Friday 2 October 2020

छाटलेले पंख .. विनीत वर्तक ©

 छाटलेले पंख .. विनीत वर्तक ©


प्रिया एक आय. टी. कंपनीमधे मॅनेजर होती. अतिशय सुशिक्षित आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली प्रिया तिच्या व्यक्तिमत्वामुळे सगळ्यांची लाडकी होती. कामाच्या निमित्ताने अनेकदा तिला घरी जायला उशीर होत असे. तिच्या कामाच्या वेळा अनेकदा १२ च्या पलीकडेही जात असत. प्रोजेक्ट डेडलाईन मुळे अनेकदा उशिरा घरी येणं आता घरच्यांनाही अंगवळणी पडलं होतं. एक रात्र मात्र तिच्यासाठी काळरात्र ठरली. होत्याचं नव्हतं व्हायला काही तास पुरले. घरी येताना एका नराधमाने त्याचा डाव साधला. काही कळायच्या आत सगळं संपलं होतं. कशीबशी ती घरी आली. घरच्यांनी पोलीस केस केली. पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या. यथावकाश त्याला शिक्षाही झाली. काळाच्या ओघात शरीराच्या जखमा भरून आल्या, पण प्रियाचे पंखच छाटले गेले होते. आजूबाजूचं सगळं विश्व तिच्यासाठी आणि आजूबाजूच्या विश्वासाठी ती याचे सगळे संदर्भ बदलून गेले होते. छाटलेल्या पंखांना सहानुभूतीचे टाके घातले तरी त्यानं उडता थोडंच येणार  होतं? 

अशीच व्यथा आज प्रत्येक बलात्कारीत स्त्रीची आहे. प्रिया तर एक प्रातिनिधिक उदाहरण होतं. बलात्कार किंवा फोर्सड् सेक्स एक असं कृत्य आहे ज्याची शिक्षा फाशीपलीकडे आहे कारण ते करताना ज्या शारीरिक आणि मानसिक यातना स्त्रीला होतात त्याचा विचार करून पण एक पुरुष म्हणून मला अंगावर काटा येतो. काळाच्या ओघात शारीरिक यातना भरून आल्या तरी मानसिक जखमा तश्याच खोलवर ओल्या राहतात. काळाचं औषध तिकडे चालत नाही. भरून न येणारं नुकसान आणि एक मानसिक धक्का बसलेला असताना समाजाकडून मिळणारी वागणूक आगीत तेल ओतण्याचं काम करत असते. समाज अश्या घटनांकडे अतिशय वेगळ्या नजरेने बघतो. बलात्कारी स्त्रीबद्दल सहानुभूती आणि त्या नराधमाबद्दल समाजाच्या सगळ्याच पातळीतून टिका झाली तरी कायद्याने दिलेल्या शिक्षेनंतर तो नराधम सगळ्यांच्या विस्मरणात जातो. पण बलात्कार झालेली स्त्री नेहमीच लक्षात राहते किंबहुना तिच्यावर अत्याचार आणि बलात्कार झाला आहे असं लक्षात आणून दिलं जातं. 

समाज बनतो तो तुम्ही, आम्ही सगळे मिळून. समाजाच्या जडणघडणीमध्ये आपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असतो. त्या समाजाचा भाग म्हणून आपण अश्या स्त्रियांकडे कसे बघतो, याचा विचार आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या आत डोकावून करावा. बलात्काराची घटना झाल्यावर स्त्री सर्व बाजूंनी उध्वस्त झालेली असताना तिला फक्त सहानुभूतीच्या टेकूची गरज असते का? अनेकदा तिची चूक काढण्यात समाज धन्यता मानत असतो. पुरुषाला शिक्षा झाली की समाज अश्या नराधमांना सहज विसरून जातो. काळाच्या ओघात शिक्षा होऊन असे लोक समाजात पुन्हा मिसळून जातात. पण त्या स्त्रीला छाटलेल्या पंखांची  नेहमीच आठवण करून दिली जाते. बलात्कार झालेली स्त्री जर आपल्या घराचा, कुटुंबाचा भाग असेल तर कोणत्याही नात्यात एक स्त्री/पुरुष म्हणून आपली वागणूक आणि आपला दृष्टीकोन कसा असेल याचा आपण एक क्षणभर विचार तरी करतो का? 

उदाहरण दिलेली प्रिया जर माझी बायको असेल तर मी तिला पुन्हा त्याच पद्धतीने प्रेम करू शकतो का? तिच्या सोबत मानसिक, शारीरिक पातळीवर एकरूप होऊ शकतो का? हे एकरूप होणं म्हणजे नुसतं प्रेम किंवा सेक्स नव्हे तर आपल्या घरात तिचं असलेलं स्थान आपण पुन्हा देऊ शकतो का? एक मुलगी म्हणून आपण तिला तेच प्रेम देऊ शकतो का? एक बहीण म्हणून तिला आपलं मानू शकतो का? एक प्रेयसी म्हणून तिच्याशी लग्न करू शकतो का? एक मित्र म्हणून तिच्याशी तशीच निखळ मैत्री करू शकतो का? एक ऑफिस कलीग म्हणून आपल्या प्रोजेक्ट टीमचा भाग ती पुन्हा बनू शकते का? एक स्त्री म्हणून याकडे बघताना आपल्याच बलात्कार झालेल्या मैत्रिणीला पुन्हा एकदा आपल्यात सामावून घेऊ शकतो का? एक आई म्हणून तिला पुन्हा तितकंच प्रेम करू शकतो का? एक बहीण म्हणून पुन्हा एकदा तिच्याशी त्याच मस्तीत खेळू शकतो का? एक सासू म्हणून तिला सुनेचा मान-सन्मान देऊ शकतो का? एक स्त्री म्हणून आपण त्या स्त्रीला कोणत्याही नात्यात आपलं म्हणून शकतो का? एक समाज म्हणून आपण तिला हळदीकुंकू, पूजा-अर्चा, लग्न, सण समारंभ अश्या सगळ्या परिस्थितीत एक सामान्य स्त्रीचा दर्जा देऊ शकतो का? तिचा बलात्कार झाला म्हणून प्रियाच्या छाटलेल्या पंखांच्या जागी आपण एक स्त्री किंवा पुरुष म्हणून कोणत्याही नात्यात आपले पंख तिला देऊ शकतो का? हा विचार आपण करायला हवा.   

आज समाजात काय किंवा वैयक्तिक काय, वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नाही म्हणूनच येतात. जो समाज स्वतःला पुढारलेला आणि सशक्त मानतो, तो अश्या गोष्टींचा विचार तरी करतो का? बलात्कार झालेल्या स्त्रीला अनेकदा चौकशीला सामोरे जायची नामुष्की येत असते. तू असेच कपडे का घातलेस? ते, तू याची वाच्यता कुठे करू नकोस! हे तिला ऐकवले जाते. समाजात त्या स्त्रीने न केलेल्या चुकांसाठी प्रायश्चित स्वीकारण्याची वेळ तिच्यावर येते! बलात्कार झाला म्हणून ती कोणत्या तरी रोगाने पिडीत झाली किंवा निदान आता ती पांढरपेशा समाजाचा घटक नाही असेच सतत बिंबवले जाते. एक समाज म्हणून आपण बलात्कार करणाऱ्या मानसिकतेला विकृती मानतो पण जिच्यावर तो केला जातो तिलाही त्यासाठी जबाबदार धरण्याची भूमिका नक्की कोणत्या समाजाचं आणि प्रगल्भ दृष्टीकोनाचं प्रतिनिधित्व करत आहे?

एका सशक्त, प्रगल्भ समाजातील एक संवेदनशील घटक म्हणून आपण स्वतःकडे जेव्हा बघतो तेव्हा एका बलात्कार झालेल्या स्त्रीच्या संवेदना आपण ओळखू शकतो का? आज बलात्काराच्या घटनेत कित्येक पटींनी वाढ झाली आहे. त्याची कारणे अनेक असतील. कायदा योग्य ती शिक्षा देईलच पण आपण समाजाचा भाग म्हणून अश्या घटनांकडे फक्त आणि फक्त सहानुभूतीच्या नजरेतून बघणार का? आज दुसऱ्यांच्या कुटुंबात असलेली ती स्त्री उद्या आपल्या कुटुंबातील भाग असू शकते अश्या वेळेस आपली वागणूक काय असणार आहे? उद्या मी एक स्त्री/पुरुष म्हणून त्या छाटलेल्या पंखांना आपले पंख जोडून पुन्हा एकदा त्यांना समाजात सामान्य प्रवाहात आणण्यात सक्षम आहे का याचा विचार आज प्रत्येकाने करण्याची गरज आहे. समाजातील अश्या घटना दुर्दैवी असल्या तरी समाज आणि त्या समाजाचा भाग म्हणून  अश्या घटनांना आपण कसे सामोरे जातो ते आपण त्या छाटलेल्या पंखांना बळ देतो की त्या छाटलेल्या पंखाना अजून छाटतो त्यावर अवलंबून आहे.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




No comments:

Post a Comment