Wednesday, 29 July 2020

अब तुम्हारे हवाले वतन साथियों... विनीत वर्तक ©

अब तुम्हारे हवाले वतन साथियों... विनीत वर्तक ©

आज लडाख भारताचा भाग आहे त्यामागे भारतीय सैनिकांच अतुलनीय शौर्य आहे. आज ए.सी. केबिन अणि कॅमेरा समोर हेअरस्टाइल करून सैनिक बंदुकीशिवाय पुढे गेले कसे? हे विचारणारं राजकीय नेतृत्व बघून कुठेतरी असं वाटते की ज्या सैनिकांमुळे आज आपण हे बोलू शकतो त्यांच बलिदान आणि पराक्रम ह्याची थोडीतरी जाणीव ठेवायला हवी. 

 “When the going get’s tough, the tough get’s going” 

भारतीय सैनिक ह्याच उक्तीला आजवर पुरून उरत आले आहेत. त्यांच्या युद्धातील शौर्या ची तुलना तर कशाचीच होऊ शकत नाही. त्याचं देशप्रेम व्यक्त करायला शब्द पण कमी पडतात. कारण त्याचं ते असामान्य देशप्रेम शब्दात मांडणार तरी कस? मातृभुमिच्या प्रेमाचा इतका वारसा भारतीय सैन्याने आपल्यासमोर ठेवला आहे कि वाचताना पूर्ण अंगात रोमांच उभे राहतात. भारताने असे सैनिक गमावले ह्यासाठी एका डोळ्यातून पाणी तर दुसऱ्या डोळ्यातून त्यांच्याविषयी प्रचंड अभिमान वाटतो. पण हे सगळ आज आपण विसरलो आहोत ह्याच वाईट हि वाटते. आज कोणता इतिहास शिकवला जातो? इतिहासात सुद्धा होऊन गेलेल्या गोष्टीत धर्म, जात, पात शोधून त्यावर राजकारण करून एकमेकांचा जीव घेणाऱ्या आपल्यात कुठून निर्माण होणार आहे देशभावना? कारण आम्ही आमच्या सैनिकालाच समजू शकलो नाही तिकडे देश तर दूरच राहिला.

रॉ करेज ज्याला म्हंटल जाते जे कोणत्याही पैश्याने निर्माण करता येत नाही. तर ते तुमच्या रक्तात असाव लागते. उफाळून याव लागते तेव्हाच समोर आलेल्या शत्रूला आपण असे सामोरे जातो ज्याचा विचार तर सोडाच ज्याच स्वप्न पण शत्रू बघू शकत नाही. हि देशभक्ती ते रॉ करेज आपल्या भारतीय सैनिकांनी दाखवल त्याला जगात तोड नाही. शेवटचा माणूस शेवटची गोळी संपेपर्यंत लढला. सगळ संपल्यावर उघड्या हातानी शत्रूवर चालून गेले. पण माघार घेतली नाही. एकाने हि तिथून पळ काढला नाही. ते लढले फक्त देशासाठी. रक्ताचा चिखल झाला. पण शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या बंदुकी शत्रूचा वेध घेत होत्या. श्वास थांबल्यावर पण प्राण गेलेल्या डोळ्यांच्या नजरेत फक्त शत्रू होता. प्राण गेलेली बोट बंदुकीच्या ट्रिगर वर स्थिरावलेली होती. अरे काय आहे हे? हि कुठली जाज्वल्य देशभक्ती? अस एक नाही तर प्रत्येकजण असाच लढला. ते १२३ होते पण त्याचं बळ १२३ कोटी भारतीयांच्या देशभक्तीच होत. ज्याच्यापुढे शत्रू निष्प्रभ झाला. ते गेले पण त्यांच्या पराक्रमामुळे आजही लडाख भारताचा भाग आहे. आज किती जण ओळखतात त्या १२३ लोकांना? किती लोकांना माहित आहे त्या १२३ लोकांचा पराक्रम? किती लोकांना माहित आहे त्या १२३ पेकी प्रत्येक जण आपल्यामागे किती मोठा देशभक्तीचा वारसा ठेवून गेला आहे. इकडे नको त्या पुतळ्यांच राजकारण करणाऱ्या लोकांना त्या १२३ लोकांच आज स्मरण पण नाही. भारताचा सैनिक आणि आपले हिरो आपणच ओळखत नाही हीच आपली शोकांतिका आहे.

ते १२३ होते १३ कुमाव बटालियन चे शूरवीर भारतीय सैनिक. त्याचं नेतृत्व करत होते ५६ इंचांची छाती असलेले बहादूर मेजर शैतान सिंग. आजही जिकडे हे १२३ लढले ती जागा जगातील सर्वात कठीण अशी युद्धभूमी मानली जाते. समुद्रीसपाटी पासून ५००० मीटर पेक्षा जास्त आणि साधारण १६००० फुटापेक्षा अधिक उंचीवर रेझांग ला वर हि लढाई १८ नोव्हेंबर १९६२ ला झाली. १३ कुमाव बटालियन च्या ह्या १२३ लोकांच्या चार्ली कंपनी कडे रेझांग ला च्या सुरक्षिततेची जबाबदारी होती. १६००० फुटावर जिकडे श्वास घ्यायला पण कठीण जाते तिकडे अपुरा साठा, थंडीपासून रक्षण करणारे कपडे अश्या अवस्थेत कोणत्याही मदतीशिवाय भारताच्या ह्या पोस्ट च रक्षण करण्याची जबाबदारी होती.

१८ नोव्हेंबर १९६२ ला चीन च्या सैनिकांनी त्यांच्या ट्रेडमार्क ह्युमन व्हेव बनवत अत्याधुनिक बंदुकी, रॉकेट सह भारताच्या ह्या पोस्ट वर सकाळच्या गोठवणाऱ्या थंडीत आक्रमण केल. ३५० चीनी सैनिकांच्या पहिल्या फळीने भारताच्या १२३ लोकांवर चोहोबाजूने हल्ला चढवला. पण जिगरबाज भारतीय सैनिकांनी आपल्या पराक्रमाने चीनी सैनिकांना पाणी पाजल. चीनी आक्रमणाची पहिली फळी कोलमडत असताना चीन च्या दुसऱ्या फळीने सगळीकडून आक्रमण केल. दुसऱ्या फळीत तब्बल ४०० सैनिक भारतीय सैनिकांवर तुटून पडले. रॉकेट, मशीनगन च्या आवाजांनी १६,००० फुटांच्या आसमंतात रक्ताची कारंज उडाली. अनेक देह बर्फावर निपचित पडले. पण भारतीय सैनिक मागे हटले नाहीत. न त्यांनी शरणागती पत्करली देशभक्तीच्या त्वेषाने ते चीनी सैन्यावर तुटून पडले. चीन च्या तिसऱ्या फळीतील अजून ७५० सैनिकांनी आक्रमण केल. मेजर शैतान सिंग ज्यांच्या नेतृत्वाखाली हे १२३ लढत होते ते स्वतः शत्रूच्या गोळ्यांचा विचार न करता सगळ्या पोस्ट वर जाऊन शत्रूला प्रत्युत्तर देत होते. त्या १२३ च मनोधैर्य वाढवत होते. अंगावर गोळ्या लागलेल्या असताना सुद्धा जखमी अवस्थेत आपल्या जीवाची पर्वा न करता चीनी सैन्याला सगळ्या बाजूने रोखून धरत होते. चीन च्या त्या ह्युमन व्हेव पुढे शरणागती पत्करण्याची संधी असताना सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत “बचेंगे तो ओर भी लढेंगे” ह्या पानिपत च्या उक्ती प्रमाणे मेजर शैतान सिंग ह्यांनी प्रत्येक सैनिकाच्या मनात देशभक्ती निर्माण केली. त्यामुळेच हे १२३ चीन च्या जवळपास १५०० पेक्षा जास्ती असणाऱ्या सैन्याला भारी जात होते.

मेजर शैतान सिंग गंभीर जखमी झाले असताना सैनिक त्यांना आडोशाला घेऊन जात होते. पण चीनी चालून येत आहेत हे बघून त्यांनी सैनिकाला आपल्याला जिकडे आहे तिकडे सोडून पुन्हा एकदा चीनी सैनिकांना प्रत्युत्तर देण्यासाठी आज्ञा केली. आपल्या जीवाची पर्वा न करता मेजर शैतान सिंग ह्यांनी पुन्हा एकदा बंदूक हातात घेऊन शत्रूवर गोळीबार सुरु केला. भारतीय सैन्याकडच्या गोळ्या संपल्या तेव्हा सैनिकांनी चीनी सैनिकांच्या दिशेने धाव घेत हातघाई ची लढाई सुरु केली. अंगावर गोळ्या तुटून पडत असताना त्यांनी पळ नाही काढला तर आनंदाने आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी मृत्यू पत्करला. भारताचा प्रत्येक सैनिक शेवटच्या गोळी पर्यंत लढला. युद्ध थांबल तेव्हा रेझांग ला वर माणसांच्या प्रेताचा खच पडला होता. भारताने ११४ वीर सैनिकांना गमावलं त्यात लीडर प्रमाणे पुढे राहून त्याचं नेतृत्व करणारे मेजर शैतान सिंग ह्यांना वीरमरण आल. भारताचे ९ सैनिक गंभीर जखमी झाले. तर चीन ने १३०० पेक्षा जास्त सैनिकांना गमावलं होत. ह्यात जखमींचा आकडा वेगळा आहे. भारताचे फक्त १२३ सैनिक त्या १५०० चीनी सैनिकांना पुरून उरले. हे युद्ध काही साध्या युद्धभूमीवर झाल नव्हत. तब्बल १६,००० फुटावर भारतीय सैनिकांनी ज्या शौर्य आणि देशभक्ती च दर्शन दाखवल ते शब्दांपलीकडच आहे. ह्या अतुलनीय पराक्रमासाठी मेजर शैतान सिंग ह्यांना मरणोत्तर परमवीर चक्रा ने सन्मानित करण्यात आल.

अश्या जाबांज भारतीय सैनिकांना आपण विसरून गेलो आहोत. ज्या मातृभूमीच्या रक्षणासाठी ज्यांनी मागचा पुढचा विचार न करता आपल रक्त सांडल त्यांना आपण ओळखत पण नाही. त्यांच्या त्यागाची किंमत पण आज आपण ठेवत नाहीत. ते १२३ ब्राह्मण नव्हते न दलित होते, ना हिंदू होते ना मुसलमान होते, न उच्चवर्णीय होते न मागासलेले होते. ते फक्त आणि फक्त भारतीय होते. हेच मनात ठेवून त्यांनी सर्वोच्च बलिदान आपल्या देशासाठी दिल. पण आपण काय करतो आहोत? आपला करंटेपणा इतका आहे कि त्याची आठवण तर नाहीच पण आज जातीवरून भांडतो आहोत. माझे हक्क मागताना कर्तव्य विसरत आहोत. ज्या इतिहासात असे वीरपुरुष होऊन गेले. त्या इतिहासात जाऊन त्यांची जात शोधत आहोत. कारण आपण हेच करू शकतो. आपली लायकी,विचार आणि आपली देशभक्ती तितकीच पोकळ आणि कुपमंडूक आहे. तिकडे सांडलेल्या रक्ताच्या एकेका थेंबाच आपण देण लागतो हे आपण विसरून गेलेलो आहोत.

पण खेदाने हि जाणीव कोणत्याच भारतीयाला होत नाही. त्यामुळे जितक्या सहजतेने आपण शहीद म्हणतो त्या शब्दामागच बलिदान आपण लक्षात घेत नाही. आज भारत अखंड आहे तो अश्याच शूरवीर, पराक्रमी सैनिकांमुळे. जिकडे तुम्ही कोणत्या धर्माचे आणि जातीचे असण्यापेक्षा भारतीय असण महत्वाच असत. कदाचित आमची पिढी काय येणारी पिढी ह्या इतिहासाला समजून घेण्यात कमी पडली म्हणून कि काय त्या १२३ हिरोंना आम्ही आमच्या आयुष्यात जागा देऊ शकलो नाही. अजूनही वेळ नाही गेली. वेळ काढून एकदा समजून घ्या आयुष्यातल्या खऱ्या हिरोंना. ज्यांच्यामुळे मी, तुम्ही आपण सगळेच ह्या अखंड देशात सुरक्षित आहोत. त्या १२३ हिरोंना माझा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार.

रेझांग ला इकडे त्या सैनिकांच्या सैन्य स्मारकावर असलेली अक्षरे खूप काही सांगून जातात, 

“How can a man die better

Than facing fearful odds

For the ashes of his fathers

And the temples of his Gods.”

To the sacred memory of the Heroes of Rezang La, 114 Martyrs of 13 Kumaon who fought to the Last Man, Last Round, Against Hordes of Chinese on 18 November 1962.

– Built by All Ranks 13th Battalion, The Kumaon Regiment.

फोटो स्रोत :- गुगल 

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment