Sunday 20 September 2020

शुक्रांच्या ढगात... विनीत वर्तक ©

 शुक्रांच्या ढगात... विनीत वर्तक ©

गेल्या आठवड्यात आलेल्या एका बातमीमुळे खगोल संशोधकांच्या मध्ये नवीन कुतूहल निर्माण झालं आहे. ही बातमी म्हणजेच संशोधनातील निष्कर्ष हे आशेची एक नवीन पालवी फुटल्यासारखे आहेत. आजवर मानव गेली अनेक शतके पडलेल्या मूलभूत प्रश्नाचं उत्तर तो शोधत आहे. तो प्रश्न म्हणजे आपल्या शिवाय पृथ्वी पलीकडे सजीवांच अस्तित्व आहे का? गेल्या काही दशकातील प्रगतीमुळे ह्या प्रश्नाच उत्तर शोधण्यासाठी खुप सारे प्रयत्न जागतिक पातळीवर होऊ लागले आहेत. पृथ्वी सारख्याच आपल्या सौर मालेतील अजून कोणत्या ग्रहांमध्ये आपण राहू शकतो का? किंवा सजीव कोणत्या प्रकारे अस्तित्वात आहेत का? ह्याचा कसून शोध सुरु आहे. मंगळ हा ग्रह जवळपास पृथ्वीसारखा असल्याने तिकडे सजीव तसेच सजीवांच्या उत्पत्तीसाठी लागणाऱ्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी खुप साऱ्या मोहिमा आखल्या गेल्या आहेत. चंद्रावर ही मानवाने पाऊल ठेवून पाण्याचं अस्तित्व सिद्ध केलं आहे. पण ह्या सगळ्या संशोधनात नेहमीच लपलेला ग्रह म्हणजे 'शुक्र'. 

शुक्र आजवर मानवी मोहिमांपासून अलिप्त राहण्यामागे काही कारणं आहेत. आपल्या सौर मालेतील दुसरा ग्रह असणारा शुक्र जवळपास पृथ्वी च्या आकाराचा आहे. शुक्राचे वस्तुमान पृथ्वीच्या ८०% इतकं आहे. शुक्राचे वातावरण खुप दाट आहे. ह्या दाट वातावरणामुळे शुक्रवार येणारी सूर्याची उष्णता शुक्रावर अडकून राहते. सूर्याच्या सगळ्यात जवळ नसताना पण शुक्राचं तपमान ४७१ डिग्री स्लेसिअस इतकं तप्त आहे. शुक्राच्या वातावरणात कार्बन डायऑक्साइड असुन स्लफुरीक ऍसिड च्या ढगांच आवरण आहे. संशोधनातून असं ही सिद्ध झालं आहे की इकडे विजा चमकतात तसेच खुप सारे ज्वालामुखी आजही सुरु आहेत. शुक्र स्वतः भोवती २४३ दिवसात प्रदक्षिणा घालतो पण त्याचवेळी तो सूर्याभोवती २२५ दिवसात प्रदक्षिणा घालतो. ह्याचा अर्थ शुक्रावर दिवस हा वर्षापेक्षा मोठा असतो. शुक्राच्या ढगांच कुतूहल आजवर संशोधकांना वाटत आलेलं आहे. शुक्राच्या ह्या ढगात काय गुपित दडलेली आहेत ह्या बद्दल अजूनही संशोधन सुरु आहे. 

शुक्र हा सौरमालेतील सगळ्यात तेजस्वी ग्रह आहे. पण त्याची हिच प्रखरता संशोधनासाठी मारक ठरते. शुक्राच्या प्रचंड तपमानामुळे कोणतच यान त्याच्यावर जास्त काळ टिकू शकत नाही. शुक्राच तपमान यानावरील सगळ्या साधनांना बेचिराख करते. ह्यामुळे शुक्रावर काही जिवसृष्टी असेल का? ह्याबद्दल जास्ती संशोधन अथवा मोहिमा आखल्या गेल्या नाहीत. पण गेल्या आठवड्यात जे निष्कर्ष समोर आले त्यामुळे शुक्र ग्रह पुन्हा एकदा संशोधकांच्या रडारवर आला आहे. शुक्राच्या ढगात फॉस्फाईन नावाचा गॅस आढळून आला आहे. फॉस्फाईन गॅस मध्ये एका फॉस्फोरस च्या अणु भोवती तीन हायड्रोजन चे अणु बांधलेले असतात. हा गॅस पृथ्वीवर ही आढळतो. हा गॅस तयार होण्याची शक्यता पृथ्वीवर दोन प्रकाराने आहे. एक म्हणजे इंडस्ट्रियल प्रोडक्ट. दुसरी म्हणजे एनएरोबिक जिवाणू. ह्या शिवाय ह्या गॅस ची निर्मिती पृथ्वीवर होतं नाही. शुक्राच्या ढगात ह्या गॅस च अस्तित्व एकाच पद्धतीने शक्य आहे ते म्हणजे एनएरोबिक जिवाणू. शुक्राच्या वातावरणात १ बिलियन भागात २० भाग ह्या गॅस चे आढळले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर ह्या गॅस ची निर्मिती शुक्राच्या ढगात असणं कुठेतरी सजीव सृष्टीकडे निर्देश करत आहे. 

शुक्रावर एनएरोबिक जिवाणू असण्याची फक्त शक्यता ह्या गॅस च्या मूल्यमापनातून व्यक्त केली आहे. व्हायचा अर्थ तिकडे जिवसृष्टी आहे असा होत नाही. ह्या शिवाय फॉस्फाईन गॅस शुक्रावर असण्यासाठी अन्य काही कारणं आहेत का ह्याचा ही अभ्यास होणं गरजेचं आहे. शुक्राचे वातावरण बघता सजीव सृष्टीसाठी लागणारं वातावरण अतिशय प्रतिकूल आहे. पण ह्या संशोधनातून अश्या प्रतिकुल वातावरणात जर अश्या पद्धतीचे जिवाणू जगत असल्याच सिद्ध झालं तर इतर ग्रहांवरील अश्याच वातावरणात सजीव सृष्टीचे दाखले मिळण्याची शक्यता वाढणार आहे. ह्यामुळे शुक्र पुन्हा एकदा जगातील संशोधकांच्या रडारवर आला आहे. ह्या संशोधनाच्या पुष्टीसाठी अनेक मोहिमा शुक्रवार आखल्या जाणार आहेत. भारत ही ह्या संशोधनात मोलाची भुमिका बजावणार आहे. भारताने २०१७ साली 'शुक्रयान' ची घोषणा केली असुन २०२३ पर्यंत भारताची इसरो शुक्रावर आपलं यान पाठवणार आहे. शुक्राच्या ढगात उद्याची बीज आहेत की नाही ह्याची शहानिशा करणार आहे. 

फोटो स्रोत :- नासा 

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment