Wednesday 18 March 2020

#मंदिरांच्या_देशा भाग २... विनीत वर्तक ©

#मंदिरांच्या_देशा भाग २... विनीत वर्तक ©

हिंदू धर्मात शंकराला सर्वोच्च स्थान आहे. शंकराकडे सगळ्यांपेक्षा जास्त शक्ती असल्याचं हिंदू धर्म सांगतो. शंकर हा सृष्टीचा जन्मदाता तर त्याच सृष्टीचा विनाश करण्याची शक्ती असलेला देव आहे. शंकराकडे असणाऱ्या ह्या अभूतपूर्व शक्तीमुळे शंकराची सर्वच मंदिर ही भव्यदिव्य उभारली गेली आहेत. शंकराच्या सगळ्याच मंदिरात विज्ञान, स्थापत्यशास्त्र, टाइम- स्पेस, कला, संस्कृती ह्या सगळ्यांचा योग्य मेळ साधला आहे. अश्याच गोष्टींचा मेळ असलेला एक जागतिक वारसा मुंबई सारख्या शहराला खेटून जवळपास गेल्या १००० वर्षापेक्षा जास्ती कालावधीच प्रतिनिधित्व करत उभं आहे. मुंबई अस्तित्वात यायच्या आधी वाळधुनी नदीच्या तिरावर वसलेलं अंबरनाथ इथलं शिवमंदिर आपल्या संस्कृतीचा अलौकिक ठेवा आहे. जगातील अमूल्य अश्या २१८ जागतिक वारसा असणाऱ्या स्थळांपैकी भारतात २५ स्थळ आहेत. त्यातली महाराष्ट्रात ४ स्थळ आहेत. त्यातील १ म्हणजे अंबरनाथ येथील शिवमंदिर.

अंबरनाथ शिवमंदिराची निर्मिती पांडवानी एका दगडातून एका रात्रीत केली आणि ह्या मंदिरात साधारण १ किलोमीटर चे भुयार होते व त्या भुयारातून पांडव निसटले अशी आख्यायिका आहे. सध्या तरी हे भुयार अस्तित्वात नाही आणि पांडवानी ह्याची निर्मिती केली ह्याला शास्त्रीय आधार नाही. इकडे असलेल्या शिलालेखावरून ह्याची निर्मिती साधारण १०६० च्या दशकात शिलाहार राजवटीत झालेली आहे. जवळपास १००० वर्षापूर्वी निर्मिती झालेलं हे मंदिर महाराष्ट्रातील सगळ्यात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. असं म्हंटल जाते की ११ व्या शतकात इतक्या भव्य मंदिराच्या निर्मितीचे दाखले दुसरीकडे भारतात नाहीत. भुमिज स्थापत्य शास्त्राचा मिलाफ असलेल्या मंदिरात उत्तर भारतातील मंदिर स्थापत्य शैली आणि दक्षिण भारतातील स्थापत्य शैली ह्यांच सुंदर मिश्रण केलेलं आहे.

ह्या मंदिरातील शिखराचे काम ज्या ठिकाणी शंकराची पिंडी आहे त्या ठिकाणी अर्धवट नष्ट झालं आहे. ह्या जागेच नाव अंबरनाथ ह्याचसाठी पडलेलं आहे कारण अंबर म्हणजे आकाश आणि नाथ म्हणजे देव. 'आकाशाचा देव' म्हणजेच अंबरनाथ. इकडे शंकराची दोन लिंग असून ती स्वयंभू असल्याचं म्हंटल जाते. साधारण जमीनीच्या पातळीवर शिवलिंग इतरत्र बघायला मिळतात पण अंबरनाथ येथील शिवलिंग जमिनीच्या खाली आहे. साधारण २० पायऱ्या उतरून आपल्याला गर्भगृहात जावं लागते. इकडे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे गर्भगृहाचे तपमान नेहमी बाहेरच्या तापमानापेक्षा जवळपास ३-४ डिग्री सेल्सिअस ने कमी असते. बाहेरून साधारण २५० पेक्षा जास्त हत्तींनी हे मंदिर तोलून धरलेलं आहे अशी ह्या मंदिराची रचना आहे. त्यावर ७० वेगवेगळ्या मिथुन आणि शृंगाराच्या सुंदर मूर्ती आहेत. ह्या मंदिराचं बांधकाम दगडांच्या नर- नारी अश्या जोड्या वापरून सगळं बांधकाम एकसंध केलेलं आहे. ह्या जोडणीत कोणत्याही सिमेंट (मोर्टार ) चा वापर बांधकाम एकजीव करण्यासाठी करण्यात आलेला नाही. जवळपास १००० वर्षापूर्वी केलेलं बांधकाम निसर्गाच्या सगळ्या रूपांना पुरून आजही उभं आहे ह्यावरून बांधकामाच्या मजबुती चा अंदाज यावा.

मंदिर अजूनही मजबूत असलं तरी काळाच्या ओघात पडझड आणि बाहेरील भाग झिजला गेला आहे. पण सगळ्यात मोठी शोकांतिका आहे ती म्हणजे ह्या मंदिराच्या आजूबाजूचा परीसर. जागतिक वारसा असलेल्या ह्या मंदिराच्या परिसराबद्दल न लिहलेलं बरं. कारण परदेशात जाऊन तिथल्या जागतिक स्थळांबद्दल लिहणाऱ्या अथवा कौतुक असणाऱ्या सगळ्यांना आपल्याच घरात असलेल्या जागतिक स्थळाबद्दल काही पडलेलं नसते. तिकडे प्रत्येकाला दगड दिसतात किंवा महाशिवरात्री सारख्या दिवशी ५ लाखापेक्षा जास्ती लोकं भगवान शंकराचं दर्शन घेतात. बाकी दिवशी इकडे कोणाचं राज्य असते हे वेगळ्याने लिहायला नको.

अंबरनाथ इथलं शंकराचं मंदिर हे आपल्या संस्कृतीचा एक अमूल्य ठेवा असून त्याच जतन करण्याची जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकाची आहे. लाखो रुपये खर्च करून आपण जागतिक वारसा असलेल्या स्थळांना भेटी देतो मग काही रुपयांचं ट्रेन च तिकीट काढून आपल्या घरात असलेल्या ह्या जागतिक वारसाला आपण कधी मुर्तीपुजे पलीकडे भेट देऊन त्याचा इतिहास समजून घेणार आहोत का? कधी त्या शृंगारिक मुर्त्यांना सजीव करणार आहोत का? विचार आणि कृती आपल्यापैकी प्रत्येकाला करायची आहे. आपल्या हिंदू संस्कृतीला आज १००० वर्षानंतर ही जगासमोर मांडणाऱ्या अंबरनाथ इथल्या शिवमंदिराला भेट नक्की द्या आणि इथल्या इतिहासाला पुन्हा एकदा जगासमोर न्या.

पुन्हा भेटू एका नवीन मंदिरासह मंदिरांच्या देशात.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


1 comment:

  1. NAMASKAR,
    VEG VEGLE VISHAY ABHYAS CHAN AAHE.AAVADLET.
    MANDIRACHYA BABTIT M.P.MADHILCHAMBAL CHYA BHAGATIL MANDIRACHA LEKH VACHTANA JAIN TIRTHA PALITANA (50 KM FROM BHAVNAGAR GUJRAT) CHI AATHAVAN JHALI 3300 PAYRYA CHADUN JAVAL JAVAL 2.5 KM.1000 MANDIRACHI SHRINKHALA JAIN TIRTHANKARANCHYA 17/18 HAZAR MURTI.MUKHYA MANDIR 500 VARSHA PRACHIN.
    EK VEL JARUR JANYA SARKHE AAHE.

    ReplyDelete