ऑपरेशन विजय... विनीत वर्तक ©
२६ जुलै १९९९ कारगिल मधील युद्ध संपल्याची घोषणा भारतीय सैन्याने केली. आज ह्या घटनेला २१ वर्ष होत आहेत. पण आजही कारगिल चा विषय निघाला की समोर उभं राहते ते म्हणजे 'ऑपरेशन विजय'. उंच पर्वतराजी मधलं लढलं गेलेलं भारताच यशस्वी ऑपरेशन होतं. पण ह्या ऑपरेशन विजय ला समजावून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागे जायला हवं.
१९९८ च्या अणु चाचण्यांनंतर पाकिस्तान चा आत्मविश्वास वाढला होता. आपण भारताला त्याच्याच हद्दीत घुसून काश्मीर वर कब्जा करू शकतो. भारताने विरोध केलाच तर आता त्याला अण्वस्त्रांची भीती दाखवू शकतो असा विचार पाकिस्तान सैन्यातील काही अधिकाऱ्यांना वाटत होतं. त्यातच भारताच डोकं ठेचायाच असेल तर गळा दाबायला हवा. अशी जागा पाकिस्तान ने आधीच हेरून ठेवली होती. कारगिल प्रांत पाकिस्तान ने का निवडला ह्याला काही कारणं होती. कारगिल हे श्रीनगर पासून २०५ किमी अंतरावर आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेलं कारगिल चा भूभाग अतिशय प्रतिकूल हवामानाचा आहे. इथल्या पर्वतराजी मध्ये भारतीय सैन्याच्या अनेक पोस्ट आहेत. ह्या सर्व पोस्ट ची उंची साधारण ५००० मीटर ( १६,००० फुट) ते ५५०० मीटर (१८,००० फुट) इतकी आहे. हिवाळ्यात तपमान साधारण उणे -४८ डिग्री सेंटीग्रेड पर्यंत घसरत असल्याने अश्या प्रतिकूल काळात भारतीय सैनिक अश्या पोस्ट रिकामी सोडून मागे सरकत असायचे. हे दोन्ही कडून होत होतं. पाकिस्तान ने ही गोष्ट हेरली होती. ह्या सगळ्या पोस्ट अतिशय उंचीवर असून तिथून भारताच्या एका महत्वाच्या रस्त्याला लक्ष्य करण सहज शक्य होतं.
एन एच १ डी हा भारताचा महत्वाचा महामार्ग लेह ला ह्या भागातून जातो. जर ह्या रस्त्यावर आपण कंट्रोल केला तर आपण सियाचीन ला जाणारी भारताची रसद तोडू. सियाचीन वर रसद तोडण म्हणजे सियाचीन वरून भारताची माघार आणि त्याच वेळेस ह्या भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली कि आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीर प्रश्न अजून चिघळला जाईल. जोवर त्यातून मार्ग निघेल तोवर पाकिस्तान ने सियाचीन वर ताबा मिळवला असेल व त्याचसोबत काश्मीर प्रश्नावर जगाच लक्ष वळवलेल असेल. हा पूर्ण प्लान यशस्वी होण्यासाठी जी साथ निसर्ग आणि पर्वतराजी ची लागणार होती ती पाकिस्तान च्या बाजूने होती. पाकिस्तान चा लष्करी बेस स्कार्डू इकडे फक्त १७० किमी वर होता. तसेच भारताने बांधलेल्या पण मोकळ्या असलेल्या पोस्ट आपल्या सैनिकांना आरामात राहण्याची सोय करू शकतात हे पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना ठाऊक होतं. एकदा का इकडे ताबा मिळवला कि भारताने सियाचीन आणि काश्मीर दोन्ही गमावलं कारण अतिउंचीवरच्या युद्धात जो उंचीवर त्याच्या बाजूने सगळ्या गोष्टी. समोरासमोर युद्ध झाल तर १:६ सैनिक अशी विषम परिस्थिती भारताला हाताळावी लागणार होती. १:६ अर्थ होतो पाकिस्तान चा १ सैनिक मारण्यासाठी भारताला ६ सैनिक गमवावे लागतील. हे तर कागदावरच प्रमाण खऱ्या युद्धात हि विषमता अजून जास्ती प्रमाणात पाकिस्तान च्या बाजूने झुकणार हे पाकिस्तान ला ठाऊक होतं.
पाकिस्तान ने हिवाळ्याच्या दिवसात ऑपरेशन बद्र सुरु केलं. हिवाळ्याच्या त्या दिवसात भारतीय सैन्याच्या रिकाम्या झालेल्या पोस्टवर पाकिस्तानी सैनिकांनी तिथल्या स्थानिक लोकांच्या वेशात जाऊन कब्जा करायला सुरवात केली. मशीन गन घेऊन जाणाऱ्या काही सैनिकांना गुराख्यांनी पाहिल्यावर त्याची कल्पना त्यांनी भारतीय सैन्याला दिली. भारतीय सैन्याने एक सर्च पार्टी कॅप्टन सौरभ कालिया च्या नेतृत्वाखाली पाठवली. कॅप्टन सौरभ कालिया ला पाकिस्तानने बंधक बनवलं आणि त्याच्यावर असे अत्याचार केले की ज्याची कल्पनापण आपण करू शकत नाही. गरम दांड्या ने त्याचे कान फोडले, दोन्ही डोळे फोडले, जेनेटिकल ऑर्गन कापून टाकले आणि शेवटी त्याची हत्या केली. माणुसकीची इतकी खालची पातळी पाकिस्तान ने गाठली होती. ह्यानंतर भारतीय सैन्याला पाकिस्तान च्या डावाचा अंदाज येईपर्यंत पाकिस्तान ने साधारण १३०-२०० स्क्वेअर किलोमीटर च्या परिसरावर अतिक्रमण केलं होतं.
भारतीय सेनेने तातडीने २ लाख सैनिकांना युद्धासाठी तयार राहण्याचा आदेश दिला पण कारगिल ची परिस्थिती अशी होती कि तिकडे २०,००० पेक्षा जास्ती सैनिकच लढाईसाठी जाऊ शकले. भारतीय सैन्यापुढे सगळ्यात मोठी जबाबदारी होती ती पर्वतराजी चे जे पॉइंट भारताच्या महामार्गाला लागून होते त्यावर नियंत्रण मिळवण. कारण त्यावरून होणारा गोळ्यांचा मारा आतोनात नुकसान करत होताच त्या शिवाय भारतीय सैन्याचा लेह आणि सियाचीन शी असलेला संपर्क ही तोडत होता. त्यामुळेच पॉइंट ४५९० आणि पॉइंट ५३५३ ताब्यात घेण गरजेच होतं. पॉइंट ४५९० ताब्यात घेताना सगळ्यात जास्ती हानी भारतीय सैन्याला झाली. पण तोलोलिंग च्या शिखरावर तिरंगा फडकावण तितकच गरजेच होतं. ह्या विजयाने भारतीय सैन्याला आत्मविश्वास दिला. पॉइंट ५०६० टायगर हिल आणि पॉइंट ५१०० सोबत पॉइंट ५३४३ वर एकेक करत भारतीय सैन्याने तिरंगा फडकवला. इकडे लक्षात घेण्यासारख्या काही गोष्टी आहेत. आधीच युद्धभूमीची उंची ही १८००० फुटापेक्षा जास्त होती. त्यामुळे कोणतही लढाऊ विमान इकडे उडवण्यासाठी त्याला कमीत कमी २०,००० फुटापेक्षा जास्ती उंचीवरून उड्डाण गरजेच होतं. इतक्या उंचीवरून उड्डाण करताना हवेची घनता ३०% कमी असते आणि पायलट चा मृत्यू ओढवू शकतो. तरीही भारतीय वायू सेनेने भारतीय सैन्याला हवेतून मदत केली. पाकिस्तान च्या हवाई प्रमुखांना कारगिल हल्याची पूर्व कल्पना न दिल्याने त्यांनी पाकिस्तानच्या सैन्याला हवाई मदत नाकारली.
आपली हार होते आहे हे लक्षात येताच पाकिस्तान ने जागतिक मंचावर भारत आपल्यावर हल्ला करून आपला प्रदेश काबीज करत आहे अशी आवई उठवली. यु.एस.ए. चे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन ह्यांनी पाकिस्तान ला कारगिल मधून माघार घेण्याची सूचना केली. पण पाकिस्तान नमला नाही. भारताने काही गोष्टी जमेच्या केल्या त्यामुळे पूर्ण जगाचा पाठींबा भारताच्या बाजूने होता. पाहिलं म्हणजे भारताने आंतराष्ट्रीय सीमा रेषा ओलांडली नाही. पाकिस्तानी सैन्याला चारी मुंड्या चीत केल्यावर पण भारताने आंतरराष्ट्रीय सीमा रेषेच पालन केलं. इकडे भारताच्या नौदलाने ऑपरेशन तलवार सुरु करताच पाकिस्तान ची पाचावर धारण बसली होती. भारताच्या युद्धनौका कराची बंदरावर नांगर टाकून फक्त आदेशाची वाट बघत होत्या. एका आदेशावर पाकिस्तान च कराची बंदर पूर्ण नामशेष आणि तिकडून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा बंद करायला भारतीय नौदलाला काही तास पुरेसे होते. पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ ह्यांनी नंतर दिलेल्या कबुलीत स्पष्ट सांगितल होतं की फक्त ६ दिवस पुरेल इतकाच साठा पाकिस्तान कडे होता. तरीही भारताने रसद तोडली नाही ह्याचा फायदा भारताला आंतरराष्ट्रीय मंचावर झाला. कारण भारत- पाकिस्तान दोन्ही देश अण्वस्त्रधारी होते. भारत कदाचित ५-६ दिवसात युद्ध जिंकला असता पण अण्वस्त्रच्या वापराने भारताच ही मोठ नुकसान झाल असतं. भारताचा संयम जगातील सर्वच राष्ट्रांनी उचलून धरला. अमेरिका सोबत, जी ८, एसियन, युरोपियन युनियन सकट सगळ्याच राष्ट्रांनी भारताला पाठींबा दिला. चीन ह्या पाकिस्तान च्या मित्राने तटस्थ भूमिका घेतली. ह्यामुळे सगळीकडून गळचेपी झाल्यावर ११ जुलै १९९९ ला पाकिस्तान ने माघार घ्यायला सुरवात केली. १४ जुलै १९९९ ला ऑपरेशन विजय हे विजयी झाल्याची घोषणा तत्कालीन प्रधानमंत्री श्री अटल बिहारी वाजपेयी ह्यांनी केली. तर २६ जुलै १९९९ ला भारतीय सेनेने सगळ्या पाकिस्तानी सैनिकांना पिटाळून लावल्याची घोषणा करत एक यशाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला.
ऑपरेशन विजय भारतासाठी खूप कठीण होतं. भारताला त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागली. गड आला पण भारताने अनेक सिंह गमावले ज्याची भरपाई कदापि शक्य नाही. काळाच्या ओघात आपण त्या बलिदानाला विसरून ही गेलो. पण आजही पाकिस्तान च्या त्या स्वप्नांचे पंख कोणी छाटले असतील तर ते आपल्या भारतीय सैनिकांनी. पाकिस्तान ने इतकी अचूक वेळ साधत भारताची नस घोटली होती की खरोखर अजून काही क्षण आणि सियाचीन आपल्या हातून गेलं असतं. पण हरतील ते भारतीय सैनिक कुठले “या तो तिरंगा फैलाके आऊंगा या तिरंगे मे लपटा हुआ आऊंगा लेकीन आऊंगा जरूर” अस जिगर असणाऱ्या भारतीय सैनिकांच्या आहुती आणि त्यागामुळे पाकिस्तान च नुसतं स्वप्न तुटलं नाही तर पाकिस्तान ने पराभव चाखला. आज किती भारतीय त्या बलिदानाची आठवण ठेवून आहेत किंवा किती भारतीयांना कोणी काय बलिदान दिलं ह्याची आठवण आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता बलिदान देणाऱ्या ह्या सैनिकांना भारतीय सरकारने पदक देऊन गौरवलं पण त्या सैनिकांची आज आपल्याला काहीच माहिती नाही.
Grenadier Yogendra Singh Yadav, 18 Grenadiers, Param Vir Chakra
Lieutenant Manoj Kumar Pandey, 1/11 Gorkha Rifles, Param Vir Chakra, Posthumous
Captain Vikram Batra, 13 JAK Rifles, Param Vir Chakra, Posthumous
Rifleman Sanjay Kumar, 13 JAK Rifles, Param Vir Chakra
ह्यांना परमवीर चक्र तर,
- Major Vivek Gupta, 2 Rajputana Rifles, Posthumous
- Major Rajesh Singh Adhikari, 18 Grenadiers, Posthumous
- Major Padmapani Acharya, 2 Rajputana Rifles, Posthumous
- Captain N Kenguruse, 2 Rajputana Rifles, Posthumous
- Captain Anuj Nayyar, 17 Jat Regiment, Posthumous
- Lieutenant Keishing C Nongrum, 12 JAK Light Infantry
- Major Sonam Wangchuk, Ladakh Scounts
- Lieutenant Balwant Singh, 18 Grenadiers
- Naik Digendra Kumar, 2 Rajputana Rifles
ह्यांना महावीर चक्र तर,
Captain Haneef-uddin, 11 Rajputana Rifles, Vir Chakra, posthumous
Major Mariappan Saravanan, 1 Bihar, Vir Chakra, Posthumous
Squadron Leader Ajay Ahuja, Indian Air Force, Vir Chakra, Posthumous
Havildar Chuni Lal, 8 JAK LI, Vir Chakra.
ह्यांना वीर चक्राने सन्मानित करण्यात आलं. ह्यांच्या सोबत ५२७ पेक्षा जास्ती सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती आपल्या देशाच रक्षण करण्यासाठी दिली. आज १९ वर्ष झाल्यावर आपण त्यांची आठवण ठेवली नाही तर तो आपला करंटेपणा ठरेल. २६ जुलै २०१५ ला तोलेलंग च्या शिखराच्या जवळ उभं राहून तिरंगा फडकताना बघताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी मनाने गेलो आणि पुन्हा एकदा त्या सर्व सैनिकांना मनातून कडक सॅल्युट केला. ओठांवर कवी जगदंबा प्रसाद मिश्र हितैषी ह्यांची कविता आली.
उरूजे कामयाबी पर कभी हिन्दोस्ताँ होगा
रिहा सैयाद के हाथों से अपना आशियाँ होगा
चखाएँगे मज़ा बर्बादिए गुलशन का गुलचीं को
बहार आ जाएगी उस दम जब अपना बाग़बाँ होगा
ये आए दिन की छेड़ अच्छी नहीं ऐ ख़ंजरे क़ातिल
पता कब फ़ैसला उनके हमारे दरमियाँ होगा
जुदा मत हो मेरे पहलू से ऐ दर्दे वतन हरगिज़
न जाने बाद मुर्दन मैं कहाँ औ तू कहाँ होगा
वतन की आबरू का पास देखें कौन करता है
सुना है आज मक़तल में हमारा इम्तिहाँ होगा
शहीदों की चिताओं पर जुड़ेंगे हर बरस मेले
वतन पर मरने वालों का यही बाकी निशां होगा
कभी वह दिन भी आयेगा जब अपना राज देखेंगे
जब अपनी ही जमीं होगी जब अपना आसमां होगा....
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.