Friday 4 September 2020

चेक की चेकमेट?... विनीत वर्तक ©

 चेक की चेकमेट?... विनीत वर्तक ©

चीन चं विस्तरवादी धोरण जगापासून लपलेलं नाही. आर्थिक महासत्तेच्या दिशेने चीन चा गेल्या दशकात झालेल्या प्रवासाने चीन ला आर्थिक आणि सैन्य तसेच तांत्रिक वर्चस्व दिलेलं आहे. ह्याचाच परीणाम म्हणजे चीन कधी नव्हे तो आपल्या छुप्या महत्वाकांक्षेला पुर्ण करण्यासाठी जागतिक पटलावर वाटचाल करायला लागला आहे. कोरोना च पडघम जागतिक पटलावर वाजण्यापूर्वी चीन ला आपल्या ताकदीचा माज आणि गर्व झालेला होता. आपण आपल्या ताकदीच्या जोरावर संपूर्ण जगाला झुकवू शकतो हा आशावाद आणि गर्व चीन च्या राज्यकर्त्यांना होता. तो अगदीच खोटा होता असं नाही कारण आपल्या ह्याच ताकदीने चीन ने अनेक राष्ट्राच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात घेऊन त्यांच्या सार्वभौमत्तेला आव्हान दिलेलं आहे. पण ह्याच विजयाचा उन्माद चीन च्या डोक्यात गेला आणि आपण संपूर्ण जगावर राज्य करत आहोत अश्या अविर्भावात तो बेडकाप्रमाणे फुगला होता. कोरोना च्या उद्रेकानंतर जागतिक परिस्थितीत खुप बदल झाले आणि होत आहेत. कोरोनामुळे आर्थिक आघाड्यांवर अनेक राष्ट्र कमजोर असताना आपल्या अपूर्ण महत्वाकांक्षाना पूर्ण करण्याची हीच संधी आहे असा समज चीन ला झाला आणि त्याने विस्तारवादाची पावलं टाकायला सुरवात केली. 

विस्तारवादाची पावलं टाकताना चीन च्या राजकर्त्यांकडे १९६२ ची भारताची निर्माण झालेली दुबळी प्रतिमा होती. शांतीची कबुतर उडवणारा भारत आणि भारतीय सेना आपल्या विरुद्ध काही प्रतिकार करू शकणार नाही. आपल्या ताकदीला घाबरून स्वतःच्या भागात रस्ते, दळणवळण यंत्रणा न उभारणारा भारत आता सुद्धा आपल्या दबावाखाली दबून व्हीव्हळण्या पलीकडे काही करेल असा विश्वास चीन ला होता. चीन ने बुद्धिबळाच्या पटलावर भारताला चेक दिला. आपल्या समोरच्या प्रतिस्पर्ध्याला म्हणजेच भारताला दोन पावलं मागे घ्यायला लावेल असा विचार करून चीन आपली चाल खेळला होता. गावात आपलं कुंपण रोज इंच इंच पुढे घेत पूर्ण शेत आपल्या घशात घालणारे अनेकजण आपण पहिले असतील. चीन भारताविरुद्ध अगदी अशीच चाल १९६२ साली खेळाला आणि त्याने इंच नाही पण कित्येक हजारो किलोमिटर चा प्रदेश आपल्या घशात घातला. पण १९६२ चा भारत आणि आताचा भारत ह्यात खूप फरक आहे. राजकीय, आर्थिक, सैनिकी ताकद ह्यात भारत आता ज्या पातळीवर आहे त्याचा अंदाज चीन ला नव्हता असं नाही. पण भात्यातली आपली अस्त्र, शस्त्र वापरण्याची मानसिकता भारताची कशी असेल ह्याबाबतचा त्याचा अंदाज पूर्णपणे चुकला हे नक्कीच. 

गेल्या काही दिवसात लडाख इकडे एल.ए.सी. (लाईन ऑफ एक्चुअल कंट्रोल) वरती अनेक घटना घडलेल्या आहेत. भारत आणि चीन च्या सेना एकमेकांसमोर उभ्या राहिलेल्या आहेत. गाल्वान खोऱ्यात जे घडलं त्याने संपूर्ण जगाचा दृष्टीकोन बदलवला आहे. आजवर आपल्या मस्तीत आणि गर्वात वावरणारा चीन पुर्णपणे एक पाऊल ह्या घटनेमुळे मागे गेला आहे. इकडे एक लक्षात घेतलं पाहीजे की कोणाचे किती सैनिक मारले गेले ह्यापेक्षा मानसिकतेत झालेला बदल हा चीन साठी सगळ्यात मोठा धक्का होता. संपूर्ण जगाला जर ह्या घटनेतून काही शिकायला मिळालं असेल तर, 'एक मुंगी सुद्धा हत्ती ला नाचवू शकते' हा खूप मोठा मेसेज संपूर्ण जगात गेला. चीन च्या प्रतिमेला त्यामुळे तडा तर गेलाच पण चीन च्या मदमस्तीपणाला कुठेतरी वेसण घालण्याची गरज आहे हे जगाला कळलं. त्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्नांना सुरवात झाली. भारतासोबत अमेरीका, जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रांस सारखे देश उभे राहिले. कुठेतरी चीन ह्या सगळ्यात एकाकी पडत चालल्याच चित्र निर्माण झालं. अमेरीकेने चीन च्या दुखऱ्या नसेवर पाय ठेवताना आपल्या दोन महाकाय युद्धनौका साऊथ चायना सी मध्ये आणल्या. चीन ला चारी बाजूने कोंडीत पकडण्याचे जागतिक स्तरावर प्रयत्न सुरु झाले. 

चीन गप्प बसणार नाही ह्याचा अंदाज भारताला आला किंबहुना चीन इंच-इंच करून आपला विस्तार करण्याची चाल पुढे सुरु ठेवणार हे भारताला कळून चुकलं होतं. गेल्या काही वर्षात सुमारे ४००० किलोमीटर च्या भारत-चीन एल.ए.सी. वर भारताने खूप काही गोष्टी बदलल्या आहेत. दळणवळण, रस्ते, पायाभूत व्यवस्था ह्या सगळ्या बाबीवर भारताने लक्ष केंद्रित केल्यामुळे भारताने गाल्वान घटनेनंतर आपली संपूर्ण यंत्रणा अतिशय वेगाने सिमेजवळ नेली. चीन कोणकोणत्या पद्धतीने आपल्या क्षेत्रावर कुरघोडी करेल? त्याला आपण कश्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो? एकाचवेळी पाकीस्तान आणि चीन ह्यांनी भारताविरुद्ध आघाडी उघडली तर आपण कश्या पद्धतीने उत्तर देणार आहोत? पारंपारीक युद्धसोबत, आण्विक अथवा जैविक हल्ला झाल्यास त्याला प्रतिउत्तर देणाऱ्या यंत्रणा कश्या असतील? चीन ने कुरघोडी करण्याअगोदर आपण एक पाऊल टाकून चीन ला चेक देऊ शकतो का? हा क्रांतिकारी विचार २०२० मधला भारत करत होता हे समजायला चीन ला उशीर झाला. 

आपल्या सिमेजवळच नाही तर चीन च्या दुखऱ्या नसेवर अंकुश ठेवण्यासाठी भारताने आपली युद्धनौका साऊथ चायना सी मध्ये तैनात केली. तिकडे आर्थिक पातळीवर चीन ला कोंडीत पकडताना चीन च्या भारतातील आर्थिक व्यवहारांवर, मालावर तसेच चीन शी निगडित असणाऱ्या सगळ्याच गोष्टींवर भारताने अंकुश ठेवायला सुरवात केली. चीन ला जागतिक स्तरावर एकटं पाडण्यासाठी राजनैतिक स्तरावर भारताने अनेक बड्या राष्ट्रांना चीन विरुद्ध एकटवण्याचा प्रयत्न सुरु केला. भारताने उचललेल्या प्रत्येक पावलाला जागतिक महासत्तांचं पाठबळ लाभेल हे बघणं अतिशय गरजेचं होतं. एक हुशार बुद्धिबळपटू चेक पेक्षा चेकमेट च्या चाली खेळतो. कारण नुसतं चेक देऊन सामना जिंकता येतं नाही. समोरच्याला आपल्याला हवं तस खेळण्यासाठी पुढल्या दहा चालींचा विचार तो करत असतो. ह्याचप्रमाणे भारताने गेल्या २ महीन्यात पावलं टाकली होती. एका दिवसात उठून तुम्ही युद्ध अथवा शत्रूवर कुरघोडी करू शकत नाही. योजना आखून त्या प्रमाणे प्रत्येक चाल व्यवस्थित खेळावी लागते. काहीवेळा आपल्या काही गोष्टी त्यात स्वाहा ही होतात आणि आपलं नुकसान ही होते पण पुढच्या काही चालींसाठी ती गरज असते. 

गाल्वान नंतर भारतीय सेनेने उन्माद न करता आपल्या रणनीती प्रमाणे सिमेजवळ चीन ला तोडीस तोड सैन्य आणि इतर गोष्टी उभ्या केल्या. एकीकडे चर्चेचं गुऱ्हाळ चालू ठेवताना भारताने आपली स्वयंसिद्धता वाढवत नेली. कागदावर कोण किती वरचढ ह्यापेक्षा तिथल्या भौगोलिक परिस्थिती आणि तिथल्या गोष्टींचं आकलन करून त्या प्रमाणे युद्धनिती आखण हे खूप महत्वाचं होतं. २९-३० ऑगस्ट ला भारताने अतिशय चपळाईने एल.ए.सी. मधील महत्वाची ठिकाण हस्तगत केली. ह्या ठिकाणावर हक्कामुळे भारताला चीन च्या सर्व सैनिकी कारवायांवर नजर ठेवता येणार आहे. चीन आणि भारताच्या सेनेने साधारण एकाचवेळी ह्या ठिकाणावर हक्क दाखवण्यासाठी चढाई सुरु केली होती. पण कुठले सैनिक कुठे पाठवायचे ह्यात भारतीय सेनेची रणनीती वरचढ ठरली. भारतीय सैन्याला मदत करणाऱ्या विकास रेजिमेंटमुळे हे शक्य झालं आहे. तिबेटी आणि गोरखा सैनिकांनी बनलेली ही रेजिमेंट उंच पर्वतरांगांनमधील युद्धासाठी जगात सर्वोत्तम समजली जाते. हे सैनिक अतिशय प्रतिकूल वातावरणात प्रशिक्षित असल्याने शत्रूच्या दहा सैनिकांपेक्षा वरचढ ठरतात. हा फरक चीन ला ही त्या दिवशी समजुन चुकला. चीन चे सैनिक माथ्यावर जायच्या आधी भारताचा तिरंगा तिकडे फडकत होता. चिनी सैनिकांना माघार घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. 

ह्या भागात जो उंचावर त्याच पारड जड पण त्याचसोबत ऑक्टोबर पासून कडाक्याची थंडी ह्या भागात सुरु होईल. एका महिन्यानंतर इकडे रहाणं कठीण होईल तिकडे युद्ध तर लांबची गोष्ट. जोवर थंडी संपेल तोवर भारताने आपली उंचावरची ठिकाण अजुन सुरक्षित केलेली असतील. पुढल्या वर्षी ही ठिकाण भारताचा अधिकृत भाग झालेली असतील. भारताने गेल्या आठवड्यात चीन ला चारी बाजूने कोंडीत पकडण्याचा डाव खेळला आहे. अर्थात सहजासहजी चीन आपल्या जाळ्यात अडकेल असं नक्कीच नाही. पण भारताने केलेली कुरघोडी चीन च्या वर्मावर घातलेला घाव नक्कीच आहे. चीन आता येत्या ४-५ आठवड्यात काय पावलं टाकतो ह्यावर खूप काही गोष्टी अवलंबून असतील. चीन ची एल.ए.सी. वरचा चेक हा भारताची शक्ती बघण्यासाठी होता? भारतावर अंकुश ठेवण्यासाठी होता? की जागतिक मंचावर आपण किती एकाकी पडू हे बघण्यासाठी होता? हे येणार काळ सांगेलच. पण तूर्तास भारताने चीन ला चेक देऊन एक पाऊल मागे घ्यायला लावलं आहे हे नक्की. आता चीन कोणती पावलं टाकतो ह्यावर तो ह्या चेक पासून वाचतो की चेकमेट होतो हे ठरणार आहे.  

तळटीप :- ह्या पोस्टचा उद्देश राजकीय नसून कोणीही त्याचा वापर राजकीय कुरघोडी अथवा पक्षीय राजकारणासाठी करू नये. 

फोटो स्रोत :- गुगल 

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



No comments:

Post a Comment