Monday 28 September 2020

अभ्यास आणि एम.पी.ए.टी.जी.एम.... विनीत वर्तक ©

अभ्यास आणि एम.पी.ए.टी.जी.एम.... विनीत वर्तक © 

गेल्या आठवड्यात डी.आर.डी.ओ. ने दोन वेगवेगळ्या प्रणाली च्या चाचण्या घेतल्या. सिमेवर भारत आणि चीन च्या सेना समोरासमोर उभ्या असताना ह्या प्रणाली ची गरज सगळ्यात जास्ती जाणवत आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ह्या दोन्ही चाचण्यांना खूप महत्व आहे. ह्या दोन्ही चाचण्या वेगवेगळ्या प्रणाली च्या घेतल्या गेल्या आहेत. त्यातील एक आहे ज्याला अभ्यास असं म्हणतात. तर अभ्यास एक (HEAT) म्हणजेच high-speed expendable aerial target आहे. तर दुसरी होती एम.पी.ए.टी.जी.एम (Man Portable Anti-Tank Guided Missile) ह्या दोन्ही चाचण्या अतिशय यशस्वी ठरल्या आहेत. तर नक्की काय आहे ह्या अभ्यास आणि एम.पी.ए.टी.जी.एम प्रणाली हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे. 

अभ्यास म्हणजेच (HEAT) high-speed expendable aerial target हे एक प्रकारच ड्रोन आहे. आता आपण विचार करू इतकी सगळी ड्रोन असताना डी.आर.डी.ओ. ने नक्की कोणत्या प्रकारचं ड्रोन बनवलं आहे? अभ्यास कळण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. २६ फेब्रुवारी २०१९ च्या भल्या पहाटे भारताची काही लढाऊ विमान पाकिस्तान च्या दिशेने निघाली. पाकिस्तान च्या हद्दीत गुपचूप जाण्यासाठी पाकिस्तान ला गंडवावं लागणार होतं. ह्यासाठी भारताची दोन सुखोई लढाऊ विमाने पाकिस्तान च्या हद्दीजवळ पोहचली. पाकिस्तान च्या एवॉक्स प्रणाली म्हणजेच रडारवर ती दिसताच पाकिस्तान ची सुरक्षा यंत्रणा ह्या विमानांच्या मागे लागली. तेवढ्यात पाकिस्तान च्या रडार ला गंडवून भारताच्या मिराज २००० विमानांनी बालाकोट इकडे आपलं लक्ष्य पूर्ण केलं. आपण फसवले गेल्याच लक्षात येईपर्यंत भारताने आपलं मिशन फत्ते केलं होतं. भारताने जाणून बुजून सुखोई विमानांना पाकिस्तान च्या सीमेजवळ पाठवलं होतं. 

पण प्रत्येकवेळी आपण आपली लढाऊ विमान आणि आपले वैमानिक ह्यांचा जीव धोक्यात घालायचा का? असा प्रश्न समोर उभा राहिला. एखाद्या शत्रू राष्ट्राची रडार सिस्टीम अथवा क्षेपणास्त्र सुसज्जता ओळखण्यासाठी असं एखादं विमान बनवता आलं की ते शत्रुच्या हद्दीत घुसून ही सगळी माहिती आपल्याला देईल त्या शिवाय शत्रुच्या रडार ला असा चकवा देईल की शत्रूच लक्ष्य त्याच्याकडे जाईल आणि तेवढ्या वेळात आपण आपलं लक्ष्य पूर्ण करू शकू त्याचवेळी आपण कोट्यवधी रुपयांची लढाऊ विमान आणि वैमानिक ह्यांचा जीव धोक्यात न घालता हे पुर्णत्वाला नेऊ. ह्या सगळ्या प्रश्नांच उत्तर म्हणजेच अभ्यास. 

अभ्यास (HEAT) high-speed expendable aerial target ड्रोन आहे. हे ड्रोन ध्वनीच्या अर्ध्या वेगात प्रवास करते. (६१७ किलोमीटर / तास ) आणि जवळपास ४०० किलोमीटर च अंतर कापू शकते. हे ड्रोन पुर्णतः स्वयंचलित आहे. ह्यावर जी.पी.एस., नेव्हिगेशन प्रणाली असुन हे स्वतः आपला रस्ता ठरवू शकते किंवा लक्ष्यापर्यंत पोहचण्यासाठी हवा तो बदल करू शकते. जसं वर लिहिलं तसं ह्याचं मुख्य उदिष्ठ हे खोट लक्ष्य बनणं आहे. ह्याच रडार क्रॉस सेक्शन जवळपास ५० पट वाढवलेलं आहे. त्यामुळे रडारवर ते एखाद्या लढाऊ विमानाप्रमाणे दिसून येते. नक्की आपल्यावर काय चाल करून येत आहे ह्याचा अंदाज न आल्याने शत्रुची फसगत होते आणि शत्रूचं लक्ष दुसरीकडे वळवण्यात अभ्यास यशस्वी ठरते. ह्या शिवाय अभ्यास चा वापर सबसॉनिक मिसाईल म्हणून पण करता येऊ शकतो. एखाद्या बिल्डिंग च्या खिडकीला ही हे लक्ष्य करू शकते. भारत अशी अचूक प्रणाली स्वबळावर निर्माण करणाऱ्या मोजक्या देशात ह्या चाचणीने समाविष्ट झाला आहे. अभ्यास च्या येण्याने भारताच्या हवाई सुरक्षिततेला अजून धार येणार आहे. 

 एम.पी.ए.टी.जी.एम म्हणजेच Man-Portable Anti-Tank Guided Missile System. एखादा सैनिक घेऊन जाऊ शकतो असं शत्रुचा रणगाडा नष्ट करणारी मिसाईल प्रणाली ची चाचणी डी.आर.डी.ओ ने नुकतीच घेतली. ह्या मिसाईल ने एका ट्रायपॉइड लॉंचर वरून उड्डाण केलं आणि काही क्षणात एका रणगाड्याला  नष्ट केलं. ह्या मिसाईल ची क्षमता जवळपास २.५ किलोमीटर ची आहे. भारत आजवर असे मिसाईल इस्राईल कडून आयात करत होता पण ह्या प्रणाली च्या यशस्वी चाचणीने भारताने आत्मनिर्भर होणाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं आहे. 

अभ्यास आणि  एम.पी.ए.टी.जी.एम च्या यशस्वी निर्मितीमागे कष्ट घेणाऱ्या डी.आर.डी.ओ. च्या अभियंते, शास्त्रज्ञ ह्यांच अभिनंदन. भारत आणि चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ह्या दोन्ही यशस्वी चाचण्यांनी नक्कीच भारतीय सेनेचा आणि भारतीयांच्या आत्मविश्वासाला नक्कीच बळ मिळालं आहे.

जय हिंद!!! 

फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




  

No comments:

Post a Comment