एका करोडपती बाबा ची गोष्ट... विनीत वर्तक ©
१५ ऑगस्ट १९४७ ला इंग्रजांनी भारताचे दोन तुकडे करताना एका नवीन राष्ट्राचा उदय जागतिक पटलावर केला. भारताला तर स्वातंत्र्य मिळालं पण ह्या फाळणीने अनेकांच स्वातंत्र्य हिरावून घेतलं. एका क्षणात होत्याच नव्हतं झालं. आपलं घर, दार, शेती, जमीन सर्व सोडून दुसरीकडे जावं लागलं. ह्या फाळणीत अनेक कुटुंब पिळवटून निघाली. वयाच्या १२ व्या वर्षी आपलं सगळं अस्तित्व पेशावर, पाकीस्तान इकडे सोडून जगदीश लाल आहुजा पटियाला इथल्या निर्वासित लोकांच्या छावणीत आले. सगळं लुटलं होतं पण पोटाची भूक मात्र क्षमावावी लागणार होती. आपल्या वयस्कर आई- वडील आणि कुटुंबाची जबाबदारी अवघ्या १२ व्या वर्षी जगदीश लाल आहुजा ह्यांच्या खांद्यावर येऊन पडली होती. भिक मागायची नाही हा निश्चय त्या तरुण मुलाने केला होता. त्यासाठी त्यांनी चणे आणि नमकीन विकायला सुरवात केली. १ रुपयाच्या पॅक वर २ आण्याचा नफा अश्या पद्धतीने विक्री करून पोटाची भूक भागवायला लागत होती. दिवसभर फिरून हातापायाला फोड येत होते. पण विकायला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण अनेकदा उपाशी झोपायला लागण्याची सवय झाली होती.
वयाच्या २१ व्या वर्षी जगदीश लाल आहुजा आता गाडीवर संत्री, केळी विकू लागले. नफा वाढत होता. २ आण्या पासून सुरु झालेला प्रवास मेहनत, सचोटीने त्यांनी कोटी रुपयांमध्ये नेला. एकेकाळी एका रुपयासाठी पायाला फोड येईपर्यंत चालणारा मुलगा आता कोट्याधीश झाला होता. पैसे, प्रॉपर्टी, मान-सन्मान, समाजात स्थान सगळं काही पायाशी लोळण घेत होतं. ज्या लक्ष्मीसाठी एकेकाळी सगळीकडे फिरत होता तिच लक्ष्मी आज त्याच्या घरात सुखाने नांदत होती. आपल्या स्वतःच्या मुलाच्या १८ व्या वाढदिवसाला त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं. चंदिगढ च्या स्केटर २६ मध्ये त्यांनी १५० मुलांना जेवण आणि खाऊचं वाटप केलं. ह्या एका क्षणाने ह्या कोट्याधीश माणसाला आपला भुतकाळ आठवला. १ रुपयाचं पाकीट घेऊन सगळीकडे फिरणारा, अनेक रात्री उपाशी झोपणारा तो जगदीश आहुजा त्यांच्यासमोर उभा राहिला. त्या मुलांमध्ये त्यांनी स्वतःला बघितलं. जेवण मिळाल्यावर त्या मुलांच्या चेहऱ्यावर येणाऱ्या त्या समाधानाने त्यांना एक वेगळं समाधान मिळालं.
हा एक क्षण होता जेव्हा जगदीश लाल आहुजांनी ठरवलं आपलं एक लक्ष्य. ते लक्ष्य म्हणजेच प्रत्येक दिवशी जेवढं शक्य होईल तेवढ्या सगळ्या मुलांना आपण जेवण द्यायचं. डाळ-भात, चपाती, काहीतरी गोड आणि फुगे त्यांनी चंडीगढ च्या भागात गरीब मुलांना वाटप सुरु केलं. गेली ३० वर्ष न थकता हा कार्यक्रम ह्या करोडपती माणसाने चालू ठेवला. आपल्याकडची सगळी लक्ष्मी त्याने आपल्या समाधानासाठी खर्च केली. एकेकाळी बंगले, जमीन, दुकान ह्यांचा मालक असणारा कोट्याधीश आता सगळं विकून आपलं समाधान शोधत होता. पैसे कमी पडायला लागल्यावर ही त्यांनी कोणाकडून आपल्या कामासाठी पॆसे मागितले नाहीत. एकीकडे (कॅन्सर) कर्करोगाशी आपला लढा आणि पैश्याची अडचण असताना पण त्यांनी सुरु ठेवताना आपलं निस्वार्थी काम जेवढं जमेल तितकं त्यांनी आजही सुरु ठेवलं आहे.त्यांच्या ह्या निस्वार्थी सेवेमुळे पूर्ण चंडीगढ त्यांना 'लंगर बाबा' म्हणून ओळखते. ह्या सगळ्या कामासाठी स्फूर्ती कुठून मिळते असं विचारल्यावर ते म्हणतात,
"मैं अपना बचपन देखता हूँ, इन्ना विच" (मी त्या सगळ्यांमध्ये स्वतःच बालपण बघतो)
आज ८३ पेक्षा अधिक वय असलेल्या लंगर बाबांचा एका आण्या पासून ते कोट्याधीश आणि एका कोट्यधीशापासून ते लंगर बाबा होईपर्यंतचा प्रवास सगळ्यांना स्फूर्ती देणारा आहे. भारत सरकारने लंगर बाबांच्या कार्याचा सन्मान करताना त्यांना २०२० च्या पद्मश्री सन्मानाने गौरवलं आहे. हा सन्मान मिळाल्यावर त्यांची प्रतिक्रिया ही त्यांचा निस्वार्थी भाव दाखवणारी आहे. ते म्हणतात,
"माझं नाव पद्मश्री सन्मानासाठी कोणी सरकारला सांगितलं मला माहित नाही. सरकारने पण माझं नाव स्विकारलं ह्याच आश्चर्य मला आहे."
आपलं काम सुरु ठेवण्यासाठी त्यांना फक्त भारत सरकारने कर भरण्याच्या सवलतीतून सूट द्यावी जेणेकरून त्यांना आणि त्यांच्या कुटूंबाला त्यांच कार्य असच पुढे चालू ठेवता येईल .
लंगर बाबा तुमचा हा प्रवास प्रत्येकाला आपलं समाधान शोधण्यासाठी प्रेरीत करेल. पैसे, सुख आणि प्रतिष्ठा ही जितकी मोठी तितकीच खोटी असते. मात्र मिळालेलं समाधान हे निरंतर सुख देतं. आयुष्याचे चटके माणसाने विसरले नाहीत की एका आण्याची किंमत पण काही कोट्यावधी रुपयांपेक्षा जास्त असते.
अवघ्या १२ व्या वर्षी फाळणीचे चटके सोसून आयष्यातली दोन्ही टोक अनुभवलेल्या लंगर बाबा ना माझा साष्टांग दंडवत आणि कडक सॅल्यूट.
फोटो स्रोत :- गुगल
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
काय माणूस आहे ... भारी
ReplyDelete