Sunday 1 March 2020

एका तिरंग्यासाठी... विनीत वर्तक ©

एका तिरंग्यासाठी... विनीत वर्तक ©

सियाचीन ग्लेशिअर हे नावं अनेक भारतीयांना कदाचित फक्त ऐकून माहिती आहे. आपली नामुष्की अशी की भारता बद्दल आपल्याला असलेली माहिती फक्त काही शहरांपुरता मर्यादित आहे. सियाचीन ग्लेशिअर हे हिमालयाच्या काराकोरम भागात वसलेलं आहे. साधारण ७०० स्केवर किलोमीटर क्षेत्रफळ असलेला हा भाग जगातील सर्वात उंच युद्धभूमी आहे. साधारण २१,००० फुटापेक्षा जास्त उंची असलेल्या ह्या ग्लेशिअर च्या एका बाजूला चीन तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि तिसऱ्या बाजूला भारत आहे. पाकिस्तान ने जर ह्या भागावर आपलं अस्तित्व स्थापन केलं असतं तर कदाचित लडाख भारताच्या हातून गेलं असतं. चीन आणि पाकिस्तान ला सैनिकी देवाणघेवाण करण्यासाठी सरळ रस्ता मिळाला असता जिकडून ह्या दोघांनी भारतावर बरोबर अंकुश ठेवला असता. पण पाकिस्तान चे मनसुबे भारताने ओळखून ऑपरेशन मेघदूत करून देशाच्या सीमांसाठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या सियाचीन ग्लेशिअर  भारतीय तिरंगा फडकवला. भारताच्या सियाचीन ग्लेशिअर पासून पाकिस्तान आणि चीन च्या पोस्ट जवळपास ३००० फूट खाली आहेत. ह्यामुळे उंचावरून भारताला ह्या  देशांच्या सगळ्या फॉरवर्ड पोस्ट च्या हालचालीवर लक्ष ठेवता येते.

२१,००० फुटावर जिकडे तपमान उणे -६० डिग्री स्लेसिअस पर्यंत खाली उतरते. जिकडे बोचरे वारे वाहतात हवा, ऑक्सिजन कमतरता आहे , हिमवर्षाव, हिमस्खलन कधीही होतं असते. जिकडे मदत मिळण्याची किंवा कोणीतरी मदतीला येण्याची कोणतीच शक्यता नसते अश्या ठिकाणी आपल्या हातात बंदूक घेऊन त्या तिरंग्याची रक्षा करताना त्या सैनिकांना कोणत्या दिव्यातून जावं लागत असेल ह्याची कल्पना पण आपण करू शकत नाही. १९८४ साली भारताने जगातल्या सगळ्यात उंचीवरच्या युद्धभूमीवर तिरंगा फडकवल्यानंतर त्याची आन, बान, शान राखण्याची जबाबदारी भारतीय सैनिकांची होती. १९८६ साली २०,२५० फूट (६१३५ मीटर) उंचीवर असणाऱ्या (पॉईंट ६१३५) जागेवर तिरंगा फडकवण्याची जबाबदारी कॅप्टन नवकीरण सिंग घेई ह्यांच्यावर आली. कॅप्टन नवकीरण सिंग घेई ह्यांची नियुक्ती लडाख स्काऊट मध्ये झाली होती. लडाख स्काऊट हे भारतीय सेनेचं युनिट अतिउंचावरच्या लढाई आणि संरक्षणासाठी कार्यरत आहे. अतिउंचीवर येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती ना तोंड देत संरक्षणाची भूमिका कशी पार पाडायची ह्यासाठी त्याच नाव पूर्ण जगात नावाजलेलं आहे.

कॅप्टन नवकीरण सिंग घेई आणि प्लॅटून कमांडर सुभेदार सोनम ह्यांच्यासह ४ लडाखी सैनिकांनी आपल्या लक्ष्याकडे कूच करण्याआधी अतिउंचीवरच्या वातावरणाला तोंड देता यावं म्हणून बेस कॅम्प मध्ये होणाऱ्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण करत आणि स्वतःच्या शरीराला ह्या अतिथंड तापमानाशी जुळवून घेतं  २६ फेब्रुवारी १९८६ ला कॅप्टन नवकीरण सिंग घेई आपल्या टीम सोबत पोस्ट वर संध्याकाळी ८ वाजता पोहचले. त्यांच्या जवळ असलेले आर्टिक टेन्ट (तंबू ) हेच त्यांना त्या गोठवून टाकणाऱ्या जीवघेण्या थंडीपासून वाचवणार होते. त्यात पुढले तीन दिवस व्हाईट क्लाऊड म्हणजेच पांढरे धुके असणार होतं. अश्या वेळेस पुढलं काहीच दिसत नाही म्हणजे तंबू च्या बाहेर जाणं जीवघेणं. कॅप्टन नवकीरण सिंग घेई आणि त्यांची टीम पुढले तीन दिवस तंबूत तळ ठोकून होते. बाहेरच वातावरण इतकं खराब होतं की तीन दिवस अगदी लघवीसाठी पण बाहेर जाता आलं नाही. निसर्गाच्या अश्या वातावरणात त्यांना काही महिने काढायचे होते आणि नुसते काढायचे नव्हते तर तिरंग्याच रक्षण करण्याची जबाबदारी होती.

तीन दिवसांनी वातावरण चांगलं झाल्यावर पाकिस्तानी बाजूच्या 'बिलाफोंड ला' ह्या ठिकाणी त्यांना पाकिस्तान सैन्याच्या हालचाली दिसत होत्या. त्यांना रोखण्यासाठी त्यांनी तब्बल २०,००० फुटावरून खाली असणाऱ्या पाकिस्तानी पोस्ट ला लक्ष्य करायला सुरवात केली. अतिविरळ हवा, बोचरे वारे अश्या ठिकाणी बंदुकीचा नेम किंवा मारा हा लक्ष्यावर मारणं अतिशय कठीण असते. काहीवेळा गोळ्या आपल्याच भागात आपल्या पोस्ट ला ही लक्ष्य करू शकतात. अश्या दररोज च्या कार्यक्रमाने पाकिस्तानी सैन्यावर नियंत्रण ठेवून भारताचं सार्वभौमत्व आणि तिरंग्याची शान त्यांची टीम जपत होती. दिवसाचे आठवडे झाले, आठवड्याचे महिने पण ते ६ लोक एखाद्या भुताप्रमाणे २०,२५० फूट उंचीवर भारताचा तिरंगा सांभाळत होते. तब्बल ६ महिने कॅप्टन नवकीरण सिंग घेई  आणि त्यांच्या टीम ने भारतीय तिरंगा जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर डौलाने फडकवत ठेवला होता. कॅप्टन नवकीरण सिंग घेई ह्यांनी हे ६ महिने अक्षरशः दुधाच्या पावडरीवर आणि कधी तरी आपल्या लडाखी साथीदारांनी बनवलेल्या पराठ्यांवर काढले. ह्या काळात त्यांच वजन १० किलोग्रॅम ने  झालं तर अतिउंचीवरील ह्या वातावरणामुळे स्मृतीभंश, तसेच भास होण्याचा त्रास झाला.

पॉईंट ६१३५ वर ६ महिने काढून जेव्हा त्यांची टीम बेस ला आली. तेव्हा त्यांच्या अनुभवाने भारतीय सेनेने ह्या पोस्टवर सैनिकांना न पाठवण्याचा निर्णय घेतला. ह्या पोस्ट च्या उंचीवर कॅप्टन नवकीरण सिंग घेई आणि त्यांच्या टीम ने फडकावलेला तिरंगा हा भारतीय सैनिकांच्या पराक्रमाची साक्ष देत कदाचित आजही तिकडे फडकत असेल कारण ज्या ठिकाणी जाणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण तिकडे त्यांनी ६ महिने काढले होते. सियाचीन ग्लेशिअर आज भारताचा हिस्सा आहे त्यामागे कॅप्टन नवकीरण सिंग घेई सारख्या असंख्य सैनिकांचा पराक्रम आणि बलिदान आहे. निसर्गाच्या मृत्यूच्या तांडवाला सामोरं जाऊन आपल्या एका तिरंग्यासाठी आपलं सर्वकाही वेचणाऱ्या त्या सर्व सैनिकांना त्रिवार वंदन आणि कडक सॅल्यूट.

तिकडे आमचे सैनिक एका तिरंग्यासाठी स्वतःला जाळतात तर इकडे आम्ही धर्म रक्षणासाठी एकमेकांची घरे जाळतो. शत्रूवर गोळ्या झाडणारे कुठे? आणि आपल्याच माणसावर ४०० वार करणारे धर्मरक्षक कुठे? आमच्यासाठी धर्म, कायदा आणि नागरीकत्व महत्वाच कारण देश आमच्या व्याख्येत सगळ्यात शेवटी
येतो. कोणी कोणाला मारलं, कोण कोणत्या जातीचा, धर्माचा ह्यातच आमचे विचार संपतात. कोण चूक आणि कोण बरोबर ह्यावर आमच्या गप्पा होतात. तिकडे २०,००० फुटावर फडकणारा तिरंगा सुद्धा सियाचीन च्या बर्फात अश्रू ढाळत असेल की एका तिरंग्यासाठी रक्त सांडणारे कुठे आणि एकीकडे जाती- धर्माच्या नावाखाली तो जाळणारे कुठे. आमची खरच लायकी नाही त्या तिरंग्याला स्पर्श करण्याची कारण त्या एका तिरंग्याच महत्व फक्त आणि फक्त भारतीय सैनिक ओळखतो. त्या सर्व अजाण सैनिकांना माझा पुन्हा एकदा सलाम.

 जय हिंद!

फोटो स्रोत :- गुगल   

 सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

1 comment: