Tuesday 17 March 2020

गरुड ड्रोन बनवणारा हर्षवर्धनसिंह झाला... विनीत वर्तक ©

गरुड ड्रोन बनवणारा हर्षवर्धनसिंह झाला... विनीत वर्तक ©

'जेल मैं सुरंग' हा असरानी चा शोले चित्रपटातील संवाद आजही अनेकांच्या स्मरणात असेल. भूसुरंग हे हत्यार आजही शत्रूच्या हल्याला थोपवण्यासाठी वापरलं जाते. एका अंदाजानुसार पूर्ण जगात १०० मिलियन पेक्षा जास्ती भूसुरंग आजही पेरलेले असून ते चालू स्थितीत आहेत. शत्रूने पेरलेल्या अनेक भूसुरंगांचा अंदाज न आल्याने भारताने आजवर अनेक सैनिकांना गमावलं आहे. तर कित्येक सैनिकांना आपले अवयव गमवावे लागले आहेत. भारतात नक्षल लोक आजही मोठ्या प्रमाणावर ह्या भूसुरंगांचा वापर आपल्या विरुद्व करत आहेत. भूसुरुंगांना शोधून त्यांना निष्क्रिय करण्याची प्रक्रियेत पण खूप मोठी जोखीम असते. त्यांना निष्क्रिय करताना सुद्धा अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळेच आजही भूसुरुंग हे आपल्या भारतीय सेनेपुढे, तसेच सी.आर.पी.एफ. सारख्या निमलष्करी दल तसेच पोलीस दलांसाठी खूप मोठं आव्हान होतं. आपल्या देशाच्या संरक्षण दलाकडे असणाऱ्या ह्या प्रश्नाने अहमदाबाद गुजरात इथल्या एका १५ वर्षाच्या मुलाच्या मनात घर केलं. यु ट्यूब वर भूसुरुंगामुळे सैनिकांचा जाणारा जीव बघून त्याच्या मनात कसतरी झालं. चंद्रावर जाण्याचं तंत्रज्ञान असताना माणसाशिवाय भूसुरुंगांना निष्क्रिय करण्याचं तंत्रज्ञान आपण का बनवू शकत नाही असा प्रश्न त्याच्या मनात आला? इथून सुरु झाला पूर्ण जगाला दखल घ्यायला लावणाऱ्या तंत्रज्ञानाचा प्रवास.

हर्षवर्धनसिंह झाला गुजरात मधल्या अहमदाबाद इथला एक सर्वसामान्य मुलगा. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्या प्रमाणे हर्षवर्धनसिंह ला लहानपणापासून तंत्रज्ञानाची गोडी होती. अवघ्या १० वर्षी त्याने घरातील सगळ्या उपकरणांना कंट्रोल करेल असं रीमोट कंट्रोल तयार केलं. टी.व्ही., म्युझिक सिस्टीम ते अगदी स्वयंपाकाच्या घरात असणाऱ्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू फक्त एका रीमोट कंट्रोल ने चालवत्या येत होत्या. हर्षवर्धनसिंह इथवर थांबला नाही तर त्याने हॉल मधील भांडी किचन मध्ये नेणारा, घरात साफ सफाई करणारा रोबोट तयार केला. वयाच्या १० व्या वर्षी त्याने एडव्हान्स इलेक्ट्रॉनिक मधली पुस्तक वाचली. रोबॉटिक्स मधल अजून शिकण्यासाठी त्याला इंटरनेट ची गरज होती. घरी मध्यम वर्गीय परीस्थिती असल्याने इंटरनेट ची सोय नव्हती. इंटरनेट कॅफे मध्ये वय कमी असल्याने त्याला एकट्याला इंटरनेट वापरण्यासाठी कॅफे चा मालक मनाई करत होता. आपल्या आजोबांना सोबत घेऊन इंटरनेट च्या मायाजालात त्याने प्रवेश केला आणि रोबॉटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स मधल्या अनेक गोष्टी आत्मसात केल्या. वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत त्याने ४२ ग्याजेट ८ रोबोट आणि ३ ड्रोन तयार केले होते.

वयाच्या १३ व्या वर्षी एका यु ट्यूब व्हिडीओ ने त्याच्या मनाला घोर लावला. भूसुरंगाना ड्रोन च्या द्वारे निष्क्रिय करता येईल का? ह्या प्रश्नावर उत्तर शोधण्याची जबाबदारी त्याने उचलली. पण समोर अडचणींचा पाढा होता. सगळ्यात मोठी अडचण होती ती पैश्यांची. ह्या संशोधनासाठी पैसा कसा उभा करायचा हा प्रश्न त्याच्यासमोर होता. हर्ष चा रोबॉटिक्स मधील आवाका त्याच्या वयाच्या मानाने प्रचंड होता. त्याने ह्या गोष्टीचा उपयोग करून पैसे कमावण्याचं ठरवलं. त्याने बि. टेक. आणि एम.टेक. च्या मुलांसाठी शिकवणी सुरु केली. एका १३ वर्षाच्या मुलाकडून पदवीयुत्तर मुलं शिकत होती ह्यावरून आपण हर्षवर्धनसिंह झाला ची बुद्धीमत्ता किती प्रचंड आहे ह्याचा अंदाज बांधू शकतो. हर्ष ने सुरुंग शोधणाऱ्या ड्रोन चं एक प्रोटोटाईप मॉडेल बनवलं. हे मॉडेल घेऊन त्याने जवळपास १२ वेगवेगळ्या कंपन्यांची दार ठोठावली पण कोणीच त्याच्या संशोधनात पैसे लावायला तयार झालं नाही.

हर्ष ने हार मानली नाही. कोणतिही कंपनी जर पैसे लावायला तयार नाही तर आपण आपलीच कंपनी सुरु केली तर? आपल्याकडच्या सर्व साठवलेल्या पैश्यातून त्याने कंपनी सुरु केली. ११ जणांची टीम त्याने तयार केली. आपल्या बनवलेल्या ड्रोन च्या मॉडेलला त्याने १०० पेक्षा जास्ती वेळा सगळ्या चाचण्यांतून तपासलं. आता त्याच ड्रोन तयार होतं एका उड्डाणासाठी. २०१७ च्या 'व्हायब्रन्ट गुजरात' ह्या कार्यक्रमात त्याने आपलं ड्रोन सगळ्यांसमोर आणलं. एका दिवसात हर्षवर्धनसिंह झाला हे नावं अनेक रक्षा तज्ञांच्या तोंडी पोहचलं. काही दिवसांनी हर्ष ला सी.आर.पी. एफ. च्या डायरेक्टर जनरल चा फोन आला व त्यांनी त्याच्या ड्रोन च्या तंत्रज्ञानाला बघण्यासाठी आणि चाचणीसाठी त्याच्या घरी येतं असल्याचं कळवलं. दुसऱ्या दिवशी सैन्य अधिकाऱ्यांचा एक गट ज्यात खुद्द डायरेक्टर जनरल होते ते हर्ष च्या घरी पोहचले. हर्ष च्या ड्रोन तंत्रज्ञानाने सगळ्याचं मन जिंकलं.

हर्ष ला त्या नंतर अनेक राष्ट्रांकडून त्याच तंत्रज्ञान विकत घेण्याच्या ऑफर आल्या पण हर्ष च्या मते,

I have got partnership offers from South Korea, the US, France, Dubai and Thailand. We have got offers to establish our company there. We have been ensured funding as well. But, given the number of jawans who are martyred (due to landmines), in our motherland, if I can develop this technology to serve the Indian Army and the CRPF, I will be glad.
 
हर्ष ने २०१८ साली आपल्या गरुड ड्रोन चा एक अवतार जगापुढे आणला.

Eagle A7 (short for Escort for Attacking on Ground and buried Landmines as Enemy)

हे ड्रोन १०० किलोमीटरपेक्षा जास्ती अंतरावरून नियंत्रित केलं जाऊ शकते. हे ड्रोन जमीनीपासून २ फूट उंचीवर उडते. उडताना काही विशिष्ठ तरंग जमिनीत पाठवते ज्याने भूसुरुंगाचा वेध घेता येतो. ह्या शिवाय हे ड्रोन विशिष्ठ लहरींनी ह्या भूसुरुंगाला निष्प्रभ करू शकते. हे सगळं आर्मी ऑफिसर, पोलीस किंवा कोणतही सैन्य दल नियंत्रण कक्षातून मधून नियंत्रित करू शकते. तसेच ह्या ड्रोन मधून ज्या ठिकाणी भूसुरुंग आहे त्या ठिकाणी मार्कर टाकण्याची सोय आहे. ज्यायोगे सैनिकांना त्याला शोधण्यास कोणतीही अडचण येणार नाही. ह्या ड्रोन च वजन ८ किलोग्रॅम असून त्यावर अजून ८ किलोग्रॅम वजनाचा भार घेऊन जाण्याची क्षमता असून एक तासापर्यंत हवेत उड्डाण भरू शकते. हर्ष च्या ह्या इगल ए ७ ड्रोन च्या क्षमतांची तारीफ खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत ड्रोन तंत्रज्ञानात अग्रेसर असणाऱ्या इस्राईल चे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ह्यांनी केली आहे.

हर्षवर्धनसिंह झाला आता रोबॉटिक्स च्या क्षेत्रात असा रोबोट बनवतो आहे जो आपल्या मनातल्या इच्छा ओळखून काम करेल. आपल्या मेंदूतून निघणाऱ्या लहरींना ओळखून त्या प्रमाणे काम करण्यास सक्षम असेल. अवघ्या १६ वर्षाच्या हर्षवर्धनसिंह झाला चा प्रवास थक्क करणारा आहे. त्याच संशोधन विकत घेण्यासाठी प्रगत राष्ट्र भरपूर पैसा घेऊन रांगेत उभे असताना पण त्याने आपल्या सैनिकांसाठी आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं ठरवलं आहे. अवघ्या १५ व्या वर्षी जगातील लाखो सैनिकांचे प्राण वाचवण्याचं तंत्रज्ञान तयार करणाऱ्या हर्षवर्धनसिंह झाला ला माझा कडक सॅल्यूट. त्याच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

3 comments:

  1. अप्रतिम 💐👍😊🍫🙏

    ReplyDelete
  2. अतिशय अप्रतिम भारताला अशाच हर्षवर्धनसिंग झाला सारखे बौद्धिक ची आवश्यकता आहे, खरा देशभक्त आहे

    ReplyDelete