Saturday, 31 July 2021

भावनाचोरी... विनीत वर्तक ©

 भावनाचोरी... विनीत वर्तक ©


आजवर सोशल मिडीयावर 'लेखनचोरी' हा प्रकार ऐकून होतो पण आता त्यात 'भावनाचोरी' करणाऱ्यांची पण भर पडली आहे. गेली अनेक वर्षं फेसबुकवर लिहीत असताना आपलं लिखाण दुसऱ्याच्या नावाने आपल्याला फॉरवर्ड होण्याचा प्रकार मी अनेकदा अनुभवलेला आहे. लिखाण, साहित्य कॉपीराईट करूनही अनेकदा हे प्रकार सुरू असतात. याच प्रकाराला कंटाळून अनेक चांगल्या लेखकांनी फेसबुक किंवा एकूणच सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरून आपलं लिखाण, साहित्य प्रकाशित न करण्याचाही निर्णय घेतला आहे. अर्थात याने नुकसान जे चांगले वाचक असतात त्यांचं झालेलं आहे. 

अनेक लेखकांनी एकत्र अथवा वैयक्तिक पातळीवर पैसे भरून स्वतःचे लेखन वाचकांसाठी उपलब्ध करून देण्याचा पर्यायही निवडला आहे. तो योग्य की अयोग्य या प्रश्नात मला जायचं नाही, कारण प्रत्येकाचे लिखाण करण्यामागचे उद्देश वेगळे असतात. प्रत्येक लिखाण करणारा/करणारी हे त्याप्रमाणे त्याला योग्य वाटेल तसे निर्णय घेत असतो. ज्याप्रमाणे मॅगी दोन मिनिटात बनून तयार होते, त्याप्रमाणे दोन मिनिटात प्रसिद्ध होण्यासाठी अनेकांनी लेखनचोरीचा पर्याय निवडला आहे. एखादी पोस्ट अथवा साहित्य चांगल्या दर्जाचं अथवा लोकांना आवडतं आहे असं दिसलं किंवा आपल्याला सोशल मिडीयावर मिळालं, की ते आपलंच म्हणून मागचा पुढचा विचार न करता पुढे ढकलून द्यायचं. यात सुशिक्षित आणि समाजातील प्रगल्भ समजले जाणारे लोक जास्ती पुढे आहेत. कारण भारतात या बाबतीत असलेले तकलादू कायदे, तसेच कळलं तरी आपलं कोणी काही उखाडू शकत नाही, असा एक भाव निर्माण झालेला आहे. तसेच कोणी समोर आणलं तरी मला फॉरवर्ड आलेलं मी पुढे टाकलं किंवा चोरी दाखवून दिल्यावर सांगणाऱ्या व्यक्तीला उडवून लावणारे महाभाग खूप आहेत.

आता त्यात भावनाचोरी हा प्रकार सुरू झालेला आहे. दोन दिवसांपूर्वी एक फोटो बघून व्यक्त केलेल्या माझ्या भावना पण लोकांनी शब्दच्या शब्द उचलून आपल्याच नावावर फॉरवर्ड करायला सुरू केल्या. त्यात भरीस भर म्हणून एकांनी चक्क आपला मोबाईल नंबरही त्यात लिहून दिला. जसं काही त्या भावना वाचून लोकांना त्यांच्याशी बोलायची इच्छा झाली तर त्यांना ते सोयीचं जावं. असो व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. एका बाईंनी तर चक्क सांगितल्यावर या माझ्याच भावना आहेत, असं ठामपणे सांगितलं. कोणीतरी त्यांना ह्या भावना विनीत वर्तक यांनी लिहील्याचे पुरावे दिल्यावर त्या म्हणाल्या, 'मला व्हाट्सअपवर फॉरवर्ड आल्या आहेत' असं कारण त्यांनी दिलं. दोन मिनिटांपूर्वी आपल्याच भावना म्हणून ओरड करणारी ही व्यक्ती पुरावे देताच व्हाट्सअपचं कारण देऊन काढता पाय घ्यायला लागली. अर्थात या सगळ्या प्रकारामुळे आपण आपल्याच नजरेत पडतो, याचं कोणतंच शल्य त्यांच्या बोलण्यात जाणवलं नाही. 

लेखनचोरी, साहित्यचोरी आणि आता भावनाचोरी हा सोशल मिडीयावर एक नेहमीच चर्चेत राहिलेला विषय आहे. या विषयावर लेखकाने अथवा ज्याचं ते लेखन आहे त्याने/तिने लिहील्यावर इग्नोर करा, कशाला इतकं लावून घेता इथं पासून ते त्याच्यावर केस करा, सायबर क्राईमकडे तक्रार करा असे अनेक सल्ले दिले जातात. पण हे सगळे उपाय हे जखम झाल्यावर उपचार करण्यासारखे आहेत. जखम होऊच नये अशी वातावरण निर्मिती करण्यात आपण कुठेतरी कमी पडत आहोत असं मला मनापासून वाटतं. जसं की एखादा फोटो, एखादा व्यक्ती, एखादी घटना जरी सर्वांसाठी सारखीच असली, तरी त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आणि त्याची तीव्रता, प्रभाव हा व्यक्तीप्रमाणे बदलत जातो. मग जे आपल्याला जाणवते ते मांडण्यात आपल्याला कसली अडचण. त्यात पण आपण दुसऱ्याचे शब्द चोरून आपल्या नावावर टाकायला लागलो तर निदान आपल्या भावनांशी तरी आपण प्रामाणिक राहणार आहोत का? हा विचार मनात यायला हवा! पण काय आहे की या आभासी जगातील आभासी लाईक, शेअर आणि प्रसिद्धीच्या मागे आपण इतके हपापलेले आहोत की आता आपण भावनाचोर पण व्हायला लागलो आहोत. 

मी लिहीताना नेहमीच 'शब्दांकन' कॉपीराईट करतो. याचा अर्थ असा आहे की ज्या पद्धतीने ती गोष्ट मला जाणवली आणि शब्दातून उतरली ते माझं आहे. बाकी ती वस्तुस्थिती, व्यक्ती अथवा गोष्ट यांवर अनेकांना लिहीता येऊ शकते अथवा अनेकांनी लिहीलेलं असू शकतं. कारण माहिती ही सर्वांसाठी सारखीच उपलब्ध असते. पण त्यातून आपण निवडून कश्या पद्धतीने मांडतो, हे व्यक्तीवर अथवा त्या लेखकावर अवलंबून असते. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश इतकाच की प्रत्येक घटनेवर प्रत्येकाला आपल्या पद्धतीने दृष्टिकोन, मत मांडता येऊ शकतात. जर असं आहे तर लेखनचोरी किंवा साहित्यचोरीची वेळ येऊ नये. जर आपल्याला तसं मांडता येत नसेल पण पुढे अग्रेषित करायचं असेल तर कॉपी-पेस्ट, शेअर असे अनेक पर्याय योग्य ते क्रेडिट देऊन उपलब्ध असतात. 

अर्थात असा विचार करण्याची प्रगल्भता चोरी करणाऱ्या लोकांमध्ये नसते याची जाणीवही आहे. पण कुठेतरी हे सगळं समाजातला जो एक स्तर सवंग प्रसिद्धी आणि सगळं झटपट मिळवण्याच्या नादात ढासळत चालला आहे त्याचं एक प्रतिबिंब आहे. या सगळ्यांमुळे जरी वाईट वाटत असलं तरी एक त्याने लिखाण बंद करणं किंवा सोशल मिडीया पासून दूर जाणं हा उपाय असू शकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. गरुड आणि कावळ्याची एक गोष्ट अनेकांनी वाचली असेल की गरुडाच्या अंगावर बसून कावळा मस्त विहार करतो. गरुड त्यामुळे विचलित न होता आपलं उड्डाण करत राहतो. तो इतक्या उंच हवेत जातो की कावळ्याला श्वास घेणं कठीण होऊ लागतं आणि स्वतःच तो त्याच्या अंगावरून बाजूला होतो. माझ्यामते आपण आपल्या लेखनाचा दर्जा, सातत्य आणि जे मनापासून वाटते ते मांडण्याचं कसब अजून उंचावत नेलं की असे कावळे आपोआप बाजूला होतात. हे गेल्या काही वर्षांच्या अनुभवावरून मला वाटतं. चोरी करणाऱ्याला पण चोरी करताना दोन वेळा विचार करावा लागेल इतकं आपण उंच गेलो की चोरी करण्याच्या उद्देशापासून आपण एखाद्याला परावृत्त करू शकतो. अर्थात त्यातही काही अपवाद असतात, पण अपवाद सगळीकडे असतात त्याचं आपण काही करू शकत नाही. 

माझ्या व्यक्त केलेल्या भावनासुद्धा जर लोकांना चोरी कराव्याश्या वाटत असतील तर नक्कीच माझ्या लेखनाने ती उंची गाठल्याचं समाधान मला आहे. या गोष्टीने नाराज होऊन त्यावर आकांडतांडव करण्यापेक्षा माझी जबाबदारी लिखाणाच्या बाबतीत अधिक वाढल्याची जाणीव माझ्यासाठी जास्ती महत्वाची आहे. त्यामुळे आता भावनाचोरी हा प्रकार पण माझ्या लिखाणाला जोडला गेला आहे त्याचं मी मनापासून स्वागत करतो. अशी भावनाचोरी करून जर कोणाला प्रसिद्धी अथवा मानसिक शांती मिळाली असेल तर ते पण माझं सौभाग्य समजतो. बाकी चोरणारे भावनेतील शब्द चोरू शकतात ती भावना नाही.     

तळटीप :- ही पोस्टही कॉपीराईट करतो आहे. काय माहित थोड्यावेळाने मलाच कोणा दुसऱ्याच्या नावाने फॉरवर्ड येईल.. 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Friday, 30 July 2021

खोटारडा चीन... विनीत वर्तक ©

खोटारडा चीन... विनीत वर्तक ©

१६ जून २०२१ ला चीन ने आपल्या तैशान अणुभट्टी मधे सगळं आलबेल असल्याचं सगळ्या जगाला निक्षून सांगितलं होतं. आज जवळपास महिन्याभराने त्या अणुभट्टीतून विकिरणाचा धोका वाढल्यानंतर चीन ने अणुभट्टी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुळातच आपल्या घरातील सगळं झाकून दुसऱ्याच्या घरात वाकून बघणाऱ्या चीन कडून दुसरं काही अपेक्षित नव्हतं. पण या सगळ्यावर ज्या पद्धतीने दुजाभाव केला जातो आहे त्यावरून आपण खूप काही शिकण्यासारखं आहे. 

कोरोना ची सुरवात चीन च्या वुहान प्रांतातून झाल्याची बातमी अगदी शेवटच्या पानावर कोपऱ्यात देणाऱ्या भारतातील मिडिया ने भारतातल्या डेल्टा विषाणू ने कसं जगाला ग्रासलं आहे याची ठळक बातमी आपल्या फ्रंट पेज आणि ब्रेकिंग न्यूज मधे दिलेली आहे. आताही विकिरणाचा धोका वाढला असताना भारतातील तथाकथित मानवी हक्काचे समर्थक असे सगळे मूग गिळून गप्प आहेत. तैशान अणुभट्टी मधे Électricité de France (EDF) या फ्रांस कंपनीचा ३०% हिस्सा आहे. जरी यात फ्रांस कंपनीचा हिस्सा असला तरी अणुभट्टी चालवण्याची किंवा त्या संदर्भात निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार हे चीनकडे आहेत. या अणुभट्टी च कार्य योग्य रीतीने चालते का नाही हे फक्त बघणं आणि त्या संदर्भात योग्य गोष्टी चीन च्या सरकार किंवा ती अणुभट्टी चालवणाऱ्या संस्थेस सुचवणं एवढीच जबाबदारी या कंपनीवर होती. 

Électricité de France (EDF) ने एप्रिल महिन्याच्या सुरवातीला अणुभट्टी मधील विकिरण गॅस चे प्रमाण वाढत असल्याचं नमूद करून त्याने विकिरणाचा धोका वाढलेला आहे अशी चेतावणी चीन च्या सरकारला आणि अधिकाऱ्यांना दिलेली होती. यावर तोडगा काढण्यापेक्षा चिनी लोकांनी नेहमीप्रमाणे आपल्या झालेल्या चुका लपवण्यासाठी सगळं काही आलबेल असल्याचं जगाला निक्षून सांगितलं. फ्रांस च्या कंपनीने या अणुभट्टी च्या जवळच्या भागात विकिरणाचं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचं नमूद केलं होतं. याचा अर्थ अणुभट्टी मधून मानवाला आणि साऱ्या सजीवांना घातक असणाऱ्या पार्टीकल आणि गॅसेस चा विसर्ग होत होता. फ्रांस च्या कंपनीने ताबडतोब अणुभट्टी बंद करून पुन्हा संपूर्ण अणुभट्टी च्या कामाचा आणि तिथल्या सुरक्षा उपायांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले होते. 

खोटारड्या चीन ने यावर उपाय म्हणून जी विकिरणाची सुरक्षित पातळी एखाद्या अणुभट्टी च्या जवळच्या भागात आंतरराष्ट्रीय कायद्यांप्रमाणे पाळली जाते. ती चीन सरकारने वाढवून फ्रांस कंपनीने दिलेले आकडे हे सुरक्षापातळीच्या आत आहेत असं नमूद करून अणुभट्टी सुरु ठेवली. फ्रांस कंपनीकडे ती अणुभट्टी बंद करण्याचा अधिकार नसल्याने त्यांनी जागतिक पातळीवर याबद्दल आवाज उठवला. यावर चीन ने अणुभट्टीत असलेले ५ इंधनाचे रॉड हे खराब असून ६०,००० रॉड मधून हे अवघे ०.०१% आहे असं म्हणत सगळं आलबेल असल्याचं जगाला निक्षून सांगितलं. भारतासारखा संविधानाने दिलेले हक्क तिथल्या सहिष्णू आणि मानवाधिकार लोकांना नसल्याने त्यांना खोटारड्या चीन मधे आपलं तोंड गप्प करून बसल्याशिवाय पर्याय नव्हताच. 

फ्रांस कंपनीने यातला धोका लक्षात घेऊन चीन वर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव वाढवल्याने चीन ला आपली शेपटी गुंडाळून ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. 'गिरे तो भी टांग उपर' या उक्तीप्रमाणे चीन ने ही अणुभट्टी बंद करताना मेंटेनन्स च कारण दिलं आहे. तसेच कोणतंही विकिरण झालं नसल्याचं म्हंटलेलं आहे. अर्थात आपली चूक कधीही मान्य न करणाऱ्या खोटारड्या चीन कडून तो काही कबूल करेल अशी अपेक्षा बाळगणं पण चुकीचं आहे. पण या काळात झालेल्या विकिरणाचा धोका कित्येक लोकांना जीवघेणा ठरणार आहे हे येणारा काळच सांगेल. कारण अश्या प्रकारच्या विकिरणातून होणारे परीणाम हे खूप वर्षांनी दिसतात जेव्हा तिथल्या लोकांना कॅन्सर सारखे दुर्धर आजार होतील. तूर्तास फ्रांस कंपनीच्या दबावाखाली चीन ने अणुभट्टी बंद केली आहे. पण जर का यात फ्रांस च्या कंपनीचा हिस्सा नसता तर चीन च्या अणुभट्टीतून होणाऱ्या विकिरणाचे परिणाम पर्यायाने सर्व जगाला भोगावे लागले असते. 

फोटो स्रोत :- गुगल (तैशान अणुभट्टी) 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



Tuesday, 27 July 2021

अंतरांचं गणित (भाग २)... विनीत वर्तक ©

 अंतरांचं गणित (भाग २)... विनीत वर्तक © 

मागच्या भागात आपण बघितलं की कश्या पद्धतीने त्रिकोणमिती पॅरलॅक्स' (Trigonometric Parallax) ही पद्धत वापरून अंतरांचं गणित केलं जातं, आणि अश्या पद्धतीने अंतराचे गणित सोडवण्यात कोणत्या मर्यादा आपल्याला येतात. पहिल्या भागात लिहिलं तसं ही पद्धत काही हजार प्रकाशवर्षं मधील अंतराचे गणित करू शकते पण त्यापुढे यावर मर्यादा येतात. विश्वाची व्याप्ती इतकी प्रचंड आहे, की तिकडे किलोमीटरसारखी अंतराची मापकं खूप तोकडी पडतात. लाखो प्रकाशवर्षं लांब असणाऱ्या आकाशगंगा आणि एकूणच जे विश्व आपण बघू शकतो त्याची अंतरं मोजण्यासाठी वैज्ञानिकांना दुसऱ्या पद्धतीचा वापर करावा लागतो. या पद्धतीला surface brightness fluctuations (SBF) असं म्हणतात. 

सरफेस ब्राईटनेस फ्लक्च्युएशन समजून घेण्यासाठी आपल्याला प्रकाशाच्या काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. 
त्या गोष्टी म्हणजे प्रकाश अंतरावर कसा प्रवास करतो आणि प्रकाशाचे रंग कसे त्याचं तपमान आपल्याला दर्शवतात. आपल्या मराठीत एक म्हण आहे, ती म्हणजे 'दुरून डोंगर साजरे' याचा अर्थ असा होतो की लांबून आपण एखादी गोष्ट बघितली की ती अगदी छान, सुस्पष्ट आपल्याला भासते. पण आपण जसे जवळ जाऊ तसे त्यातले खाच-खळगे आपल्याला दिसून येतात. विश्वामधल्या अनंत अंतरावर असलेल्या आकाशगंगेच्या बाबतीत ही म्हण अगदी तंतोतंत लागू आहे. एक उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या टेलिव्हिजन किंवा कॉम्प्युटर स्क्रीनचं घेऊ. जर आपण खूप जवळून बघितलं तर आपल्याला स्क्रीनमधील इमेजचे पिक्सल दिसून येतात. तर लांबून बघितलं तर तीच इमेज अगदी सुस्पष्ट दिसते. लांब पृथ्वीवरून बघताना या दूरवरच्या आकाशगंगा अगदी आपल्याला अश्याच अगदी सुस्पष्ट/गुळगुळीत भासतात. पण जेव्हा त्या जवळ असतात तेव्हा त्यातील ताऱ्यांच्या किंवा एकूणच ती कशी बनली आहे याचा अंदाज येतो (सोप्या भाषेत त्यातील खाच-खळगे आपल्याला दिसतात). जर एखाद्या आकाशगंगेमधील तारे, इतर गोष्टी जे तिला बनवतात हे खडबडीत दिसत असेल तर ती आपल्याला जवळ आहे असं म्हणू शकतो आणि जिच्यामधील तारे आपल्याला अगदी गुळगुळीत वाटतात ती आपल्यापासून लांब आहे असं आपण म्हणू शकतो. 

कोणत्याही आकाशगंगेला तिचं मूळ स्वरूप बघण्यासाठी तिच्या प्रतिमेवर काही काम करावं लागतं ज्याला  power spectrum असं म्हणतात. हे पॉवर स्पेक्ट्रम म्हणजे नक्की काय, तर ज्याप्रमाणे एखाद्या लक्ष्याचा वेध घेण्यासाठी आपण नेम धरतो. नेम धरतो म्हणजे आपण आपल्या डोळ्यांना दिसत असलेला अनावश्यक भाग कमी करतो आणि त्यामुळे लक्ष्य आपल्याला अधिक सुस्पष्टतेने दिसते. आपण लक्ष्यावर योग्य रीतीने निशाणा साधू शकतो. पॉवर स्पेक्ट्रम नेमकं हेच करते. आकाशगंगेच्या प्रतिमेतला नको असलेला प्रकाश काढून टाकते. त्यामुळे काय होते, की या प्रकाशाच्या मागे लपलेले तारे आणि आकाशगंगेची रचना समोर येते. आता आकाशगंगेचा मूळ खडबडीतपणा किंवा गुळगुळीतपणा आपल्यासमोर येतो. वर सांगितलं तसं, की हा गुळगुळीतपणा आणि खडबडीतपणा किती आहे यावरून आपण ती आकाशगंगा आपल्यापासून किती जवळ किंवा किती लांब आहे याचा अंदाज बांधू शकतो. 

पण कसं आहे की नुसत्या खडबडीतपणावरून अंदाज बांधणं म्हणजे निशाणा साधताना वाऱ्याचा वेग, लक्ष्याचा वेग याचा अंदाज न बांधता निशाणा लावणं जो की चुकण्याची शक्यता जास्ती असते. त्यासाठी अजून एका गोष्टीची गरज आपल्याला लागते ती म्हणजे रंग. आता कोणालाही प्रश्न पडेल की यात रंगाचं काय देणं-घेणं. तर रंगाचं महत्व समजण्यासाठी आपण एखाद्या जळत्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे बघू. मेणबत्तीची ज्योत जळत असताना तुम्हाला ती एकाच रंगाची दिसते का? तुम्ही जर निरखून बघितलं तर अनेक रंग तुम्हाला दिसून येतील. लाल, पिवळा, पांढरा, निळा. तर एकाच ज्योतीमध्ये हे इतके अनेक रंग काय दाखवतात? तर हे रंग त्या ज्योतीमधील वेगवेगळं तपमान दाखवतात. लाल रंग हा कमी तपमानाचा, पिवळ्या रंगाचं तपमान थोडं जास्ती, त्यापेक्षा पांढऱ्या रंगाचं आणि सगळ्यात जास्ती तपमान मेणबत्तीच्या ज्योतीत निळ्या रंगाचं असतं. आता लक्षात आलं असेल, की रंग कश्या पद्धतीने आपल्याला तपमानाचा अंदाज देतात. 

आता आपण हळूहळू मेणबत्ती पासून लांब जाऊ. लांब जाऊ तसं आपल्याला दिसून येईल की हे सगळे रंग जाऊन आपल्याला एकच रंग दिसायला लागेल. एखाद्या अंधाऱ्या खोलीत आपण मेणबत्तीच्या जवळ असू तर आपल्याला पुस्तक वाचता येईल. पण जसे लांब जाऊ तसं प्रकाशाची तीव्रता कमी होत जाईल. एकावेळी आपल्याला फक्त दूरवर ती ज्योत नुसती दिसायला लागेल. हे आपल्याला काय सांगते तर प्रकाशाची तीव्रता ही अंतराशी निगडीत आहे. जसं आपण लांब जाऊ तशी ती कमी होत जाते. ही गणिताच्या सूत्रात जर आपण बांधली तर आपण दोन पावलं मेणबत्ती पासून लांब गेलो तर ती चार पट कमी होते. आपण तीन पावलं लांब गेलो तर ती नऊ पट कमी होते. यावरून आपण गणित करू शकतो की समजा मेणबत्तीच्या प्रकाशाची तीव्रता नऊ पट कमी आहे, म्हणजे मी तिच्यापासून तीन पावलं लांब आहे. आता हाच नियम अनंत अंतरावरून येणाऱ्या आकाशगंगेच्या प्रकाशाला लागू होतो. 

खूप लांबून पृथ्वीवर येणारा हा प्रकाश आपल्याला खूप काही सांगतो. अमुक एका आकाशगंगेकडून येणारा प्रकाश कोणत्या रंगाचा आहे, यावरून आपण त्या आकाशगंगेच्या तपमानाचा अंदाज बांधू शकतो. जर समजा तो लाल रंगाचा असेल तर त्या आकाशगंगेतले तारे हे त्यामानाने थंड आहेत. समजा निळ्या रंगाचा असेल तर त्यातील तारे प्रचंड गरम आहेत. ज्या पद्धतीच्या ताऱ्यांचे वर्चस्व त्या आकाशगंगेत असेल त्या पद्धतीचा रंगाचा प्रकाश आपल्याकडे पोहोचतो. प्रकाशाच्या रंगावरून आपण ठामपणे सांगू शकतो, की या आकाशगंगेत गरम ताऱ्यांचे किंवा थंड ताऱ्यांचे वर्चस्व आहे. एकदा का आपल्याला हे कळालं की, किती गरम तारे आहेत आणि त्या आकाशगंगेचा खडबडीत/गुळगुळीतपणा किती आहे, की आपण गणित करू शकतो की असे किती तारे त्या आकाशगंगेत असतील आणि ते किती प्रकाश निर्माण करू शकतात. 

एकदा का आपल्याला कळालं की किती प्रकाश एखाद्या आकाशगंगेत त्यात असलेल्या ताऱ्यांमुळे निर्माण व्हायला हवा की पुढचं काम अतिशय सोप्पं असतं. कारण या आकाशगंगेकडून येणाऱ्या प्रकाशाची तीव्रता आपण मोजली, की वर सांगितलं तसं आपण सहज ती किती लांब असेल याचं गणित करू शकतो. जसं वर सांगितलं (प्रकाशाची तीव्रता नऊ पट कमी आहे म्हणजे मी तिच्यापासून तीन पावलं लांब आहे.) वैज्ञानिक या दूरवरून येणाऱ्या प्रकाशाच्या रंगाचं त्यात लपलेल्या माहितीचं आकलन करून अगदी अचूकतेने त्या प्रकाशाच्या स्त्रोताचे पृथ्वीपासूनच्या अंतराचे गणित करू शकतात. (इकडे अचूकता ही प्रकाशवर्षात असते. त्यामुळे कित्येक करोडो किलोमीटर त्यात तफावत असू शकते हे पण आपण ध्यानात ठेवलं पाहीजे.) 

आता प्रश्न असा आहे की या अंतराच्या गणिताचं आपल्याला काय महत्व आहे? तर अंतरामुळेच आपल्याला खूप काही गोष्टी कळतात. त्या आकाशगंगेचं स्वरूप, विश्वाची उत्पत्ती, कृष्णविवर, डार्क मॅटर, डार्क एनर्जी ते अगदी आपण किती भूतकाळात बघत आहोत याचा अंदाज सुद्धा आपण त्यावरून बंधू शकतो. आपल्याकडे आज आलेला प्रकाश हा अनेकदा पृथ्वीची निर्मिती होण्याअगोदर त्याच्या स्त्रोताकडून निघालेला असतो. आपण अक्षरशः लाखो, करोडो, अब्ज वर्षं भूतकाळात जाऊन काय सुरू होतं याचा अभ्यास करू शकतो. यातून आपण पुढे काय होणार असेल? विश्व म्हणजे नक्की काय? त्याची सीमारेषा काय? अनेक साऱ्या गूढ प्रश्नांची उत्तर शोधू शकतो. त्यामुळेच अंतराचे हे गणित मानवाच्या तांत्रिक प्रगतीमधील एक महत्वाचा टप्पा आहे. या सर्व गोष्टींचा शोध घेणाऱ्या आणि त्यातून अनेक प्रश्नांची उकल करणाऱ्या अनेक अनाम वैज्ञानिकांना माझा नमस्कार. 

समाप्त. 

फोटो स्त्रोत :- गुगल (पहिल्या फोटोत कश्या पद्धतीने अंतर बदलल्यानंतर एखाद्या इमेजमधील पिक्सल दिसतात. दुसऱ्या फोटोत मेणबत्तीच्या प्रकाशातील रंग)   

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



Monday, 26 July 2021

अंतरांचं गणित (भाग १)... विनीत वर्तक ©

 अंतरांचं गणित (भाग १)... विनीत वर्तक ©

अवकाशात दिसणाऱ्या असंख्य लुकलुकणाऱ्या ताऱ्यांकडे बघून अनेकदा आपल्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. त्यातील एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हा तारा किती अंतरावर दूर आहे? ताऱ्यांचे पृथ्वीपासून अंतर मोजण्याच्या प्रकाशवर्ष, पर्सेक,  एस्ट्रॉनॉमिकल युनिट अश्या अंतर मोजणाऱ्या मापन पद्धती आपल्याला माहिती आहेत. पण नक्की नुसतं दुर्बिणीतून निरीक्षण करून अमुक एक तारा आपल्यापासून किती अंतरावर दूर आहे, हे वैज्ञानिक कसं सांगतात किंवा अमुक एक प्रकाश कितीतरी लाख, कोटी, अब्ज वर्षांपासून निघालेला आपल्यापर्यंत आत्ता पोहोचत आहे, याचं अनुमान कसं मांडतात, हा एक कुतूहलाचा भाग आहे. ते कश्या पद्धतीने अंतराचे गणित करतात हे जाणून घेणं खूप रंजक आहे. 

पृथ्वीपासून एखाद्या ताऱ्याचे अंतर मोजण्यासाठी दोन पद्धती वैज्ञानिकांमध्ये प्रचलित आहेत. मी दोन्ही इकडे सांगणार आहे. पण त्या सांगताना काही वैज्ञानिक शब्दांचा आधार घेणार आहे. त्याबद्दल सुद्धा समजेल अश्या भाषेत विवेचन करणार आहे. सगळ्यांत प्रचलित पद्धत जी अंतराचे गणित सोडवण्यासाठी वापरली जाते, तिला 'त्रिकोणमिती पॅरलॅक्स' (Trigonometric Parallax) असं म्हणतात. तर काय आहे ही पद्धत, ज्यातून आपण अंतरांचे गणित करू शकतो?

त्रिकोणमिती पॅरलॅक्स' (Trigonometric Parallax) समजून घ्यायला लांब जायची गरज नाही. आपले डोळेच आपल्याला त्याची जाणीव करून देतील. आपल्या डोळ्यांच्या सरळ रेषेत एखादी पेन्सिल,पेन किंवा कोणतीही वस्तू पकडा. आता एक डोळा बंद करून तिच्याकडे बघा. मग हेच दुसऱ्या डोळ्याने करा. तुम्हाला जाणवेल की त्या पेन्सिल, पेन अथवा वस्तूची जागा मागे असणाऱ्या इतर गोष्टींपासून बदलली आहे. उजव्या डोळ्यातून बघताना ती पेन्सिल डावीकडे सरकली आहे असं जाणवेल तर डाव्या डोळ्यातून बघताना तीच पेन्सिल उजवीकडे सरकली आहे असं जाणवेल. आता हे अनुभवल्यानंतर ती वस्तू डोळ्यांपासून लांब अथवा दूर न्या. तुम्हाला जाणवेल की जशी ती पेन्सिल डोळ्यांपासून लांब जाते, तसं तिचं एखाद्या बाजूला होणं हे कमी होतं. जशी ती डोळ्यांच्या जवळ येईल तसा हा फरक वाढत जाईल. आता एका अंतरानंतर ती पेन्सिल तुम्हाला दोन्ही डोळ्यांनी स्थिर वाटेल. हीच पद्धत त्रिकोणमिती पॅरलॅक्स' (Trigonometric Parallax) मध्ये वापरली जाते. 

आपल्या डोळ्यांच्या दोन बाहुल्यांमधील अंतर हे बदलता येत नसल्याने आपण किती दूर अंतरावर असलेल्या वस्तूमध्ये सापेक्ष फरक बघू शकतो यावर मर्यादा येतात. समजा आपल्या दोन डोळ्यांतील अंतर वाढवत नेलं, तर अजून लांबच्या गोष्टींमध्ये आपण सापेक्ष फरक बघू शकू. हीच पद्धत आपण समजा चंद्र बघण्यासाठी वापरली. एकाच वेळी एखाद्याने चंद्र काश्मीर मधून बघितला आणि त्याचवेळी एखाद्याने कन्याकुमारी इकडून बघितला, तर चंद्र या दोघांना ज्या अंशात दिसेल त्यात सूक्ष्म फरक त्यांना जाणवेल. एकाच वस्तूकडे बघताना दोन बघण्याच्या स्थानात वाढलेल्या अंतरामुळे हा फरक होईल. आपल्या डोळ्यांच्या बाहुल्या वेगळ्या झाल्या असा अर्थ आपण घेऊ. आता हा एक त्रिकोण तयार झाला. काश्मीर मधून बघणारा 'अ' माणूस, कन्याकुमारी मधून बघणारा 'ब' माणूस आणि साक्षात चंद्र म्हणजे 'क'. आता आपल्याला 'अ' आणि 'ब' यातील अंतर माहित आहे. (३६७६ किलोमीटर) जर का आपण 'अ' आणि 'ब' हे दोघे जण कोणत्या अंशातून चंद्राकडे म्हणजे 'क' कडे बघत आहेत हे मोजलं तर आपण 'क' इकडे तयार होणारा कोन किती अंशाचा आहे हे काढू शकतो. (अ + ब + क = १८० डिग्री, आपल्या ५-६ वी मधील गणित). जर आपल्याला 'क' च्या कोनातील अंश कळले, तर पायथागोरसचा नियम वापरून आपण अ आणि क तसेच ब आणि क यामधील अंतर सहज काढू शकतो. तसेच त्यांच्या मध्यापासून चंद्राचं लंब असं अंतर एकदम अचूक असं मिळेल, जे की जवळपास ३,८४,००० किलोमीटरच्या आसपास येईल. यालाच 'त्रिकोणमिती पॅरलॅक्स' (Trigonometric Parallax) असं म्हणतात. 

वर सांगितलं तसं एखाद्या वस्तूकडे दोन ठिकाणांहून आपण किती लांबून बघतो यावर किती लांबच्या गोष्टी मधील सापेक्ष फरक जाणवू शकतो हे अवलंबून आहे.  करोडो आणि अब्जावधी किलोमीटर लांब असलेल्या ताऱ्यांच्या बाबतीत पृथ्वीचा व्यास सुद्धा कमी पडतो. अशावेळी आपल्याकडे अजून एका लांब अंतरावरून एखाद्या ताऱ्याच्या अंतराचे गणित करण्याची संधी असते. ती म्हणजे पृथ्वीचं सूर्याभोवती परिवलन. प्रत्येक ६ महिन्यांनी पृथ्वी आपल्या आधीच्या जागेपासून बरोबर १८० डिग्रीवर असते. हे अंतर आहे सूर्य आणि पृथ्वी यांच्या अंतराच्या दुप्पट (पृथ्वी सूर्याभोवती एका विशिष्ट कक्षेतून फिरते. जर ती १ वर्षात एक फेरी पूर्ण करते तर ६ महिन्यात अगदी उलट दिशेला असते. त्याचवेळी ६ महिन्यापूर्वी असलेल्या अंतरापासून ती दुप्पट अंतरावर असते) म्हणजे २ ए.यु. ( एस्ट्रॉनॉमिकल युनिट) साधारण ३० कोटी किलोमीटर. आता आपले डोळे तब्बल ३० कोटी किलोमीटर अंतरावरून एखाद्या ताऱ्याचे त्याच्या भोवतालच्या ताऱ्यापासून निरीक्षण करतात. दोन्ही ठिकाणांवरून त्या ताऱ्याकडे बघताना किती अंशाचा फरक झाला यावरून आपण त्या ताऱ्याचे सूर्यापासून लंब अंतर काढू शकतो. पण हे तितकं सोप्पं नाही, कारण अवकाशामधील अंतरं इतकी प्रचंड आहेत की बघताना होणारा फरक हा कितीतरी मिली आर्क सेकंदाचा असू शकतो. (१ आर्क सेकंद म्हणजे एका अंशाचा ३६०० वा भाग). एक आर्क सेकंदाचा फरक व्हायला तो तारा किती अंतरावर असू शकेल तर याचं उत्तर आहे २,०६,२६५ ए.यु. ( एस्ट्रॉनॉमिकल युनिट) किंवा साधारण ३१ लाख कोटी किलोमीटर (३१ ट्रिलियन) किंवा ३.२६ प्रकाशवर्षं व यालाच एक 'पर्सेक' असं म्हणतात. 

आता लक्षात येईल की जे तारे हजारो प्रकाशवर्षं दूर आहेत, तिकडे त्यातील सापेक्ष बदल ओळखायला आपल्याला असं तंत्रज्ञान लागेल जे अंशाच्या सूक्ष्मात सूक्ष्म भागाला ओळखू शकेल. कारण आपण पृथ्वीच्या परिवलनाचा व्यास वाढवू शकत नाही. त्यामुळे जर अजून लांबवरच्या ताऱ्यांच्या अंतराचे गणित करायचे असेल तर आपल्याला बघताना होणाऱ्या कोनामधील फरक अजून सूक्ष्म पद्धतीने ओळखणारी यंत्रणा बनवायला हवी. यासाठी युरोपियन स्पेस एजन्सीने डिसेंबर २०१३ मधे सोडलेलं 'गाया' हे यान एका आर्क सेकंदाच्या दहा लाख भागातील एका भागात होणारा सापेक्ष फरक ओळखण्यास सक्षम आहे. हे आकडे ऐकून आपल्याला चक्कर येईल, कारण आधीच १ आर्क सेकंद हा एका अंशाचा ३६००वा भाग त्याचे परत दहा लाख तुकडे केले तर त्यातील एका भागाने कोनात फरक पडला आहे की नाही हे ओळखण्याचं हे तंत्रज्ञान आहे. त्यामुळे हे यान तब्बल ३०,००० प्रकाशवर्षं लांब असलेल्या ताऱ्याच्या अंतराचे गणित करण्यात सक्षम आहे.  

इतकं प्रचंड क्लिष्ट असं तंत्रज्ञान निर्माण करूनसुद्धा आपल्या विश्वातील ताऱ्यांच्या अंतरांचं गणित करण्यात  त्रिकोणमिती पॅरलॅक्स' (Trigonometric Parallax) ला मर्यादा येतात. कारण आपल्याच मिल्की वे आकाशगंगेतील अवघ्या १/३ ताऱ्यांचं अंतर जवळपास अचूकपणे सांगू शकतो. आपलीच आकाशगंगा तब्बल १ लाख प्रकाशवर्षं अंतरावर पसरलेली आहे. मग जे तारे आकाशगंगा अजून लांब आहेत त्यांचं गणित कश्या पद्धतीने केलं जातं, हे आपण पुढल्या भागात बघू. 

क्रमशः 

फोटो स्त्रोत :- गुगल (पहिल्या फोटोत त्रिकोणमिती पॅरलॅक्स' (Trigonometric Parallax) कश्या पद्धतीने काढतात ते दाखवलेलं आहे. दुसऱ्या फोटोत तीच पद्धत अवकाशातील ताऱ्यांच्या अंतराच्या गणितासाठी कशी वापरली जाते. यात आपण लाल रंगाच्या ताऱ्याच्या जागेत कसा सापेक्ष बदल झाला आहे ते दिसून येईल.)   

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Sunday, 25 July 2021

ए वतन तेरे लिए... विनीत वर्तक ©

 काल संध्याकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन कट्टा यांच्यातर्फे आयोजित कारगिल विजय दिवसाच्या पूर्वसंध्येला एका कार्यक्रमाला झूम वरून उपस्थित होतो. प्रमुख वक्ते होते निवृत्त लेफ्टनंट जनरल पाटणकर. त्यांच्या कडून कारगिल विजय गाथा ऐकताना एका सैनिकाचा उल्लेख आला. आज कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने इतिहासाच्या पानात लुप्त झालेल्या अश्याच एका सैनिकाची गाथा आजच्या दिवसाने पुढे ठेवत आहे.   

ए वतन तेरे लिए... विनीत वर्तक ©

हर करम अपना करेंगे

हर करम अपना करेंगे

ए वतन तेरे लिए...... 

दिल दिया है जां भी देंगे

ए वतन तेरे लिए...... 

कर्मा चित्रपटातील हे गीत ऐकलं की आजही अंगावर रोमांच उभे राहतात. पण रोमांच उभं राहणं वेगळं आणि ते प्रत्यक्षात जीवाची बाजी लावून खरं करणं यात जमीन आस्मानाचा फरक आहे. तो जेवढा फरक आहे तेवढाच फरक एक सैनिक आणि एका सामान्य नागरिकात आहे. कारण ज्यांनी कधी कारगिल, द्रास, बटालिक, मश्कोह हा भाग पहिलाच नाही त्यांना कारगिल युद्धाची जाणीव तितकी होणार नाही. कारण युद्ध हे अनुभवावं लागते ते घरात बसून समजून घेता येत नाही. ही गोष्ट आहे अश्याच एका सैनिकांची ज्याने वर लिहलेला प्रत्येक शब्द अनुभवला. आपल्या प्राणाची बाजी लावून भारताच्या सरहद्दीचं रक्षण करण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याच्या या पराक्रमाचे वर्णन त्याच्या कमांडींग ऑफिसर कडून ऐकण्याचं भाग्य मला काल लाभलं. ते म्हणजे निवृत्त लेफ्टनंट जनरल पाटणकर. 

राजस्थान च्या झुंझुणु जिल्ह्यातील एक १९ वर्षाचा तरुण भारतीय सैन्याच्या ८ जट बटालियन मधे १९८० साली दाखल झाला. आपल्या चपळतेने त्याने डोंगर रांगामधील चढाईत निपुणता मिळवली होती. त्याच नाव होतं 'हवालदार शिशराम गिल'. १९९९ ला कारगिल युद्धाचे पडघम वाजल्यावर ऑपरेशन विजय च्या अंतर्गत ८ जट बटालियन ला भारताच्या सरहद्दीच रक्षण आणि त्याच्या आत घुसलेल्या पाकिस्तानी सैनिकांना पळवून लावण्याची जबाबदारी दिली गेली होती. त्यांना १७,००० फूट उंचीवर असलेल्या शत्रूच्या 'मंजू' नावाच्या पोस्ट वर तिरंगा फडकवायचा होता. कारगिल युद्धात शत्रूकडे उंचीचा फायदा होता. भारतीय सैन्याची कोणतीही कारवाई शत्रू डोंगरावरून बघू शकत होता. भारतीय सैन्य दरीत तर शत्रू डोंगरावर दबा धरून बसला होता. डोंगरावर चढाई करण्याची कोणतीही हालचाल आणि शत्रूला त्याचा सुगावा लागणार हे स्पष्ट होतं. 

भारतीय सैन्याकडे एकच पर्याय होता तो म्हणजे शत्रूला चुकवत डोंगर चढाई करायची. रात्रीची वेळ हा एकमेव पर्याय होता कारण सूर्याची किरण आली की शत्रूला सुगावा लागणार. हा सगळा भाग जवळपास १५,००० ते १७,००० फुटावर होता. त्यामुळे चढाई साठी कित्येक तास लागणार होते. शत्रूची एक नजर आणि खेळ खल्लास कारण लपायला एक झाडही त्या उंचीवर नव्हत. सरळसोट ७० ते ८५ अंशाचे कडे समोर होते. प्रतिकूल वातावरण, थंडी अश्या प्रतिकूल वातावरणात वरून होणारा गोळ्यांचा, मोर्टार चा मारा. या सगळ्याला चुकवत आपलं लक्ष्य साध्य करणं हे एक खूप खूप कठीण काम होतं. रात्रीच्या वेळेत ही बर्फापेक्षा थंड असलेल्या कातळांवर चढाई करणं सोप्प नव्हतं. ८ जुलै १९९९ च्या रात्री भारताच्या मदतीला निसर्ग आला. डोंगरावर पावसाचे ढग उतरले. ढग आणि पावसामुळे शत्रूला दरीत काय चालू आहे हे उंचीवरून दिसणार नव्हतं. हीच वेळ होती की लक्ष्याकडे कूच करण्याची. लेफ्टनंट जनरल पाटणकरांनी आपल्या सैनिकांना आज्ञा दिली की सकाळी तिरंगा मंजू पोस्ट वर फडकला पाहिजे. रात्रीच्या अंधारात पाऊस पडत असताना १७,००० फुटावर हाडं गोठवणाऱ्या थंडीत चढून जाण अशक्य अशी गोष्ट होती पण घाबरतील ते भारतीय सैनिक कुठले. क्षणाचा विलंब न करता त्या टीम चा लिडर हवालदार शिशराम गिल ने सांगितलं, 'हम अपना मिशन कामयाब करके लौटेंगे'. 

रात्रीच्या त्या काळजाला थरकाप उडवणाऱ्या अंधारात आणि पावसात हवालदार शिशराम गिल च्या नेतृत्वाखाली भारतीय सैनिकांनी मंजू पोस्ट कडे कूच केलं. अतिशय खडतर आणि अशक्य असणाऱ्या ८५ अंशाच्या कोनातले कडे त्यांनी सर केले. लक्ष्याच्या जवळ येताना पाकिस्तानी सैनिकांना त्यांची चाहूल लागली आणि त्यांनी प्रचंड गोळ्यांचा वर्षाव त्यांच्यावर सुरु केला. मोर्टार आणि गोळ्यांच्या पावसात भारतीय सैनिक लपायला कोणतीही जागा नसताना आपल्या लक्ष्याकडे आगेकूच करत होते. या धुमश्चक्रीत हवालदार शिशराम गिल यांच्या पायाला गोळ्या लागल्या आणि ते जवळपास जायबंदी झाले. परत मागे फिरण्याची मुभा असताना देखील आपण मागे गेलो तर आपल्या सैनिकांच मनोधैर्य खचेल आणि आपलं लक्ष्य पूर्ण होणार नाही. तसेच देशाच्या सुरक्षिततेसाठी दिलेला आपला शब्द खाली पडेल जो आपण आपल्या कमांडिंग ऑफिसर ला दिला होता याची जाणीव असल्याने त्यांनी मागे फिरण्याचा निर्णय न घेता उलट अजून त्वेषाने शत्रूवर गोळीबार करत आपली आगेकूच सुरु ठेवली. जखमी अवस्थेत ही त्यांनी पाकिस्तान च्या १ कमांडिंग ऑफिसर, २ ज्युनिअर ऑफिसर, ३ इतर सैनिकांचा आपल्या गोळ्यांनी वेध घेतला. तब्बल ६ पाकिस्तानी सैनिकांना त्यांनी ढगात पाठवून दिलं होतं. तर अजून ४ सैनिकांना त्यांनी जखमी केलं. त्यांच्या या पराक्रमापुढे पाकिस्तानी सैनिकांनी नांगी टाकली. भारताने सकाळी ३ वाजता मंजू पोस्टवर तिरंगा फडकावला. आपलं लक्ष्य पूर्ण केल्यानंतरच हवालदार शिशराम गिल हुतात्मा झाले.  

हर करम अपना करेंगे

ए वतन तेरे लिए...... 

दिल दिया है जां भी देंगे

ए वतन तेरे लिए.. 

हवालदार शिशराम गिल यांनी अदम्य साहस, पराक्रम आणि देशप्रेम दाखवताना आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या या अभूतपूर्व देशभक्ती बद्दल भारत सरकारने त्यांना 'वीर चक्राने' सन्मानित केलं. काल निवृत्त लेफ्टनंट जनरल पाटणकर यांच्याकडून त्यांच्याविषयी ऐकताना हा पराक्रम किती मोठा होता याची जाणीव झाली. त्यांच्या मते हवालदार शिशराम गिल हे तानाजी मालुसरे होते. कारण त्यांनी मंजू पोस्ट जिंकली पण सरांनी आपला सिंह गमावला.  ९ जुलै १९९९ ला आपल्या वाढदिवसाच्या अवघ्या ७ दिवस आधी त्यांनी देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं. 

आज या गोष्टीला २२ वर्षाचा काळ लोटला पण भारतीय नागरिकात हवालदार शिशराम गिल यांच नाव कुठेच येत नाही. आमच्या पुढच्या पिढीला औरंगजेब आणि मुघल शासक किती चांगले होते हे पद्धतशीरपणे शिकवलं जाते. पण भारतमातेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे हवालदार शिशराम गिल सारखे कित्येक सैनिक इतिहासाच्या पानात जाणूनबुजून लुप्त केले जातात. आज कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने अश्या अनेक विरांच्या स्मृतीस मी कडक सॅल्यूट करतो. तसेच त्यांच्या पराक्रमाचा वारसा माझ्या शब्दातून पुढच्या पिढीकडे देण्याचं एक वचन देतो. 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Saturday, 24 July 2021

'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'... विनीत वर्तक ©

 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'... विनीत वर्तक ©


सद्गुरू श्री वामनराव पै यांनी एक शिकवण दिली आहे, ती म्हणजे "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार". हे वाक्य समजायला मला तरी खूप वर्षं जावी लागली. आयुष्यातील कित्येक वर्षं मी स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत परिपूर्ण करण्यासाठी जगत आलो. या सगळ्या प्रवासात अनेक चांगले-वाईट अनुभव आले. काही चुका मी केल्या, तर काही वेळा न केलेल्या चुकांची शिक्षा मला मिळाली. काहींना मी दुखावलं तर काहींनी मला दुखावलं. सगळ्याची गोळाबेरीज केली तर कुठेतरी परिपूर्ण राहण्याचा अट्टाहास यामागे होता, असं मला उमजून आलं. ती परिपूर्णता ही कोणा दुसऱ्या व्यक्तींसाठी होती, ज्यांच्या गावीही नव्हतं. तसेच ज्या गोष्टींसाठी मी परिपूर्ण व्हायचा प्रयत्न करत होतो, त्या गोष्टी माझ्याशी कधी जुळतंच नव्हत्या. स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत सिद्ध करण्यासाठी आणि त्यातून आपला आनंद शोधण्याचा माझा प्रयत्न मात्र फक्त काही क्षणांसाठीच आनंद देत होता पण खूप काही हिरावून नेत होता. मी त्या काळात अनेक गोष्टी चुकीच्या केल्या आणि चुकीचं वागलो. चांगली माणसं गमावली आणि चुकीच्या माणसांना आयुष्यात स्थान दिलं. 

अचानक काहीतरी घबाड हाताशी लागलं, की आपण ज्या पद्धतीने हावरट बनतो तशीच अवस्था माझीही झाली होती. त्या काळात अनेक चुका मी केल्या. अनेकवेळा नको त्या वादात उडी घेऊन आपणही कोणीतरी महत्वाचं असल्याचं दाखवण्याचा अट्टाहास केला. तेव्हा जाणीव होत गेली, की आपण घडवतो आहे ते शिल्प किती चुकीचं आहे. त्या शिल्पाला परिपूर्ण करण्याच्या नादात किंवा कोणाला तरी चांगलं दाखवण्याच्या नादात आपण त्याचा सगळा चेहरामोहराच बदलवून टाकला आहे. जी प्रतिमा घडते आहे त्यात मी खरा कुठेच नाही. जो आहे तो देखावा. ती वेळ होती जेव्हा त्या वाक्याचा खरा अर्थ मला उमजला. आपल्यापैकी प्रत्येकजण माझ्यासारखंच या बदलातून कधी ना कधी जातो. ती वेळ कधी तरुण असताना येते, तर कधी आयुष्याच्या संध्याकाळी, पण येते मात्र नक्की. अर्थात तिला समजून आपलं शिल्प आपण घडवायचं हे समजण्याची प्रगल्भता किती जण दाखवतात आणि त्यात ते कितपत यशस्वी होतात यावर प्रत्येकाचा आपला अभ्यास असू शकेल. 

आयुष्यात यशस्वी व्हा, चांगले व्हा, नेहमीच चांगलं वागा, दुसऱ्याला दुखवू नका, कोणाचा द्वेष करू नका, सतत चांगला विचार करा आणि अश्या आशयाच्या ढीगभर पोस्ट, पुस्तके आणि ओळी रोज आपल्या कानावर आणि डोळ्यांवर आदळत असतात. 'सतत आनंदी रहा' असं सांगणारे अनेक प्रथितयश पॉझिटिव्ह थिंकर आणि मोटिव्हेशनल स्पीकर आपल्याला नेहमीच आपल्यातच काहीतरी कमी आहे, असं नकळत दाखवून देत असतात. कारण आपण कधी ना कधी दुःखी होत असतो, कळत-नकळत कोणाला तरी दुखावत असतो, कळत-नकळत आपल्याला दुसऱ्या कोणाचा द्वेष वाटतो आणि आपला द्वेष करणारे आपल्याच आजूबाजूला असणारी आपली माणसं असतात. आपण आनंदी राहायचं म्हणजे नक्की काय? ही व्याख्याच आपल्याला समजून येत नाही. मग सुरू होतो परिपूर्णतेचा अट्टाहास, कारण तिथे पोहोचल्यावर तरी आपण आनंदी राहू असे आपल्याला वाटत असते. त्या सगळ्यांत आपण स्वतःचं अस्तित्व विसरून जातो. 

कोण असा आहे, की जो कधी दुःखी नाही झाला? कोण असा आहे, की ज्याची स्वप्नं कधी अपूर्ण नाही राहिली? कोण असा आहे की ज्याने दुसऱ्यांना दुखावलं नाही? कोण असा आहे की ज्याच्यावर समाज बोट ठेवत नाही? अहो जिकडे गुलाबात पण त्याचे काटे मोजणारे आहेत तिकडे आपल्यासाठी वाईट बोलणारे आपल्यावर गॉसिप करणारे, आपल्याच व्यक्तिमत्वाची मज्जा घेत तिखट मीठ लावून सांगणारी माणसं सगळ्यांच्या वाटेला येतात. फरक यात आहे की आपण त्यांना कसं स्वीकारतो. सुंदर दिसणाऱ्या कमळाच्या फुलाला पण चिखलाचा संदर्भ द्यावाच लागतो. त्या प्रमाणे आपल्याही बाबतीत असं बोलणारे आणि गोष्टी चिकटवणारे असतातच की. कालच्या चुकांवर बोट ठेवून सगळ्यांना सांगता येतं पण त्या चुका बदलवून आपला आज, एक पायरी वर नेणं आपल्या हातात असतं. त्या चुका जरी आपल्याशी आयुष्यभर चिकटल्या तरी त्यानंतर आपण काय प्रवास केला, हा फरक तुम्हाला तुमच्या आयुष्याचा शिल्पकार बनवतो. कारण ते घडवलेलं शिल्प त्याच कटू अनुभवातून आकाराला आलेलं असतं. कदाचित समाजाच्या दृष्टीने ते परिपूर्ण नसेलसुद्धा पण ते घडवण्याची जबाबदारी घेणं माझ्या मते आयुष्यात प्रगल्भ होण्याच्या दृष्टीने टाकलेलं एक पाऊल असतं. 

प्रत्येकवेळी आपण सर्वांना आनंदी ठेवू हे शक्य नसते. घरातील चार माणसांना आपण एकाचवेळी आनंदी नाही करू शकत तर समाज फार लांबची गोष्ट आहे. नावं ठेवणारे नावं ठेवणार आणि वाईट बोलणारे वाईट पसरवणार, प्रश्न हा आहे की आपण या सर्वाला सामोरं कसं जातो. गौतम बुद्धाचं एक वाक्य नेहमीच मला आवडते, "अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता जास्ती महत्वाची आहे". प्रत्येकवेळी आपण प्रतिक्रिया न देणं हे केलेल्या गोष्टीचं समर्थन नसतं, तर अनेकदा आपली पायरी सोडून न देण्याची प्रगल्भता असते. आपण कोणाला अडवू शकत नाही पण आपण स्वतःला सावरू शकतो आणि तेच जर आपण योग्य रितीने केलं तर आपण एक पायरी कालच्यापेक्षा वर जातो आणि जे शिल्प उभं राहतं त्याचे शिल्पकार आपणच असतो. म्हणूनच परिपूर्णतेच्या अट्टाहासापेक्षा आपल्या कालच्या असलेल्या शिल्पात आपण काय चांगला बदल केला तेच आपल्याला एक चांगलं शिल्पकार बनवतं. 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



एका वजनाचा प्रवास... विनीत वर्तक ©

 एका वजनाचा प्रवास... विनीत वर्तक ©


असं म्हणतात की एका रात्रीत यश मिळण्यासाठी अनेक रात्री जागाव्या लागतात. कदाचित हाच अनुभव आज 'मीराबाई चानू' घेत असेल. आज संपूर्ण देश तिचं ऑलिम्पिकमधील यश साजरं करतो आहे. पण या यशासाठी गेली कित्येक वर्षं घेतलेली मेहनत आहे. यश-अपयश यांच्यातून रस्ता शोधताना आलेले कटू अनुभव आहेत. यशाच्या शिखरावर असताना आलेला पराभव हा तिच्या आत्मविश्वासाला तडा देणारा ठरला. वेटलिफ्टिंगमधली आपली लय हरवल्यावर तिने आपली आणखी पडझड न होऊ देता आपल्या पुढल्या लक्ष्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि आज ते पूर्ण करून तिने इतिहास घडवला आहे. वेटलिफ्टिंग प्रकारात रौप्य पदक जिंकणारी आणि ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताला पदक मिळवून देणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. 

भारतातील सो-कॉल्ड सुशिक्षित लोक आणि समाज ज्या भारताच्या भागाला आणि तिथल्या लोकांना आपलं मानत नाही, त्याच भागातून मीराबाई चानू येते. मणिपूरसारख्या भारताच्या अतिपूर्वेकडील राज्याचं ती प्रतिनिधित्व करते. अतिशय साधी राहणी आणि दोन वेळची चूल पेटवण्यासाठी जंगलातून लाकडं आणून ती घरी द्यायची. ते करताना आपला वेटलिफ्टिंगचा छंद तिने जोपासला. वजन उचलायचे प्राथमिक धडे जंगलात भटकताना लाकडाचं वजन उचलून तिने गिरवले. कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नसताना तिने आपला प्रवास सुरू ठेवला. 

एकामागोमाग एक स्पर्धा जिंकत आपल्या खांद्यावर अपेक्षांचं ओझं घेत ती २०१६ साली रिओ ऑलिम्पिकला पोहोचली. लहानपणापासून खेळाडू होण्याचं आणि देशासाठी मेडल जिंकण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची ती वेळ होती. पण छोट्या कुटुंबातून जागतिक स्तरावर खेळताना अपेक्षांचं ओझं मात्र तिला डोईजड झालं, आणि आयुष्यातील सगळ्यात मोठ्या कटू अनुभवाला ती सामोरी गेली. स्पर्धा संपताना आपलं भविष्य आणि स्वप्न कोलमडून पडल्याची तिला जाणीव झाली. यात ती निराशेच्या गर्तेत अडकली. पण संपूर्ण तोल जाण्याआधी तिने स्वतःला सावरलं. यात तिचे कोच, भाऊ, कुटुंबीय यांचं मोठं योगदान होतं. मानसिक स्वास्थ सुदृढ करण्यासाठी तिने प्रोफेशनल कोचची मदत घेतली. पुन्हा एकदा तिने २०१७ ला आगमन केलं. आपला दर्जा उंचावत नेला. पण पाठीच्या दुखण्याने आणि खांद्याच्या दुखण्याने ती चाचपडत होती. ऑलिम्पिक स्पर्धा तोंडावर होत्या, पण खांद्याच्या दुखण्याने तिला आपला सर्वोत्तम खेळ खेळायला अडचणी येत होत्या.

भारत सरकार, खेळ मंत्रालाय आणि वेटलिफ्टिंग फेडरेशनकडे तिने उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची मदत मागितली. गेल्या काही वर्षांत खेळ-मंत्रालयानेही  कात टाकली आहे. जिकडे उपचाराच्या नावावर पार्ट्या व्हायच्या, पैसे इकडून तिकडे व्हायचे आणि खेळाडूंच्या पदरी निराशा यायची. ह्या सगळ्यांत आता बदल झाला आहे. त्यामुळेच जेव्हा तिने सरकारकडे याबद्दल मदत मागितली, तेव्हा तिच्या उपचारांची गरज लक्षात घेऊन भारत सरकारने तिच्या अमेरिकन दौऱ्यासाठी तब्बल ७१ लाख रुपयांचा खर्च केला. अमेरिकेत जाऊन योग्य उपचार आणि मार्गदर्शन घेतल्यावर ती टोकियो ऑलिम्पिकसाठी तयार झाली. 

आज जेव्हा भारतासाठी तिने पहिलं पदक जिंकलं, तेव्हा देशाने तिच्यावर केलेल्या खर्चाची तिने व्याजासकट आणि ऋण न फेडता येणाऱ्या अश्या क्षणांनी परतफेड केली आहे. जंगलातून लाकडं गोळा करणारी मुलगी ते ऑलिम्पिक रौप्य पदक हा तिचा प्रवास सगळ्यांना प्रोत्साहन देणारा आहे. पण त्याचवेळी भारतीयांसाठी अनेक गोष्टी उघड्या पाडणारा आहे. आज जिकडे सगळ्या सुखसोयी उपलब्ध असणारी तरुणपिढी ड्रग्स, सेक्स, दारू, नशा आणि जस्ट-चिल म्हणत आपल्या उद्दिष्टापासून भरकटते आहे, तिकडे गावांतून कोणत्या सोयी उपलब्ध असणाऱ्या भारताचे खेळाडू भारताला पदक मिळवून देत आहेत. 

१३४ कोटी भारतीयांमधून फक्त १२७ भारतीय १८ विविध खेळांसाठी पात्र ठरले आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी बाबही आहे. आपल्यापेक्षा कितीतरी छोटे देश सुविधा नसताना ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत आपलं नाणं खणखणीत वाजवत असतात. पण आपण मात्र दरवेळी त्यात कमी पडतो यावर विचार आणि कृती करण्याची गरज आहे. एकावेळी जिकडे हा विरोधाभास दिसून येतो, तिकडे 'मीराबाई चानू'चे यश अजून जास्ती खुलून दिसते. तिने केलेला वजनाचा प्रवास भारताच्या चमूतील इतर खेळाडूंना प्रोत्साहन देणारा ठरेल आणि अशी अनेक पदकं भारताच्या नावावर लागतील, याच आशेने तिचं आजचं यश साजरं  करतो आहे. मिराबाई चानू, प्रत्येक भारतीयाला तुझा अभिमान आहे आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


  


Tuesday, 20 July 2021

एक आशेचा किरण... विनीत वर्तक ©

 एक आशेचा किरण... विनीत वर्तक ©

कोरोनाची दुसरी लाट आता थोडी ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. भारत सोडून भारताच्या साऊथ ईस्ट एशिया असणाऱ्या देशांमध्ये मात्र कोरोना ने हाहाकार माजवला आहे. सध्या अश्याच कठीण परिस्थिती मधे मी काम करत आहे. कोरोना चे वेगवेगळे व्हेरिएंट समोर येत आहेत आणि ते आधीच्या विषाणूपेक्षा जास्ती वेगाने प्रसार होण्यास कारणीभूत ठरत आहेत. एकूणच कोरोना विषाणू आणि त्याचा शरीरावर होणारा परीणाम, त्याला विरोध करण्यासाठी शरीरात तयार होणारी प्रतिकारशक्ती, तसेच या सगळ्यात कोरोना लसी च मिळणारं पाठबळ या सर्वांचा अभ्यास सध्या जगात सुरु आहे. त्यातून काही निष्कर्ष पुढे आलेले आहेत. नुकत्याच झालेल्या अभ्यासावरून जे निष्कर्ष पुढे आले आहेत त्यात आशेचा एक किरण दिसून येत आहे. तर काय आहे हा अभ्यास आणि त्याचे निष्कर्ष? 

युनायटेड किंगडम मधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाची अस्रझेनेका ही लस कोरोना चे धोके कमी करण्यासाठी जगभरातील ८० पेक्षा देशात दिली जात आहे. भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया याच लसीची निर्मिती 'कोव्हीशील्ड' नावाने करत असून आजवर भारतातील ज्या ४० कोटी पेक्षा जास्त भारतीयांच लसीकरण झालं आहे. त्यात सगळ्यात मोठा वाटा हा याच लसीचा आहे. तर यु.के. मधे जो अभ्यास या लसीवर सुरु आहे. त्यातून काही चांगले निष्कर्ष पुढे आलेले आहेत. या लसी घेतल्यानंतर आपल्या शरीरात अँटीबॉडी ची निर्मिती होते. याच अँटीबॉडी कोरोना विषाणू विरुद्ध शड्डू ठोकून त्याचा नायनाट करतात. पण या अँटीबॉडी काही विशिष्ठ काळ आपल्या शरीरात राहतात. त्याचसोबत ही लस शरीरात 'टी सेल्स' ची निर्मिती करण्यासाठी शरीराला प्रशिक्षण देतं राहते. संपूर्ण शरीरात या 'टी सेल्स' च जाळ निर्माण करून कोरोना पासून आपलं संरक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. 

आपल्या शरीरात नक्की कश्या पद्धतीने कोरोना च्या विषाणू ला मारलं जाते त्यासाठी शरीराची कोणत्याही विषाणू च्या विरुद्ध लढण्याची प्रक्रिया सोप्या शब्दात समजून घ्यावी लागेल. कोणत्याही विषाणू, जिवाणू, अँटीजेन च आपल्या शरीरात आगमन झालं की आपल्या पांढऱ्या रक्त पेशीत असणारे 'बी सेल्स' हे काम करायला सुरवात करतात. हे बी सेल्स आपल्या हाडांच्या मधे म्हणजे बोन मॅरो मधे जन्माला येतात आणि तिथे त्यांची वाढ होते. हे बी सेल्स आणि वर सांगितलेले टी सेल्स मिळून प्लास्मा सेल बनवतात ज्या पुढे अँटीबॉडी बनवून विषाणूंचा खात्मा करतात. हे दोन्ही सेल्स आपल्या इम्यून सिस्टीम चा भाग आहेत जी अश्या विषाणू आणि जिवाणू सोबत लढा देऊन शरीराला निरोगी ठेवते. (ही प्रक्रिया तशी गुंतागुंतीची आहे. त्यामुळे त्यातील वैद्यकीय भाषेला सोपं करून सांगितलेलं आहे.). यातील टी सेल्स शरीरात जास्त काळ रहात नाहीत पण बी सेल्स मात्र शरीरात राहतात. पुन्हा समजा जर अश्या कोणत्याही विषाणू, जिवाणू च आक्रमण जर शरीरावर झालं तर शरीराच्या इम्यून सिस्टीम ला संदेश देऊन पुन्हा त्यांच्यावर आपल्या साथीदारांच्या म्हणजेच टी सेल्स च्या मदतीने हल्ला करतात.  

एडेनोव्हायरस लसी म्हणजेच अस्रझेनेका / कोव्हीशील्ड या ज्या लोकांनी घेतल्या आहेत त्यांचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलेलं आहे की यांनी आपल्या शरीरात खूप काळ वास्तव्य करणाऱ्या फायब्रोब्लास्टिक रेटिक्युलर सेल मधे प्रवेश केलेला आहे. हेच सेल टी सेल्स प्रमाणे काम करण्यास सक्षम आहेत. याचा असा निष्कर्ष निघतो की शरीरातले टी सेल जरी काही काळाने नष्ट झाले तरी लसीमुळे आपल्या शरीरात खूप काळ राहणारे फायब्रोब्लास्टिक रेटिक्युलर सेल हे टी सेल्स प्रमाणे कार्यरत राहतात. त्यामुळे एडेनोव्हायरस लसी घेतलेल्या लोकांना कदाचित आयुष्यभर कोरोना पासून लढण्याची शक्ती मिळण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. अर्थात हा काही प्रयोगात समोर आलेला निष्कर्ष आहे. अजून यावर संशोधन किंवा या निष्कर्षाला वेगवेगळ्या पद्धतीने पडताळून बघणं हे संशोधन अजून सुरु आहे. पण तूर्तास समोर आलेला हा निष्कर्ष दिलासा देणारा आहे. 

अजून याच विषयावर जो वेगवेगळा अभ्यास सुरु आहे त्यातून आलेले काही निष्कर्ष समाधान देणारे आहेत. अजून एक महत्वाचा निष्कर्ष जो समोर येतो आहे तो म्हणजे लसींच मिक्स एन्ड मॅच चा. एडेनोव्हायरस लसी म्हणजेच अस्रझेनेका / कोव्हीशील्ड आणि एम आर एन ए बेस वर असलेल्या फायझर आणि मोडेना लसींचे डोस जर मिक्स केले तर जास्ती चांगल्या पद्धतीने कोरोना विषाणू च्या विरुद्ध इम्युनिटी निर्माण होतं असल्याचं पुढे येत आहे. चार आठवड्यांच्या अंतराने या लसी दिलेल्या होत्या. तसेच आधी कोव्हीशील्ड आणि मग फायझर ची लस घेतल्यास सगळ्यात जास्ती इम्युनिटी निर्माण होतं असल्याचा निष्कर्ष ही या संशोधनातून पुढे आला आहे. दोन कोव्हीशील्ड लसींच्या डोसा पेक्षा अश्या पद्धतीने मिक्स-मॅच केल्यास कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यास आपलं शरीर अतिशय चांगल्या पद्धतीने तयार होत असल्याचं पुढे आलं आहे. या दोन्ही लसीमधील अंतर १२ आठवडे केल्यावर काय होते यावर पुढील संशोधन सुरु आहे. कोव्हीशील्ड  लसीचा तिसरा बूस्टर डोस घेतल्यास तयार झालेल्या अँटीबॉडी अल्फा, बीटा आणि डेल्टा अश्या सर्व प्रकारच्या कोरोना विषाणूंना लढा देण्यास समर्थ असल्याचं ही या प्रयोगातून समोर आलं आहे. 

हे सगळे निष्कर्ष कुठेतरी आशेचा किरण असले तरी कोणतीच लस कोरोना चा संसर्ग थांबवू शकत नाही. त्यामुळे 'ऑफेन्सिव्ह डिफेन्स' हेच आपलं मुख्य शस्त्र बनवण्याची गरज आहे. मास्क वापरणे, गर्दी ची ठिकाण शक्य होतील तितकी टाळणे तसेच इतर कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आणि न होण्यासाठी घ्यावा लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी आपल्याला कसोशीने पाळाव्या लागणार आहेत. तूर्तास आपल्यासोबत इतरांची काळजी आपल्या वागण्यातून घेणं हे सगळ्यांनी अंगिकारण्याची गरज आहे. 

तळटीप:- वरील लिहलेल्या गोष्टी या प्रयोगातून समोर आलेल्या आहेत. त्या सर्वमान्य होण्यास काही कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे लसींच्या बाबतीत पुढे जाताना योग्य वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज आहे तसेच कोरोना टाळण्यासाठी मास्क, अंतर आणि हात वरचेवर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Monday, 19 July 2021

पैश्याचं गणित... विनीत वर्तक ©

 पैश्याचं गणित... विनीत वर्तक ©


पैसा कोणाला नको असतो? प्रत्येकजण नाही म्हटलं तरी पैश्याच्या मागे धावत असतो. रात्रीचा दिवस करून, एक वेळ उपाशी राहून कोणी पैसे कमावते तर कोणी एकमेकांना फसवून, चोरी किंवा विश्वासघात करून. पैसे कमावण्याला जेवढं डोकं लागत नाही तेवढं डोकं तो सांभाळून ठेवायला आणि त्याला वाढवण्यासाठी लागतं. इकडेच सामान्य माणूस पैश्यांच्या गणितात मार खातो. पैसे कमावले म्हणजे आपण ध्येय साध्य केलं, असा आनंद साजरा करण्याच्या नादात आपली नजर हटते आणि दुर्घटना घडते. 

आपली नजर हटण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यातील महत्वाची म्हणजे पैश्याची हाव. थोडे पैसे मिळाले की अजूनच्या मागे आपण लागतो. त्या अजूनसाठी पुन्हा तेवढेच कष्ट करण्याची नि तितका काळ थांबण्याची आपली तयारी नसते. मग सुरू होतो झटपट पैसे कमावण्याचा शोध आणि त्याचवेळी आपण सहज सावज बनतो, टिपून बसलेल्या पैश्यांच्या शिकाऱ्यांचे. अनेक वेगवेगळ्या रूपांत आपल्यासमोर ते बागडत असतात आणि योग्य वेळेची वाट बघत असतात. कधी इंश्युरन्स एजंट बनून तर कधी मालमत्ता विकणारे बनून, कधी शेअर बाजारातले ब्रोकर बनून तर कधी फायनान्शियल एक्स्पर्ट बनून. कारण त्यातून त्यांची पोळी किती भाजली जाणार हे ठरलेलं असतं. जितक्या मोठ्या खड्ड्यात ते तुम्हाला घालतील, तितकीच मोठी त्यांची कमाई असते. जेवढी समोरच्याची हाव मोठी तितका मोठा खड्डा तो स्वतःसाठी खोदत असतो. फक्त त्यात ढकलण्याचं काम ही लोकं करत असतात. एकदा का त्यात पडलं की तुम्ही कितीही तडफड करा, शिव्या-शाप द्या किंवा आरडाओरड करा, तुमचं नुकसान हे ठरलेलं असतं. कारण अश्या वेळी आपली माणसंही बाजूला होतात. अर्थात याला काही अपवाद असतील आणि असावेत. पण त्या अपवादांच्या जोरावर आपण खड्डा खोदायचा का? हा विचार आपण करायला नको का? 

भाजीवाल्याकडे प्रत्येक बटाटा आणि टोमॅटो निरखून घेणारे आपण हॉटेलच्या आलिशान मिटींग रूम मधे बसून लेक्चर ऐकतो, 'लाखोचे चेक मला येतात', तुम्ही अजून ३ मेंबर करा, मग तुम्हाला पण असेच चेक येतील' असं म्हणणारे जे असतात त्यांच्याकडे आपण फॉर्म १६ ची मागणी किंवा त्यांनी त्या चेकवर भरलेल्या रकमेचा आयकर भरला आहे की नाही, याची तपासणी करण्याची तसदी पण आपण घेत नाही. दुसऱ्या कोणी आणलेला किंवा दिलेला शर्ट कधी न घालणारे आपण दुसऱ्यांनी कोणीतरी सांगितलं म्हणून डोळे बंद करून हजारोंच -लाखोंची गुंतवणूक करतो. मग खड्ड्यात पडल्यावर दोष कुणाचा? त्या सांगणाऱ्याचा की न विचार करता त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून गुंतवणूक करणाऱ्या आपला? दोन टक्के जास्ती मिळतात म्हणून जास्ती जोखीम पत्करणारे आपण, त्या जोखमीचे चटके बसल्यावर दुसऱ्यांना दोष का देतो? आज अगदी प्रथितयश असणारे म्युच्युअल फंडसुद्धा कराराची कागदपत्रे नीट वाचून त्यातील नियम,अटी समजून घेऊन गुंतवणूक करायला सांगतात. आपल्यापैकी कितीजण ते नियम वाचतात? हेच एल.आय.सी., इंश्युरन्स पॉलिसी, मेडिक्लेम या सर्वांच्या बाबतीत लागू आहे. माझा २ कोटींचा मेडीक्लेम आहे, हे आपण मोठ्या आवाजात सांगतो, पण त्यात किती आजारांच संरक्षण आहे? जी रक्कम सांगितली गेली आहे, ती मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे, तब्येतीच्या तक्रारी आणि आधी असलेले आजार यांचा समावेश अथवा वगळलेले आहेत, याच्या अभ्यासासाठी आपण वेळ घेतो का? जर आपल्याला गरजेच्या वेळी आपण काढलेल्या पॉलिसीचे पैसे मिळाले नाहीत तर त्या २ कोटींचा उपयोग काय? 

 आपल्या भावंडांना मग ते सख्खे असो वा चुलत, काही शे रुपयांची मदत करताना कुरबूर करणारे आपण सोशल मिडियावरून भरभरून वाहणाऱ्या करुणामयी आणि मदतीच्या आवाहनांना शहानिशा न करता बिनदिक्कतपणे हजारो आणि लाखो रुपये देऊन मोकळे होतो? समोरचा माणूस कधी भेटलेला नसताना त्याच्यावर असणारा आपला विश्वास हा आपल्या रक्तातील माणसांपेक्षा जास्ती असतो. मग समोरच्याने खड्ड्यात ढकलले तर चुकीचं कोण? ढकलणारा की मागचा पुढचा विचार न करता विश्वास ठेवणारे आपण? इकडेही अपवाद असतील. वेगवेगळे अनुभव असतील पण त्या अनुभवांतून आपण शिकलो नाही, तर आज तो तर उद्या दुसरा आपला फायदा घेत राहणार. मग आपण कष्टाने कमावलेल्या पैश्याचं नियोजन जर आपण करत नसू तर त्याचा दोष कोणाचा? 

पैसे कसे गुंतवावे किंवा आपल्याकडे असलेल्या पैश्याला कश्या प्रकारे वाढवावं हे सांगणारे आज अनेक लोक आहेत. नक्कीच या बाबतीत त्यांचा सखोल अभ्यासही असेलच. पण ढोबळमानाने आपण आपल्याकडे असलेल्या पैश्याचं गणित शिकलो तर निदान खड्ड्यात जाण्याची परिस्थिती तरी नक्कीच टाळू शकतो. समजा १०० रुपये उत्पन्न असेल तर ६०-७० रुपये आपला खर्च मानला तर उरलेल्या ३०-४० रुपयांचं नियोजन करण्यासाठी खरंच तज्ञ माणसाची मदत घ्यायची का? हा निर्णय प्रत्येकाने घ्यायचा आहे. त्या ३०-४० रुपयांमधले १०-२० रुपये आपल्या अकल्पित येणाऱ्या खर्चासाठी. १०-२० रुपये पॉलिसी, मेडिक्लेमसाठी आणि उरलेले १०-२० रुपये जोखमीच्या परतावा असणाऱ्या गोष्टींसाठी असा सरळ साधा हिशोब आपण करूच शकतो. अर्थात हा बेस झाला. त्यावर आपण इमारत कशी उभारणार त्यासाठी त्यातील तज्ञांची मते नक्कीच निर्णायक ठरू शकतील. 

पैश्याचं गणित म्हणजेच त्याचं नियोजन जर आपण योग्य पद्धतीने केलं तर आपण स्वतःला खड्ड्यात जाण्यापासून वाचवूच शकतो. जरी कधी खड्ड्यात पडलो तरी योग्य नियोजनाची शिडी त्यातून बाहेर पडायला नक्कीच मदत करते. व्यवहार करताना नाही म्हणता येणं सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे. नात्यातलं असो वा आपल्या जवळचं असो, नाती आणि व्यवहार हे वेगळे ठेवता यायला हवेत. मदत आणि कर्तव्य हे व्यवहाराचा भाग नाहीत, हे पण त्याच वेळी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण पैश्याचं गणित जुळवताना नातेसंबंधांचं गणित पण चोख ठेवता यायला हवं. अनेकदा आपण यात गल्लत करतो आणि दोन्हीकडून माती खातो. त्यामुळेच आपली नजर हटवू नका आणि दुर्घटनेचा भाग बनू नका. 

जनहितार्थ जारी. 

तळटीप :- हा लेख कोणत्याही व्यक्ती,अथवा गोष्टीशी संबंधित नाही. तसेच त्यातून यात कोणत्याही एजंट अथवा आर्थिक तज्ञ तसेच कोणत्याही पॉलिसी अथवा स्कीमला दुखावण्याचा अथवा अयोग्य पद्धतीने सांगण्याचा हेतू नाही. लेखाचा उद्देश फक्त आपलं आर्थिक गणित शिकण्याचा आहे.  

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Saturday, 17 July 2021

#खारे_वारे_मतलई_वारे (भाग १२)... विनीत वर्तक ©

 #खारे_वारे_मतलई_वारे (भाग १२)... विनीत वर्तक ©


जागतिक पटलावर सध्या अनिश्चिततेचं वादळ घोंघावत आहे. एकीकडे कोरोना महामारीच्या लाटा वेगाने सर्व जगात येत आहेत, तर दुसरीकडे धार्मिक आणि वैचारिक शीतयुद्धं सुरू झालेली आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून जिकडे भारतात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा झपाट्याने कमी झाला, तिकडेच जगात कोरोनाने अजून एका लाटेचा तडाखा द्यायला सुरूवात केली आहे. आजच भारत जगात रोज वाढ होणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत चौथ्या स्थानावर खाली आला आहे. इंडोनेशिया, ब्राझील, युनायटेड किंग्डमनंतर भारताचा नंबर आहे. भारताची लोकसंख्या लक्षात घेता हा आकडा जागतिक प्रमाणावर ज्या वेगाने रुग्णसंख्येत वाढ होते आहे, त्यामानाने खूप कमी आहे. पण ही परिस्थिती कधीही उलट होऊ शकते. त्यामुळेच कोरोना महामारीचं संकट आता जगापुढील सगळ्यांत मोठा प्रश्न बनलेलं आहे. 

एकीकडे कोरोनामुळे जिकडे जागतिक अर्थव्यवस्थेची घडी विस्कटलेली आहे, तिकडेच काही देशांमधील खालावत जाणारी परिस्थिती भारतापुढे एक आव्हान बनू पाहत आहे. जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये घुसून तालिबानी वर्चस्वाला शह दिला, त्यानंतर भारताने तिथे स्थापन झालेल्या लोकशाही राष्ट्र निर्मितीमध्ये भरीव योगदान देण्यास सुरूवात केली. आत्तापर्यंत विकासाच्या जवळपास ४०० पेक्षा जास्ती प्रकल्पांमध्ये भारताने हजारो कोटी रुपयांचं भांडवल गुंतवलेलं आहे. दळणवळण, वैद्यकीय, ऊर्जा निर्मिती, बांधकाम तसेच अफगाणिस्तानच्या लोकांना उपयोगी पडतील अश्या प्रत्येक कामात भारताचा सहभाग राहिलेला आहे. त्यामुळेच इथल्या प्रत्येक कामावर भारताच्या तिरंग्याची छाप दिसून येते. पण गेल्या काही महिन्यांत इथली परिस्थिती झपाट्याने बदललेली आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यापासून तालिबानने आपलं वर्चस्व सगळीकडे प्रस्थापित करायला सुरूवात केली आहे. अफगाणिस्तानमधील बराचसा प्रदेश आता तालिबान अधिपत्याखाली येत चालला आहे. 

तालिबानने काही दिवसांपूर्वीच एक फतवा काढला असून १५ वर्षांच्या वरील प्रत्येक मुलीने आणि ४५ वर्षांच्या खाली असणाऱ्या विधवेने तालिबानी सैनिकांशी लग्न करून त्यांची दासी बनण्याचा आदेश दिला आहे. अफगाणिस्तानातील प्रत्येक मौला आणि मौलवीला त्यांच्या भागातील प्रत्येक मुलीची माहिती तालिबानला देण्याचे आदेश दिले गेले आहेत. स्त्रियांचे शिक्षण संपूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे. तसेच हा कायदा मोडणाऱ्याचा भर रस्त्यात शिरच्छेद करण्याचा आदेश दिला आहे. तिथल्या स्त्रियांच्यावर होणाऱ्या अमानवीय अत्याचाराला सुरूवात झालेली आहे. अर्थात यावर आपल्याच देशात हिंदू धर्मातील देव आणि चालीरीती यावर भरभरून बोलणारे पत्रकार आणि सहिष्णु लोक मूग गिळून गप्प बसलेले आहेत. या बातमीची वाच्यताही भारतातील कोणत्याही मिडिया हाऊसने केलेली माझ्या तरी बघण्यात नाही. तर या सगळ्या गोंधळात एकूणच भारत सध्या अतिशय धोक्याच्या वळणावरून जात आहे. 

गेल्या काही आठवड्यांत भारताचे परराष्ट्र मंत्री विविध दौऱ्यांवर असून त्यांनी गुप्तपणे तालिबानच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन भारताचे हितसंबंध तालिबानी राजवटीत जपण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत, अश्या बातम्या येत आहेत (निश्चित असं यावर काही सांगता येत नाही). येत्या काळात अफगाणिस्तानवर तालिबान शासनव्यवस्था येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. अश्या वेळेस भारताने केलेली विकास कामं तसेच तेथे काम करत असलेले भारतीय यांची सुरक्षा हा मुद्दा सगळ्यांत महत्वाचा आहे. भारताची तालिबानी राजवटीबद्दलची मतं आणि सध्या तिथली परिस्थिती बघता भारताने अंगिकारलेलं धोरण योग्य म्हणता येईल. कारण भारताची लोकशाही व्यवस्थेची इच्छा पूर्ण करण्यासाठी सैन्य अफगाणिस्तानात उतरवणं किंवा तिथल्या तालिबानी शासनाचा विरोध करून सगळ्यावर पाणी सोडणं भारताला परवडणारं नाही. पाकिस्तानच्या सीमेवर तालिबानी फौजा येऊन पोहोचलेल्या आहेत. गेल्याच आठवड्यात अफगाणिस्तानचे पाकिस्तानमधील राजदूत नजीबुल्ला अलिखील यांच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आलेले आहेत. एकंदरीत येत्या काही महिन्यांत अफगाणिस्तानाची वाटचाल अत्याचाराचं केंद्र बनण्याकडे सुरू झालेली आहे. त्याचे मोठे फटके पाकिस्तान तर काही फटके भारताला बसणार हे उघड आहे. 

अफगाणिस्तानात आपलं लक्ष्य पूर्ण केल्यावर खरे तर गोंधळ सुरू करून अमेरिकेने आपलं पुढलं लक्ष्य चीनकडे वळवलं आहे. चीन आणि त्याची आर्थिक महासत्ता होण्याकडे होत असलेली वाटचाल अमेरिकेसाठी धोक्याची घंटा वाजलेली आहे. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी अमेरिका नाटो, जी-७, जी-२० आणि क्वार्ड ग्रुप अश्या विविध पातळीवर वेळप्रसंगी चीनच्या शत्रूंना सोबत घेऊन चीनला काटशह देण्यासाठी चाली खेळत आहे. नुकतेचं अमेरिकेच्या सिनेटने एक नवीन प्रस्ताव पास केला आहे. ज्यामुळे अमेरिका-चीन संघर्ष शिगेला पोहोचणार आहे. अमेरिकेच्या सिनेटने The Uyghur Forced Labor Prevention Act हा प्रस्ताव एकमताने मंजूर केला आहे. ज्यात अमेरिकेने उयघूर इथे मुसलमान धर्माच्या लोकांवर अत्याचार करून त्यांच्याकडून जबरदस्ती काम करून घेतल्याबद्दल चीनच्या झिनजियांग प्रांतात बनलेल्या कोणत्याही वस्तूला अमेरिकेन बाजारात विकण्यास बंदी आणली आहे. झिनजियांग प्रांत हा चीनमधील औद्योगिक दृष्टीने सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्यावर अंकुश म्हणजे चीनच्या मालावर एक प्रकारे बहिष्कार. झिनजियांग प्रांतात चीनमधील ८६% कापसाचे उत्पादन होते. चीनमधील नॅचरल गॅसचे सगळ्यात जास्ती उत्पादन इकडेच होते. इकडेच सगळ्यात जास्ती तेलाचे आणि गॅसचे साठे सापडलेले आहेत. एकूणच काय तर ज्या गोष्टी कुठल्याही प्रकारे झिनजियांग प्रातांशी निगडित आहेत त्याला अमेरीकन बाजारात जागा नाही. 

अमेरिकेचं हे पाऊल चीनला खूप मोठी इजा करून जाणारं आहे. अमेरिकेने हा प्रस्ताव मंजूर करून एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. एकतर चीनच्या वाढत्या वर्चस्वावर अंकुश आणि दुसरं म्हणजे चीनमध्ये उयघूर मुस्लिम लोकांवर होणाऱ्या अन्यायाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं आहे. ज्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. आपल्या स्वार्थासाठी मूग गिळून गप्प बसलेली मुस्लिम राष्ट्रं या निमित्ताने आपलं तोंड उघडणार आहेत हे उघड आहे. चीनला या सर्व शंकांना उत्तर देण्याची गरज पडणार आहे. अर्थात या सगळ्या गोष्टी चीनच्या एकूणच वाटचालीमध्ये कितपत आडव्या येतील हे काळ ठरवेल. पण ज्या पद्धतीने अमेरिका आणि चीन यांचे संबंध ताणले जात आहेत, ती एका नवीन शीतयुद्धाची सुरूवात आहे हे नक्की आहे. इतिहास सांगतो की अमेरिका शीतयुद्धात रशियासारख्या राष्ट्राला पुरून उरलेली आहे. अर्थात तो काळ वेगळा होता पण तरीसुद्धा चीनची खूप मोठी शक्ती इकडे खर्च होणार आहे आणि याचा स्वाभाविक फायदा भारताला होणार आहे आणि आपल्या नुकसानीपेक्षा भारताला होणारा फायदा हीच चीनची खरी दुखरी नस आहे. कारण आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया खंडामध्ये चीनच्या वर्चस्वाला शह देण्याची ताकद एकाच राष्ट्रामध्ये आहे. तो म्हणजे भारत. भारताची वाढलेली ताकद चीनला परवडणारी नाही. 

एकूणच काय तर आंतरराष्ट्रीय पटलावर वाहणाऱ्या वाऱ्यांनी प्रचंड वेग घेतलेला आहे. त्याचं रूपांतर वादळात होते की नाही हे पाहणं रोमांचकारी असणार आहे.  याचे चांगले-वाईट असे दोन्ही परिणाम भारताच्या दृष्टीने होऊ शकणार आहेत. या दोन्ही परिस्थितीसाठी सज्ज राहणं हे तूर्तास भारत करू शकतो. त्याचदृष्टीने  भारताने आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

 



Wednesday, 14 July 2021

मृत्युंजयी गोरखा... विनीत वर्तक ©

 मृत्युंजयी गोरखा... विनीत वर्तक ©


  “When a man says that he is not scared of dying, he is either lying or he is a Gorkha".... फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ 

भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी असं वाक्य गोरखा सैनिकांसाठी म्हटलं होतं, कारण जिकडे साक्षात मरण घाबरते, असा पराक्रम गाजवण्याची ताकद गोरखा सैनिकांकडे आहे. गोरखा रेजिमेंटची स्थापना ब्रिटीश काळात झाली. स्वातंत्र्यानंतर ६ गोरखा रेजिमेंट भारतीय सैन्याचा भाग झाल्या. त्यानंतर भारतीय सेनेचा भाग म्हणून गोरखा सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावून भारतमातेच्या सरहद्दीचं रक्षण केलं आहे. गोरखा सैनिकांची ओळख म्हणजे त्यांचं स्वसंरक्षणाचं हत्यार म्हणजेच 'खुकरी'. ही गोष्ट आहे अश्या एका गोरखा सैनिकाची ज्याच्या नुसत्या खुकरीच्या पराक्रमापुढे मृत्यूनेही नांगी टाकली.

'ऑपरेशन विजय'चा भाग म्हणून 'हवालदार ग्यान बहादूर तमंग' यांना पाकिस्तानच्या एका तुकडीची रसद तोडण्याचं काम सोपवण्यात आलं. उंचावर असलेल्या पाकिस्तानी सैनिकांना मागच्या बाजूने होणारा रसद पुरवठा तोडण्याचं लक्ष्य घेऊन हवालदार ग्यान बहादूर तमंग आणि त्यांचा साथीदार आपल्या लक्ष्याकडे आगेकूच करत होते. वर बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांना त्यांचा सुगावा लागला आणि त्यांनी त्यांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार करायला सुरूवात केली. या गोळीबारात ते त्यांच्या साथीदारापासून विलग झाले. या गोळीबारात त्यांचा साथीदार हुतात्मा झाला तर ते मानेमध्ये गोळी लागून पाठीमागे फेकले गेले. डोंगर उतारावरून घरंगळत काही अंतर जाऊन रक्तस्त्राव झाल्याने बेशुद्ध पडले. 

रात्रभर तश्याच अवस्थेत ते त्या गोठवणाऱ्या थंडीत पडून होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शुद्धीवर ते आले तेव्हा आजूबाजूला मशिनगनमधून गोळ्यांचा वर्षाव होत होता आणि तोफेचे गोळे फुटत होते. त्यांनी ८ पाकिस्तानी सैनिकांना आपल्या जवळ येताना बघितलं. जशी त्यांची नजर पडली, तसंच पाकिस्तानी सैनिकांनाही त्यांचा सुगावा लागला. त्यांनी आपल्याकडील ए. के. ४७ मधून गोळ्यांचा वर्षाव त्यांच्यावर सुरू केला. डोंगर उतारावर असणाऱ्या कातळांचा आसरा घेत त्यांनी पाकिस्तानी सैनिकांवर प्रतिहल्ला केला. मानेला लागलेली गोळी, रात्रभर उपाशी आणि नुकतंच शुद्धीत आलेल्या अवस्थेतूनपण त्यांनी ३ पाकिस्तानी सैनिकांना आपल्या अचूक निशाण्याने कंठस्नान घातलं. उरलेले सैनिक त्यांच्यावर हल्ला करायला पुढे येणार तेव्हा निसर्ग त्यांच्या मदतीला धावून आला. अचानक त्या उंचीवर धुक्याचं साम्राज्य पसरलं. अवघं १० फुटांवरचं दिसणं अवघड झालं. याचा फायदा घेत हवालदार ग्यान बहादूर तमंग हे पाकिस्तानी सैनिकांना चकमा देत तिथून निसटले.  

मानेतून खूप रक्त वाहत होतं, ते थांबवण्यासाठी त्यांनी आपल्या कमरेचा पट्टा मानेला बांधला. संपलेल्या गोळ्या, खराब झालेली रायफल, वाहणारं रक्त अश्या परिस्थितीत ते कधी कातळांवरून रांगत तर कधी झाडाझुडपांच्या मधून अडखळत ते धुक्यात रस्ता शोधत होते. रक्तस्त्राव जास्ती झाल्याने पुन्हा एकदा ते बेशुद्ध पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा दोन पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना घेरलं होतं. बंदुकीच्या टोकावर त्यांना पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्करायला सांगितली. पण अश्या क्षणी सुद्धा त्यांनी अचानक एका दिशेने बघून जोरजोरात ओरडायला सुरूवात केली. जसं काही कोणीतरी मदतीला तिथे आलं आहे. त्या दोन्ही पाकिस्तानी सैनिकांची नजर एका क्षणासाठी तिकडे वळताच त्यांनी आपल्या खुकरीने त्या दोन्ही सैनिकांचा गळा चिरला होता आणि कोणताही आवाज न करता ते दोन्ही सैनिक तिकडेच मरण पावले. पण त्यांनी पाकिस्तानी सैनिकांचं लक्ष विचलित करण्यासाठी केलेल्या आवाजाने इतर पाकिस्तानी सैनिकांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि ते त्यांच्यावर चाल करून आले. 

गोळ्यांचा वर्षाव त्यांच्यावर पुन्हा एकदा सुरू झाला. त्यातून स्वतःला बचावत ते कातळांचा आधार घेत लपून राहिले. अर्धा तास चारी बाजूने त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव झाला. गोळ्यांचा वर्षाव थांबल्यावर चार पाकिस्तानी सैनिक आपल्या ज्युनिअर कमांडर ऑफिसरसोबत त्यांच्या दिशेने आले. निसटण्याचा कोणताही मार्ग दिसत नसताना त्यांनी तिकडेच मरून पडल्याचं नाटक केलं. त्याचवेळी आपली खुकरी आपल्या अंगाखाली लपवली. जवळ आलेल्या त्या पाच सैनिकांना ते मेले आहेत असं वाटलं, पण एकाला शंका आल्याने त्याने पायाने त्यांना खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. त्याच्या डोळ्याचं पात लवते न लवते तोच "जय महाकाली आयो गोरखाली" असं आपल्या रेजिमेंटच्या ब्रिदवाक्याने हवालदार ग्यान बहादूर तमंग यांनी आपल्या खुकरीने त्या पाच जणांना ढगात पाठवलं. काय होतंय कळायच्या आत त्यांनी पाच पाकिस्तानी सैनिकांचा अश्या बिकट परिस्थितीत खात्मा केला होता. पुन्हा एकदा गोळ्यांचा वर्षाव बाकीच्या उरलेल्या पाकिस्तानच्या सैनिकांकडून त्यांच्यावर सुरू झाला. त्यांना चकवा देत लपत, छपत हवालदार ग्यान बहादूर तमंग यांनी आपल्या रेजिमेंटच्या दिशेने म्हणजे उतारावर आपला प्रवास सुरू केला. 

तब्बल दोन दिवस पोटात काही गेलं नव्हतं. रक्ताची संततधार अजूनही सुरू होती. अंगात ताप होता. बोचरी थंडी आणि चारी बाजूने होणाऱ्या गोळ्यांच्या वर्षावात शत्रूच्या नजरेपासून लपून राहणं अश्या न भूतो न भविष्यती अश्या परिस्थितीमध्ये मृत्यू कोणत्याही क्षणी वेध घेईल अशी शक्यता असताना मृत्यूला घाम फोडणारे ते गोरखा सैनिक होते. संपूर्ण रात्र त्या थंडीत त्यांनी झाडाझुडुपात स्वतःला लपवून घेतलं. पोटाची आग शमवण्यासाठी झाडाची पानं खाल्ली आणि त्याच स्थितीत पुन्हा एकदा बेशुद्ध पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी अंगात त्राण नसतानाही त्यांनी उतारावरून आपल्या रेजिमेंटच्या दिशेने प्रवास सुरू केला. त्याचवेळी त्यांना दोन पाकिस्तानी सैनिक दारुगोळा घेऊन गप्पा मारत वरच्या दिशेने येताना दिसले. स्वतःला चालायला येत नसताना, तीन दिवस उपाशी असणाऱ्या आणि रक्ताच्या थारोळ्यात आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या हवालदार ग्यान बहादूर तमंग यांच्या मनात तेव्हाही देशाचं रक्षण हे सर्वप्रथम होतं. त्यांना खरतर पाकिस्तानी सैनिकांपासून लपून राहता आलं असतं, पण तो दारुगोळा शत्रूच्या हातात पोहचला असता तर खूप मोठा अनर्थ घडला असता. 

मृत्यूची टांगती तलवार असतानाही ते एका कातळाचा आडोसा घेऊन त्यांच्या जवळ येण्याची वाट बघत राहिले. जसे ते जवळ आले त्याच क्षणी त्यांनी "जय महाकाली आयो गोरखाली" असं म्हणत खुकरी हातात घेऊन त्यांच्यासमोर उभे राहिले. त्यांच्या आवाजातला तो जोश, साक्षात मृत्यूला घाबरवणारी नजर आणि त्यांचा आवेश यापुढे आपला निभाव लागणार नाही, याची क्षणात कल्पना आल्याने त्या दोन्ही पाकिस्तानी सैनिकांनी सर्व दारुगोळा तिकडेच टाकून तिकडून पोबारा केला. त्यांच्या त्या रौद्र रुपापुढ़े त्यांनी सपशेल शरणागती पत्कारली. हवालदार ग्यान बहादूर तमंग यांनी आपला पुढचा प्रवास असाच सुरू ठेवला आणि ते आपल्या साथीदारांना एल्डोर गावात मिळाले. पुढे १/११ गोरखा रायफल्सच्या सैनिकांनी हवालदार ग्यान बहादूर तमंग यांच्या रस्त्याचा शोध घेतल्यावर आपल्या खुकरीने ढगात पाठवलेल्या ७ सैनिकांचे मृतदेह भारतीय सैन्याला मिळाले. हवालदार ग्यान बहादूर तमंग यांनी आपल्या मिशनमध्ये १० पाकिस्तानी सैनिकांना ढगात पाठवण्याची कामगिरी केली. 

साक्षात मृत्यू प्रत्येक क्षणी समोर असताना त्याला न घाबरता परतवून लावणाऱ्या या मृत्युंजय हवालदार ग्यान बहादूर तमंग यांना भारत सरकारने त्यांच्या पराक्रमासाठी सेना मेडल देऊन त्यांचा सन्मान केला. तब्बल तीन दिवस मानेतून वाहणारं रक्त, पोटात अन्न, पाणी नसताना नुसत्या खुकरीने समोर ए.के.४७ घेऊन गोळीबार करणाऱ्या शत्रूच्या ७ सैनिकांच्या नरड्याचा घोट घ्यायला काय जिगर लागत असेल याचा आपण अंदाज लावू शकत नाही. जेव्हा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी ते विधान केलं त्यामागे या शूरवीर, पराक्रमी आणि मृत्युंजय अश्या गोरखा सैनिकांच्या पराक्रमाची त्यांना जाणीव होती. अश्या मृत्युंजय गोरखा सैनिक हवालदार ग्यान बहादूर तमंग यांना माझा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार. 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Monday, 12 July 2021

जंटलमन प्रेक्षक आणि पूर्वग्रह मिडिया... विनीत वर्तक ©

जंटलमन प्रेक्षक आणि पूर्वग्रह मिडिया... विनीत वर्तक 


जगाला जंटलमन गेम देणाऱ्या इंग्रजांच्या देशात दोन दिवसांपूर्वी झालेल्या युरो कप फायनलच्या दरम्यान झालेल्या प्रेक्षकांच्या हाणामारीचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. ते व्हिडीओ बघताना प्रक्षकांनी खेळाला युद्धाचं मैदान आणि आपल्या आत धुमसत असलेल्या वर्णद्वेष, असंतोषाला वाचा फोडण्याचं एक हक्काचं व्यासपीठ बनवल्याची जाणीव होते आहे. फूटबॉल, क्रिकेटसारख्या सांघिक खेळांत देशभावना तीव्र असतात हे आधीपण अनेकदा दिसून आलं आहे. पण ज्या पद्धतीने त्याला जागतिक पटलावर मांडण्यात येतं ते कुठेतरी आपण समजून घेण्याची गरज आहे. भारतात क्रिकेटमधील तीव्र भावनांना भारताच्या लोकांचा बेशिस्तपणा, तिथल्या लोकांची हुल्लडबाजी आणि सरकारची निष्क्रीयता असा मुलामा दिला जातो. तर इंग्रजांच्या देशात याला देशभावना आणि स्वतःची कातडी वाचवण्यासाठी दुसऱ्या कोणीतरी केलेल्या वर्णद्वेषाचा संबंध दाखवला जातो. स्वतःला जागतिक दर्जाचे पत्रकार म्हणवणाऱ्या अश्या अनेक मिडिया हाऊ चा असं चित्र उभं करण्यात खूप मोठा हात असतो. 

१९९६ च्या विल्स वर्ल्ड कप मधील भारत-श्रीलंका संघांदरम्यान उपांत्य फेरीचा सामना सुरू असताना भारतीय प्रेक्षकांनी भारताच्या निराश कामगिरीमुळे चिडून स्टेडियममध्ये आग लावणे, नासधूस करणे तसेच खेळात व्यत्यय आणला होता. शेवटी हा सामना श्रीलंकेला बहाल करण्यात आला. आजही त्याच्या चर्चा आणि त्याचे अनेक व्हिडीओ आपल्याला बघायला मिळतील. त्यावर आजही परदेशातील मिडिया हाऊस रकाने भरून चर्चा करतील. पण स्वतःच्या घरात काल-परवा झालेल्या हिंसाचाराची एक घटना किंवा बातमीसुद्धा आपल्या पेजवर येऊ देणार नाहीत. बातमी नाईलाजाने टाकावीच लागली तर तिला वर्णद्वेषाचा रंग देऊन नागरिकांनी केलेल्या कृत्याचे समर्थन करण्याचा डावही सुंदर खेळला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्विटरवरून भारताच्या काही धार्मिक कार्यक्रमांवर आक्रोश करणारे हे मिडिया हाऊस आणि त्यांचे खंदे समर्थक युरो कपसाठी स्टेडियममध्ये कोरोना काळातील सर्व नियम धाब्यावर बसवून होणाऱ्या गर्दीचं समर्थन करण्यासाठी लसीकरण झाल्याचं तत्वज्ञान पाजळतात. बरं हेच लोक सांगत असतात की, जगातील कोणतीही लस कोरोनाचं संक्रमण रोखू शकत नाही. फक्त लसीमुळे कोरोना झाल्यावर होणारा त्याचा त्रास कमी होऊ शकतो.  

'आपलं ते ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं ते वाकून' अशी वृत्ती ठेवून आजवर हे लोक भांडवल करत आलेले आहेत. युरोकप फुटबॉलच्या वेळचे प्रेक्षकांच्या प्रक्षोभक प्रतिक्रिया बघितल्या तर भारतातील प्रेक्षक त्यामानाने खूपच संयमित किंवा जंटलमन म्हणता येतील. कारण निदान दुसऱ्याला लाथा बुक्यांनी एकमेकांना रक्तबंबाळ केल्याची उदाहरणं युरोप किंवा इतर देशांच्या तुलनेत भारतात क्वचितच असतील. भारतीय एकवेळ आपल्या खेळाडूंना शिव्या आणि घाण शब्द बोलतील किंवा आपल्या घरचा टी.व्ही. फोडतील पण दुसऱ्यांना रक्तबंबाळ करून आपला राग व्यक्त करण्याची पद्धत तितकी तरी भारतात माझ्या बघण्यात नक्कीच नाही. पण हीच गोष्ट ज्या पद्धतीने मिडिया हाऊसकडून मांडली जाते, त्यावर प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. 

याच इंग्रजांच्या देशात त्याचवेळी विम्बल्डन स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेच्या दरम्यान असलेल्या प्रेक्षकांकडून किंवा त्या स्पर्धेच्या इतिहासातून आपण खूप काही शिकण्यासारखे आहे. जेव्हा खेळाडू सर्विस करायला सुरूवात करतात, मग ते कोणत्याही देशाचे असोत, तेव्हा संपूर्ण स्टेडियममध्ये प्रेक्षकात 'पिन ड्रॉप सायलेन्स' हा असतो, कोणावरही जबरदस्ती न करता आपसूक हा नियम पाळला जातो. कोणताही खेळाडू हरतो अथवा जिंकतो त्याचा त्याने केलेल्या खेळासाठी योग्य सन्मान ठेवला जातो. त्यामुळेच अश्या वेळी हार -जीत ही फक्त औपचारीकता राहते आणि जिंकतो तो खेळ! कदाचित भारतीयांना हे गुण शिकण्याची खूप गरज आहे असे मला मनापासून वाटते. 

दोन दिवसांपूर्वी झालेल्या युरो कप स्पर्धेत इंग्लंड स्पर्धा हरली पण फुटबॉल एक खेळ म्हणून, आणि इंग्लंडचे लोक एक प्रेक्षक म्हणूनपण हरले. अर्थात ब्रिटिश मिडियाला हा दिव्याखालचा अंधार नक्कीच दिसणार नाही. कारण त्यांचं लक्ष जगात पुढे जाणाऱ्या भारतीयांना कश्या पद्धतीने खाली दाखवलं जाईल याकडेच जास्ती असते. पण एक गोष्ट त्याचवेळी ही मान्य करावी लागेल, की विम्बल्डनसारख्या स्पर्धांनी टेनिस एक खेळ म्हणून नक्कीच जिंकतो. भारतीयांनीसुद्धा क्रिकेटच्या बाबतीत एक सुजाण प्रेक्षक बनण्याची गरज आहे. किंबहुना क्रिकेटपेक्षा इतर खेळांमधूनपण देशाचा तिरंगा उंचावला जातो, ह्याचं भान ठेवलं पाहिजे. जगातील सगळ्यात मोठ्या आणि प्रतिष्ठित अश्या ऑलम्पिक स्पर्धा येत्या काही आठवड्यांत सुरू होत आहेत. अर्थात तिथेही हा बायस मिडिया चांगल्या गोष्टी बाजूला ठेवून भारतीय कसे अपयशी ठरतात, ह्यावर अनेक चर्चा घडवून आणेल. पण जर भारतीयांनी क्रिकेट सोडून आपल्या इतर खेळाडूंना पाठिंबा दिला नाही, तर हेच होणं अपेक्षित असेल. तेव्हा भारतीयांनी कुठेतरी आता जंटलमन प्रेक्षक होण्याची गरज आहे, जे यश अथवा अपयश त्याच खिलाडूवृत्तीने स्वीकारतील आणि आपल्या देशाच्या खेळाडूंच्या पाठीशी उभे राहतील. 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.





Saturday, 10 July 2021

क्वीन ऑफ स्पोर्ट्स... विनीत वर्तक ©

 क्वीन ऑफ स्पोर्ट्स... विनीत वर्तक ©


विम्बल्डनच्या इतिहासात असे अनेक खेळाडू होऊन गेले, ज्यांच्या खेळाची जादू आजही कायम आहे. अगदी जॉन मेकॅन्रो, मार्टीना नवरातिलोवा, स्टेफी ग्राफ, बोरीस बेकर, पीट सॅम्प्रास, रॉजर फेडरर, विल्यमस् बहिणी.... अशी न संपणारी एक यादी प्रत्येकाची असेल. याच यादीत काल एक नवीन नाव जोडलं गेलं आहे, ते म्हणजे 'ऍश बार्टी'. २०२१ सालची विम्बल्डन स्पर्धा जिंकून तिने एक नवीन इतिहास लिहिला आहे. विम्बल्डनच्या इतिहासातील अनेक चित्तथरारक सामन्यांपैकी एक असा कालचा सामना झाला नसला, तरी ऍश बार्टीच्या यशाची किंमत कमी होत नाही. आज तिने जिंकलेल्या सामन्यापेक्षा चर्चा होते आहे ती तिच्या अचंबित करणाऱ्या प्रवासाची. नेहमीच्या रूढी आणि परंपरांना छेद देत तिने आपल्या यशाला गवसणी घातली आहे. वर उल्लेख केलेल्या अनेक खेळाडूंपेकी किंवा इतर खेळाडूंच्या करिअरचा विचार केला, तर असं कोणी नसेल ज्यांनी आपलं टेनिसचं करिअर अर्धवट सोडून त्याचवेळी दुसऱ्या एखाद्या खेळात तितकंच यश संपादन केलं असेल. ते करतानाच पुन्हा टेनिसला सुरूवात करून, ज्या सेंटर कोर्टवर खेळणं प्रत्येक टेनिस खेळाडूचं स्वप्न असतं, तिकडे खेळणं आणि विम्बल्डन स्पर्धाही जिंकणं हे कोणाला आजवर शक्य झालेलं नाही. म्हणूनच ऍश बार्टीचं यश हे जास्ती उजळते आहे. 

कोणत्याही खेळाडूचं करिअर हे अनेक उतार चढावांनी बनलेलं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात यश-अपयशाचे अनेक क्षण येतात. त्या प्रत्येक क्षणांना तो खेळाडू कसं घेतो, त्यावर त्याची पुढची वाटचाल ठरलेली असते. ऍश बार्टीच्या २५ वर्षांच्या आयुष्यात तिने जेवढे उतार-चढाव बघितले आहेत, असे क्वचितच कोणत्या खेळाडूच्या वाट्याला आले असतील. ऍश बार्टीच्या प्रवासाची सुरूवात ती अवघी ४ वर्षांची असताना झाली. एप्रिल २००० मध्ये तिने जिम जॉयसेच्या हाताखाली टेनिस शिकायला सुरूवात केली. खरं तर अवघ्या ४ वर्षांच्या ऍशला शिकवण्याची जिमची इच्छा नव्हती. पण त्या लहान वयात तिचं 'हॅन्ड एन्ड आय कॉर्डीनेशन' बघून तो थक्क झाला होता. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे ऍश बार्टीने आपली चमक त्या लहान वयात दाखवायला सुरूवात केली होती. 

२०१० पर्यंत तिने प्रोफेशनल टेनिस खेळायला सुरूवात केली होती, पण तिचं जे कर्तृत्व होतं त्याला साजेशी कामगिरी तिच्याकडून होत नव्हती. जून २०११ ला मात्र ऍश बार्टीने वयाच्या १५ व्या वर्षी ज्युनिअर विम्बल्डन स्पर्धा जिंकून संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. अचानक ऑस्ट्रेलियाच्या पटलावरून जागतिक पटलावर एका नवीन टेनिस खेळाडूचा उदय झाला होता. पण म्हणतात ना, की यश पचवता पण आलं पाहिजे. अवघ्या १८ व्या वर्षी ऍश बार्टीला आपल्या कडून वाढलेल्या अपेक्षांना सामोरं जाणं कठीण होऊ लागलं. तिने अचानक प्रोफेशनल टेनिसमधून ब्रेक घेण्याचं जाहीर केलं. तिच्या शब्दात, 

“I needed some time to refresh mentally more than anything. It became a bit of a slog for me and I wasn’t enjoying my tennis as much as I would have liked to."

"I went from not being known anywhere in the world to winning junior Wimbledon and six months later playing the Australian Open. I was a victim of my own success, really.”

२०१४ ते २०१६ ऍश बार्टी टेनिसच्या पटलावरून गायब झाली. आपल्या करीअर घडवण्याच्या सर्वोत्तम काळात ऍश बार्टीला अपेक्षांचं ओझं वाटायला लागलं. कदाचित आपण जो नैसर्गिक खेळ खेळतो आणि त्याची मजा घेतो ते सगळंच कुठेतरी हरवलेलं होतं. प्रवाहासोबत जाण्यापेक्षा तिने आपल्या मनाचा रस्ता स्वीकारला. सगळं बाजूला ठेऊन ती टेनिसपासून लांब गेली. पण खेळाडू हा खेळाडू असतो. तिने त्या काळात क्रिकेटचे धडे घ्यायला सुरूवात केली आणि चक्क ब्रिस्बेन हिट संघासोबत तिने प्रोफेशनल क्रिकेट खेळायला सुरूवात केली. ९ सामन्यांत तिने या संघातर्फे क्रिकेटच्या मैदानात पाऊल टाकलं आणि ६८ धावा केल्या. हा काळ तिच्यासाठी खडतर असा होता. एकेकाळी हातात टेनिसची रॅकेट धरणारी ती आता क्रिकेटची बॅट हातात घेऊन टेनिसच्या बॉलचा नाही तर सिझन बॉलचा सामना करत होती. 

फेब्रुवारी २०१७ मध्ये तिने पुन्हा टेनिसमध्ये पुनरागमन केलं. त्याच वर्षी मलेशियन ओपन स्पर्धा जिंकून तिने जागतिक क्रमवारीत १७ व्या क्रमांकावर उडी घेतली. त्याचवेळी डबल्स मध्ये पहिल्या २० जोड्यांमध्ये आपला समावेश केला. यानंतर जून २०१९ मध्ये तिने मार्केटा वोन्डरौसोवाला ६-१, ६-३ असं हरवत रोलँड गॅरोसवर फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकून एक इतिहास रचला. वयाच्या २३ व्या वर्षी ४६ वर्षांनंतर फ्रेंच ओपन जिंकणारी ती पहिली ऑस्ट्रेलियन महिला ठरली. यशाच्या शिखरावर असताना २०२० मध्ये कोरोनाने सगळ्या जगात हाहाकार माजवला. पुन्हा एकदा ऍश बार्टीने टेनिस मधून ब्रेक घेतला आणि ती गोल्फ खेळायला लागली. त्यात तिने ब्रुक वॉटर गोल्फ क्लब वूमन चॅम्पीयनशिप जिंकली. गोल्फच्या जागतिक क्रमवारीत क्रमांक ५ आणि ७ वर असणाऱ्या प्रोफेशनल गोल्फ खेळाडूंना तिने ही स्पर्धा जिंकताना पराभूत केलं. तिकडेच तिची भेट आपला प्रियकर गॅरी किससीक याच्याशी झाली जो की प्रोफेशनल गोल्फ खेळाडू आहे. 

जानेवारी २०२१ मधे तिने पुन्हा प्रोफेशनल टेनिसमध्ये पुनरागमन केलं. दुखापतीमुळे तिला जून २०२१ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेत माघार घ्यावी लागली. पण १० जुलै २०२१ ला ऍश बार्टीने इतिहास रचताना कॅरोलिना पिल्सकोवाला ६-३, ७-६, ६-३ असं हरवत आपलं एक स्वप्न पूर्ण केलं. तब्बल ४१ वर्षांनंतर एखाद्या  ऑस्ट्रेलियन खेळाडूने विम्बल्डनच्या त्या चषकावर आपलं नाव कोरलं. ऍश बार्टीने विम्बल्डन सुरू होण्यापूर्वीच सांगितलं होतं, की मला विम्बल्डन जिंकायची आहे. अर्थात प्रत्येक खेळाडूच्या मनात तेच असतं, पण ऍश बार्टीने उघडपणे हे बोलून दाखवलं होतं. तिच्या मते, 

“If it doesn’t work out, it doesn’t work out. Yeah, she’s not afraid to try. If you get it wrong, you get it wrong. If you try and fail, that’s still OK.”

And if you succeed, it’s glorious.

ऍश बार्टीचा हा प्रवास मला व्यक्तिशः खूप काही शिकवून गेला आहे. आपली आवड आपण आपल्यासाठी जपणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. पुरस्कार, बक्षीस, मानसन्मान हे येत राहिल, पण सगळ्यात महत्वाचं असतं की आपल्याला जे मनापासून आवडतं तेच करणं . लोकं काय म्हणतील हा मुद्दा ऍश बार्टीने मागे ठेवला. जे तिला आवडत गेलं ते ती करत गेली. प्रत्येक ठिकाणी तिने आपली छाप सोडली आहे. टेनिस, क्रिकेट किंवा गोल्फ प्रत्येक ठिकाणी तिने सर्वोत्तम दिलं. कदाचित २०१४ साली तिने तो ब्रेक घेतला नसता तर अपेक्षांच्या ओझ्याखाली तिचं करिअर संपुष्टात आलं असतं. आज तिने ज्या यशाला गवसणी घातली, त्याचं रहस्य तिच्या त्या विचारांमध्ये आहे. काल संपूर्ण सामना बघताना कॉमेंटेटरपासून ते दर्शकांपर्यंत फक्त कॅरोलिनाचं नाव होतं. ऍश बार्टी मात्र शांतपणे आपला खेळ खेळत होती. एखादा पॉईंट जिंकला अथवा गमावला तरी तिच्या चेहऱ्यावर ना उन्माद होता ना निराशा. ती फक्त खेळत होती. अगदी दुसरा सेट टायब्रेकरमध्ये गमावल्यानंतरही पुढचे दोन्ही गेम तिने अगदी शांतपणे जिंकले. तिकडेच मला वाटते तो सामना ऍश बार्टीच्या बाजूने फिरला. 

टेनिस, क्रिकेट आणि गोल्फ अश्या वेगवेगळ्या पद्धतीच्या खेळात आपली छाप सोडणाऱ्या ऍश बार्टीला 'क्वीन ऑफ स्पोर्ट्स' असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. तिच्या विम्बल्डन यशासाठी तिचं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या अश्याच अनेक उत्तुंग शिखरांना पादाक्रांत करण्यासाठी शुभेच्छा. 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Tuesday, 6 July 2021

एक छोटी सी लव्ह स्टोरी... विनीत वर्तक ©

 एक छोटीसी लव्ह स्टोरी... विनीत वर्तक ©


काही गाठी त्यानेच बांधलेल्या असतात. काळ, वेळ, परिस्थिती कशीही आली तरी त्या टिकून राहतात. अजरामर होतात. कोणीतरी असं आपल्या आयुष्यात असणं आणि आपण कोणाच्या तरी आयुष्याचा असा भाग असणं म्हणजे परमभाग्य. खूप कमी जणांच्या वाट्याला ते येतं आणि खूप कमी जण असं जगू शकतात. बॉलिवूड किंवा हॉलिवूडमधल्या प्रेमकथा चिल्लर वाटतील, अशी एक छोटीसी लव्ह स्टोरी आजही खऱ्या आयुष्यात जगणारे ते दोघे आहेत. प्रेम म्हणजे काय? प्रेमात त्याग काय असतो? प्रेमात जगणं म्हणजे काय? प्रेमात साथ-सोबत करणं काय असतं? अश्या सर्व गोष्टींना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारी ही "छोटी सी लव्ह स्टोरी". 

१९९५ चं वर्षं होतं. पंजाब विद्यापीठात एक तरुण मुलगा आणि मुलगी इंग्रजी विषयातून एम.ए. करत होते. एकत्र शिकत असताना त्यांच्यात गाठीभेटी सुरू झाल्या आणि त्या कोवळ्या वयात प्रेमाचे धुमारे फुटले. तो तरुण ध्येयवेडा होता. देशप्रेम त्याच्यात ठासून भरलं होतं. देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा तो तिला नेहमीच  सांगायचा आणि ती सुद्धा त्याला त्याच ताकदीने आत्मविश्वास द्यायची. १९९६ साल उजाडलं आणि त्याच्या स्वप्नांना पंख मिळाले. इंडियन मिलिट्री एकेडमी, डेहराडून  इकडे त्याची भारतीय सेनेत वर्णी लागली. त्याचं पहिलं प्रेम तिला माहीत होतंच, त्यामुळे तिने कधीच त्याला विरोध केला नाही. उलट ज्या दिवशी त्याला ही बातमी कळली तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. ना तो आपलं शिक्षण पूर्ण करू शकला न तिने पुढे आपलं शिक्षण पूर्ण केलं. जणूकाही त्यानेच त्या दोघांची भेट घडवून आणण्यासाठी त्या विद्यापीठाची निवड केली असावी. कारण शिक्षण अपूर्ण राहिलं तरी त्यांचं प्रेम आणि सोबत जोडली गेली ती कायमची. 

तो डेहराडून आणि ती चंदीगढला. अंतर वाढलेलं होतं, पण त्याचसोबत प्रेमसुद्धा. अंतराची लांबी त्यांचं प्रेमसुद्धा वाढवून गेली. जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळायचा तेव्हा तेव्हा तो तिला भेटायला यायचा. चंडीगढ इथल्या मंदिरात आणि गुरुद्वारामध्ये ते दोघे भेटायचे. देवाचं दर्शन घेऊन मंदिराची परिक्रमा झाल्यावर एकदा तो तिला म्हणाला, ''झाले की चार फेरे, आता तू माझी झालीस". ती त्याच क्षणी थबकली. घरातून लग्नाचा दबाव तिच्यावर वाढत होता. त्यांच्या भेटीमधे ती नेहमीच तो विषय त्याच्याकडे बोलायची. तो एकदा तिला म्हणाला, 

"तुला जे आवडते ते कर, नाहीतर दुसऱ्यांना जे आवडते ते तुला आवडून घ्यावं लागेल... "

त्याचे हे शब्द तिला खूप काही आत्मविश्वास देऊन गेले. पण कॉलेजमध्ये सुरू झालेलं आपलं प्रेम असं मध्ये तुटणार नाही ना! याची तिला नेहमीच काळजी वाटत होती. अनेकदा त्याने समजावूनही तिच्या मनात थोडी धाकधूक होतीच. कारण तो होताच राजबिंडा मिलिट्री ऑफिसर, ज्याच्यावर कितीतरी जणी जीव ओवाळून टाकतील. तिच्या मनात असलेली धाकधूक त्याने ओळखली. चक्क एक दिवस त्याने आपल्या पॉकेट मधून चाकू काढला. आपला अंगठा चिरला आणि त्यातून वाहणाऱ्या रक्ताची धार तिच्या कपाळावर लावून तो म्हणाला, 

आज, "तुम्हारी मांग मैंने अपने खून से भर दी हैं. मैं तुम्हारा हुं, कोई तुमसे मुझे अलग नहीं कर सकता"..  
 
यानंतर ती त्याला नेहमी 'पूरा फ़िल्मी हो' असं म्हणत त्याला चिडवायची, पण मनातून त्याच्या याच व्यक्तिमत्वावर तिने आपला जीव ओवाळून टाकला होता. 

बघता बघता ४ वर्षं सरली. १९९९ साल उजाडलं. आता तो इंडियन आर्मीचा एक कमिशन्ड ऑफिसर होता. त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण त्याच आधी त्याच्या पहिल्या प्रेमाने त्याला जीव वाचवण्यासाठी साद घातली होती. त्यानं मागचा पुढचा विचार न करता "तानाजी मालुसरें" सारखं, "आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे" म्हणत आपल्या देशप्रेमासाठी स्वतःला झोकून दिलं. आपल्या लग्न झालेल्या सहकाऱ्याला मृत्यूच्या दाढेत जाऊ न देता तो शत्रूवर चाल करून गेला. ४२ गोळ्या अंगावर झेलूनसुद्धा त्याचे शेवटचे शब्द होते. "जय हिंद" !!!. भारताने आपल्या इतिहासातील एका सर्वोत्तम सैनिकाला गमावलं. त्याची आणि तिची एक छोटीसी लव्ह स्टोरी इकडे संपली नाही तर इकडे सुरू झाली. कारण तिने कधीच त्याला आपलं मानलं होतं. तो आधीच तिच्या आयुष्याचा भाग झाला होता. तो शरीराने नसला तरी तो सदैव तिच्याचसोबत होता. तिच्या शब्दात, 

"माझ्या मनात मला माहीत आहे, की मी पुन्हा तिला भेटणार आहे. फक्त काही क्षणांचा हा आपल्यातील दुरावा आहे. तू आहेस माझ्या श्वासात, प्रत्येक क्षणात आणि आपण लवकरच भेटू. तेव्हा आपल्याला परिस्थितीपण वेगळं करू शकणार नाही".

त्याचा त्याग, पराक्रम, बहादुरी आणि त्याचं प्रेम आज सगळंच भारताच्या इतिहासातील एक सोनेरी क्षण बनून राहिलं आहे. आपल्या सर्वोच्च बलिदानासाठी त्याला भारताच्या सर्वोच्च सैनिकी सन्मान परमवीर चक्राने गौरवण्यात आलं. आजही शत्रूसुद्धा ज्याच्या नावाला सॅल्यूट करतात तो "शेरशहा" म्हणजेच कॅप्टन विक्रम बात्रा आजच्याच दिवशी ७ जुलै १९९९ ला धारातीर्थी पडून हुतात्मा झाला. त्याची 'डिंपल चिमा' सोबतची ही छोटीसी लव्ह स्टोरी प्रेमाच्या राज्यात अमर झाली. आजही ती वाट बघते आहे त्या वेळेची, जेव्हा तिची भेट त्याच्याशी होईल. आता फक्त काही क्षणांचा अवकाश आहे..... 

भारतमातेच्या या सुपुत्रास माझा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार. 

जय हिंद!!!

मर गए, मिट गए वतन के लिए,
फिर भी कोई गम न होगा।

वतन के लिए ही जीना है और,
वतन के लिए ही मरना,

ये फ़िल्ज़ का जुनून कभी कम न होगा।
हम आज़ादी के परवाने हैं,

अमन -चैन की लौ में जलते है।
वतन के लिए जलने -मिटने का,

ये सिलसिला कभी खत्म नही होगा।
मेरी हस्ती भी मेरे वतन से है,

मेरी शोहरत भी मेरे वतन से है।
मेरी हर जीत का आगाज़ अब वतन,
के इक़बाल से होगा।

निधी अग्रवाल... 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.