Thursday 19 March 2020

फ्रेंड इन निड इज फ्रेंड इंडिड... विनीत वर्तक ©

फ्रेंड इन निड इज फ्रेंड इंडिड... विनीत वर्तक ©

पाकीस्तानी सैनिकांनी टायगर हिल वर आपला ताबा मिळवला होता. २४ जून १९९९ चा निर्णायक दिवस होता. एक मिराज २००० ज्याचं सारथ्य विंग कमांडर रघुनाथ नांबियार करत होते. जमिनीपासून २८,००० फूट उंचीवर उडणाऱ्या मिराज २००० विमाना मधून एका लेझर ने टायगर हिल ला लक्ष्य केलं. टायगर हिल जवळपास १६,००० फूट उंचीवर आहे. त्या उंचीवर क्षणार्धात बॉम्ब हल्ला झाला आणि पाकिस्तानी सैन्याचा तळ नष्ट झाला. त्याच क्षणी युद्धाचं पारडं भारताच्या बाजूने फिरलं. पुढे जे घडलं तो इतिहास आहे. ह्या निर्णायक क्षणामागे एका राष्ट्राने निर्णायक भूमिका बजावली ते राष्ट्र म्हणजेच 'इस्राईल'. ज्या वेळेस जगातील सर्व राष्ट्रांनी भारताला मदत देण्याचं नाकारलं ज्यात अमेरीका पण समाविष्ट होती. भारताकडे आयुधांची कमी होती, उंचीवर लपलेल्या शत्रूला शोधण्याचं आणि त्याला नष्ट करण्याच तंत्रज्ञान नव्हतं, युद्धात भारताचे सैनिक अगदी टिपून मारले जात होते अश्या अतिशय अडचणीच्या काळात भारताचा एकच मित्र धावून आला तो म्हणजे 'इस्राईल'.

१९४८ ला भारताने मुस्लिम राष्ट्रांच्या दडपणाखाली इस्राईल च्या निर्मितीसाठी युनायटेड नेशन मध्ये भारताने त्याच्या निर्मिती विरुद्ध मतदान केलं. पण इस्राईल ने ते मनात ठेवलं नाही. १९७१ च्या युद्धात भारताला आयुधांची अडचण जाणवली. राजनैतिक संबंध भारताने स्थापन केलेले नसताना सुद्धा भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी मदत मागितल्यावर त्या वेळच्या इस्राईल पंतप्रधान गोल्डा मिर ह्यांनी तात्काळ इराणसाठी जाणारा सर्व शास्त्रसाठा कोणताही मोबदला न घेता भारताला पाठवून दिला. खरे तर ह्या मदतीच्या मोबदल्यात गोल्डा मिर ह्यांनी भारताला राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याची अट घातली असती पण कोणत्याही अटीशवाय इस्राईल ने भारताला मदत केली. १९९९ च्या युद्धात भारत पुन्हा चाचपडत होता. तोवर ही भारताने मुस्लिम राष्ट्रांच्या भितीने इस्राईल शी संबंध पडद्यामागचे ठेवले होते. अमेरीका आणि इतर राष्ट्रांनी भारताला इस्राईल ने कोणत्याही प्रकारचं तंत्रज्ञान, हेरगिरी करणाऱ्या उपग्रहांच्या मदतीने वर लपलेल्या पाकीस्तानी सैन्याचे तळ अथवा बॉम्ब देऊ नयेत ह्यासाठी प्रचंड दबाव आणला.

इस्राईल हा देश कोणाच्या दडपणाखाली झुकत नाही. मग तो अमेरीका असो वा अजून कोणी. सगळ्या विरोधाला बाजूला ठेवून इस्राईल ने उघडपणे आपल्या शस्त्रागाराचे, तंत्रज्ञानाचे सर्व दरवाजे भारतासाठी उघडले. भारताला पाकिस्तानी छावण्यांचा ठावठिकाणा ते लेझर गायडेड बॉम्ब जे भारताने मागितलं त्याचा पुरवठा वेळेत भारताला केला आणि कारगिल युद्धाचं पारडं भारताच्या बाजूने झुकवलं. भारताला त्याने केलेल्या चुकांची जाणीव उशिरा का होईना झाली. मग भारताने इस्राईल शी संबंध वाढवत नेले. २०२० साल उजाडलं आणि गोष्टी बदलल्या गेल्या. कोरोना च्या सावटाखाली जग अलिप्त झालं. प्रत्येक देशाने आपल्या सिमा बंद केल्या. वेगवेगळ्या देशांसोबत होणारा व्यापार जवळपास ठप्प झाला. चीन सोबत भारताने औषधांच्या निर्यातीवर पूर्णपणे बंधन घातली. आपल्या देशात औषधांचा तुटवडा जाणवू नये ह्यासाठी हे गरजेचं होतं. भारत जेनेरीक औषध जगाला पुरवणारा सगळ्यात मोठा देश आहे.

इस्राईल हा जरी तंत्रज्ञानात अग्रेसर असला तरी  गोष्टींसाठी इतर देशांवर अवलंबून आहे. चीन, अमेरीका आणि भारताने घातलेल्या बंधनामुळे इस्राईल ला औषधांचा तुटवडा जाणवायला लागला. इस्राईल ने अमेरीका आणि चीन दोघांकडे मदतीची मागणी केली पण दोन्ही राष्ट्रांनी सद्यपरीस्थितीत कोणतीही मदत देण्यास नकार दिला. इस्राईल च्या पंतप्रधानांनी मग भारताच्या पंतप्रधानांना फोन केला व इस्राईल ला ह्या संकटात मदत करण्याची मागणी केली. आता भारताची पाळी होती ज्या देशाने कोणताही हेतू न ठेवता भारताला अनेकदा संकटातून बाहेर काढलं त्या मित्राला आता मदतीची गरज होती. भारताच्या पंतप्रधानांनी इस्राईल ला आश्वस्त करताना भारत इस्राईल ला कधीच औषधांची कमतरता पडू देणार नाही हे सांगताना भारत-इस्राईल मैत्री पक्की असल्याचं नमूद केलं. भारताने त्वरीत आपल्या कायद्यात बदल करताना फक्त आणि फक्त इस्राईलसाठी औषधांचा साठा खुला केलेला आहे. आज इस्राईल च्या प्रत्येक पेपरात, मिडिया मध्ये भारताने निभावलेल्या मैत्रीचं कौतुक होते आहे. ह्याचे दूरगामी परीणाम भारत- इस्राईल च्या पुढच्या वाटचालीत बघायला मिळतील. ( भारतातील काही लोकं ह्याला आक्षेप ही घेतील पण १९७१ ते १९९९ च्या वेळेला इस्राईल ने केलेली मदतीची आठवण त्या सगळ्यांनी आधी ठेवावी. )

मादागास्कर हा आफ्रिकेतील एक छोटा देश पण त्याच सागरी महत्व खूप प्रचंड आहे. हिंद महासागरात वचक ठेवण्याच्या दृष्टीने अश्या छोट्या राष्टांशी असलेले संबंध निर्णायक भूमिका बजावतात. ३ महिन्यापूर्वी इकडे आलेल्या वादळाने हाहाकार माजवला. पूर्ण मादागास्कर देश पाण्याखाली गेला. सगळं उध्वस्थ झालं असताना मदत मागण्या आगोदर भारताने मादागास्कर साठी 'ऑपरेशन वॅनिला' हाती घेतलं. भारताची युद्धनौका आय.एन.एस. ऐरावत कपडे, चादरी, औषध तसेच इतर लागणार सामान घेऊन मादागास्कर ला सगळ्यात पहील्यांदा पोहचली. ह्या संकटात मादागास्कर ला मदत करणारा भारत पहिला देश होता. दोन दिवसांपूर्वी भारताने मानवतेच्या दृष्टिकोनातून अजूनही आलेल्या संकटातून सावरत असलेल्या मादागास्कर ला सगळ्यात मोठी मदत पाठवली आहे. भारताने आपली शक्तिशाली युद्धनौका आय.एन.एस. शार्दूल मधून ६०० टन ( ६००००० किलो ) तांदूळ मादागास्कर ला पाठवून दिला आहे. ह्या मदतीमुळे मादागास्कर च्या पंतप्रधानांनी भारताचे आभार मानताना संकटाच्या काळात भारताने केलेली ही मदत मादागास्कर पूर्ण आयुष्यात कधीच विसरणार नाही हे सांगितलेलं आहे. हिंद महासागरा मधील सामरिक दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या देशासाठी भारताने केलेली मैत्रीची मदत येणाऱ्या काळात भारतासाठी निर्णायक ठरेल ह्यात शंका नाही.

गेल्या काही वर्षात भारताने घेतलेल्या कणखर भूमिकेचं सर्वत्र कौतुक होते आहे. कोरोना रोगाशी लढण्यात भारताने पुढाकार घेत सगळ्यात आधी सार्क राष्ट्रांना एकत्र येऊन लढा देण्याचं आवाहन करताना १० मिलियन अमेरीकन डॉलर ची आर्थिक मदत सगळ्यात आधी दिलेली आहे. कोरोना शी लढण्यात सगळे देश धडपडत असताना भारताने जी २० राष्ट्रांना ही मैत्रीतून एकत्र लढण्यासाठी तयारी सुरु केली आहे. जी २० मधील युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया तसेच सौदी अरेबियाने भारताच्या ह्या पावलांचे स्वागत केले आहे. सार्क राष्ट्रांसोबत भारताने केलेली कॉन्फरन्स बघून यु.के. च्या पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलिया च्या पंतप्रधानांना फोन करून भारताच्या ह्या पावलाचा उल्लेख केला आहे. ही घटना अनेक गोष्टीने ह्यासाठी महत्वाची आहे की भारताच्या "फ्रेंड इन निड इज फ्रेंड इंडिड" नितीने भारताच्या शब्दाला जागतिक पटलावर वजन तर निर्माण झालच आहे पण संकटात तारणारा भरवशाचा मित्र ही प्रतिमा अजून उजळली आहे. ह्याचा फायदा भारताला नजिकच्या भविष्यात नक्कीच होणार आहे.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

1 comment:

  1. Vinit why you deleted ur article which was supporting China and opposing America's stand on Corona-the Chinese Virus...

    ReplyDelete