Sunday 8 March 2020

चाय के टपरी पे... विनीत वर्तक ©

चाय के टपरी पे...  विनीत वर्तक ©

साधारण ३५ वर्षापूर्वी आकाशाचं वेडं असणारे दोघेजण एका स्पर्धा परीक्षेच्या दरम्यान ओळखीचे झाले. त्या स्पर्धेत एक प्रश्न विचारणारा होता तर दुसरा त्याच उत्तर देणारा. स्पर्धेत एकमेकांच्या विरोधात असणारे ते दोघे स्पर्धा संपल्यावर एकमेकांचे मित्र बनले ते हैद्राबाद च्या सगळ्यात प्रसिद्ध अश्या 'गार्डन कॅफे' ह्या  इराणी चहा च्या टपरी वर.  एक रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स वर कॉलेज मधल्या सिनियर मुलांना शिकवायचा तर दुसरा मोपेड वर १०० किलोमीटर लांब असणाऱ्या टेलिस्कोप ने हॅले चा धूमकेतू पाहयला जायचा. ह्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले पण चहाची टपरी लक्षात राहिली. २५ वर्षानंतर ते त्यातल्या एकाने दुसऱ्याची कंपनी विकत घेतली आणि पुन्हा ते दिवस आठवले. दोघांच्या मनात घर करून राहिलेलं आकाश त्यांना खुणावत होतं. मधल्या काळात पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं होतं. आकाशाची क्षितिज विस्तारत होती आणि त्या क्षतिजावर भारताचा उदय झाला होता.   

१५ ऑगस्ट १९६९ चा दिवस भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिला गेला होता. ह्याच दिवशी भारताने अश्या एका क्षेत्रात पाऊल टाकलं जे येणाऱ्या २१ व्या शतकात भारताला एक सामर्थ्यशाली राष्ट्र तसेच तंत्रज्ञानातील मोजक्याच प्रगत राष्ट्रात समाविष्ट करणारं होतं. १५० वर्ष गुलामगिरीच्या अधिपत्याखालून निघालेला नुकताच निघालेला भारत आपल्याच लोकांच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी धडपडत होता. अश्या वेळेस अवकाश क्षेत्रा सारख्या खर्चिक क्षेत्रात भारताने टाकलेलं पाऊल जागतिक पातळीवर नगण्य होतं. फार काय तर भारत एखादा उपग्रह सोडेल आणि जमलच तर एखादं रॉकेट बनवेल जे आपल्या बलवान रॉकेट आणि उपग्रहांशी बरोबरी करू शकणार नाही असं जगातील अनेक राष्ट्रांना वाटतं होतं. पण खरी मेख इकडेच होती कमी वजनाचे उपग्रह आणि हलकी रॉकेट ह्या क्षेत्रात भारताला टक्कर देणारा कोणताच देश नव्हता. भारताच्या पी.एस.एल.व्ही. ने अवकाश क्षेत्रात भारताचा झेंडा अटकेपार रोवला.

उपग्रह निर्मिती चं तंत्रज्ञान ज्या वेगाने प्रगती करत होतं त्या वेगाने मोठे मोठे उपग्रह आता कमीत कमी वजनाचे होऊ लागले. एकीकडे भारत ह्या उपग्रहांच्या प्रक्षेपण क्षेत्रात दादा बनत असताना आपण का नाही असे हलक्या वजनाचे उपग्रह भारतात बनवू शकत असा क्रांतिकारी विचार त्याच दोन मित्रांच्या मनात आला. अवकाश क्षेत्र हे अजूनही सरकारी नियंत्रणाखाली असल्याने खाजगी क्षेत्रात ह्या तंत्रज्ञानाची माहिती असलेले अनेकजण असूनही भारत कुठेतरी ह्या क्षेत्रात मागे होता. हे नेमकं त्या दोघांनी हेरलं होतं. चहाच्या टपरीवर बघितलेली स्वप्न आता प्रत्यक्षात आणायला जवळपास ५ वर्षाचा कालावधी गेला पण ते दोघेही मागे हटले नाहीत. सुरवात करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा 'ध्रुवा स्पेस' नावाची कंपनी विकत घेतली. त्यानंतर आपल्या स्वप्नांना मूर्त स्वरूप द्यायला त्यांनी सुरवात केली.

सॅटेलिझे जन्माला आली आणि आपला पहिला उपग्रह ExseedSat1 ची निर्मिती त्यांनी अवघ्या ४ महिन्यात केली तर आपला दुसरा उपग्रह ExseedSat2 ची निर्मिती एका आठवड्यात केली. तिथून मागे वळून त्यांनी पाहिलच नाही. उपग्रह निर्मिती च्या क्षेत्रात ह्या दोन मित्रांच्या कंपनीने खळबळ उडवली. दोन भारतीयांच्या स्वप्नातून तयार झालेल्या कंपनीने उपग्रह निर्मिती करून त्याला प्रक्षेपण करण्याचा खर्च १००० करोड वरून अवघ्या १० कोटीवर आणला. इसरो छोट्या आणि नॅनो उपग्रहांच्या बाजारातील जवळपास ३०% हिस्सा राखून आहे. अमेरिकेची 'स्पेस एक्स' आणि भारताची 'इसरो'  ह्या दोघांसोबत काम करण्याचा सॅटेलिझे ला अनुभव असुन ह्या दोघांच्या मदतीने स्वतःचा उपग्रह अवकाशात पाठवण्याच स्वप्न बघणाऱ्या अनेक संस्थांना, राष्ट्रांना सॅटेलिझे ने एक स्वस्त पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सॅटेलिझे  च्या मते इसरो जितके उपग्रह एका वर्षात अवकाशात पाठवते त्यातले १०% जरी सॅटेलिझे ने बनवले तर त्याची किंमत १०० मिलियन अमेरीकन डॉलर च्या घरात आहे. ह्यात जर बाहेरील जगाचा हिस्सा पकडला तर हीच किंमत १ बिलियन च्या घरात जाईल.

चहाच्या टपरीवर बसून भारताला स्वस्त आणि किफायतशीर उपग्रह निर्मितीचा देश बनवण्याचं स्वप्न बघणारे ते तरुण म्हणजेच 'आशर फरहान' आणि 'महेश मूर्ती'. त्यांच्या स्वप्नातून तयार झालेल्या सॅटेलिझे ने आज जागतिक पटलावर भारताचं नाव नेलं आहे. इसरो कडे जर जगातल सगळ्यात स्वस्त उपग्रह प्रक्षेपित करणारं रॉकेट आहे तर सॅटेलिझे कडे जगातले सगळ्यात स्वस्त उपग्रह निर्मितीच तंत्रज्ञान आहे. आज इसरो आणि सॅटेलिझे मिळून मायक्रो आणि न्यानो उपग्रह क्षेत्रात भारताचं नाव सोनेरी अक्षरांनी लिहत आहेत. त्यांच्या पुढील प्रवासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. एक भारतीय  म्हणून तुमचा अभिमान आहे.

फोटो स्रोत :- गुगल, सॅटेलिझे     

 सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 

No comments:

Post a Comment