Wednesday 11 March 2020

एका लाईकसाठी... विनीत वर्तक ©

एका लाईकसाठी... विनीत वर्तक ©

आज एक पोस्ट वाचनात आली खरे तर अश्या आशयाच्या पोस्ट नेहमीच अनेक ग्रुप अथवा भिंतीवर येतं असतात. पोस्ट चा आशय होता की मला अमुक एक पुरस्कार मिळाला त्याबद्दलची पोस्ट फेसबुक आणि तत्सम ग्रुप टाकल्यावर त्याला मिळालेला प्रतिसाद अत्यल्प असल्याने ग्रुप बाहेर जात आहे. आपलं लिखाण, कविता किंवा इतर कोणतीही गोष्ट पोस्ट च्या माध्यमातून जेव्हा सोशल मिडियावर येते तेव्हा त्याच्या प्रतिसादाची अपेक्षा असणं ह्यात काहीच चुकीचं नाही. आपल्या पोस्टवर मिळणारे लाईक, कमेंट किंवा शेअर नक्कीच पोस्ट टाकणाऱ्याला आनंद देतात. कोणी कितीही म्हंटलं तरी आपलं लिखाण सगळ्यांनी लाईक आणि शेअर करावं ह्याची छुपी अपेक्षा सगळ्यांचीच असते. पण आपला आनंद कशात आणि समाधान कशात हे आपल्याला ठरवता यायला हवं.

आपल्याला मिळालेल्या पुरस्कार, कौतुक सोहळा, फोटो अथवा अजून कोणत्याही गोष्टीच मुल्यमापन आणि समाधान जर इतरांनी दिलेल्या लाईक वरून ठरवलं तर नक्कीच आपण कुठेतरी आभासी विश्वात हरवून गेलेलो आहोत. एखाद्या पोस्ट वर मिळालेले लाईक जितका पटकन आनंद देतात तितक्याच वेगाने विस्मृतीत जातात. ज्या वेगाने आपण एखादी गोष्ट सोशल मिडियावर शेअर करतो तेव्हा त्याच्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांनी आपल्याला छान वाटणं साहजिक आहे आणि तश्या अपेक्षा असणं पण योग्य. पण त्या प्रतिक्रियांच्या लाईक मध्ये आपल समाधान शोधणं हे सुरु झालं की अपेक्षाभंग होतोच. कित्येकदा अनेक मेहनतीने, अभ्यास करून किंवा आपल्या दृष्टीने महत्वाची असलेली माहिती लेखाच्या अथवा कवितेच्या किंवा शब्दांच्या गुंफणात आपण शेअर करतो आणि त्याला काहीच प्रतिक्रिया मिळाली नाही की लोकं लिखाण, कविता किंवा शब्दाची गुंफण करणचं बंद करतात. ह्यामुळे नुकसान आपलचं होते. कारण आभासी जगात कोणाचं कोणाला काही पडलेलं नसते. तत्परतेने प्रतिक्रिया देणारे पण पुढच्या क्षणाला आपण काय लिहलं हे विसरलेले असतात. काही प्रतिक्रिया मात्र खूप मनापासून लिहलेल्या असतात ज्या अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला व्यक्त व्हायला आपल्याला प्रोत्साहित करतात, आपल्या शब्दांसाठी आभार व्यक्त करणाऱ्या असतात, आपल्या लिखाणावर प्रेम करणाऱ्या त्या बद्दल वाद नाहीच पण त्या प्रत्येकवेळी मिळायला हव्यातच ही अपेक्षा चुकीची.

कधी कधी टुकार पोस्ट किंवा व्हाट्स अप फॉर्वर्डस वर पडलेला लाईक आणि कमेंट चा खच बघून आपल्या चांगल्या लेखनाची कदर करणारे सोशल मिडिया वर कोणीच नाहीत असं वाटायला लागते. प्रोफाइल पिक ते जात, धर्म, आपलं सोशल स्टेटस बघून प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्ती तितक्या प्रकृती ह्या आभासी जगाचा भाग असतात. आपण जे सोशल मिडिया वरून शेअर करतो ते जर का आभासी जगाचा भाग आहे तर मिळणाऱ्या प्रतिक्रिया मग त्या चांगल्या असो वा वाईट किंवा न मिळालेल्या प्रतिक्रिया ह्या आपण आभासी म्हणून का घेऊ शकत नाही. प्रत्येक लाईक करणाऱ्याला आपलं लिखाण आवडलं असते असं नाही किंवा ज्या कोणी वाचून प्रतिक्रिया दिलेली नसते म्हणजे लिखाण आवडलं नाही असं नसते आणि प्रत्येक मिळालेलं हार्ट हे मनापासून असते असं ही नाही. त्या आभासी प्रतिक्रियांवर आपल्या मनाची अवस्था ठरवणं कितपत योग्य? त्या एका लाइकने आपल्या समाधानाचा धागा शोधणं कितपत योग्य? ह्याचा विचार सोशल मिडिया वर लिहणाऱ्या प्रत्येकाने करावा.

आपलं समाधान कशात आहे हे कळलं की मग त्या लाईक आणि प्रतिक्रियांनी मनाची अवस्था ठरत नाही. लिखाण माझ्यासाठी आवड आहे तर काहीतरी चांगलं सोशल मिडिया च्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवणं हे माझ्यासाठी समाधानाची गोष्ट हवी. पुढे ते किती लोकांना आवडते अथवा नाही आवडत ह्यावर माझा आनंद अवलंबून असू शकतो पण समाधान हे जे आपल्याला मनात वाटलं ते आपण शब्दातून मांडू शकलो त्याच असायला हवं. मला मिळालेला पुरस्कार ज्या कामासाठी मिळालेला आहे त्या कामाचं, त्या कामासाठी घेतलेल्या मेहनतीचं ते फळ असते तेव्हा त्याच समाधान आपल्याला हवं न की आपल्या पुरस्काराच्या पोस्ट ला किती लाईक आणि कमेंट आले. आपल्या मनात ही सोशल माध्यम आभासी ठेवता यायला हवीत. अगदी आपल्या प्रत्येक पोस्ट ला सगळ्यात पहिल्यांदा हार्ट देणारा कोणी ओळखीचा अथवा अनोळखी हा आयुष्याच्या अडचणीत प्रत्यक्ष आयुष्यात अनेकदा कुठेच नसतो. तेव्हा आपलीच माणसं सोबत असतात. ( अर्थात ह्या गोष्टीला अपवाद असतात कारण आभासी जगातली नाती कधी कधी जवळच्या माणसापेक्षा आपल्यासाठी स्पेशल असतात. पण अशी ही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच.)

अनेकदा कोणतीच प्रतिक्रिया न देता आपलं लिखाण वाचणारे अनेक जण असतात. कधी आपले आभासी प्रतिस्पर्धी बनून तर कधी आपल्यावर जळतात म्हणून तर कधी द्वेष करतात म्हणून तर कधी कधी आपल्या लिखाणावर खूप प्रेम करणारे, आपल्या लिखाणाला आपल्या व्यक्तिमत्वाला खूप स्पेशल मानणारे. कोणी कसही, कोणत्याही उद्देशाने ते वाचत असलं तरी आभासी प्रतिसादावर आपली आवड आणि आपली मेहनत तोलू नये. जे काम करायला आपल्याला समाधान मिळते ते आपण केलं की बाकी सगळ्या गोष्टी आपोआप जुळत जातात. मग ते लाईक, कमेंट, शेअरींग अथवा एखादा पुरस्कार हे मिळालं अथवा नाही मिळालं तरी त्याने आपल्या लिखाणाच्या समाधानात तसूरभर ही फरक पडत नाही. आपलं समाधान आपल्या आत मधेच असायला हवं. एकदा हे जमलं की मग एक लाईक पण पुरेसा होतो. कारण आपलं कोणी वाचलं हेच पुष्कळ असते. त्या लिखाणाचे समाधान ते लिहतानाच मिळालेले असते. 
 
फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment