Saturday 14 March 2020

मंदिरांच्या देशा भाग १... विनीत वर्तक ©

मंदिरांच्या देशा भाग १... विनीत वर्तक ©

चंबळचे खोरे म्हंटल की डोळ्यासमोर येतात ते चंबळच्या खोऱ्यातील डाकू. गेली अनेक दशके चंबळच्या खोऱ्यातील रक्तपातामुळे इकडे कोणतीही शासन व्यवस्था अस्तित्वात नव्हती. अनेक वर्ष रक्तचाराच्या विळख्यातून मुक्त झाल्यावर ह्या चंबळ च्या खोऱ्यात लपलेला भारतीय संस्कृतीचा एक वारसा समोर आला. जवळपास १००० ते १२०० वर्षाच्या कालावधीचा इतिहास, निसर्ग , राज्यकर्ते, नैसर्गिक आपत्ती अश्या सगळ्यांचा सामना करत उभी असलेली मंदिरांची चेन. एक- दोन नाही तर तब्बल दोनशे मंदिर एकाच ठिकाणी निर्माण केली गेलेली असून हिंदू धर्मातल्या सर्वश्रेष्ठ अश्या शंकर आणि विष्णू ला वाहिलेली मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक अनमोल खजिना आहेत.

मध्य प्रदेश च्या मोरना जिल्ह्यातील पडवली गावाजवळ एका टेकडीच्या आडोश्याला चंबळ नदीच्या जवळ जवळपास २५ एकरवर २०० वेगवेगळ्या मंदिरांची पूर्ण चेन आहे. ही मंदिरे साधारण ८ व्या ते १० व्या शतकातील असावीत असा ह्यावर अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांचा कयास आहे. हा कयास जर खरा मानला तर ही मंदिरे जवळपास १२०० वर्षाचा इतिहास घेऊन उभी आहेत. ह्यांच निर्माण गुर्जर आणि प्रतिहारा राजवटीत झालेल आहे. इकडे असलेल्या सगळ्यात मोठ्या शंकराच्या मंदिराच्या भुतेश्वर नावापासून ह्या सर्व मंदिरांना 'बटेश्वर मंदिर' असं नाव पडलेलं आहे. साधारण १२०० वर्षापूर्वी निर्माण झालेली ही मंदिरे १३ व्या शतकात कोलमडून पडली असल्याच सांगण्यात येतं. भारतातील अनेक मंदिर ही परकीय आक्रमणाने लुटली गेली आणि त्याच नुकसान केलं गेलं पण बटेश्वर मंदिर मात्र भुकंपामुळे तुटली असावीत असा कयास आहे.

बटेश्वर मंदिर ही दरीत वसलेली आहेत. आजूबाजूला टेकड्या आणि गर्द झाडी ह्यामुळे ह्या मंदिरांच अस्तित्व पटकन कळून येतं नाही. आजही इकडे असंख्य पक्ष्यांची रेलचेल असते. तसेच उध्वस्थ झालेल्या मंदिरांच्या मूर्ती, नक्षीकाम नष्ट केलेलं नाही ह्या सगळ्यामुळे निसर्गाच्या आपत्ती मध्ये ह्या मंदिरांची पडझड झालेली आहे. ज्या गुर्जर आणि प्रतिहारा राजवटीने ह्यांच निर्माण केलं त्यांच्याच वंशजांनी ह्याचा वापर पोलिसांपासून वाचण्यासाठी केला. चंबळ च्या खोऱ्यातील एक कुप्रसिद्ध डाकू निर्भय सिंग गुर्जर ह्याची इकडे सत्ता होती. आजूबाजूच्या ४० गावांमध्ये त्याच्या गॅंग चा दरारा होता. जवळपास २०० पेक्षा जास्ती खुनांच्या आरोपात पोलिसांना तो हवा होता ह्यावरून त्याच्या दहशतीची कल्पना यावी. २००५ ला हा डाकू पोलिसांच्या हातून मारला गेल्यानंतर ए.एस.आय. ने ह्या जागेवर आपला हक्क प्रस्थापित केला.

बटेश्वर मंदिर पुन्हा उभी करण्यामागे ए.एस.आय. त्या काळचे चे सुप्रिटेंडन्ट के.के. मोहम्मद ह्यांचा सिंहाचा वाटा होता. २००४ साली जेव्हा ह्या भागात आले तेव्हा ह्या भागात डाकूंची पूर्णपणे सत्ता होती. २०० मंदिरामधील फक्त ७ ते ८ मंदिरे उभी होती सगळीकडे दगडांचा ढीग पडला होता. मंदिरांचं पुन्हा निर्माण करण्यात अडचण होती ती इथे असलेल्या डाकूंची. के.के. मोहम्मद ह्यांनी डाकूंचा सरदार निर्भय सिंग गुर्जर ह्याची भेट घेऊन त्याला त्याच्याच पुर्वजांनी निर्माण केलेल्या वैभवाला पुन्हा जिवंत करण्यासाठी मदत मागितली. हा भाग डाकूंच्या कब्ज्यात असल्याने नक्षीकाम दगड आणि मुर्त्या सुरक्षित होत्या. निर्भय सिंग ने ए.एस.आय. ला परवानगी दिल्यावर ह्या मंदिरांचा पुन्हा जीर्णोद्धार झाला. आज जवळपास १०० पेक्षा जास्ती मंदिरांना आपलं गतवैभव पुन्हा मिळालेलं आहे.

बटेश्वर मंदिरे आज पुन्हा एकदा १२०० वर्षापूर्वी भारताच्या अमूल्य संस्कृतीचे दाखले देत आज उभी आहेत. सुंदर नक्षीकाम, मंदिरांची रचना आणि त्यातलं सौंदर्य आजही बघणाऱ्या अचंबित करते. ही मंदिरे एकाच ठिकाणी का बांधली? ही मंदिरे बांधण्यामागे उद्देश? ह्या सर्व गोष्टी आजही गुलदस्त्यात आहेत. ह्या मंदिरात आज पूजा अर्चना होत नसल्याने मंदिरे सर्वबाजूने अगदी आतमध्ये जाऊन बघता येतात. लांबून बघताना जवळपास २०० एकत्र मंदिरांचं सौंदर्य आपलं मन मोहून टाकते. भारतीय संस्कृतीची खरी ओळख ही भारताच्या सर्व कोपऱ्यात असलेली मंदिरे आहेत. कारण आपल्याला माहित असलेल्या सर्व शाखा मिळून त्यांच निर्माण केलं गेलं आहे. त्यात कला, श्रद्धा, संस्कृती, देव ह्या सगळ्यांना स्थान देतांना ह्या सर्वांचं अफलातूनपणे मिश्रण केलं आहे. जे आपल्याला जागच्या जागी खिळवून ठेवते.

पुढच्या भागात अश्याच एका मंदिरासह पुन्हा भेटू मंदिरांच्या देशात.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

2 comments: