Saturday, 29 August 2020

खारे वारे मतलई वारे ( भाग ३ ) ... विनीत वर्तक ©

 खारे वारे मतलई वारे ( भाग ३ ) ... विनीत वर्तक ©

जगाला भारत- पाकीस्तान हा प्रश्न महत्वाचा वाटत असतो असं आपल्याला वाटत असते. किंबहुना काश्मीर प्रश्ना इतका दुसरा कोणता प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर बोलला गेला नसेल अशी सर्वसाधारण भारतीयांची समजुत असते. आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीर प्रश्नापेक्षा चिघळलेले आणि महत्वाचे प्रश्न आहेत. काश्मीर पेक्षा जगाचं लक्ष ज्या दोन प्रमुख प्रश्नांनावर आहे ते म्हणजे इस्राईल - आखाती देश संबंध आणि साऊथ चायना समुद्र. सध्या ह्या दोन्ही प्रश्नांवर खूप काही घडामोडी घडत  असुन त्याचे दुरगामी परीणाम जगाच्या अर्थकारण, संबंधांवर होणार आहेत. इस्राईल हे ज्यु राष्ट्र सर्व बाजूने अरब मुस्लिम राष्ट्रांनी वेढलेलं आहे. इस्राईल- पॅलेस्टाईन ह्यांच्या छुप्या लढाया कितीतरी वर्ष सुरु आहेत. भारत- पाकीस्तान अतिरेकी ह्यांच्या लढाया ह्या गोळ्यांनी होत असतील तर इस्राईल- पॅलेस्टाईन अतिरेकी ह्यांच्या लढाया ह्या क्षेपणास्त्रांनी होतं असतात. त्यावरून आपण अंदाज लावू शकतो की ह्याचे परीणाम जगाच्या दृष्टीने किती गंभीर असतील. अरब राष्ट्रांकडे तेलाचा पैसा आणि संपत्ती आहे तर इस्राईल जगात आपल्या तंत्रज्ञानासाठी नावाजलेला देश आहे. इस्राईल त्यामुळेच ह्या सर्व अरब राष्ट्रांना पुरून उरला आहे. 

अमेरीका हा ह्या दोन्ही बाजूचा मित्र आहे. दोन्ही ठिकाणी अमेरीकेचे हितसंबंध गुंतलेले आहेत. आपले हितसंबंध जपण्यासाठी अमेरीकेने ह्या दोन्ही देशात सलोखा निर्माण करण्यासाठी मध्यस्ती केली. त्याचाच परीणाम म्हणजे नुकतेच प्रस्थापित झालेले यु.ए.ई (युनायटेड अरब अमिराती) आणि इस्राईल मधील राजनैतिक संबंध. दोन्ही देशांनी एक एक पाऊल मागे घेताना एका नवीन राजकीय आणि आर्थिक वळणाची सुरवात जागतिक पटलावर केली. ही गोष्ट दोन्ही देशांच्या प्रगतीसाठी पुरक असली तरी ती किती वेळ टिकते ह्यावर बरच काही अवलंबून आहे. अरब राष्ट्रात ही अनेक गट आहेत. शिया-सुन्नी मुसलमान लोक आपापसात एकमेकांशी लढत आहेत तर दुसरीकडे तेलाच्या जिवावर एकमेकांवर आर्थिक कुरघोडी करण्याची स्पर्धा ही सुरु आहे. सौदी अरेबिया हा सगळ्यांचा मोठा भाऊ असला तरी यु.ए.ई च्या ह्या पावलावर त्याने मौन साधलं आहे. अनेक मुस्लिम राष्ट्रांनी इराण, लिबिया, तुर्की ह्यांनी ह्याचा विरोध केला आहे तर बहरीन, इजिप्त, जॉर्डन ह्या राष्ट्रांनी ह्याच स्वागत केलं आहे. 

ह्या सगळ्या बदलणाऱ्या संबंधांचा फायदा सगळ्यात जास्ती कोणाला होऊ शकतो तर तो म्हणजे भारत. भारताचे इस्राईल आणि यु.ए.ई ह्यादोन्ही राष्ट्रांशी घनिष्ठ संबंध गेल्या काही वर्षात स्थापन झाले आहेत. एकीकडे जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान इस्राईल भारताला विकतो तर दुसरीकडे यु.ए.ई साठी भारतीय बाजार ही गुंतवणुकीची खूप मोठी संधी आहे. दोन्ही देशांन सोबत भारत जर अजून घनिष्ठ मैत्री करू शकला तर ह्या संबंधाचा सगळ्यात जास्ती फायदा भारत घेऊ शकतो. इकडे हे लक्षात ठेवले पाहीजे की चीन चे ही ह्या दोन्ही राष्ट्रांसोबत चांगले आर्थिक संबंध आहेत. पण कोरोना च्या पार्श्वभुमीवर चीन ने थोडी कच खाल्ली आहे. ह्याच संधीचा फायदा भारताने घेतला पाहीजे. ह्यात सगळ्यात मोठी गोची आणि नुकसान झालं आहे ते पाकीस्तान चं. धार्मिक पंख लावून आपल्या प्रगतीची गाडी पुढे नेता येणार नाही हे मुस्लिम राष्ट्रांना समजलेलं आहे. पाकीस्तान अजूनही तिकडेच अडकून आहे. एकीकडे पाकीस्तान आणि इस्राईल एकमेकांना पाण्यात सुद्धा बघत नाहीत तिकडे पाकीस्तान चे यु.ए.ई सारखे धार्मिक राष्ट्रमित्र दुरावत चालले आहेत. आर्थिक आणि नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान ह्या दोन्ही बाबतीत पाकीस्तान प्रचंड प्रमाणावर मागे पडलेला तर आहेच पण आता त्याची वाताहत सुरु होणार आहे. यु.ए.ई च्या ह्या पावलाने नाराज झालेली राष्ट्र ही कमी नाहीत. इराण सारखं राष्ट्र गेल्या काही वर्षात सैन्य शक्तीत झपाट्याने पुढे येत आहे. लिबिया, सिरिया ह्या सारख्या ठिकाणी ही इराण ची मक्तेदारी वाढत चालली आहे. धर्मवेडी मुस्लिम राष्ट्र आणि प्रगतिशील मुस्लिम राष्ट्र असे गट आखाती देशात तूर्तास निर्माण झालेले आहेत.  

 साऊथ चायना समुद्र हा जागतिक पातळीवरचा मोठा प्रश्न सध्या खूप चिघळलेल्या स्थितीत आहे. गेल्या काही दिवसातील घडामोडींमुळे तर इकडे पुढल्या क्षणाला काय होईल ह्याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. सामान्य लोकांना पडलेला एक प्रश्न म्हणजे साऊथ चायना समुद्र नक्की काय भानगड आहे? साऊथ चायना समुद्रामधील अडचणी समजण्यासाठी आधी आपल्याला तिथली भौगोलिक स्थिती आणि आंतरराष्ट्रीय कायदे समजून घ्यायला लागतील. साऊथ चायना समुद्राच क्षेत्रफळ सुमारे ३.६ मिलियन चौरस किलोमीटर इतकं आहे. (संपुर्ण भारताचं क्षेत्रफळ २.९७ मिलियन चौरस किलोमीटर इतकं आहे.) आता अंदाज आला असेल की संपुर्ण भारतापेक्षा ही कैक पट मोठा हा भाग आहे. हा भाग संपुर्ण ओलांडायला एखाद्या मोठ्या जहाजाला ज्याचा वेग ३० नॉट पेक्षा जास्त आहे त्याला ३ दिवसापेक्षा जास्त कालावधी लागतो. ह्या संपुर्ण समुद्राच्या भागात कितीतरी छोटी-मोठी बेट येतात. हा संपुर्ण प्रदेश अनेक नैसर्गिक जैव- विविधतेने आणि साधन संपत्ती ने ओतप्रोत आहे. सगळ्यात महत्वाचं ह्या भागात तेल आणि नैसर्गिक वायूचे प्रचंड असे साठे आहेत. ज्याच उत्खननं अजुन केलं गेलेलं नाही. 

१९८२ मध्ये युनायटेड नेशन ने सागरी संपत्ती च्या हक्काबद्दल एक कायदा संमत केला होता. त्या कायद्या प्रमाणे २०० नॉटिकल मेल किंवा ३७० किलोमीटर च्या हद्दीतील साधन संपत्तीवर जवळच्या राष्ट्राचा हक्क असतो. सोप्या शब्दात भारताच्या मुंबई किनाऱ्यापासून समुद्रात ३७० किलोमीटर अंतरापर्यंत अरबी समुद्राचा मालकी हक्क भारताकडे आहे. ३७० किलोमीटर च्या पलीकडे समुद्रावर संपुर्ण जगाची मालकी आहे. भारत ३७० किलोमीटर पर्यंत त्याच्या जागेत कोणी यायचं, त्यात मिळणाऱ्या खनिज, नैसर्गिक साधन संपत्ती च काय करायचं हे स्वतः ठरवू शकतो. युनायटेड नेशन चा हा कायदा असं सांगतो की जर समजा ह्या अंतरामध्ये दोन किंवा अधिक देशांच्या सीमा येतं असतील तर त्या भागातील मालकी हक्क त्या देशांनी सामंजस्याने सोडवायचा. जेव्हा हा करार अस्तित्वात आला तेव्हा साऊथ चायना समुद्रातील ह्या भागावर ६ देशांनी आपला हक्क सांगितला. ह्या ६ देशात चीन, व्हियेतनाम, मलेशिया, फिलिपाइन्स, ब्रुनेई, जपान ह्या देशांचा त्यात समावेश आहे. ह्या देशांनी ज्या सीमारेषा आखल्या किंवा ज्या बेटांवर आपला हक्क सांगितला त्या एकेमकांच्या हद्दीतुन जात आहेत. एकाच वेळी तीन-तीन देश एखाद्या बेटावर आपला हक्क सांगत आहेत. चीन ने युनायटेड नेशन च्या कायद्याला केराची टोपली दाखवली. चीन च्या म्हणण्यानुसार तो ९ डॅश लाईन कायदा मानतो. ज्या नुसार चीन च्या भूमीपासून २००० किलोमीटर पर्यंतचा सर्व भाग चीन चा आहे. चीन च हे तत्व मानलं तर अर्ध्याहून अधिक साऊथ चायना समुद्र चीन च्या अधिपत्याखाली येईल. चीन च्या ह्या दाव्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नाकारण्यात आलेला आहे. पण आपल्या आर्थिक आणि सैनिकी शक्तीच्या जोरावर चीन ह्या भागात दादागिरी करतो आहे. 

क्रमशः

पुढील भागात चीन ची अरेरावी, आंतरराष्ट्रीय पातळीवर बदललेली समीकरण, सध्या साऊथ चायना समुद्रात होणाऱ्या घडामोडी आणि ह्या सर्वात भारताची निर्णायक भुमिका. 

फोटो स्रोत:- गुगल (फोटोत वेगवेगळ्या देशांनी त्यांनी हक्क दाखवलेल्या सीमारेषा)

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




Thursday, 27 August 2020

हवेतील डोळे... विनीत वर्तक ©

 हवेतील डोळे... विनीत वर्तक ©

भारत आणि चीन ह्या दोन्ही देशांमध्ये ताणलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सीमांना सुरक्षित करण्याची गरज भारताला जास्ती वाटू लागली आहे. आपल्या देशांच्या सीमांना सुरक्षित ठेवायचं असेल तर शत्रुच्या हालचालींची माहिती आधी असायला हवी आणि त्याचसोबत त्याला प्रतिकार करण्याची आपली तयारी पण असायला हवी. अश्या दोन्ही बाजूवर भारताने आपल्या सेनेला सुरक्षित, आधुनिक करण्यासाठी काही पावलं उचलली आहेत. राफेल करार हा त्याचाच एक भाग आहे. त्याचसोबत भारताने शत्रुच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी इस्राईल तंत्रज्ञानाने बनवलेली जगातील सगळ्यात अत्याधुनिक आणि सर्वश्रेष्ठ असलेली Airborne Warning and Control System (AWACS) घेण्याच्या कराराला नुकताच हिरवा झेंडा दाखवला आहे. १ बिलियन अमेरीकन डॉलर इतकी प्रचंड किंमत असलेली ही सिस्टीम आहे तरी काय? भारताकडे अशी सिस्टीम आल्यावर त्याने देशाच्या सामरिक शक्ती मध्ये कशी वाढ होणार आहे हे आपल्याला समजायला हवं. 

Airborne Warning and Control System (AWACS) म्हणजे हवेतील डोळे. शत्रूच्या कोणत्याही हालचालीचा अंदाज येण्यासाठी आपल्याकडे अतिशय उच्च क्षमतेचं रडार असणं गरजेचं आहे. शत्रूची लढाऊ विमाने, क्षेपणास्त्र ह्याचा अंदाज जर आपल्याला वेळेत आला तर त्याला निष्प्रभ करण्यासाठी आपण आपल्या बचाव करणाऱ्या यंत्रणा कार्यान्वित करू शकतो. जमीनीवर असणाऱ्या रडार तंत्रज्ञानावर काही मर्यादा येतात. एक तर जमिनीवर ज्या ठिकाणी रडार सिस्टीम असेल त्याच्या काही अंतराचा भाग त्याच्या कक्षेत येतो. जमीनीवर असणारे रडार हे कमी उंचीवरून उडणाऱ्या विमानांना अथवा क्षेपणास्त्र ह्यांना पटकन ओळखू शकत नाहीत. त्यांच्या अंतराच्या मर्यादेमुळे सिमारेषेजवळ ह्यांना ठेवावं लागते. जात शत्रूला ह्यांचा ठावठिकाणा लागला तर शत्रू ह्याच्यापासून लपून अथवा ह्याला टार्गेट करून हल्ला करू शकतो. अतीतटीच्या लढाईत आपण शत्रूला कुठून शोधत आहोत अथवा त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहोत हे कळू न देणं युद्धाचं पारडं फिरवू शकते. आपल्याकडे कितीही शक्तिशाली लढाऊ विमान आणि क्षेपणास्त्र असली तरी त्यांच कमांड आणि कंट्रोल त्यांना घातक करत असते. ह्या सर्व गोष्टीमुळे जमिनीवरील रडार यंत्रणेवर खूप मर्यादा येतात. 

आता समजा आपल्याकडे अशी काही यंत्रणा आहे की हवेतून आपल्याला हव्या त्या ठिकाणी लक्ष ठेवता येईल आणि त्याचवेळी आपण सतत हवेत फिरत असल्याने शत्रुला आपण नक्की कुठून लक्ष ठेवतो आहे हे लक्षात न आल्याने हल्ला करण्याचा निर्णय ही घेता येणार नाही. जरी तसा निर्णय घेतला तरी आपल्या रडार वर त्याच्या हालचाली दिसल्यावर त्याचा हल्ला निष्प्रभ करण्याच्या अनेक योजना ह्याच सिस्टीम मधून लगेच कार्यान्वित केल्या जाऊ शकतील. अश्याच यंत्रणेला Airborne Warning and Control System (AWACS) म्हणजे हवेतील डोळे असं म्हणतात. भारत जी यंत्रणा इस्राईल कडून विकत घेणार आहे तिला फाल्कन किंवा EL/W-2090 (AWACS) असं म्हणतात. ह्याची निर्मिती इस्राईल आणि एलटा ह्या इस्राईल कंपनीने केली आहे. ह्या सिस्टीम ला फेडरेशन ऑफ अमेरीकन सायंटिस्ट ने सर्वोत्तम अशी मान्यता दिली आहे. ह्या सिस्टीम मध्ये  active electronically scanned array (AESA) आणि  phased array रडार सिस्टीम आहे. सामान्य भाषेत सांगायचं झालं तर ही सिस्टीम आपलं रडार प्रत्यक्ष न फिरवता कॉम्प्युटर च्या साह्याने रडार च्या सिग्नल ३६० अंश कोनात प्रक्षेपित आणि त्याच ग्रहण करू शकते. तसेच वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी मध्ये आपला संदेश ग्रहण अथवा पाठवू शकते. हे सिग्नल शत्रूच्या रडार यंत्रणेला पकडणं अथवा त्यातील माहिती शोधणं हे खूप कठीण असते. त्यामुळेच ही यंत्रणा एखाद्या स्टेल्थ प्रमाणे रडारवर अदृश्य राहून काम करू शकते. 

फाल्कन सिस्टीम रशियाने बनवलेल्या Ilyushin Il-76 ह्या विमानावर बसवण्यात येते. हे विमान अतिशय शक्तिशाली असून ह्याच नाव जगात प्रसिद्ध आहे. जवळपास ५००० किलोमीटर पेक्षा जास्त अंतर ४० टन वजनापेक्षा जास्त वजन घेऊन हे कापू शकते ते ही जवळपास ४०,००० फुटापेक्षा जास्त उंचीवरून आणि ते ही ६ तासापेक्षा कमी वेळात. काश्मीर ते कन्याकुमारी हे भारताच्या दोन टोकाचं अंतर ३६०० किलोमीटर च्या आसपास आहे. म्हणजे हे विमान ४ तासापेक्षा कमी वेळात संपूर्ण भारताच्या हवाई क्षेत्रावर नजर मारू शकते. तब्बल ४०० किलोमीटर च्या परिघातील प्रदेशावर ४०,००० फुटापेक्षा जास्त उंचीवरून ही ह्याच्या नजरेतून कोणतच विमान, क्षेपणास्त्र, शत्रूचा तळ सुटत नाही. तिकडे घडणाऱ्या सर्व गोष्टींवर नजर ठेवून गरज वाटल्यास भारताच्या क्षेपणास्त्र, लढाऊ विमान ह्यांना त्याच उंचीवरून प्रतिहल्ल्यासाठी संदेश देऊ शकते अथवा डागू शकते. फाल्कन सिस्टीम हवेत असेल तर संपूर्ण 'साऊथ ब्लॉक' सारखं कमांड आणि कंट्रोल सिस्टीम आपण हवेत सुरु केल्यासारखं आहे. जिकडून आपण सर्व यंत्रणा, युद्धजन्य परिस्थितीत शत्रूला आपलं अस्तित्व न दाखवता संपूर्ण युद्धाचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवू शकते. 

उरी चित्रपटात अशीच  (AWACS) यंत्रणा पाकिस्तान ने कार्यान्वित केल्यामुळे सैनिकांना गुहेतून पाकव्याप्त काश्मीर मध्ये प्रवेश केला असं दाखवण्यात आलं होतं. पाकीस्तान आणि चीन ह्या यंत्रणेच्या बाबतीत खेदाने भारताच्या पुढे आहेत. पाकीस्तान कडे अश्या ८-१० यंत्रणा आहेत तर चीन कडे हाच आकडा ३० च्या आसपास आहे. भारताकडे मात्र सद्यस्थितीला फक्त ३ यंत्रणा आहेत. गेल्या काही वर्षातील राजकीय निष्क्रियतेमुळे अश्या यंत्रणा खरेदी करण्याचे करार खूप लांबणीवर पडले होते. अतिशय प्रगत असणारी ही यंत्रणा प्रचंड खर्चिक आहे ह्यात वाद नाही पण त्याचा उपयोग आणि त्याची गरज भारताला कधी नव्हे तितकी आता भारत- चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जाणवत आहे. गेले कित्येक वर्ष अडकलेल्या ह्या १ बिलियन अमेरीकन डॉलर खर्चाच्या यंत्रणेला आता हिरवा कंदील मिळाला असून येत्या ३ वर्षात अजून असे दोन हवेतील डोळे ( फाल्कन Airborne Warning and Control System (AWACS) भारताच्या सेवेत समाविष्ट होतील.      

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

 


     

Wednesday, 26 August 2020

अज्ञात उडणारी वस्तू... विनीत वर्तक ©

 अज्ञात उडणारी वस्तू... विनीत वर्तक ©

मानवाच्या उत्क्रांतीपासूनच मानवाला आपल्यासारखं कोणी ह्या विश्वात आहे का? ह्याची उत्सुकता वाटत आलेली आहे. जसजसं तंत्रज्ञान आणि अवकाशाविषयी आपलं ज्ञान तो प्रगल्भ करत गेला तसतसं ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत गेला. आजतागायत तरी आपल्यासारखं दुसरं कोणी ह्या विश्वाच्या पसाऱ्यात शोधण्यात यश आलेलं नाही. पण त्याचवेळी आत्ताच्या तंत्रज्ञानाची मजल ही विश्वाच्या आकारमानापुढे धुळीच्या कणाएवढी आहे ह्याची जाणीव ही त्याला झालेली आहे. अजून जरी उत्तर मिळालं नसलं तरी आपल्या सारखं कोणी ह्या विश्वाच्या पोकळीत असेल असं अनेक वैज्ञानिकांचे मत आहे. विश्वाच्या ह्या पोकळीत अनेकवेळा ह्याच परग्रहावरील लोकवस्तीच्या अत्याधुनिक विमान अथवा तबकड्या किंवा अज्ञात उडणाऱ्या वस्तू दिसल्याच्या अनेक घटनांची इतिहासात नोंद आहे. अनेकवेळा हे दावे आणि त्यासाठी सादर केलेले पुरावे वैज्ञानिक चष्म्यातून चुकीचे ठरले असले तरी काही घटनांची गाठ सुटलेली नाही. विज्ञानाच्या चष्म्यातून काही घटनांना समाधानकारक उत्तर देता आलेली नाहीत. त्यामुळेच आजही अश्या गोष्टींच कुतूहल जनमानसात ते वैज्ञानिक ह्या दोघांमध्ये तितकच आहे. 

गेल्या आठवड्यात घडलेली अशीच एक घटना सध्या जगाच्या पटलावर खळबळ माजवत आहे. कारण ज्याने ती बघितली तो कोणी साधासुधा व्यक्ती नाही न त्याची शाहनिशा करणाऱ्या संस्था. ही घटना टिपणारा व्यक्ती एक अंतराळविर आहे. ह्या अंतराळवीराच नावं आहे इवान वॅग्नर. इवान हा रशियाचा अंतराळवीर असून सोयूझ एम एस -१६ ह्या मोहीमेद्वारा एप्रिल २०२० मध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर दाखल झाला आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे पृथ्वीपासून ४०८ किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित करून स्थापन केलेलं आहे. अनेक देशांचे अंतराळवीर इकडे संशोधनासाठी जात असतात आणि वास्तव्यात असतात. इवान वॅग्नर ही आय.एस.एस. वर आपलं काम करत असताना त्याला अवकाशातून दिसणाऱ्या एका सुंदर घटनेला आपल्या कॅमेरामध्ये बंदिस्त करण्याचा मोह आवरला नाही. जेव्हा त्याने अवकाशातून दिसणाऱ्या अरोरा ऑस्ट्रेलीस ला आपल्या कॅमेरामध्ये बंदिस्त केलं तेव्हा त्यासोबत एका वेगळ्या घटनेला आपण बंदिस्त करतो आहोत हे त्याच्या ध्यानीमनी नव्हतं. 

सूर्याकडून येणारे प्रभारीत कणांची पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी होणारी टक्कर जेव्हा प्रकाशाच्या रूपाने ध्रुवीय भागात दिसते तेव्हा तो एक नयनरम्य सोहळा असतो. हा सोहळा जेव्हा इवान वॅग्नर ने बंदिस्त करून बघितला तेव्हा त्यातील एका घटनेने त्याच लक्ष वेधलं. ह्या व्हिडीओ मध्ये साधारण ९ सेकंद ते १२ सेकंद ह्या काळात ५ यु.एफ.ओ. (अज्ञात उडणारी वस्तू) त्याला एका सरळ रेषेत दिसून आल्या. त्याने ह्याचा शोध घ्यायचा आपल्या परीने प्रयत्न केला पण त्याला ते कळलं नाही. त्याने अवकाशातून आपला हा व्हिडीओ ट्विट केला आणि पूर्ण जगाला हे नक्की काय आहे? असा प्रश्न विचारला. टाइम लॅप्समुळे प्रत्यक्षात ५२ सेकंद दिसणारे हे ५  यु.एफ.ओ. (अज्ञात उडणारी वस्तू) अवघ्या ३ सेकंद त्या व्हिडीओ मध्ये दिसतात आणि नंतर अरोरा ऑस्ट्रेलीस च मनोहरी दृश्य आपण ह्यामध्ये बघू शकतो. 

इवान ने ट्विट करताना वैज्ञानिकांना हे काय असू शकेल असा प्रश्न विचारला आहे? इवान आपल्या ट्विट मध्ये म्हणतो, 

The objects “appear flying alongside with the same distance, “What do you think those are? Meteors, satellites or … ?”

त्याच्या ह्या प्रश्नावर जगभरातील संशोधक, वैज्ञानिक ह्यांनी अभ्यास करायला सुरवात केली आहे पण अजूनपर्यंत उत्तर मिळालेल नाही. इवान चा हा व्हिडीओ त्याने रशियाची स्पेस एजन्सी रॉसकॉसमॉस कडेही सुपूर्द केला आहे. 

“It is too early to make conclusions until our Roscosmos researchers and scientists at the Space Research Institute of the Russian Academy of Sciences tell us what they think. It was decided to hand over those materials to experts, who will tell us what that was in their opinion.”

सध्या ह्या गोष्टीवर जगातील वैज्ञानिक, खगोल संशोधक अभ्यास करत असून जर इवान ला नक्की काय दिसलं ह्याच गूढ नाही सोडवू शकले तर कदाचित पुन्हा एकदा उडत्या तबकड्या, यु.एफ.ओ. (अज्ञात उडणारी वस्तू) ह्यांच्याविषयी असलेल्या गूढतेमध्ये भर पडणार आहे. नासा ने तूर्तास ह्यावर मौन बाळगलं आहे. पण ही गोष्ट पेंटॉगॉन आणि नासा च्या रडारवर असणार हे नक्की आहे. 

इवान चा हा व्हिडीओ यु ट्यूब वर उपलब्ध आहे. बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

https://www.youtube.com/watch?v=bXjikQaMjc8   

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Monday, 24 August 2020

खारे वारे मतलई वारे ( भाग २ ) ... विनीत वर्तक ©

 खारे वारे मतलई वारे ( भाग २ ) ... विनीत वर्तक ©

भारत ज्या गतीने आर्थिक, लष्करी सामर्थ्य ह्यामध्ये प्रगती करत होता त्याच वेगाने पाकीस्तान चा प्रवास कर्जाच्या दरीत सुरु झाला. पाकीस्तानी जनतेला तिथल्या हुकूमशहांनी काश्मीर च गाजर दाखवून इतके वर्ष आपली अधोगती लपवली होती. पण कलम ३७० हटल्यावर पाकीस्तान चा काश्मीर प्रश्नावर पूर्णपणे हरला असल्याची भावना एकूणच तिथल्या जनतेत झाली. आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची कोंडी करणं अशक्य आहे हे लक्षात आल्यावर पाकीस्तान ने निदान ओ.आय.सी. च्या माध्यमातून भारतावर धर्मावर आधारीत विश्वास संपादन करण्याचा मनसुबा आखला. कारण तिथल्या जनतेला तोंड दाखवायला काश्मीर प्रश्नी काहीतरी करून दाखवणं हे सध्याच्या नेतृत्वाला गरजेचं होतं. कर्जाच्या खाईत डुबलेल्या पाकीस्तान ला आंतरराष्ट्रीय स्तरावर भिक मागण्यासाठी अतिरेकी आणि त्यांना घडवणाऱ्या संस्था ह्यावर कुठेतरी निदान अंकुश ठेवला आहे हे दाखवणं गरजेचं होतं तर त्याचवेळी भारताने ऑफेन्सिव्ह डिफेंस ही निती बाळगल्याने गोळीच उत्तर गोळ्यांनी भारत देणार हे स्पष्ट झालं होतं. 

सगळ्याच आघाड्यांवर पाकीस्तान एक एक करून माती खात होता आणि त्याचा शेवटचा आशेचा किरण ओ.आय.सी. हे होतं. पण सौदी अरेबिया ने त्याच्या ह्या मनसुब्यांवर पूर्णपणे पाणी फिरवलं. सौदी अरेबिया विरुद्ध समोरून काही करता येतं नसल्याने पाकीस्तान ने सौदी विरुद्ध आखाती देशांना चिथवायला सुरवात केली. सौदी नाही तर मुस्लिम धर्माच्या विरुद्ध भारताने काश्मीर मध्ये केलेल्या कारवाई चा निषेध आपण करायला हवा असं त्याच्या परराष्ट्र मंत्र्यांनी वक्तव्य करायला सुरवात केली. पण सौदीने पाकीस्तान चा आवाज ऐकून न ऐकल्यासारखा केला. ह्या सगळ्या गोष्टी सौदी अरेबिया च्या तत्कालीन नेतृत्वाला अजिबात पसंद पडल्या नव्हत्या. असंतोषाची धग दोन्हीकडे जाणवत होती. अवकाश होता तो एका ठिणगीचा. जुलै महीन्यात पाकीस्तान च्या परराष्ट्र मंत्र्यांनी एका टी.व्ही. वहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत पुन्हा एकदा तोच राग आवळला. ह्या नंतर सौदी अरेबिया ने आपला संयम तोडला. सतत एकच विषय सगळीकडे बोलला की त्याने समोरच्यावर दबाव निर्माण होतो हा काश्मीर प्रश्नी आलेला अनुभव पाकीस्तान ला पुन्हा येईल असं वाटलं. पण समोर आता भारत नव्हता तर सौदी अरेबिया होता. 

सौदी अरेबिया च्या नेतृत्त्वाने तात्काळ पाकीस्तान ला कर्ज रूपाने दिलेली सगळी मदत रोखण्याची घोषणा केली. २०१८ मध्ये सौदी अरेबियाने पाकीस्तान ला ६.२ बिलियन अमेरीकन डॉलर ची मदत जाहीर केली होती. त्यात ३ बिलियन अमेरीकन डॉलर स्वस्त दराने कर्ज तर उरलेल्या ३.२ बिलियन डॉलर च ऑईल आणि गॅस क्रेडिट त्यांनी दिलं होतं. (क्रेडिट म्हणजे ३.२ बिलियन अमेरीकन डॉलर च तेल आणि गॅस पाकीस्तान उधारीवर खरेदी करू शकतो. कोणतही व्याज न देता.) सौदी ने करार रद्द तर केलाच पण आपले सर्व पैसे आणि उधारी आत्ताच्या आत्ता चुकवण्याचा आदेश पाकीस्तान ला दिला. असं काही होईल ह्याची जाणीव पाकीस्तान ला होई पर्यंत खुप उशीर झाला होता. सौदीने पाकीस्तान ची जागा एका झटक्यात त्याला दाखवली होती. आधीच नाकापर्यंत कर्जात डुबलेल्या भिकारड्या पाकीस्तान ला जगात कर्ज द्यायला कोणी उभं करत नव्हतं. शेवटी चीन कडून चढ्या भावाने १ बिलियन डॉलर च कर्ज मिळालं. पण त्यासाठी लागणार व्याज ही चीन वसूल करणार हे ओघाने आलं. 

१ बिलियन तर दिले. पुढले २ बिलियन अमेरीकन डॉलर आणायचे कुठून हा प्रश्न आ वासून समोर उभा आहे. पाकीस्तान ची आर्थिक स्थिती सध्या अतिशय नाजूक आहे. पाकीस्तान कडे फक्त १२.५ बिलियन अमेरिकन परकीय गंगाजळी आहे. (भारताकडे त्याच तुलनेत जवळपास ५३८ बिलियन अमेरिकन डॉलर ची परकीय गंगाजळी आहे.) ह्या पैश्यात पाकीस्तान सरकार फक्त ३ महिने देश चालवू शकते. (आयात आणण्यासाठी लागणारे पैसे). त्यात सौदी अरेबिया आपल्या कर्जाच्या परतफेडीसाठी पाकीस्तान वर दबाव टाकत आहे. सौदीच्या रागाला शांत करण्यासाठी पाकीस्तान आर्मी चे प्रमुख जनरल बजवा आणि आय.एस.आय. चे प्रमुख तातडीने सौदी नेतृत्वाची समजूत काढायला गेले. पण सौदी च्या नेतृत्त्वाने त्यांना भेट नाकारत आता फक्त उरलेले पैसे परत द्या असं स्पष्टपणे बजावलं. ह्या शिवाय ३.२ बिलियन डॉलर च उधारीच खात ही बंद झाल्याचं निक्षून सांगितलं. आधीच भिकारी बनलेल्या पाकीस्तान ची अवस्था आता न घर का न घाट का अशी झाली आहे. बेजबाबदारपणे वक्तव्य केल्यामुळे पाकीस्तान वर आज ही वेळ आली आहे. 

एकाकी पडलेल्या लाचार पाकीस्तान चा फायदा घेणार नाही तो कसला चीन. चीन ने त्वरित १ बिलियन अमेरीकन डॉलर च कर्ज पाकीस्तान ला देऊन आपण मित्र असल्याचं दाखवलं पण हे कर्ज चढ्या भावाने दिलं हे मात्र लपवलं. पाकीस्तान ज्या वेगाने चीन च्या जाळ्यात अडकत जातो आहे ते भारतासाठी धोक्याची घंटा निश्चित आहे. पाकीस्तान आपलं कर्ज फेडू शकणार नाही हे चीन ला पक्के ठाऊक आहे. ह्या पैश्याच्या मोबदल्यात चीन पाकीस्तान च्या सार्वभौमत्वावर आपलं वर्चस्व स्थापन करत आहे. एकदा की पाकीस्तान ची आर्थिक नाडी त्याच्या हातात आली की चीन पाकीस्तान चा वापर भारताविरुद्ध हवा तसा करणार आहे. म्हणजे लढणार भारत आणि पाकीस्तान पण जिंकणार चीन. कारण दोघांच ह्यात नुकसान होणार आणि चीन आपलं सैन्य सहभागी न करता युद्ध जिंकणार. चीन स्वतः ज्या पद्धतीने मुस्लिम धर्मावर अत्याचार करत आहे त्या बद्दल पाकीस्तान मुग गिळून गप्प आहे. जवळपास ३ मिलियन उयघूर्स आणि तुर्की मुसलमान लोकांवर अत्याचार केले आहेत. हे अत्याचार नाझी कॅम्प पेक्षा भयंकर आहेत. पण ह्यावर न पाकीस्तान काही बोलत आहे न मुस्लिम धर्माचा आव आणणारी राष्ट्र. 

भारताच्या दृष्टीने पाकीस्तान चा जो काही ऱ्हास चालू आहे तो चांगला नाही. चीन ज्या पद्धतीने हिमालय, पाकव्याप्त काश्मीर ह्यावर सीपेक च्या मदतीने कब्जा करत आहे. ते भारतासाठी चांगल नाही. कोणी म्हणेल की पाकव्याप्त काश्मीरवर भारताने हमला करून तो आपला ताब्यात घ्यावा पण ते तितकं सोप्प नाही. पाकीस्तान ची सेना भारतीय सैन्याला मात देऊ शकत नाही हे पाकीस्तान ला ही चांगल माहिती आहे. प्रश्न आहे तो माकडाच्या हातात कोलीत असण्याचा. २-३ दिवसांपूर्वी पाकीस्तान च्या एका मंत्र्यांनी दिलेले विधान ह्याच सुचक आहे. आपण भले पाकव्याप्त काश्मीर घेऊ पण त्या नादात पाकीस्तान अणुबॉम्ब टाकण्याचा मुर्खपणा करू शकतो. अर्थात भारत त्याला उत्तर देईल आणि पाकीस्तान चा नकाशा पुसला जाईल हे खरं असलं तरी त्या सोबत भारताला मोजावी लागणारी किंमत प्रचंड मोठी असू शकते. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर घ्यायचा असेल तर जागतिक मंचावर पाकीस्तान ला एकटं पाडून किंवा तिकडे असणाऱ्या बलोच लोकांना मदत करून भारत पाकीस्तान चे तुकडे करून ह्या भागावर आपला हक्क प्रस्थपित करू शकतो. अर्थात ह्या सगळ्या जर तर च्या शक्यता आहेत. ज्या पद्धतीने जागतिक वारे बदलत आहेत ते बघता पाकीस्तान वेगाने विनाशाकडे जात आहे. प्रश्न इतकाच आहे की ह्या सगळ्यात भारत आपलं कमीत कमी नुकसान कसं होईल ह्याच्या उपाययोजना करू शकतो. 

क्रमशः

पुढल्या लेखात इस्राईल- यु.ए.इ. राजनैतिक संबंध, साऊथ चायना सी मधील बदलणाऱ्या घडामोडी आणि इतर. 

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 

Sunday, 23 August 2020

विधिलिखित (नशीब)... विनीत वर्तक ©

 विधिलिखित (नशीब)... विनीत वर्तक ©

काल एक चित्रपट बघताना एक छान वाक्य समोर आलं. त्या एका छोट्या वाक्यात खूप सारा अर्थ दडलेला होता. ते ऐकलं आणि पुन्हा पुन्हा ऐकत राहिलो. ते वाक्य होतं, 

Everyone has their own destiny, but not even one makes a choice to follow it. 

हे वाक्य ऐकून मनात विचारांचा कल्लोळ सुरु झाला. विधिलिखित म्हणतो ते प्रत्येकाचं वेगळं असतेच. आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं आहे ह्याचा अंदाज ना आजवर कोणाला आला न कधी येईल. नशिबाचा खेळ असं म्हणत आपण पुढे चालायला तर लागतो पण नशीब घडवता ही येतं हे पण तितकच खरं. आपण काय निवडायचं हे मात्र आपण ठरवायचं. 

जन्माला येताना प्रत्येक जीव स्वतःच असं विधिलिखित घेऊन जन्माला येतो. ना तो स्वतःचे आई-वडील निवडू शकतो ना स्वतःची भावंड. ना आपलं कुटुंब निवडू शकतो ना आपला धर्म आणि देश. आयुष्यात खूप कमी गोष्टी असतात की ज्या आपण निवडू शकतो. पण जेव्हा ती निवडण्याची वेळ येते तेव्हा खरच आपण निवडतो का? आयुष्यात बघितलेली स्वप्न असो वा आयुष्यात आलेली व्यक्ती असो प्रत्येकवेळी आपण ती निवडतोच असं नाही. घडाळाच्या काट्यावर आणि समाजाच्या साच्यात बंदिस्त केलेल्या आयुष्यात अनेकदा ते निवड करण्याचं आपण एकतर टाळतो तरी किंवा दुसऱ्याच्या भरवश्यावर सोडून तरी देतो. मात्र हाच निर्णय आपला असताना सुद्धा आयुष्यात समाधानी नसल्याचं खापर मात्र आपण नशिबावर फोडतो. 

कधी कधी नशिबाचे फासे उलट ही पडतात पण सहजा सहजी मिळेल असं आयुष्यात काहीचं नसतं. जिकडे आईच्या उदरातून जन्माला यायला ९ महिने लागतात. एका नवीन जिवाला जन्म देताना होणारा त्रास तर न शब्दात न मावणारा तिकडे बाकीच्या गोष्टी सगळ्याच फिक्या. विधिलिखित असं काही असते तर ह्याच उत्तर हो पण आहे नाही पण. विधात्याने जन्माला येताना प्रत्येकासाठी वेगळा साचा ठेवलेला असतोच. जिकडे रंग, रूप, शरीर एकसारखं दुसरं असतं नाही तिकडे विधिलिखित तरी एक कसं असणार? त्यानेच प्रत्येकाचं विधिलिखित त्याच सोबत लिहलेलं असते. फरक इतकाच की त्या नशिबाला आपलं आयुष्य बनवायचं का नाही हा निर्णय मात्र ज्याचा त्याने घ्यायचा असतो. 

नशीब घडवणारे वेगळेच असतात. ते निर्णय घेतात आपल्या स्वप्नांना मूर्त रूप देण्याचा, आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपल्या पदरात पडून घेण्याचा त्यासाठी वाटलं तर समाजाच्या भिंती उखडून टाकतात, चालीरीती बदलवून टाकतात. ना काळ त्यांना थांबवू शकत ना वेळ. ते वाटचाल करत राहतात आपलं विधिलिखित स्वतःच्या हाताने लिहीत जातात. मध्ये काही आलं तरी आपल्या ध्येयापासून त्यांना कोणी परावृत्त करू शकत नाही. अश्या वेळी एकच मार्ग उरतो तो म्हणजे आपल्याला वाटते तेच आयुष्य जगण्याचा. ज्याला आपण नशीब किंवा विधिलिखित म्हणतो. 

विधिलिखित असणं हे जरी मान्य केलं तरी ते जगायला लागणारा निर्णय मात्र आपणच घ्यायचा असतो. तो निर्णय घेण्याची पात्रता ही आपणच आत्मसात करायची असते. जे लोकं ती आत्मसात करतात त्यांच नशीब पालटायला वेळ लागत नाही. त्यांच आयुष्य समृद्ध व्हायला खोट्या कुबड्यांची गरज लागत नाही न समाधानाचे क्षण मिळवण्यासाठी त्यांना गोष्टी विकत घेण्याची गरज पडते. कारण विधिलिखित (नशीब) फुटकं असलं तरी त्या फुटलेल्या नशिबातुन पण अंकुर उगवायची पात्रता आपल्या अंगी निर्माण केली तर आयुष्यच विधिलिखित आपण आपल्याच हाताने लिहू शकतो नाही का? 

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  

Saturday, 22 August 2020

खारे वारे मतलई वारे ( भाग १ ) ... विनीत वर्तक ©

खारे वारे मतलई वारे  ( भाग १ ) ... विनीत वर्तक ©

सध्या जागतिक स्तरावर खूप काही उलथापालथी घडत आहेत. कोरोनामुळे जसं जग पुर्णपणे थांबेल अशी कोणी कल्पना केली नव्हती त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर अश्या काही गोष्टी घडून येतील ह्याचा विचार कोणी केला नव्हता. ह्या सगळ्या घडामोडींचे दुरगामी परीणाम जगाच्या नकाशावर येणाऱ्या काळात दिसून येणार आहेत. ह्या गोष्टी जरी एका रात्रीत घडल्या असल्या तरी त्याची बीज कित्येक वर्षापासून रोवली गेली होती. कोरोना हे ह्या घटनांना मूर्त स्वरूप देण्यास कारण बनलं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अश्या कोणत्या घटना घडल्या आहेत ज्याचा प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष परीणाम भारतावर आणि सामान्य भारतीयावर होणार आहे. तर त्यातला काही घटना म्हणजे पाकीस्तान आणि सौदी अरेबिया ह्यांचे बिघडलेले राजनैतिक संबंध, इस्राईल आणि युनायटेड अरब अमिराती ह्यांच्यात निर्माण झालेले राजनैतिक संबंध, पाकीस्तान ला हळूहळू विकत घेणारा चीन, साऊथ चायना समुद्र इथे चीन आणि व्हिएतनाम ह्यांच्यात होणाऱ्या घडामोडी. अमेरीका आणि चीन चा वाढता असंतोष आणि ह्या सर्व जागतिक संबंधांचा एक महत्वाचा दुवा म्हणजे भारत आणि भारतीय. 

The Organisation of Islamic Cooperation (OIC) ही एक जागतिक संघटना आहे. युनायटेड नेशन नंतर ही सगळ्यात मोठी संघटना असून ५७ देश ह्याचे सदस्य आहेत. मुस्लिम लोकसंख्या जास्त अथवा मुस्लिम धर्माच प्राबल्य असलेल्या लोकांची ही संघटना आहे. ह्या संघटनेचा मुख्य देश ही संघटना १९६९ स्थापन झाल्यापासून सौदी अरेबिया हा आहे. त्यामागे काही कारण आहेत. एकतर जगाला लागणार १८%-२०% तेल ह्या एकट्या देशाकडे आहे. तेलामुळे ह्या देशात आर्थिक सुबत्ता आहे. दुसरं म्हणजे मक्का आणि मदिना ही मुस्लिम लोकांची महत्वाची धार्मिक ठिकाण ह्याच देशात आहेत. ह्यामुळे आजवर मुस्लिम देशांच प्रतिनिधित्व सौदी अरेबियाकडे आहे. पण गेल्या काही वर्षात त्याच्या ह्या अस्मितेला धक्का देणारा एक देश पुढे येत आहे. तो म्हणजे तुर्कस्थान (तुर्की). तर ह्या देशाने आपणच मुस्लिम लोकांच प्रतिनिधित्व करत असून आपला एक गट बनवायला सुरवात केली आहे. अर्थात त्याचे हे मनसुबे सौदी अरेबिया ला आवडणारे नाहीत. त्यामुळे ह्या संघटनेत आता गटबाजी सुरु झाली आहे. पाकीस्तान हा ह्या देशांमधील भिक मागणारा देश. पण ह्या देशाकडे अणवस्त्र असल्याने भाव खाणारा. कारण ह्या ५७ देशात फक्त पाकीस्तान ने चोरून आणि चीन च्या मदतीने अणुबॉम्ब बनवलेला आहे. पाकीस्तान आणि मलेशिया चा कल हळूहळू तुर्कीकडे सरकत होता तर हे सगळं सौदी ला अजिबात आवडत नव्हतं. असंतोष दोन्ही कडे खदखदून भरलेला होता आता वाट बघायची होती ती असंतोषाची ठिणगी पडायची. 

गेल्या ५-७ वर्षातील जागतिक अर्थकारण बघितलं तर भारताचा उदय जागतिक राजकारणावर प्रभाव पाडायला लागला होता. आर्थिक विकासाची चावी चीन आणि भारत ह्या दोन देशांकडे असणार हा इतिहास आता प्रत्यक्षात घडायला लागला होता. त्यातच तेलावर असलेली जगाची तहान आता हळूहळू तांत्रिक प्रगतीमुळे घटत जाणार ह्याची चाहूल सौदी अरेबिया च्या नेतृत्वाला लागली होती. अमेरीकेत 'टेस्ला' सारख्या कंपन्यांना मिळणार यश आणि सोलार तसेच इतर ग्रीन एनर्जीकडे हळूहळू का होईना जगाची वळणारी पावलं येणाऱ्या एका दशकात ते दोन दशकात जगाची तेलाची भूक जवळपास शून्यावर येईल अशी स्थिती निर्माण होत होती. त्यामुळेच सौदी नेतृत्वाला आपल्या देशाची आर्थिक घडी सुरळीत ठेवण्यासाठी तेलापलीकडे बघण्याची गरज निर्माण झाली. चीन सारख्या कम्युनिस्ट देशापेक्षा जगातील सर्वात मोठी लोकशाही असेलला भारत हा आपले पैसे आणि गुंतवणूक सुरक्षित करेल असा विश्वास भविष्य ओळखणाऱ्या सौदी, यु.ए.ई. सारख्या देशांना वाटला. त्यातच भारताने आपले संबंध मजबूत करण्यासाठी आपली दारे उघडी केली होती. ह्याचा परीणाम असा झाला की ह्या मुस्लिम राष्ट्रांचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून गेला. 

सौदी अरेबिया आणि यु.ए.ई. सारख्या देशांनी भारतात गुंतवणूक करायला सुरवात केली आणि पाकीस्तान ला हे कुठेतरी पचनी पडणार नव्हतं. पण पाकीस्तान ला विरोध करणं ही शक्य नव्हतं कारण पाकीस्तान त्यांच्याच तुकड्यावर आजवर जगत आलेला होता. गेल्या वर्षी सौदी अरेबिया ने भारतात तब्बल १०० बिलियन अमेरीकन डॉलर ची गुंतवणूक सगळ्या क्षेत्रात करत असल्याचं जाहीर केलं. त्याच सोबत यु.ए.ई. ने ही ७५ बिलियन अमेरीकन डॉलर इतकी प्रचंड गुंतवणूक भारतात करण्याच सांगितलेलं आहे. हे सगळे आकडे अतिशय मोठे आहेत. ह्यामुळेच पाकीस्तान कुठेतरी चरफडत होता. त्याच्या ह्या असंतोषाला त्याने तुर्कीकडे आपलं वजन वळवायला सुरवात केली. सौदी ला हे लक्षात येताच सौदीने पाकीस्तान ला त्याची जागा दाखवली. सौदी ला वगळून The Organisation of Islamic Cooperation (OIC)  च्या मिटिंग ला मलेशिया इकडे न जाण्यासाठी सौदीने पाकीस्तान ला भाग पाडलं. त्यामुळे पाकीस्तान दोन्ही बाजूने तोंडघाशी पडला. त्याची अवस्था 'धरलं चावते सोडलं तर पळते' अशी झाली. त्यातच भारताने काश्मीर मधून ३७० कलम हटवलं आणि काश्मीर भारताचा भाग असल्याचं जागतिक पातळीवर भारताने सिद्ध केलं. काश्मीर हा एकच मुद्दा घेऊन आयुष्यभर रडत असलेल्या भिकारड्या पाकीस्तान ला आपला शेवटचा जोकर पण फुकट गेला अशी भिती वाटली. त्यासाठी त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर आरडाओरड केली. पण जागतिक पातळीवर तर सोडून द्या ओ.आय.सी. सारख्या मुस्लिम संघटने मध्ये ही पाकीस्तान ला कोणी भीक घातली नाही. 

ओ.आय.सी. च्या माध्यमातून आपल्या शेवटच्या पत्याला वाचवण्यासाठी पाकीस्तान ने खूप सारे डावपेच आखले पण ह्या सगळ्यावर सौदीने पूर्णपणे पाणी फिरवलं. सौदी सोबत इतर मुस्लिम राष्ट्र ही पाकीस्तान च्या सोबत उभी राहिली नाहीत. हा आपल्याच घरातला पराभव पाकीस्तान च्या जिव्हारी लागला. काश्मीर प्रश्न मुस्लिम राष्ट्रांनी मुसलमान धर्मावर केलेली कुरघोडी आहे असं मानून त्याला जागतिक प्रश्न बनवून पाकीस्तान ला मदत करावी अशी पाकीस्तान ची इच्छा होती. पण मदत तर जाऊन दे साधी ह्याची दखल घ्यायला ही मुस्लिम राष्ट्रांना गरज वाटली नाही. चिडलेल्या पाकीस्तान ने सौदी ला डिवचण्याचे प्रयत्न सुरु केले. आपल्या डिवचण्याने सौदी आपली दखल घेईल असा त्याचा अंदाज होता. पण पाकीस्तान ची खेळी त्याच्याच इतकी अंगलट आली आहे की आता त्याची अवस्था 'तेल ही गेले तूप ही गेले आणि हाती आलं धुपाटणं' अशी झाली आहे. सौदी अरेबिया किंवा मुळातच आखाती देशांचे संदर्भ आता बदलत चाललेले आहेत. धर्मवेड राहून संबंध बनवता येतं नाहीत आणि ह्या सगळ्यात आपली शक्ती तर खर्च होतेच पण हाताशी काही लागत नाही हे त्यांना कळून चुकलेलं आहे. २१ व्या शतकात जिकडे जगण्याचे संदर्भ बदलत जात आहेत तिकडे पाकीस्तान सारखा देश अजूनही १६ व्या शतकात अडकलेला आहे. जेव्हा मुसलमान राजवटींचा उदय झाला होता. ह्या सगळ्याचे जे परीणाम होणार आहेत त्या सर्वांचा परीणाम भारतावर ही होणार आहे. 

क्रमशः 

पुढील भागात सौदी आणि पाकीस्तान चे बिघडलेले संबंध, चीन चा हस्तक्षेप आणि एकूणच भारताची भूमिका तसेच इतर घडामोडी. 

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  

Monday, 17 August 2020

पद्मश्री मिळवणारा जिल्हा परीषद शाळेचा विद्यार्थी... विनीत वर्तक ©

 पद्मश्री मिळवणारा जिल्हा परीषद शाळेचा विद्यार्थी... विनीत वर्तक ©

आयुष्यात चांगल्या शाळेतून, कॉलेज मधून शिकलो म्हणजे आपण आयुष्यात चांगल्या पदावर जाऊ किंवा चांगल्या संधी उपलब्ध होतील असा मतप्रवाह जनसामान्य लोकांमध्ये आहे. काही अंशी तो खरा ही असेल पण त्यामुळे बाकीच्या शाळा, कॉलेजांच महत्व कमी होतं नाही. शिक्षण आपल्याला कुठेही घेता येतं, कसही घेता येतं. लोखंडाच सोन करणारे परीस शिक्षक चांगल्या शाळेत असतात तसे ते जिल्हा परीषद शाळेत ही असतात. चांगले विद्यार्थी घडायला त्या विद्यार्थाच्या मनात ते असावं लागते. अश्याच एका जिल्हा परीषद शाळेत शिकलेल्या विद्यार्थाने आपल्या कर्तृत्वाने भारतात एड्स / एच.आय.व्ही.च्या संशोधनात आपलं बहुमूल्य योगदान दिलं. भारतात एड्स च्या प्रसाराच्या विरुद्ध वैद्यकीय चळवळी मागचा चेहरा म्हणून त्यांना ओळखलं जाते. जिल्हा परीषदेच्या मराठी माध्यमातून शालेय शिक्षण घेऊन सार्वजनिक आरोग्यामध्ये जगातील प्रथम क्रमांकाच्या जॉन हॉपकिन विद्यापीठ,अमेरीका इकडे प्रक्षिशण घेऊन भारताच्या कोरोना विरुद्धच्या युद्धात डॉक्टरांचा चेहरा ठरलेला तो विद्यार्थी म्हणजेच डॉक्टर रमण गंगाखेडकर. 

चीन मध्ये कोरोना विषाणू ने हाहाकार माजवल्यानंतर त्याचे पडसाद जागतिक पटलावर उमटायला सुरवात झाली होती. भारताच्या वेशीपाशी आलेल्या कोरोना विषाणूची लागण आणि प्रसार कमीत कमी कसा होईल ह्यासाठी लागणाऱ्या उपायोजना आणि उपचार ह्याची सुत्र भारतीय संशोधन परीषद (आय. सी. एम. आर.) च्या साथरोग व संसर्गजन्य रोग ह्या विभागाचे प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर ह्यांच्याकडे होती. भारतात कोरोना चा प्रसार जसा वाढत गेला तशी भारतीय संशोधन परीषदेची जबाबदारी वाढत गेली. भारत सरकारच्या सोबत कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या. त्यामुळेच अमेरीका, इटली सारख्या देशात कोरोना हाहाकार माजवत असताना भारत त्या तुलनेत खूप सुरक्षित राहिला होता. त्यामागे प्रचंड असे परीश्रम डॉक्टर रमण गंगाखेडकर ह्यांचे होते. ३० जून २०२० साली ते आपल्या पदावरून निवृत्त झाले पण आपलं कार्य त्यांनी सुरु ठेवताना डॉक्टर सी.जी.पंडित नॅशनल चेअर ह्या भारतीय संशोधन परीषदेच्या अतिशय मानाच्या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली आहे. पुण्यावरून ह्या ही पुढे देशाच्या वैद्यकीय संशोधनात आपलं योगदान देण्याचं त्यांनी नक्की केलं आहे. 

१९६२ साली मुंबईत त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण जिल्हा परीषद शाळेच्या मराठी माध्यमातून त्यांनी पूर्ण केलं व आपली डॉक्टरी पदवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद इकडून मिळवली. त्यांनतर १९८९ साली त्यांनी स्वतः डॉक्टर म्हणून काम सुरु केलं. पण त्यांच्या आयुष्याने एक वेगळं वळण घेतलं जेव्हा त्यांनी एड्स वर संशोधनाला सुरवात केली. एड्स हा रोग तेव्हा भारतात जास्ती कोणाला माहित नव्हता न त्या बद्दल कोणती औषध, उपचार उपलब्ध होते. एड्स झालेल्या व्यक्तींना आधार देणं इतकच त्यांच्या हातात होतं. एड्स च्या भारतातील प्रसाराला आळा घालण्यासाठी समाजाला जागृत करण्याची गरज आहे हे त्यांना समजून चुकलं होतं. रेड लाईट एरीया म्हणजे काय? हे माहित नसताना तिकडे जाऊन तिथल्या वैश्यांच जीवन अनुभवणं इथपासून त्यांनी आपल्या संशोधनाची सुरवात केली. १९९३ साली नारी म्हणजेच National AIDS Research Institute (NARI) पुणे इकडे सुरु झाल्यावर त्यांची नियुक्ती तिकडे करण्यात आली. तिकडे असताना भारतात एड्स ला प्रतिबंध करण्यासाठी देशपातळीवर सामाजिक क्षेत्राला ह्या कार्याशी जोडलं. एड्स कसा होतो? तो होऊ नये म्हणून घ्यायच्या दक्षता? झाल्यावर उपलब्ध असणारी औषधे आणि त्याची अमंलबजावणी केली. ह्यामुळे भारतात एड्स विरुद्ध एक सशक्त चळवळ उभी राहिली. 

१९९९ साली एड्स विरुद्ध च्या लढ्यात भारताने एक नवीन पाऊल टाकलं. एड्स बाधित आई- वडिलांकडून त्यांच्या मुलांकडे दिल्या जाणाऱ्या एड्स च्या विषाणू चा प्रसार थांबवण्यासाठी आणि अश्या मुलांच्या वैद्यकीय औषधांसाठी भारत सरकारने Prevention of Parent-to-Child Transmission (PPTCT) ची योजना अमलात आणली. ह्या योजनेच्या निर्मितीत आणि ही योजना सुरु करण्यात डॉक्टर गंगाखेडकर ह्यांचं अमुल्य योगदान होतं. एड्स वर अजूनही पूर्ण उपचार नसला तरी एड्स प्रभावित व्यक्तीच आयुष्यमान लांबवणारी प्रभावी औषध आलेली आहेत. त्यांच्या मते २०३० पर्यंत भारतात एड्स चा प्रसार जवळपास संपुष्टात येईल. अनेक वर्ष नारी मध्ये आपलं संशोधन केल्यावर त्यांची नियुक्ती भारतीय संशोधन परीषद (आय. सी. एम. आर.) च्या साथरोग व संसर्गजन्य रोग ह्या विभागाचे प्रमुख म्हणून झाली. तिकडेही आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवला. कोरोना च्या संकटामध्ये भारतीय संशोधन परीषद (आय. सी. एम. आर.) चा चेहरा म्हणून डॉक्टर रमण गंगाखेडकर ह्यांचं नाव सन्मानाने घेतलं जाते. त्यांच्या एड्स आणि इतर संसर्गजन्य रोगावरील संशोधनासाठी भारत सरकारने २०२० साली पद्मश्री देऊन सन्मान केला. 

एड्स आणि कोरोना सारख्या भयंकर रोगांच्या लढाईत जिल्हा परीषद शाळेच्या मराठी माध्यमात शिकलेला एक मुलगा आज देशाचा चेहरा बनून समोर येतो आणि आपलं वैद्यकीय सेवेचं आपलं व्रत आजही अविरत सुरु ठेवतो. डॉक्टर रमण गंगाखेडकर ह्यांचा हा प्रवास स्फूर्तिदायी तर आहेच पण एका डॉक्टरच आयुष्य समजून सांगणारा आहे. आज जिकडे राजकीय वर्चस्वासाठी डॉक्टरी पेशाची कंपाउंडर शी तुलना केली जाते तिकडे एका सर्वसामान्य घरातून देशाच्या वैद्यकीय संशोधनाचा अविभाज्य भाग बनलेल्या डॉक्टरांचा प्रवास सगळ्यांना नक्कीच स्फूर्ती देणारा आहे. त्यांच्या कार्याला सलाम आणि पुढील प्रवसासाठी खूप खूप शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  


Saturday, 15 August 2020

सेवन स्टार... विनीत वर्तक ©

सेवन स्टार... विनीत वर्तक ©

कोणत्या वर्षी एखाद्या कलाकाराला किती पुरस्कार मिळाले? कोणत्या चित्रपटाने पुरस्कारांचा विक्रम केला? ते कोणत्या हिरोला अथवा हिरोईनला आजवर किती पुरस्कार मिळाले (खरं तर अनेकदा पैसे मोजून विकत घेतलेले) ह्याची नोंद ठेवणाऱ्या भारतीयांना खऱ्या हिरोंना किती पदकं मिळाली ह्याची नोंद सुद्धा नसते. मुळात भारताच्या खऱ्या हिरोंना कोणती पदके दिली जातात ह्याची पुसटशी कल्पना नसणाऱ्या प्रगल्भ भारतीयांकडून अजून जास्ती काही माहित असल्याची आशा ठेवण्याची गरज नाही. जो देशासाठी बलिदान देण्यास तयार असतो. त्याच्या संरक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा करत नाही अश्या लोकांना किती लोकांनी आपल्याला लाईक केलं किंवा किती लोक आणि मिडिया आपल्याला फॉलो करते ह्याच काही नसते. ते आपलं कर्तव्य निभावत राहतात. असे करणारे इतिहासाच्या पानावर आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरून जातात. असाच एक इतिहास सी.आर.पी. एफ सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स च्या एका अधिकाऱ्याने नुकताच नोंदवला आहे. एक, दोन नाही तर चक्क सेवन स्टार मिळवण्याचा विक्रम केला आहे. 

असिस्टंट कमांडंट नरेश कुमार ह्यांना सातव्यांदा पोलीस शौर्य पदकाने गौरवण्यात आलं आहे. सातव्यांदा हा सन्मान मिळवणारे ते सी.आर.पी.एफ. चे ते पहिले आणि एकमेव अधिकारी आहेत. वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी त्यांनी हा सन्मान मिळवला आहे. अवघ्या ४ वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत तब्बल ७ वेळा पोलीस शौर्य चक्राचा सन्मान त्यांनी देशासाठी जीवावर उदार होऊन केलेल्या पराक्रमाची साक्ष देण्यास पुरेसे आहेत. नरेश कुमार ह्यांचं पूर्ण कुटुंब भारतीय सेनेशी निगडित होतं. त्यामुळे लहानपणा पासून त्यांना सैन्याची आवड होती. १२ वित असताना त्यांचे वडील भारतीय सेनेतून ऑनररी कॅप्टन म्हणून निवृत्त झाले. त्यावेळेस त्यांनी आपल्या वडिलांना वचन दिलं होतं की जितके स्टार (त्यांच्या खांद्यावर निवृत्ती च्या वेळेस तीन स्टार होते. ) तुम्ही खांद्यावर घेऊन निवृत्त झालात तितके स्टार खांद्यावर घेऊन मी सैन्यात प्रवेश करेन. बी.टेक. ची पदवी पंजाब मधून घेतल्यावर त्यांनी मार्च २०१३ ला सी.आर.पी.एफ. मध्ये प्रवेश घेतला. दोन वर्ष तिकडे ट्रेनिंग घेऊन २०१५ ला आपल्या वडिलांना दिलेल्या वचनाप्रमाणे खांद्यावर तीन स्टार घेऊन पोलीस दलात प्रवेश केला. 

२०१५ ला त्यांची पोस्टिंग काश्मीर इकडे झाली. २०१६ ला सी.आर.पी.एफ. ने आतंकवादी आणि दशहतवाद्यांचा सामना, बिमोड करण्यासाठी क्वीक एक्शन टीम  ची स्थापना केली. नरेश कुमार ह्यांना त्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या युनिट ने एकापेक्षा एक पराक्रम करताना दशहतवाद्यांचा खात्मा करायला सुरवात केली. असं एकही वर्ष गेलं नाही की ज्यात नरेश कुमार ह्यांना शौर्य पदकाने गौरवण्यात आलं नाही. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत तब्बल ५५ अतिरेकी आणि दशतवाद्यांचा खात्मा त्यांनी आपल्या पराक्रमाने केला आहे. २६ जानेवारी २०२० ला त्यांना ६ व्या शौर्य पदकाने गौरवण्यात आलं होतं. आता १५ ऑगस्ट येता येता त्यात अजून एका शौर्य पदकाची भर पडली आहे. 

१३ फेब्रुवारी २०१८ ला नरेश कुमार श्रीनगर विमानतळावर उतरताच लागलीच विमानतळाच्या सुरक्षा अधिकाऱ्याकडे गेले. ही जबाबदारी असिस्टंट कमांडंट शितल रावत ह्यांच्याकडे होती. त्यांना एक छोटं गिफ्ट आणि फुलांचा गुच्छ देऊन त्यांनी सांगितलं की, 'संध्याकाळ पर्यंत परत आलो नाही तर तर समज की हे तुझं व्हॅलेंटाईन गिफ्ट आहे'. तडक तिथून त्यांनी एका मिशनसाठी प्रयाण केलं. नरेश कुमार ह्यांचा जीव कोणत्याही क्षणाला अतिरेक्यांच्या गोळ्यांना बळी पडू शकतो ह्याची जाणीव असताना पण देश कर्तव्य पहिलं असं समजून शीतल रावल त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. आपल्या जोडीदाराविषयी ते सांगतात, 

"I don’t have to explain why I do what I do. I am never under the pressure to seek peace postings.”

आज सेवन स्टार नरेश कुमार छातीवर विराजमान झाले आहेत. पण खऱ्या गोळ्या आपल्या छातीवर झेलणाऱ्या खऱ्या हिरोंच्या पराक्रमांना आपण भारतीय कधीच ओळखत नाही ना त्यांच्या पराक्रमाची दखल आपण घेतो आणि ठेवतो. कारण आम्हाला हिरोंची व्याख्याच कळलेली नाही तीच आमची शोकांतिका आहे. 
आपल्या पराक्रमाने देशाची रक्षा करणाऱ्या ह्या सेवन स्टार अधिकाऱ्याला माझा कडक सॅल्यूट आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. 

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Friday, 14 August 2020

स्कायरूट... विनीत वर्तक ©

 स्कायरूट... विनीत वर्तक ©

१५ ऑगस्ट १९६९ रोजी म्हणजे बरोबर ५१ वर्षापूर्वी इसरो म्हणजेच इंडियन स्पेस रीसर्च इन्स्टिट्यूट ची स्थापना झाली. गेल्या ५१ वर्षात भारताच्या अवकाश क्षेत्राने खूप मोठा पल्ला गाठला आहे. सायकल वरून रॉकेट आणि बैलगाडीवरून उपग्रह नेणारा भारत मंगळाच्या कक्षेत पहिल्याच प्रयत्नात उपग्रह स्थापन करणारा जगात पहिला देश ठरला. भारताचा गेल्या ५० वर्षातील अवकाश क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा आहे. स्वतःच्या बळावर उपग्रह पाठवणारा ते अवकाशातील उपग्रह जमिनीवरून नष्ट करणाऱ्या काही मोजक्या देशात आपला समावेश होतो. आज इसरो ह्या भारताच्या संस्थेला जगात मानाचं स्थान आहे. इसरो ने नेहमीच भारताचा तिरंगा अवकाशात तेजाने तळपता ठेवला आहे. पण गेल्या काही वर्षात अवकाश क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. भारताला ह्या बदलांशी जुळवून घेणं हे काळाची गरज बनली आणि जून २०२० ला भारताने एक क्रांतिकारी पाऊल टाकलं. 

जून २०२० साली भारताने जे क्रांतिकारी पाऊल टाकलं त्याची दखल सामान्य माणसाने घ्यावी तितकी घेतली गेली नाही. जून २०२० मध्ये भारताने असं काय पाऊल टाकलं तर भारतातील अवकाश क्षेत्र जे इतकी वर्ष सरकारी अधिपत्याखाली होतं ते आता खाजगी क्षेत्रासाठी खुलं केलं आहे. ह्याचा अर्थ इसरो विकायला काढली असा नाही तर इसरो च्या सहकार्याने अनेक खाजगी संस्था, खाजगी कंपन्या, संशोधक ह्यांना भारताच्या अवकाश प्रगतीत भागीदार होता येणार आहे. त्यांच्या ज्ञानाचा, कर्तृत्वाचा फायदा भारताला करून घेता येणार आहे. आजतागायत अवकाश क्षेत्र असं होतं की जिकडे काहीतरी नवीन करण्यासाठी इसरो शिवाय कोणताच दुसरा पर्याय नव्हता. सगळ्यांनाच इसरो मध्ये जाता येतं असं नाही. जेव्हा इसरो ची स्थापना झाली तेव्हा भारताला संदेश वहन, उपग्रह प्रणाली हाच तिचा मुख्य उद्देश होता किंबहुना आजही तोच आहे पण त्यात आता भर पडली आहे ती वैज्ञानिक दृष्टिकोनातून आकाशाचा वेध घेण्याची. 

सगळ्याच वैज्ञानिकांना, संशोधकांना इसरो मध्ये प्रवेश मिळतो असं नाही. त्यामुळे ज्यांना ह्या क्षेत्रात काम करायचं आहे त्यांना आजवर ह्या क्षेत्रात संधी नव्हती त्यामुळेच अश्या लोकांना संधी देण्यासाठी भारताने एक पुढलं पाऊल टाकलं आहे. ज्या प्रणाली इसरो ने बनवलेल्या आहेत त्यांची पुनःनिर्मिती किंवा त्याच मास प्रोडक्शन ह्यात इसरो चा वेळ आणि पैसा वाया घालवण्यापेक्षा ते काम खाजगी क्षेत्राकडून घेऊन इसरो नवीन लक्ष्यावर अधिक चांगल्या रीतीने वाटचाल करू शकेल हा विचार ठेवून जून २०२० मध्ये इन- स्पेस ची घोषणा केली. इन- स्पेस म्हणजे Indian National Space Promotion and Authorization Center (IN-SPACe). ह्याच्या अंतर्गत खाजगी क्षेत्रातील वेगवेगळ्या कंपन्यांना अवकाश क्षेत्रात संधी योग्य ते मूल्यमापन करून संधी दिली जाणार आहे. ज्या प्रमाणे अमेरीकेतील नासा ने खाजगी क्षेत्राला संधी दिली आणि त्याचमुळे आज स्पेस एक्स, ब्लु ओरीजिन सारख्या कंपन्या अवकाश क्षेत्रात प्रभावी कामगिरी करत आहेत. नासा वैज्ञानिक संशोधनावर लक्ष केंद्रित करत आहे. भारताने ही ह्याच पावलावर पाऊल टाकत आपल्या अवकाश संशोधनाचे दरवाजे सर्व भारतीयांसाठी खुले केले आहेत. अवघ्या २ महिन्यांच्या काळात ह्या ह्याची फळे दिसायला लागली आहेत.

स्कायरूट नावाच्या एका खाजगी कंपनीने नुकतेच रामन हे १००% ३ डी प्रिंटेड असलेलं इंजिन यशस्वीरीत्या चालवून दाखवलं. हे इंजिन ते बनवत असलेल्या विक्रम-१ ह्या रॉकेट च्या शेवटच्या टप्यात वापरलं जाणार आहे. विक्रम-१ हे रॉकेट डिसेंबर २०२१ पर्यंत उड्डाणासाठी तयार होणार असून २५० ते ७०० किलोग्रॅम वजनाचे उपग्रह लोअर अर्थ ऑर्बिट मध्ये प्रक्षेपीत करण्यास सक्षम असणार आहे. रामन ह्या इंजिनाच नाव भारताचे प्रख्यात शास्त्रज्ञ सी.व्ही. रामन ह्यांच्या सन्मानार्थ ठेवलेलं असुन १००% ३ डी प्रिंटेड तंत्रज्ञानातून निर्माण झालेलं भारतातील पहिलं इंजिन आहे. ह्या इंजिनाच वजन हे इतर इंजिनांपेक्षा ५०% कमी असून ह्यात वापरण्यात येणाऱ्या सुटे भागाच्या मर्यादेमुळे ह्याची निर्मिती ८०% जास्त वेगात होणं शक्य आहे. स्कायरूट भारताच्या अंतरीक्ष कामाचे शिल्पकार विक्रम साराभाई ह्यांच्या सन्मानार्थ 'विक्रम' नावाच रॉकेट कुटुंब बनवत आहे. विक्रम १ पाठोपाठ विक्रम २ आणि विक्रम ३ वर ही त्यांनी काम करायला सुरवात केली आहे. 

स्कायरूट प्रमाणे अग्निकुल, बेलाट्रिक्स सारख्या भारतीय खाजगी कंपन्या सुद्धा ह्या क्षेत्रात वेगाने पुढे येतं आहेत. रॉकेट किंवा तंत्रज्ञान निर्माण केलं तरी ह्या सगळ्यांना रॉकेट प्रक्षेपण, त्याच नेव्हीगेशन ह्यासाठी इसरो ची मदत लागणार आहे. इथेच इसरो इन- स्पेस च्या माध्यमातून त्यांच्या तंत्रज्ञानाचं, रॉकेट च मूल्यमापन करून त्यांना आपल्या कामात सहभागी किंवा त्यांना सहकार्य करणार आहे. आंतरराष्ट्रीय अहवालानुसार पुढल्या १० वर्षाच्या काळात जवळपास १०,००० लहान मोठे उपग्रह अवकाशात सोडले जाणार आहेत. ह्या सर्वाना अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी लागणारी रॉकेट बाजारपेठ ही तितकीच प्रचंड मोठी असणार आहे. ज्यातून खूप मोठं परकीय चलन उपलब्ध होणार आहे. अमेरीकेचा हिस्सा ह्यात वरचढ राहणार असला तरी भारताचा हिस्सा ही त्या सोबत असावा त्या दृष्टीने इन- स्पेस प्रयत्न करणार आहे. ह्या सर्वांची सुरवात म्हणजेच स्कायरूट च विक्रम रॉकेट आणि त्याला प्रक्षेपित करणारं रामन इंजिन. 

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Tuesday, 11 August 2020

एकटीचा प्रवास... विनीत वर्तक ©

 एकटीचा प्रवास... विनीत वर्तक ©

दोन अपूर्णांक बनून प्रत्येकवेळी एक पूर्णांक होतोच असं नाही. कधी कधी आयुष्याच्या रस्त्यात पूर्णांक बनून पण अपूर्णांक च आयुष्य जगावं लागते तर कधी कधी तो अपूर्णांक आपली साथ सोडून देतो तर कधी सुरवात ते शेवट तो पूर्णांक होतच नाही. पण प्रत्येक वेळेस परिस्थिती वेगळी असली तरी उरलेला प्रवास मात्र एकटीने करायचा असतो. हा प्रवास वाटतो तितका सोप्पा नसतो. समाजाने ठरवून दिलेल्या चौकटीत राहण्यासाठी बरेच काही स्वाहा करण्याची तयारी तिला करावी लागते. कधी नाईलाजाने तर कधी जबरदस्तीने पण आवडत नसलेली गोष्ट स्वीकारणं खरच तितकं सोप्प असते का? ह्याचा विचार कोणी करते का? स्री असून सुद्धा एकट्या स्री ला किती जणी समजून घेतात तिकडे बाकी समाजाच्या प्रगल्भतेचा विचार तर बाजूला राहिला. एकटीचा प्रवास तिला एकटीला करायचा असतो आणि तो ही एकटीला सोबत घेऊन. तिच्या ह्या प्रवासाची गोष्ट तिची एकटीची असते. 

समाज म्हणून आपण लग्न न केलेल्या, लग्न होऊन विधवा झालेल्या, विधवा होऊन पुन्हा समाजाच्या प्रवाहात आपलं स्थान निर्माण करणाऱ्या सगळ्याच स्त्रियांकडे समाज कोणत्या दृष्टिकोनातून बघतो ह्याचा विचार करण्याची गरज आहे. एक मुलगी ते एक बायको असा प्रवास झाला की समाजाचे स्रीकडे बघण्याचे सगळे संदर्भ बदलून जातात. पुरुषप्रधान संस्कृतीत आजवर आपल्या इच्छा, अपेक्षा दबून ठेवलेली ती आपल्या जोडीदाराच्या साथीने त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. पण असे किती प्रगल्भ जोडीदार ३६ गुण जुळवून भेटत असतील हा संशोधनाचा विषय आहे. पण हा प्रवास जर अर्धवट झाला तर सगळ्या गोष्टींचे संदर्भ बदलून जातात. एक विधवा, किंवा एक घटस्फोट घेतलेली स्री समाजासाठी किंबहुना स्री वर्गासाठी वेगळी ठरते. काल पर्यंत सगळीकडे हवी हवीशी वाटणारी स्री आज नकोशी होते किंवा तिने समाजाच्या कोणत्याच प्रवाहात येऊ नये ह्यासाठी स्रीच पुढाकार घेते. सासू, नणंद, भावजय अश्या विविध नात्यात असलेली स्री सगळ्यात आधी स्री ला एकटी असल्याची जाणीव करून देते.  तिकडे पुरुषांबद्दल न बोललेलं बर. 

एकटं पडलेल्या स्री च्या गरजा काही बदलत नाहीत. भावनिक, शारिरीक अश्या सगळ्याच पातळीवर. पण त्या गरजा पूर्ण करण्याचे संदर्भ मात्र सगळे बदलून जातात. खांदा द्यायला येणारे पुरुष फक्त शारिरीक गरजेसाठी येत असतात किंवा निदान तश्या सुप्त इच्छा तरी मनात ठेवून येतात. कृष्णसखा मिळणारे अपवाद असले तरी ते हिऱ्या इतकेच दुर्मिळ. त्याचवेळी निर्माण झालेल्या गोतावळ्यातून स्वतःबरोबर कुटुंबाला सांभाळण्याची कसरत ही तिलाच सांभाळायची असते. आपल्याच मुलांच संगोपन, आर्थिक स्थिती ते अनेकदा राहणाच्या घराचा शोध घेण्यापासून ही सुरवात असू शकते. तिकडे तिच्या गरजा, तिच्या इच्छा आणि तिच्या भावना ह्याकडे बघायला वेळ तरी तिला कितीसा मिळणार?. वेळ मिळाला तरी त्या इच्छा पूर्ण करणाच्या प्रयत्नांना ही दूषणं द्यायला आपला सो कॉल्ड प्रगल्भ समाज तयार असतोच. 

एकदा एकटी असल्याचा शिक्का लागला की तो पुसणं पण तितकच कठीण. पुन्हा एकदा जोडीदार निवडून सुरवात करताना सुद्धा आधीच्या प्रवासात आलेल्या अनुभवांची पुन्हा उजळणी नकोशी असते तर पुन्हा सगळं विसरून कोणासोबत सगळ्याच बाबतीत एकरूप होणं किती कठीण असेल ह्याचा विचार ना कुटुंबीय करत ना समाज. अपवादांच्या काही गोष्टी असतील ही की जिकडे समाजाने प्रगल्भता दाखवलेली असेल पण अश्या गोष्टी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच. बाकी सगळ्या वेळी चार भिंतीच्या आतल्या गोष्टी चार भिंतीत दाबून ठेवायच्या असतात किंवा ठेवल्या जातात. आजही एकटी स्री दुसऱ्या पुरुषासोबत कुठे दिसली की समाजाच्या दृष्टीने ते लफडं होते तर असा पुरुष दिसला तर ती मैत्रीण ठरते. ह्या सगळ्यावर मात करत तिला करायचा असतो एकटीचा प्रवास. 

लग्न करणं अथवा न करणं ही एक चॉईस आहे हे आपण कधी समजून घेणार आहोत? कोणत्याही पुरुषाने कोणत्याही स्री शी अथवा कोणत्याही स्री ने कोणत्याही पुरुषाशी कोणत्या लेव्हल वर एकरूप होणं हा त्या स्री आणि पुरुषाचा चॉईस आहे. सक्षम समाज घडवण्यासाठी केलेली लग्नसंस्था हा एक भाग असला तरी सरसकट त्याच आधारावर कोणत्याही स्री अथवा पुरुषाला गृहीत धरण हे चुकीचं आहे. एकटा पुरुष जसा अभिमानाने आपलं आयुष्य जगू शकतो आणि समाज त्याला ज्या चौकटीत तोलतो तीच चौकट एकट्या स्रीला का लागू होत नाही? लग्न करून अथवा लग्न न करता आपला प्रवास एकटीनं करणं ही सुद्धा एक चॉईस आहे हे समाज म्हणून आपण कधी समजून घेणार आहोत? प्रत्येकवेळी स्री समानतेची व्याख्या करणारे सगळेच ज्यात स्त्रीया पण सामाविष्ट आहेत त्या स्वतः ह्या प्रवासात ह्याच स्त्रियांच्या सोबत कधी उभ्या राहणार आहेत? 

एकटीचा प्रवास हा जरी एकटीचा असला तरी त्यात आपल्याच समाजाचं प्रतिबिंब पडत असते. हा एकटीचा प्रवास आपण समाज म्हणून समजून घेण्यात कुठेतरी कमी पडत आहोत असं मला मनापासून वाटते. 

 फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  


Monday, 10 August 2020

बुडणारा देश... विनीत वर्तक ©

 बुडणारा देश... विनीत वर्तक ©


१९४७ साली भारताचं विघटन होऊन पाकीस्तान ची निर्मिती इंग्रजांनी केली. निर्मिती पासूनच इंग्रज तिथल्या राज्यकर्त्यांच्या मनात भारताविषयी विष कालवून गेले. काश्मीर प्रश्न मुद्दामून चिघळत राहील ह्याची काळजी त्यांनी घेतली अर्थात भारतातले तेव्हाचे काही राजकारणी आणि आत्ताचे ही काही राजकारणी ह्यांनी हे विष पुढल्या पिढीकडे हस्तांतरित होईल ह्याची काळजी घेतली. गेली जवळपास ७३ वर्ष पाकीस्तान काश्मीर ह्या एका मुद्द्यावर लढतो आहे. त्यात त्याची इतकी शक्ती खर्च होते आहे पण काही ना काही करून ते मिळवायचे त्यासाठी संपूर्ण देश गहाण आणि विकायला लागला तरी चालेल ह्या धोरणावर पाकीस्तान ची झालेली वाटचाल त्याला आता बुडीत खात्यात घेऊन गेली आहे. अजून जर पाकीस्तान सावरला नाही तर काश्मीर सोडाच पण त्याच अस्तित्व, त्याच्या लोकांची स्वातंत्र्यतता, त्याच सार्वभौमत्व पूर्णपणे नष्ट होणाच्या मार्गावर आहे ज्याची सुरवात झालेली आहे. 


गेल्या काही वर्षातील पाकीस्तान ची ही बुडीत खात्यात होणारी वाटचाल भारतासाठी धोक्याची घंटा आहे. आपला शत्रू स्वतःच रसातळाला जाताना आपल्याला आनंद व्हायला हवा पण आपलाच भाऊ कोणीतरी दुसऱ्याच ऐकून खड्यात जात आहे आणि आपल्या घरात एका परक्या शक्तीचा प्रभाव वाढणार आहे ही भारतापुढची सगळ्यात मोठी चिंता आहे. पाकीस्तान ची आर्थिक व्यवस्था आता शेवटच्या घटका मोजत आहे. पाकीस्तान वर असलेलं कर्ज जवळपास २५६ बिलियन अमेरिकन डॉलर आहे. हे कर्ज पाकीस्तान च्या जी.डी.पी. च्या जवळपास ९८.२% आहे. ह्यातील जवळपास १/५ कर्ज हे सिपेक ( China-Pakistan Economic Corridor.) चं आहे. ह्याचा सरळ अर्थ आहे की पाकीस्तान हळूहळू पूर्णपणे चीन च्या विळख्यात घुरफ़टत चालला आहे. कारण सिपेक मधून जे प्रकल्प उभे राहणार आहेत त्यातून नफा तर बाजूला राहिला पण प्रत्यक्षात पाकीस्तान च्या अर्थव्यवस्थेला होणारा तोटा प्रचंड आहे. 


चीन ने पाकीस्तान मध्ये सिपेक सारखा प्रकल्प उभा करण्यामागे चीन ची भारतावर किंबहुना २०५० पर्यंत सगळ्या आर्थिक महासत्तांवर अंकुश ठेवण्याचा चीन चा प्रयत्न आहे. त्यामुळेच चीन ने सिपेक च गाजर पाकीस्तान पुढे उभं केलं आणि पाकीस्तान त्यात पूर्णपणे अडकला आहे. चीन नुसता पाकीस्तान ला आर्थिक स्तरावर अपमानित करत नाही तर चीन ने पाकीस्तान च सार्वभौमत्व वेशीवर टांगल आहे. पाकीस्तान च्या सैन्यातील अधिकाऱ्यांवर चीन चे कामगार सरळ सरळ हात उगारतात पण पाकीस्तान च्या कर्नल लेव्हल च्या अधिकाऱ्याला गप्प बसावं लागते तिकडे सामान्य पाकीस्तानी नागरिकांबद्दल न बोललेलं बर. हे सगळं पाकीस्तान आणि तिथली राजवट सहन करते आहे कारण सगळ्यांचे हात दगडाखाली अडकले आहेत. पाकीस्तान मधील हजारो गरीब मुलींवर ह्याच चीन च्या लोकांकडून अत्याचार केले जातात व त्यांना वैश्याव्यवसायात ठकलण्यात येते आहे. काश्मीर च्या जनतेच्या अन्यायावर यु.एन. मध्ये बोंबा मारणारा पाकीस्तान आणि त्याची न्यायव्यवस्था ह्या सगळ्या अत्याचारावर एक शब्द बोलायला तयार नाही. 


कोरोना च्या उद्रेकामुळे पाकीस्तान ची हालत अजून खराब होणार आहे. आधीच पाकीस्तान मधील महागाई दर १०% आहे. त्यातच त्याच्या अर्थव्यवस्थेची वाढ ही ५०% कमी होणार आहे. जवळपास ३% वेगाने सध्या होणारी वाढ २% वर पुढल्या वर्षी जाईल असा अंदाज आहे. जवळपास ६० मिलियन लोक दारिद्र्य रेषेच्या खाली असून जवळपास १८ मिलियन लोकांचा जॉब ह्या कोरोना च्या उद्रेकामुळे गेला आहे. पाकीस्तानात फक्त १% लोक कर भरतात त्यामुळे पाकीस्तान पुढे घेतलेल्या कर्जाचे हफ्ते कसे फेडायचे हा प्रश्न आ वासुन उभा आहे. भारताशी वैर मानून सैन्यावर गरज नसताना पाकीस्तान आपल्या जी.डी.पी. च्या जवळपास २०% इतकी रक्कम खर्च करतो. शिक्षण क्षेत्रावर आणि पायाभूत सुविधांसाठी हाच वाटा २% कमी आहे. ह्यामुळे भारताबद्दलचा द्वेष किती परोकोटीचा आहे ह्याचा अंदाज आपण लावू शकतो. एकवेळ आपण डुबलो तरी चालेल पण भारताला शांततेनं जगून द्यायचं नाही ह्या नादात पाकीस्तान च्या मूर्ख राजकारण्यांनी आणि सैनिकी अधिकाऱ्यांनी त्याची हालत पूर्णपणे खराब केली आहे. 


भारताचा जगात वाढणारा दबदबा आणि भारताची अर्थव्यवस्था जगात मजबूत समजली जाते. कोरोनाच्या प्रभावात सुद्धा ज्या दोन देशांच्या अर्थव्यवस्था वाढ दाखवतील त्यात भारत आहे. भारताची अर्थव्यवस्था पाकीस्तान च्या जवळपास १० पट आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या पंतप्रधानांनी जाहीर केलेली आर्थिक मदत २० लाख कोटी रुपये जवळपास पाकीस्तान च्या जी.डी.पी. इतकं आहे. त्यामुळे पाकीस्तान पुढली १०० वर्ष मेहनत करून सुद्धा भारताच्या आसपास पोहचू शकत नाही ही वस्तुस्थिती पाकीस्तान चे राजकारणी कधी स्विकारणार नाहीत. ह्याच मूर्खपणाचा फायदा चीन घेत आहे. काश्मीर च्या नादात पाकीस्तान आपल्या मुसलमान देशांशी शत्रुत्व घेतो आहे. नुकतेच सौदी अरेबिया ने पाकीस्तान च कंबरड मोडलं. काश्मीर प्रश्न सौदीने मुसलमान देशांच्या गटात उचलावा अशी पाकीस्तान ने गळ घातली होती. तसे न केल्यास सौदी अरेबिया ला एक वेगळा ग्रुप तयार करण्याची धमकी दिली होती. पण सौदी अरेबियाने पाकीस्तान ची लाज काढली आहे. भारताविरुद्ध काश्मीरवर एक शब्द बोलणार नाही हे सांगताना आपले उधार घेतलेले पैसे व्याजासकट लगेचच्या लगेच परत देण्यास सांगितलं ह्याशिवाय ठरलेला इंधन आणि गॅस चा पुरवठा ही दिला जाणार नाही हे ठणकावून सांगितलं. ज्यामुळे पाकीस्तान ची वाट लागली व पुन्हा एकदा चीन कडून १ बिलियन अमेरीकन डॉलर चं चढ्या भावाने कर्ज घेऊन सौदी अरेबिया चे पैसे परत करण्याची नामुष्की पाकीस्तान वर आली. 


कोणी म्हणेल की मरत आहेत स्वतःच्या कर्माने तर मरून दे. पण ह्या सगळ्या गोष्टींचा भारतावर प्रतिकूल परीणाम होणार आहे. एकतर सगळ्या मार्गावर अडकलेला पाकीस्तान कोणतही पाऊल उचलू शकतो. गरिबीत खितपत जाणारी पाकीस्तान ची पिढी वाईट मार्गाला म्हणजे आतंकवादी रस्त्यावर नेणं तिकडच्या धर्मगुरूंना शक्य होणार आहे. ह्या शिवाय चीन चा वाढता हस्तक्षेप आणि पाकीस्तान राजकारण्यांची चीन पुढची शरणागती भारतासाठी चांगली नाही. पण एखाद्याला जीव द्यायचाच असेल तर कोणी काही करू शकत नाही. फक्त आपल्याला कमीत कमी त्रास कसा होईल ह्याची व्यवस्था आपण करू शकतो. भारताने ती येत्या काळात करायला हवी. कारण ज्या पद्धतीने पाकीस्तान रसातळाला जातो आहे ते बघता पुढल्या ५-७ वर्षात त्याच अस्तित्व जगाच्या नकाशावर नावापुरतं राहील. ह्या बुडत्या जहाजाला आता वाचवणं अशक्य आहे. त्यामुळे त्यापासून जास्तीत जास्त लांब राहणं भारताच्या हिताचं आहे. 


फोटो स्रोत :- गुगल


सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


लढाऊ विमानांच्या पिढ्या... विनीत वर्तक ©

 लढाऊ विमानांच्या  पिढ्या... विनीत वर्तक ©


भारताने राफेल ही लढाऊ विमान खरेदी केल्यानंतर अनेक प्रश्नांचा धुराळा उडाला होता. त्यातील एक प्रश्न म्हणजे लढाऊ विमानांच्या पिढ्या. चीन कडे ५ व्या पिढीतील जे २० सारखं विमान आहे मग ४.५ पिढीतील राफेल कसं काय टक्कर देऊ शकेल? मुळात सर्वसामान्य लोकांच्या मनात प्रश्न येणं स्वाभाविक आहे की लढाऊ विमानांच्या पिढ्या म्हणजे काय? एखाद विमान कोणत्या पिढीतील आहे कसं ठरवतात? भारताकडे असलेली लढाऊ विमानं कोणत्या पिढीत येतात. तर ह्या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न इकडे करणार आहे. लढाऊ विमानांची पिढी ही ते विमान बनवण्यात वापरलेलं तंत्रज्ञान, क्षेपणास्त्र, विमान विज्ञान ( एव्हीओनिक्स) ह्यावर अवलंबून आहे. ह्याशिवाय एखाद्या पिढीतून नवीन पिढी कधी सुरु होते तर एखादं नवीन तंत्रज्ञान जेव्हा आधीच्या पिढीतील विमानात बदल किंवा त्यांच्या श्रेणीत सुधार जेव्हा शक्य होतं नाही तेव्हा एक नवीन पिढी सुरु होते. सध्याच्या काळात लढाऊ विमानांच्या ५ पिढ्या अस्तित्वात आहेत. 


१ ली पिढी (१९४०-१९५०) :- ह्या श्रेणीतील विमानात अतिशय साधारण दर्जाचं विमान विज्ञान वापरलं गेलं होतं. ह्या पिढीतील विमानात रडार नव्हतं. तसेच ह्या पिढीतील विमानात मशीन गन, सर्वसाधारण बॉम्ब बसवलेले होते. ह्या पिढीतील काही विमान म्हणजे एफ-८६, मिग-१५, मिग-१६. 


२ री पिढी (१९५०-१९६०) :- ह्या पिढीतील विमानात रडारचा वापर सुरु झाला. तसेच इन्फ्रारेड आणि सेमी गायडेड मिसाईल चा वापर ह्यात केला गेला. ह्या पिढीतील विमानांच्या तंत्रज्ञानात बदलांमुळे ह्या विमानांना सुपर सॉनिक वेग गाठणे शक्य झालं. ह्या पिढीतील विमान म्हणजे एफ-१०४, एफ-५, मिग-१४ आणि भारताकडे अजून वापरात असलेलं मिग-२१. (भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणाकडे लक्ष न दिल्याने भारताला अजूनही ह्या पिढीतील विमान वापरावी लागत आहेत. ) 


३ री पिढी (१९६०-१९७०) :- ह्या पिढीतील विमानात सगळ्यात मोठा बदल म्हणजे शत्रूच्या विमानांना शोधण्याची जबाबदारी आता एकट्या पायलट ची राहिली नव्हती तर  रडार आणि विमान विज्ञान इतकं प्रगत झालं होतं की शत्रूच्या विमानांना रडार च्या साह्याने पकडता येणं शक्य झालं. ह्या शिवाय ह्या पिढीतील विमान ही वेगवेगळ्या पद्धतीचे मिशन पूर्ण करण्यास सक्षम झाली ज्यांना मल्टिरोल फायटर असं म्हंटल जाते. ह्या पिढीतील विमान दिसण्यापलीकडे लक्ष्यभेद करण्यास सक्षम झाली. (beyond visual range). ह्या पिढीतील विमान म्हणजे मिग-२३, एफ ४, मिराज-३ 


४ थी पिढी (१९७०-१९८०) :- ह्या पिढीतील विमानात फ्लाय बाय वायर सिस्टीम चा वापर करण्यात आला.ह्याचा अर्थ काय तर ह्यात कॉम्प्युटर सिस्टीम चा वापर केला गेला. सेन्सर कडून येणारे संदेश कॉम्प्युटर ने अभ्यास करून विमान कंट्रोल करणं शक्य झाल. ह्या पिढीतील विमान हवेतून हवेत तर हवेतून जमिनीवर अश्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मिशनसाठी स्वतःमध्ये बदल करून घेण्यास सक्षम समजली जातात. ह्या श्रेणीतील विमान म्हणजे मिग-२९, सुखोई-२७, एफ-१५, एफ-१६, मिराज-२०००. 


४.५ पिढी (१९८०-१९९५) :- लढाऊ विमानांच्या निर्मितीत आणि त्यांच्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीत लागणाऱ्या पैश्यावर ह्या काळात अंकुश आल्याने दोन पिढ्यांच्या मधली लढाऊ विमान बनवण्याची मागणी जगभर होऊ लागली. त्यामुळेच ४ थ्या पिढीतील विमानांवर आधुनिक तंत्रज्ञान लावून ह्या पिढ़ीतील विमान निर्मिती केली जात आहे. भारताचं सुखोई एम.के.आय. ३० हे लढाऊ विमान ४++ पिढीतील गणलं जाते. ४.५ पिढीतील विमानात सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे Active Electronically Scanned Array (AESA) हे रडार काय करते तर ह्याची अँटेना न फिरवता हे रडार वेगवेगळ्या दिशेला रेडिओ व्हेव पाठवू शकते. हे रडार स्टेल्थ प्रकारातील लढाऊ विमानाला ओळखू शकते. तसेच ह्या प्रकारातील विमानांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून विमानाचं रडार सिग्नेचर ही कमी केलं आहे. ह्या पिढीतील विमान म्हणजे राफेल, युरोफायटर टायफून, ग्रीपेन 


५ पिढी (२००५ -सध्या) :- ह्या पिढीतील सगळ्यात मोठा फरक म्हणजे त्यांची रडार वरून अदृश्यता. स्टेल्थ तंत्रज्ञान. ह्याशिवाय ह्यातील वैमानिकाला विमान न फिरवता ही ३६० अंशात बघण्याचं तंत्रज्ञान ह्या पिढीतील जमेच्या बाजू आहेत. पण रडार वरून पूर्णपणे अदृश्य होणं इतकं सोप्प नाही. तसेच ह्यात वापरलेलं इलेक्ट्रॉनिक आणि कॉम्प्युटर तंत्रज्ञान खूप किचकट आहे. उदाहरण द्यायचं झालं तर एफ ३५ च्या सॉफ्टवेअर मध्ये जवळपास ७ मिलियन लाईन ऑफ कोड आहेत. ह्यामुळेच ह्या पिढीतील लढाऊ विमान सर्वोत्तम समजली जातात. ह्या पिढीतील विमान म्हणजे एफ २२, एफ ३५, जे -२० (चीन च्या ह्या पिढीतील विमानाबद्दल शंका आहे. ), ह्या शिवाय भारत आणि रशिया निर्माण करत असलेले सुखोई पी.ए.के. एफ.ए . 


फोटो स्रोत :- गुगल


सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 


Sunday, 9 August 2020

अटल बोगदा... विनीत वर्तक ©

 अटल बोगदा... विनीत वर्तक ©


पुढल्या महिन्यात प्रसिद्ध अश्या रोहतांग पास च्या खालून जाणारा रोहतांग बोगदा ज्याचं नामकरण 'अटल बोगदा' असं केलं गेलं तो सामान्य नागरिकांसाठी आणि देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या क्षणी वाहतुकीसाठी खुला होतो आहे. भारताला लेह-लडाख शी जोडणारा मनाली- लेह महामार्ग जवळपास ८ महिने अति- बर्फ़वृष्टीमुळे बंद असतो. त्यामुळे ह्या भागाचा संपर्क पूर्णपणे तुटून जातो. संपुर्ण वर्षभर लेह- लडाख शी संपर्कात राहण्यासाठी ह्या महामार्गावर सगळ्या काळात वाहतूक करण्यास सक्षम असेल असा बोगदा असावा असा क्रांतिकारी विचार १८६० मध्ये मांडला गेला होता. पण भारताच्या स्वातंत्र्यानंतर ही ह्याकडे कोणत्याच राजकारण्याने लक्ष दिलं नाही. तब्बल १४० वर्षांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी ३ जून २००० रोजी ह्या बोगद्याची घोषणा केली. पण राजकीय नेतृत्व बदलल्यामुळे हवी तशी गती ह्या कामाला आली नाही. ह्या शिवाय अनेक तांत्रिक अडचणी ह्या कामात समोर उभ्या राहिल्या पण  मात करत पुढल्या महिन्यात हा बोगदा वाहतुकीसाठी खुला होतो आहे. 


समुद्र सपाटीपासून जवळपास ३१०० मीटर (१०,१७० फूट) उंचीवर असणारा आणि तब्बल ८.८ किलोमीटर लांबीचा आहे. जगातील १०,००० फुटापेक्षा जास्त उंचीवर इतका लांब असणारा हा एकमेव बोगदा आहे. पीर- पांजाल च्या पर्वत रांगानखालून जाणारा हा बोगदा मनाली बाजूने धुंडी गावापासून सुरु होऊन पलीकडच्या बाजूला जुन्या लेह- मनाली रस्त्याला तेलींग इकडे जोडतो. ह्या बोगद्यामुळे मनाली ते केलोंग ह्या मधील अंतर जवळपास ४६ किलोमीटर ने कमी झालं आहे. हे अंतर वाचल्यामुळे मनाली ते लेह- लडाख हा प्रवास वर्षातील जवळपास सगळ्या महिन्यात शक्य होणार आहे. रोहतांग पास ओलांडण्यासाठी होणाऱ्या अडथळ्यातून सुटका होणार आहे. वेळ बचतीमुळे इंधन वाचणार आहे. ह्याशिवाय प्रदूषण कमी होणार आहे. ह्या सर्वाचा फायदा पर्यायाने सगळ्यात जास्ती भारताच्या सैन्याला होणार आहे. वर्षभर सैन्याची वाहने रसद, दारुगोळा लेह- लडाख मध्ये नेऊ शकणार आहेत. ह्याशिवाय रोहतांग ला भेट देणाऱ्या पर्यटकांमुळे होणाऱ्या ट्राफिकला बाजूला सारून सैन्याला वाहतूक करता येणार आहे.  


हा बोगदा बांधायला ३८०० कोटी रुपये खर्च आला आहे. जवळपास ३००० कंत्राटी कामगार आणि ६५० बी.आर.ओ. चे कर्मचारी २४ X ७ ह्या रस्त्याचं बांधकाम करत होते. २८ जून २०१० ला ह्या बोगद्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. ह्या बोगद्याच्या निर्मितीत अनेक अडचणी अभियांत्रिकीच्या दृष्टीने समोर आल्या. एकतर इतक्या उंचीवर हिमालयाच्या पर्वतरांगांना पोखरून बोगदा बांधणं खूप जोखमीचं होतं त्यात ह्या बोगद्याच्या मार्गात असलेल्या पाण्याच्या वाहिनीमुळे खूप मोठा धोका समोर उभा राहिला होता. पोखरून काढलेली ८००,००० घन मीटर दगड माती कुठे टाकायची हा प्रश्न ही मोठा होता. ह्याशिवाय रोज जवळपास ३ मिलियन लिटर प्रति दिवस निघणार पाणी नियंत्रित करणं खूप मोठी अडचण ह्या बोगद्याच्या निर्मितीत होती. पण ह्या सगळ्यावर मात करत ह्या बोगद्याचे अशक्य वाटणारे काम भारतीय अभियंतांनी पूर्ण तर केलं पण हा बोगदा अतिशय नाविन्यपूर्ण सुरक्षतेतीच्या क्षमतेने निर्माण केला गेला आहे. 


ह्या बोगद्यात प्रत्येक १५० मीटर वर टेलीफोन ची सोय आहे. प्रत्येक ६० मीटर वर आग विझवण्यासाठी नळ बसवलेला आहे. प्रत्येक ५०० मीटर वर आपात कालीन निकास आहे. प्रत्येक किलोमीटरवर हवेच प्रदूषण मोजण्याची आणि नियंत्रण करण्याची सोय आहे. प्रत्येक २५० मीटरवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवलेले आहेत. ज्यामुळे वाहतुकीवर पूर्णपणे लक्ष ठेवता येणार आहे. ह्या बोगद्यातून वाहनांचा वेग ८० किलोमीटर/ तास इतका नियंत्रित करण्यात आला आहे. दररोज जवळपास ३००० कार आणि १५०० ट्रक ह्यांची वाहतूक होणार आहे. जवळपास वर्षभर हा बोगदा बर्फाने झाकलेला असणार आहे. हिमस्खलन अथवा दरड कोसळून अपघात होऊ नये म्हणून ह्या बोगद्याच्या दोन्ही बाजूला सेन्सर बसवण्यात आले आहेत ज्याची यंत्रणा डी.आर.डी.ओ. ने विकसित केली आहे. ह्या सर्व गोष्टींमुळे अटल बोगदा देशातील अभियांत्रिकीचा एक मैलाचा दगड ठरणार आहे. ह्याच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या सर्वच अभियंते, कामगार, आणि ह्याचे स्वप्न बघून ते प्रत्यक्षात तयार करणाऱ्या सर्व यंत्रणा ह्यांना माझा सलाम. 'अटल बोगदा' देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या काळात भारतीय सेनेसाठी वरदान ठरणार आहे. 


फोटो स्रोत :- गुगल 


सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  


Friday, 7 August 2020

After every Monday, there will be a Tuesday... विनीत वर्तक ©

After every Monday, there will be a Tuesday... विनीत वर्तक ©


२० जून २०२० ला भारतीय सेनेच्या नॉर्दन कमांड ने एक ट्विट केलं होतं. चित्रपट कलाकारांच्या उठण्या बसण्या पासून त्यांच्या मुलांच्या चालण्या बोलण्याची नोंद ठेवून ब्रेकिंग न्युज करणाऱ्या अनेक मिडिया हाऊस च लक्ष ना तिकडे गेलं ना राजकीय नेत्यांवर, खेळांडूंवर शाब्दिक राजकारण करणाऱ्या सर्वसामान्य भारतीयांच. कारण असले ट्विट ना आमच्या नजरेत येत ना ते कधी महत्वाचे वाटतात. भारतीय सेनेचं कोणतही कमांड अथवा अधिकारी ट्विट किंवा माहिती सांगतात तेव्हा त्यात खूप मोठा अर्थ दडलेला असतो. तर ह्या ट्विट मधील काही वाक्य इकडे देतो. 


"Born to fight.They are not the bats. They are the Batman."


"After every Monday, there will be a Tuesday. Bajrang Bali Ki Jai"  


भारताच्या नॉर्दन कमांड ने केलेल्या ह्या ट्विट मध्ये दडलेला आहे तो १६ बिहार रेजिमेंट च्या जवानांचा पराक्रम. ज्याची तुलना जगाने विश्वयुद्धातील पराक्रमाशी केली तर आमच्या काही राजकीय नेत्यांनी पंतप्रधानांनी कोणत्या तरी प्रांताचे नाव सैनिकांचा पराक्रम करताना घेतलं ह्याच राजकारण करण्यात धन्यता मानली. नक्की त्या सोमवार आणि मंगळवारी काय घडलं होतं ज्यामुळे जगाच्या पुढच्या वाटचालीचा रोख पूर्णपणे बदलून गेला? 


भारत चीन विवादित सिमारेषेच्या जवळपास २ किलोमीटर च्या परीसरात दोन्ही देशांना कोणत्याही तात्पुरत्या अथवा कायमच्या चौक्या बनवण्यास मज्जाव आहे. ह्या शिवाय ह्या परीसरात दोन्ही देशांचे सैनिक गस्त घालू शकतात पण कोणत्याही बंदुकीविना. असा करार भारत आणि चीन दरम्यान झालेला आहे. ह्या कराराचे उल्लंघन करून चीन ने पी.पी.१४ जवळ चीन च्या क्षेत्रात पण २ किलोमीटर च्या आतमध्ये एका छोट्या टेकडीच्या टोकावर एक तात्पुरती पोस्ट तयार केली. ह्या पोस्टमुळे दौलत बेग ओल्डी त्या शिवाय त्याला जोडणारा भारताचा रस्तावरची वाहतूक, भारतीय सैन्याच्या हालचाली ह्या स्पष्टपणे दिसू शकत होत्या आणि ग्रह पडल्यास त्यावर नियंत्रण ठेवता येणं ही शक्य होणार होतं. भारताने ह्या तात्पुरत्या चौकीला आक्षेप घेतं ती हटवण्याची मागणी केली. ह्या वाटाघाटींसाठी भारताचे १६ बिहार रेजिमेंट चे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू आणि चीन चे अधिकारी ह्यांच्यात १५ जून २०२० म्हणजे सोमवारी सकाळी बैठक झाली. चीन च्या अधिकाऱ्यांनी ही चौकी खाली करण्याचं बैठकीत मान्य केलं. भारताने आपले सैनिक ठरल्या प्रमाणे मागे हटवले. चीन आपल्या शब्दाला जागत नाही ह्याची कल्पना असल्याने कर्नल संतोष बाबू ह्यांनी एका मेजर अधिकाऱ्याच्या हाताखाली १२ जणांची एक तुकडी चीन ने आपली पोस्ट खाली केली की नाही ह्याच निरीक्षण करण्यासाठी पाठवली. 


चीन च्या सैनिकांनी हत्यार न घेता आलेल्या त्या भारतीय जवानांना आपलं बंधक बनवलं. ह्याची खबर लागताच कर्नल संतोष बाबू आपल्या दोन सैनिकांसह चीन च्या त्या पोस्टवर धडकले. कराराचा मान ठेवताना कोणतही हत्यार घेऊन भारताचे कोणतेच सैनिक गेले नव्हते. तिकडे पोस्टवर शाब्दिक चकमकी झाल्या. ह्या नंतर चीन च्या सैनिकांनी धोका देताना भारताच्या कमांडिंग ऑफिसर आणि २ जवानांवर तिक्ष्ण हत्यार, दंडुके घेऊन हल्ला केला. ह्यात भारताचे कर्नल के. संतोष बाबू आणि ते २ जवान मृत्युमुखी पडले. ह्या सगळ्या घटनेत मध्यरात्र उलटून गेली होती. सोमवार नंतर येणारा मंगळवार सुरु होतं होता. पण ह्या येणाऱ्या मंगळवार ने संपूर्ण जगाचा दृष्टीकोन बदलला जाणार होता ह्याची कल्पना ना चीन ला होती ना त्याच्या सैनिकांना. 


कर्नल संतोष बाबू ह्यांच्या हत्येची बातमी १६ बिहार रेजिमेंट मध्ये येताच सगळ्या सैनिकांच रक्त खवळल. कोणत्याही रेजिमेंटचा कमांडिंग ऑफिसर हा वडिलांसारखा असतो. आपल्या वडिलांचा दगाबाजीने केलेली हत्या सगळ्याच १६ बिहार सैनिकांच्या खूप जिव्हारी लागली. सूर्योदय व्हायची वाट न बघता सेकंड इन कमांड ऑफिसर आणि कॅप्टन स्तरावर असलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या हाताखाली ३०० भारतीय सैनिकांनी चीन च्या त्या पोस्टवर हल्ला केला. भारतीय सैनिक काहीतरी करतील ह्याचा अंदाज चीन च्या सैनिकांनी बांधला होता. त्यासाठी त्यांनी दंगलीच्या वेळी घालतात तसे सुरक्षा कवच परीधान केले होते. भारतीय सैनिकांना हत्याराशिवाय त्या टेकडीवर येताना बघून त्यांनी वरतून दगड फेकायला सुरवात केली. पण भारतीय सैनिक त्या दगडांना घाबरणारे थोडीच होते. त्यांच्यात बॅटमॅन ची विरश्री संचारली होती. 'जय बजरंग बली' म्हणत त्यांनी चिनी सैनिकांवर हल्ला केला. ह्यात भारतीय सैन्याचे घातक कमांडो समाविष्ट होते. चिनी सैनिकांना दंडुके माराचा काही परीणाम होणार नाही हे बघताच त्यांनी आपल्या हाताने चिनी सैनिकांच्या नरड्याचा घोट घ्यायला सुरवात केली. दगडांनी त्यांना चिरडून टाकायला सुरवात केली. ह्या सगळ्या लढाईत चीन ची पोस्ट तग धरू शकली नाही. ती तुटून बाजूच्या गाल्वान नदीत पडली. त्याच सोबत कित्येक भारतीय आणि चिनी सैनिक टेकडीवरून खाली फेकले गेले. ह्या लढाईत चीन च्या ४० सैनिकांना जागीच खात्मा झाला तर जवळपास १५० च्या आसपास सैनिक गंभीर जखमी झाले. कित्येक सैनिकांच मृत शरीर मिळवण्यासाठी चीन ला गाल्वान नदीचं पाणी थांबवावं लागलं. ह्या सगळ्या लढाईत २० भारतीय सैनिक हुतात्मा झाले. 


मंगळवारचा सूर्योदय झाला तोवर चीन ला भारतीय सेनेने केलेल्या पराक्रमाची जाणीव झाली. चीन ची ती तात्पुरती पोस्ट नष्ट झाली. चीन ला अंदाज नव्हता की एकही गोळी न चालवता भारतीय सैनिक चीन चं इतकं नुकसान करू शकतात. भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे आकलन करण्यात चीन आणि चीन चे सैनिक कमी पडले. सोमवारी केलेल्या दगाबाजीचे उत्तर भारताने मंगळवारी चीन ला व्याजासकट परत केलं होतं. ह्या पराक्रमाने पूर्ण जगाचा चीनकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. चीन च्या महत्वकांक्षेला भारतीय सैनिकांनी सुरुंग लावून उध्वस्थ केलं होतं. भारताच्या त्या पराक्रमी सैनिकांची आठवण ठेवताना भारताच्या नॉर्दन कमांड ने ते ट्विट केलं होतं की चीन ने विसरू नये, 


 'After every Monday, there will be a Tuesday'... 


फोटो स्रोत :- गुगल


सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Saturday, 1 August 2020

गेमचेंजर... विनीत वर्तक ©

गेमचेंजर... विनीत वर्तक 

'गेमचेंजर' हा शब्द गेले अनेक दिवस सोशल मिडीया, राजकीय पटलावर आणि इतर सामान्य लोकांच्या आयुष्यात गाजतो आहे. भारतात नुकतीच उतरलेली राफेल लढाऊ विमान गेमचेंजर आहेत की नाहीत ह्यावरून अनेक तर्क- वितर्क वर्तवले जात आहेत. ज्यांना ह्या क्षेत्रातील किंबहुना राफेल च्या तंत्रज्ञानाविषयी किंवा एकूणच हवेतील लढाई विषयी काही कल्पना नाही. ते लोकं अगदी अश्या पद्धतीने बोलत आहेत की ते ह्या क्षेत्रातील जाणकार असावेत. भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्यांनी ज्याच्या पसंतीवर आपली मोहोर उमटवली, ज्याला अनेक रक्षा क्षेत्रातील जाणकारांनी सर्वोत्तम असं म्हंटल त्याला राजकीय कुरघोडी करण्यासाठी नाव ठेवण्यात आलं हे बघून ह्यावर थोडं लिहावसं वाटलं. कुठेतरी त्या सैनिकी अधिकाऱ्यांचा आणि ज्यांनी ह्या डील ला मूर्त स्वरूप दिलं त्यांचा अपमान वाटला. राफेल ची निवड का केली गेली? का भारतीय वायू दलाला ते गेमचेंजर वाटते? का चीन- पाकीस्तान च्या मनात धडकी भरली आहे? का आपण इतके प्रचंड पैसे अवघ्या ३६ विमानांसाठी मोजले? आणि का राफेल येणाऱ्या काळात भारताच्या हवाई हल्याचा कणा असणार आहे ह्याची माहिती सामान्य लोकांना असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जेव्हा हे कळेल तेव्हाच राफेल गेमचेंजर आहे का नाही हे भारतातील कर भरणारा सामान्य नागरिक ठरवू शकेल ज्याच्या पैश्यातून हे विमान विकत घेतलं गेलं आहे. 

लढाऊ विमानाबद्दल ज्या सामान्य गोष्टी सांगण्यात येतात त्या बद्दल बरच काही लिहिलं गेलं आहे. राफेल चा वेग, त्याची वजन नेण्याची क्षमता आणि त्यावरील क्षेपणास्त्र पण ह्या गोष्टी एखाद्या लढाऊ विमानाला गेमचेंजर बनवत नाहीत. तर त्याला गेमचेंजर बनवण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे एकतर त्याची शत्रुविमानांच्या पासून बचाव करण्याची क्षमता आणि शत्रुला नमोहरण करण्याची त्याची शक्ती. ह्या दोन गोष्टीवर सगळा खेळ अवलंबून असतो. कारण कितीही वेग असला तरी शत्रूला आपलं अस्तित्व शेवटच्या क्षणापर्यंत न जाणवू देणं हाच खरा हुकमाचा एक्का आहे. ज्याला एक्स शो रूम किंमत म्हणतो ती राफेल ची जवळपास ६५० कोटी रुपये आहे. पण भारताने प्रत्येक राफेलसाठी साधारण १२०० कोटी रुपये मोजले आहेत. ह्यातील जवळपास ३०% रक्कम म्हणजे जवळपास ४०० कोटी रुपये फक्त राफेल वर असणाऱ्या एका सिस्टीमसाठी भारताने मोजले आहेत. ह्या सिस्टीम चं नावं आहे 'स्पेक्ट्रा सिस्टीम'. पण ह्याच सिस्टीममुळे राफेल हे गेमचेंजर बनलं आहे असं म्हंटल तर वावगं ठरू नये. 

 स्पेक्ट्रा सिस्टीम असणारं राफेल जगातील एकमेव लढाऊ विमान आहे. ह्या सिस्टीम मध्ये असं काय आहे की भारताने ह्यासाठी इतके पैसे मोजले आहेत. स्पेक्ट्रा सिस्टीम नक्की काय करते तर सोप्या शब्दात सांगायचं तर शत्रुच्या रडार ला उल्लु बनवते. ह्या सिस्टीम मध्ये असणारे सेन्सर रडार च्या सिग्नल ला ओळखून त्या पद्धतीच्या विरुद्ध वेव्ह तयार करतात (एक्टीव्ह कॅन्सलेशन) आणि शत्रु च्या रडार ला पूर्णपणे गंडवून टाकतात. हे इतक्या सहजतेने ही सिस्टीम करते की काही काळ रडार वरून राफेल पूर्णपणे नाहीसे होते किंवा रडार वर त्याच चुकीचं ठिकाण दाखवलं जाते. जोवर शत्रुला आपण फसवलं गेलो आहेत हे लक्षात येईल तोवर राफेल शत्रुच्या ताब्यातुन पूर्णपणे निसटलेलं असते. कोणतीही वस्तु रडार वर दिसण्यासाठी एखाद्या गोष्टीच रडार क्रॉस सेक्शन महत्वाचं असते. राफेल च रडार क्रॉस सेक्शन ०.०५ ते ०. १ मीटर इतकं आहे. म्हणजे एखाद्या चिमणी एवढं. पाकीस्तान ज्या जे.एफ. १७ ब्लॉक ३ वर उड्या मारतो आहे त्याच रडार क्रॉस सेक्शन ५ मीटर आहे. म्हणजे एखाद्या कार एवढं. आता रडार वर चिमणीला ओळखणं सोप्प की एखाद्या ५ मीटर कार ला हे शेंबड मुलं पण सांगेल. समजा समोरासमोर जर ही विमान आली तर जे १७ च्या रडारवर राफेल दिसेपर्यंत राफेल च्या मेटॉर ने त्याचा वेध घेतलेला असेल किंवा त्याच्याकडे झेपावलेलं असेल. चीन च्या स्टेल्थ म्हणून जाहिरात केलेल्या जे २० ला सुखोई च्या रडार ने पकडलेलं होतं. आत्ताच चीन ने आपलं जे २० हे ४ थ्या पिढीतील आहे असं म्हणत स्वतः त्याला ५ पिढीतून ४ थ्या पिढीत आणलं आहे. ह्याचा सरळ अर्थ आहे की राफेल जे की ४.५ पिढीतील आहे ते जे २० पेक्षा सरस आणि भारतासाठी गेमचेंजर आहे. 

राफेलचा शत्रुपासून बचाव तर आपण बघितला आता शत्रुला नामोहरण करण्यात राफेल कुठे आहे ते बघूया. राफेल एका वेळी ८ लक्ष्यावर हल्ला करू शकते. इकडे गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ह्याचा अर्थ काय तर समोरून शत्रूची ८ लढाऊ विमान एकदम आली तर राफेल एकाचवेळी ८ विमानांवर एकाच क्षणात क्षेपणास्त्र डागू शकते. आधी १ ल्या लक्ष्याला मारून मग दुसऱ्याकडे असं नाही तर एकाचवेळी ८ विमानांवर एकत्र हल्ला करण्याची राफेल ची क्षमता आहे. राफेल १०० किलोमीटर पेक्षा जास्त लांब असलेल्या लक्ष्यावर वार करू शकते. ह्याचा अर्थ काय तर राफेल च रडार १०० किलोमीटर परीघाच्या आधीच शत्रुच्या विमानांना आपल्या रडार मध्ये बघुन त्यांच्यावर हल्ला करू शकते. ही विमान जर ७० किलोमीटर पर्यंत जवळ असतील तर राफेल च्या मेटॉर पासून वाचणं अशक्य आहे (नो एस्केप झोन). आता मज्जा अशी आहे की पाकीस्तान आणि चीन ह्यांच्याकडे सध्या असलेल्या कोणत्याही विमानाची क्षेपणास्त्र रेंज ही ७० किलोमीटर पेक्षा जास्त नाही. ज्याला रडार लॉक म्हंटल जाते. म्हणजे शत्रुच्या विमानांना राफेल ला लक्ष्य बनवण्यासाठी ७० किलोमीटर पर्यंत राफेल जवळ येणं गरजेचं आहे. जर का ७० किलोमीटर ते राफेल च्या जवळ आले तर त्यांचा गेम ओव्हर आहे. शत्रुच कोणतच लढाऊ विमान राफेल च्या जवळ येण्याचा मुर्खपणा करणार नाही. त्यांनी तसा केलाच तर त्यांचा खेळ खल्लास. चीन आणि पाकीस्तान ह्यामुळेच घाबरलेला आहे की राफेल चा पराभव करणं अशक्य आहे. आता राफेल गेमचेंजर आहे का नाही हे प्रत्येकाच्या लक्षात आलं असेल. 

भारताने राफेल घेताना आपल्या प्रदेशाचा विचार केला त्यामुळे राफेल ची मागणी नोंदवताना त्यांनी ३६ विमानांन मध्ये जवळपास १३-१४ बदल केले आहेत ह्या बदलांसाठी भारताने जवळपास ३०० कोटी रुपये प्रत्येक विमानामागे मोजले आहेत. हे १३-१४ बदल कोणते तर त्यातले काही इकडे नमूद करतो. भारताची सिमा वाळवंटापासून हिमालया पर्यंत पसरलेली आहे. राफेल ५०-६० डिग्री सेल्सिअस पासून उणे -१०, -२० डिग्री सेल्सिअस मध्ये ही उड्डाण करू शकायला हवं ह्यासाठी त्याच्या इंजिनात आणि इतर कंट्रोल सिस्टीम मध्ये बदल केले गेले. ज्यामुळे राफेल आता लडाख पासून कच्छ च्या रणापर्यंत सगळीकडून भारताचं संरक्षण करण्यात सक्षम आहे. राफेल मधील यंत्रणा भारताच्या नाविक ह्या प्रणालीशी जोडली गेली आहे. इसरो ने सोडलेल्या ७ उपग्रहांशी राफेल नेहमी जोडलेलं राहील. नाविक प्रणाली राफेल ला २० मीटरपेक्षा कमी क्षेत्रात अचूकतेने भारताच्या कोणत्याही भूभागावर जोडलेलं ठेवेल. राफेल च्या रडार मध्ये डॉपलर रडार भारताने जोडलेलं आहे जे की बदलत्या हवामानाची इत्यंभूत माहिती वैमानिकाला देत राहील. भारताने स्वतःच्या तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या क्षेपणास्त्रांना ही राफेल च्या भात्यात स्थान दिलं गेलं आहे. अस्त्र हे भारताचं मिसाईल बसवण्यासाठी राफेल मध्ये बदल केले गेले आहेत. ह्याशिवाय हेल्मेट माउंटेड डिसप्ले, राफेल च्या देखभालीसाठीच्या खर्चाचा ही ह्यात समावेश आहे. 

आता सर्वसामान्याना कळलं असेल की राफेल ची एक्स शो रूम किंमत आणि भारताने मोजलेली किंमत ह्यात तफावत का आहे. जर आपण एक्स शो रूम मधलं राफेल आणलं असतं तर ते कदाचित सुखोई ३० एम.के.आय. इतकच किंबहुना त्यापेक्षा कमी सरस राहिलं असतं.  काही लोकांनी ह्याच किमतीचं  राजकारण केलं. डसाल्ट ने ५८,००० कोटी रुपयाच्या करारामधील जवळपास ३०,००० कोटी रुपयांच काम भारताला दिलं आहे. ह्या ३०,००० कोटी रुपयांमधील ३% काम हे ज्यावरून रणकंदन झालं त्या रिलायंस ग्रुप ला दिलं आहे. मला त्या राजकारणात जायचं नाही. भारताने राफेल चं सगळ्यात टॉप क्लास मॉडेल घेऊन त्यात भारतीय यंत्रणा, भारताची सामरिक गरज ह्यांच्या गरजेनुसार त्यात बदल केले आहेत. ह्यामुळेच राफेल च्या शक्तीत कैक पट वाढ झाली आहे. जी शत्रु राष्ट्रांच्या डोळ्यात खुपते आहे. भारताचं राफेल गेमचेंजर पेक्षा ही गेमओव्हर करणारं आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला लक्षात येइलच. तोवर भारताच्या हवाई दलावर विश्वास ठेवणं आणि त्यांनी राफेल च्या खरेदीने आपल्या पैश्याला न्याय दिलेला आहे हे आपण समजून घ्यायला हवं. 

ता.क. :- ह्या पोस्ट चा उद्देश सामान्य लोकांना राफेल बद्दल माहिती देण्याचा आहे. ह्याचा कोणताही संबंध पक्षीय राजकारणाशी जोडू नये तसेच कोणतीही राजकीय कुरघोडी करण्याचा उद्देश ह्या पोस्ट चा नाही.  
  
फोटो स्रोत :- गुगल 

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.