एका मच्छरापासून वाचवणारी सुनिथा... विनीत वर्तक ©
'साला एक मच्छर.......' हा नाना पाटेकरचा चित्रपटातील संवाद सगळ्यांना आठवत असेल. एका मच्छर आपलं काय उखाडेल असा विचार करणाऱ्या सगळ्यांसाठीच हे जाणून घेणं महत्वाचं आहे कि हा एक मच्छर त्यांना मरणाच्या खाईत लोटू शकतो. मच्छराच्या चावण्यामुळे डेंगू, मलेरीया, चिकन गुनिया, येल्लो फिवर सारखे आजार होतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या मते मच्छरांच्या चावण्यामुळे होणाऱ्या आजाराने दरवर्षी ७ लाख लोकं मृत्युमुखी पडतात. ह्यात भारतात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या खूप आहे. एकट्या डेंगूमुळे भारतात गेल्या वर्षी ७०,००० लोकांना जीव गमवावा लागला आहे. मच्छरांचा त्रास होऊ नये म्हणून आजवर बरच संशोधन झालं आहे. आज जे उपाय वापरले जातात ते सगळेच १००% टक्के प्रभावी नाहीत. त्यामुळे आजही मच्छर पूर्ण जगात अनेक लोकांचे प्राण घेतो आहे.
भारतात दरवर्षी मच्छरांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांचा आकडा बघून १६ वर्षाच्या मंगळुरु इकडे राहणाऱ्या सुनिथा प्रभू च्या मनात आपण काही करू शकतो का? असा विचार घोळत होता. लहानपणापासून विज्ञानाची आवड असणाऱ्या सुनिथा ला एक कळून चुकलं होतं की मच्छरांच्या बंदोबस्तासाठी आज अस्तित्वात असलेले सगळे उपाय हे तात्पुरते आहेत. मच्छरांना रोखण्यासाठी कोणताच प्रभावी उपाय आज अस्तित्वात नाही. बाजारात उपलब्ध असलेले मच्छर मारणाऱ्या गोष्टी ह्या काही काळासाठी संरक्षण करत असल्या तरी त्यांच्या वापरावर मर्यादा आहेत. ह्या विषारी स्प्रेमुळे माणसाला ही त्रास होऊ शकतो तसेच ह्यांचा प्रभाव अवघा काही काळासाठी असतो. तसेच मच्छर अश्या पद्धतीच्या स्प्रे, मलमांना काही काळाने आपल्याच शरीरात बदल करून पुरून उरतात. मच्छराचा अंत करणाऱ्या सगळ्याच गोष्टी ह्या अतिशय तुटपुंज्या असल्याचं सुनिथा ला मच्छर आणि त्याच्या उपाय योजना ह्यांचा अभ्यास केल्यावर लक्षात आलं.
एकट्या भारतात मच्छरांच्या जवळपास ३५०० प्रजाती आहेत. त्यातील जवळपास ४०० प्रजाती ह्या वर उल्लेख केलेले रोग आपल्या सोबत पाळत असतात. जेव्हा माणसाला हे मच्छर चावतात तेव्हा हे रोग माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. प्रत्येक स्री मच्छर एका वेळेस १००-३०० अंडी घालते व अवघ्या ४८ तासात मच्छर ह्यातून बाहेर पडतात. मच्छरांचा आपली प्रजाती वाढवण्याचा वेग प्रचंड असल्यामुळे त्यांची संख्या प्रचंड वाढते. मच्छरांपासून वाचण्याचे दोनच उपाय आहेत ते म्हणजे एकतर त्यांचा समूळ नायनाट अथवा मच्छरांना आपल्यापासून लांब ठेवणं. मच्छर लांब ठेवणारी क्रीम अथवा स्प्रे हे हवेत विरून जात असल्याने त्यांचा प्रभाव हा ४ ते ५ तास टिकतो. त्यानंतर पुन्हा त्याचा वापर करावा लागतो ह्यामुळे त्यांच्या वापरावर तसेच मच्छरांना माणसापासून लांब ठेवण्यावर मर्यादा येतात.
सुनिथा ने आपल्या मित्रासोबत आपला विचार शेअर केला होता. मच्छरांना रोखण्यासाठी दोघेही काय करता येईल ह्याचा विचार करत असताना मच्छरांना थांबवणारे हे स्प्रे जास्ती काळ कसे टिकतील ह्यावर दोघांनी काम करायला सुरवात केली. सुनिथा च्या मित्राला त्याच्या वडिलांनी त्याच नाव असलेलं शर्ट त्याला दिलं. हे नाव जर शर्टावर धुतल्यानंतर ही चिकटून राहू शकते तर ह्या शाई मध्ये आपण जर हे स्प्रे मिसळवले तर ते कपड्यावर नेहमीच राहतील आणि मच्छरांना माणसापासून लांब ठेवतील. सुनिथा आणि तिच्या मित्राने मिळून अशी शाई बनवली जी कपड्यांना रंग पण देईल आणि त्याचवेळी त्यातील गुणधर्म डासांना लांब ठेवतील. त्यांच्या ह्या कपड्यांच्या शाईच्या पद्धतीने डासांना लांब ठेवण्याच्या शोधावर National Chemical Laboratory NCL-Pune आणि IISER, Pune ह्यांनी मोहोर लावली आहे. डासांना दूर ठेवण्यासाठी लागणाऱ्या ह्या केमीकल ची किंमत अवघी १४ रुपये पडेल जेव्हा मोठ्या प्रमाणात ह्याचा वापर कपड्यांना रंग देण्याच्या शाई मध्ये केला जाईल.
सुनिथा च्या ह्या क्रांतिकारी शोधाची दखल भारत सरकारने घेताना तिला २०२० च्या बाल शक्ती पुरस्काराने सन्मानित केलं आहे. एक लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असं ह्या पुरस्काराचं स्वरूप आहे. सुनिथा आणि तिचा मित्र आता मच्छरांना अंतरावर ठेवून लोकांचे जीव वाचवणाऱ्या ह्या तंत्रज्ञानाला आंतराराष्ट्रीय पातळीवर पेटंट करत आहे. दरवर्षी लाखो लोकांचे बळी घेणाऱ्या एका मच्छरापासून मानवजातीचे संरक्षण करणाऱ्या ह्या तंत्रज्ञानाची निर्मिती करणाऱ्या सुनिथा प्रभू ला माझा कडक सॅल्यूट आणि पुढील प्रवसासाठी खूप खूप शुभेच्छा.
फोटो स्रोत :- गुगल
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment