Thursday 9 July 2020

'दौलत बेग ओल्डी' भारताचा हुकमाचा एक्का... विनीत वर्तक ©

'दौलत बेग ओल्डी' भारताचा हुकमाचा एक्का... विनीत वर्तक ©

दौलत बेग ओल्डी हे नाव गेले कित्येक दिवस भारत चीन संघर्षाच्या पार्श्वभुमीवर सगळीकडे चर्चेत आहे. नक्की 'दौलत बेग ओल्डी' इथे असं काय आहे की चीनचा आणि पाकीस्तान चा जीव तिकडे अडकला आहे? हे सामान्य माणसांनी जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. भारत चीन संघर्षाची ठिणगी अथवा असंतोषाच मुख्य कारण ही जागा आहे. खरे तर भारतासाठी हुकमाची एक्का असणारी ही जागा राजकीय नाकर्तेपणामुळे विस्मृतीत गेली होती. संघर्ष नको असेल तर सिमेवर काहीच विकास न करणं हेच गेल्या सरकारचं संरक्षण धोरण होतं. हे मी सांगत नाही तर तसं विधान खुद्द त्या वेळच्या संरक्षणमंत्र्यांनी संसदेत केलं होतं. हे म्हणजे आपल्याकडे हुकमाचा एक्का नाहीच अश्या अविर्भावात जगणं. आपण शत्रुपेक्षा वरचढ आहोत हे शत्रुला कळू दिलं नाही की शत्रु आक्रमण अथवा विस्तार करणाच्या भानगडीत पडणार नाही असा एकूण कयास होता. आता तो किती बरोबर अथवा चूक आणि त्यातील राजकारण ह्यात मला जायचं नाही.

दौलत बेग ओल्डी ह्या जागेला महत्व आहे ते इथे असणाऱ्या भौगोलिक रचनेमुळे. ही जागा समुद्रसपाटीपासून साधारण १६,६१४ फूट उंचीवर आहे. सर्व बाजूने काराकोरम च्या उंच पर्वत रंगाच्या मधोमध एखाद्या बशी प्रमाणे ती वसलेली आहे. हिवाळ्यात उणे -५० डिग्री सेल्सिअस पर्यंत उतरणारे तपमान, बोचरे थंड वारे, ऑक्सिजन ची कमतरता ह्यामुळे हा सर्व भाग दगड धोंड्यांचा आहे. वनस्पती च अस्तित्व जिकडे मोठ्या मुश्किलीने बघायला मिळते तिकडे राहणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण. पण तरी सुद्धा आज चीन ला चारी मुंड्या चीत करण्याची भाषा आणि डोळ्यात डोळे घालून जाब विचारण्याची हिंमत आज भारत आणि भारतीय सेना, हवाई दल करू शकतो ते ह्याच दौलत बेग ओल्डीमुळे. इकडे जगातील सर्वात उंचीवर असणारी धावपट्टी भारतीय वायू दल, भारतीय सेनेने बनवलेली आहे. ज्याला भारत लाईन ऑफ कंट्रोल (नियंत्रण रेषा) मानतो त्या रेषेपासून ही जागा फक्त ८ किलोमीटर दक्षिणेला तर ९ किलोमीटर पश्चिमेला आहे. इकडून काराकोरम च्या पर्वतराजींचं हवाई अंतर हे अवघे १० किलोमीटर आहे. ह्याच काराकोरम पर्वतराजींच्या मागे पाकीस्तान आहे तर दुसऱ्या बाजुला चीन आहे. अवघ्या काही किलोमीटर च्या परीघात भारताच्या दोन्ही शत्रूंवर लक्ष ठेवता येणारा भूभाग किती महत्वाचा आहे हे सर्वांच्या लक्षात आलं असेल.

१९६५ नंतर इकडे असणारी धावपट्टी आणि एकूणच ह्या भूभागाकडे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या दुर्लक्ष करण्यात आलं. ह्या धावपट्टी ला पुन्हा जिवंत करण्यासाठी भारताच्या वायू दलाकडून केलेल्या प्रयत्नांना राजकीय इच्छाशक्तीने केराची टोपली दाखवली. कुठेतरी राजकीय अनास्थेमुळे भारताचा हुकमाचा एक्का काळाच्या पडद्याआड लुप्त झाला होता. २००८ साली तत्कालीन एअर मार्शल प्रणब कुमार बरबोरा, एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर ह्यांच्या सोबत त्यांच्या टीम ने  ह्यांनी सरकारला अंधारात ठेवून इकडे असणाऱ्या जगातील सर्वात उंच धावपट्टी ला जिवंत करण्याचं काम  घेतलं. जिकडे श्वास घ्यायला त्रास होतो तिकडे एक धावपट्टी बांधणं किती कठीण असेल ह्याचा अंदाज आपण लावू शकत नाही. पण भारतीय वायू दलाच्या ह्या अधिकाऱ्यांनी सरकारला अंधारात ठेवून भारतीय सेनेच्या मदतीने तब्बल ४३ वर्षांनी जगातील सर्वात उंच धावपट्टी वर एन ३२हे विमान यशस्वीरीत्या उतरवलं. ह्याची कल्पना त्यांनी सरकारला ही कामगिरी फत्ते केल्यानंतर दिली. ज्यावर सरकारकडून त्यांनाच उलट प्रश्न विचारले गेले. देशासाठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या ठिकाणाची डागडुजी केल्यामुळे त्याला देशाच्या संरक्षणासाठी पुन्हा सज्ज केल्यामुळे त्यांच अभिनंदन करण्याऐवजी त्यांना प्रश्नांना सामोरं जावं लागलं ह्यातच तत्कालीन राजकीय नेतृत्व भारताच्या संरक्षणाचा विचार किती गांभीर्याने करत होतं हे स्पष्ट झालं.

२००१ साली भारतीय सेनेच्या फॉरवर्ड पोस्ट ना रसद पोचवण्यासाठी Darbuk-Shyok-DBO Road चं काम तर सुरु झालं. २५५ किलोमीटर लांब आणि जवळपास १३,००० फूट ते १६,००० फूट उंचीवरून जाणाऱ्या रस्त्याचं काम कासवाच्या गतीने सुरु होतं. ह्याच रस्त्यावर शोल्क नदीवर चेवांग रिंचेन ब्रिज बांधण्यात आला आणि २०१९ साली ह्या रस्त्याचं काम पुर्णत्वाला गेलं. ह्या रस्त्यामुळे भारतीय सेनेला आपल्या सामानाची ने-आण करणं अतिशय सोप्प झालं. भारताने आधीच २०१३ साली इकडे सी १३० जे सुपर हर्क्युलस नावाचं शक्तिशाली लढाऊ विमान उतरवून आपली वायू सज्जता चीन ला दाखवली होतीच. पण २०१९ साली जेव्हा रस्त्याने दौलत बेग ओल्डी जोडलं गेलं तेव्हा चीन चा असंतोष खदखदू लागला. धावपट्टी आणि रस्ते ह्या दोन्ही गोष्टीमुळे भारत सीमेवर अतिशय कमी वेळात रसद पोहचवू शकतो हीच चीन आणि पाकीस्तान ची दुखरी नस आहे. भारत आणि चीन संघर्ष चालू झाल्यावर ज्या गतीने भारतीय सेना आणि भारतीय वायू दल ह्यांनी आपली माणसं, रसद, दारुगोळा सिमारेषेवर पोहचवला त्यामुळे चीन पूर्णपणे बॅकफूट वर गेला. आज जवळपास १०० पेक्षा अधिक रणगाडे, तोफा, सैनिक हे सी १३० जे सुपर हर्क्युलस, एन ३२, आपाचे, चिनुक सोबत संपूर्ण हवाई यंत्रणेच्या मदतीने सिमारेषेवर पोहचवणे दौलत बेग ओल्डी इथल्या धावपट्टी म्हणजेच हुकमाच्या एक्क्यामुळे साध्य झालं आहे.

शत्रू जरी कागदावर कितीही मोठा असला तरी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर परिस्थिती काय आहे त्याने पूर्ण युद्धाचं पारडं पलटू शकते. हवाई हल्ल्याच्या बाबतीत भारताचं ह्या भागात वर्चस्व आहे. चीन चे खूप सारे सैनिक हे चीन च्या आतल्या भागातले आहेत. तिबेट आणि अक्साई चिन च्या भागाची, इथल्या वातावरणाची सवय अथवा जाणीव नाही. ह्याउलट भारताच्या सैन्यातील कित्येक सैनिक लडाख च्या भागातले आहेत. लडाख स्काऊट ही भारतीय सेनेच्या मदतीला आहे. गेल्या काही वर्षात भारताने इथल्या दळणवळण साधन, रस्ते, ब्रिज, धावपट्ट्या ह्या सर्वाकडे लक्ष द्यायला सुरवात केल्याने चीन चवताळला आहे. गेले अनेक वर्ष सुप्तअवस्थेत असलेल्या हुकमाचा एक्का भारताने पुन्हा एकदा बाहेर काढलेला चीन ला रुचलेलं नाही. पण भारतावर अरेरावी करण्याचा डाव त्याच्या अंगलट आला आहे. चीन ने जरी मागे जाण्याचा आव आणला तरी ह्या भागात चाललेलं काम चीन ला पचणारे नाही. काही ना काही खुरापत काढून चीन दौलत बेग ओल्डी वर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणारं हे निश्चित आहे. फरक इतकाच आहे की आता गोष्टी तितक्या सोप्या आणि सरळ राहिलेल्या नाहीत. दौलत बेग ओल्डी ह्या जागेची भारताच्या संरक्षणात महत्वाची भुमिका येणाऱ्या काळात असणार आहे.

ता.क. :- ह्या लेखात काही राजकीय संदर्भ आलेले असले तरी ते ह्या लेखाच्या निमित्ताने गरजेचे होते. ह्या पोस्ट चा उद्देश राजकीय नाही. त्यामुळे कोणीही कोणत्याही पद्धतीने ह्या लेखाचा संदर्भ राजकीय पक्षांशी अथवा राजकीय कुरघोडीसाठी लावू नयेत.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment