख रुपये खर्च केले पण त्या मुलाच्या वाटेला व्यंगत्व आलं ते कायमचं.

एक सामान्य आयुष्य जगणाऱ्या मुलाच्या आयुष्यात एका घटनेने पूर्णतः अंधार आला होता. एका पायावर उभं राहून त्याला आयुष्य जगायचं होतं. एकेकाळी व्हॉलीबॉल आणि खेळाची आवड असणारा तो मुलगा सामान्य मुलांसोबत आता खेळू शकत नव्हता. पण तो थांबला नाही. आपल्या व्यंगत्वाला त्याने आपलसं केलं. त्याला आपली ढाल बनवली आणि अभ्यासात, खेळात मेहनत घ्यायला सुरवात केली. शाळेतील खेळ शिकवणाऱ्या शिक्षकांनी त्याला उंच उडीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. वय वर्ष १४ असताना ह्या मुलाने शाळेतील सामान्य मुलांसाठी असणाऱ्या स्पर्धेत भाग घेतला आणि चक्क दुसरा क्रमांक पटकावला. दोन पायावर धावून उंच उडी मारणाऱ्या सामान्य मुलांपेक्षा एका पायावर आपण जास्ती उंच उडी मारू शकतो हे त्याच्या लक्षात आलं. पुढे सुरु झाला तो एक प्रवास स्वतःला सिद्ध करण्याचा, व्यंगत्व आलं म्हणून आयुष्यात उंच उडी मारण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही हे त्याला उमगलं.

२०१३ साली त्याची गाठ व्यंगत्व असणाऱ्या मुलांना खेळाचं शिक्षण देणाऱ्या एका द्रोणाचार्य शी पडली. त्यांनी त्याचे गुण लगेच हेरले. २०१५ ला आंतराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी त्याला बंगळुरू इकडे घेऊन आले. एका वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर २०१६ साली त्या मुलाने ट्युनिशिया इकडे होणाऱ्या  IPC Grand Prix स्पर्धेत भाग घेऊन १.७८ मीटर ( ५ फूट १० इंच) इतकी उंच उडी मारली. त्याच्या ह्या उडीमुळे रीओ ऑलम्पिक मध्ये त्याचा प्रवेश नक्की झाला. एका छोट्या खेड्यातला एक गरीब मुलगा भारताचं प्रतिनिधित्व ऑलम्पिक मध्ये करत होता. संपूर्ण आयुष्यात त्याने जी स्वप्न बघितली होती, लक्ष्य ठेवली होती त्यांच्या पूर्ततेचा क्षण समोर होता. विचलित न होता रीओ ऑलम्पिक मधल्या T–42 ह्या स्पर्धेत त्याने चक्क १.८९ मीटर (६ फूट २ इंच) इतकी उडी घेतली. भारताला ऑलम्पिक स्पर्धेतल सुवर्ण पदक मिळवून दिलं. हा पराक्रम करणाऱ्या त्या मुलाचं नाव आहे 'मरीअप्पन थंगावेलु'. मरीअप्पन थंगावेलु हा पॅरा ऑलम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारा तिसरा भारतीय ठरला. त्याच्या ह्या पराक्रमाची दखल घेताना भारत सरकारने त्याला २०१७ साली पद्मश्री सन्मानाने तर त्याच वर्षी भारतातील खेळांमधील दुसऱ्या सर्वोच्च अश्या 'अर्जुन' पुरस्काराने सन्मानित केलं.

मरीअप्पन थंगावेलुच्या मते लुळा पडलेला त्याचा पाय तर त्याच नशीब आहे. हा तोच पाय आहे ज्यामुळे मी हे यश मिळवू शकलो. आपल्याच व्यंगत्वाला त्याने आपलं नशीब मानून त्याला अजोड मेहनत, चिकाटी आणि जिद्दी ची जोड दिली. पुढे काय झालं तो इतिहास आहे. आपल्यातील कमतरेवर तो रडत नसला नाही की आपल्या गरीबीचा त्याने कधी बाजार मांडला. जे समोर येते ते शिकत गेला आणि आपलं नाव भारतीय खेळाच्या इतिहासात अमर करून गेला. एका पायावर भारताचं नाव मोठं करणाऱ्या ह्या खेळाडू ला माझा कडक सॅल्युट. क्रिकेट सारख्या जुगारातून बाजूला होऊन भारतीय आता तरी तुझ्याकडून स्फूर्ती घेतील आणि तुझा आदर्श येणाऱ्या पिढीकडे देतील ह्या आशेवर तुझ्या पुढच्या प्रवासाला एका भारतीयाकडून शुभेच्छा.

जय हिंद!!!

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment