Wednesday, 23 September 2020

आमचे हिरोच चुकले... विनीत वर्तक ©

आमचे हिरोच चुकले... विनीत वर्तक ©

अरे ओ सांबा! कितने आदमी थे? 

पिटर, तुम लोग मुझे बाहर ढूंढ रहे हो, और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हू.... 

अश्या काही डायलॉग ने आमच्या पिढीची सुरवात झाली होती. गब्बरसिंग असो वा दिवार मधला विजय ह्या सारख्या अनेक पात्रांनी अनेकांच्या मनात खलनायकाची ते अँग्री यंग मॅन ची प्रतिमा तयार केली. दूरचित्रवाणी वरच दुरदर्शन ते ७० एम. एम. चा पडदा ह्यातल अंतर निदान माझ्या पिढीत तरी खुप मोठं होतं. चित्रपट बघायला मिळणं ही पर्वणी असायची. त्यातल्या त्यात दयावान सारख्या मादक दृष्यांच्या चित्रपटासाठी तर अनेक दिव्य करावी लागायची. पण नकळत हे कलाकार आणि त्यांच आयुष्य आमच्यासाठी आणि आमच्या नंतर येणाऱ्या पिढीसाठी एक आदर्श बनत गेलं. प्रत्येकाच्या प्रतिमा वेगळ्या असल्या तरी त्यांच्या आयुष्याचं आकर्षण मात्र सगळ्यांना वाटायला लागलं. कुठेतरी चित्रपटाच्या पडद्यावर अदाकारी साकारणारे ते कलाकार आमचे हिरो झाले. 

काळ बदलत गेला. चित्रपट गृह एकावरून मल्टिप्लेक्स होत गेली. भिरभिरणाऱ्या पंख्यांची जागा आता वातानुकुलीत संयत्रांनी घेतली. साधा येणारा आवाज आता डॉल्बी झाला. भारताच्या मातीत रमणारे आमचे हिरो आता दुल्हनिया न्यायला युरोप मध्ये जाऊन थडकले. आमच्यासाठी सर्वस्व असणाऱ्या क्रिकेट वरचा चित्रपट ऑस्कर च्या रांगेत जाऊन पोहचला. लाखात मानधन घेणारे आमचे हिरो आता कोटी मोजायला लागले. दस का बीस करणारी तिकीटबारी आता पांचसो का हजार मोजायला लागली. आमचे हिरो मोठे झाले पण त्यातला कलाकार मात्र छोटा होत गेला. ज्या प्रतिमेवर आम्ही भाळत होतो त्याची प्रतिभा मात्र छोटी होत गेली.आता चित्रपट कोटीचे आकडे गाठत होते आणि आमचे हिरो त्या कोटी रुपयांन मध्ये इतके हरवले की आता आपल्या प्रतिमा जपण्यासाठी त्यांना नशेची गरज लागायला लागली. दारू आणि सिगरेटने तर आमच्या आधीच्या पिढीत वर्दी दिली होती. पण आता त्या पलीकडे मजल जाऊ लागली. 

आमच्या पिढीला कलाकारांच्या प्रतिभेने भुरळ घातली होती पण आजच्या पिढीला त्यांच्या प्रतिमेने भुरळ घातली. मग अनुकरण करायच्या नादात नशेचे वेगवेगळे रस्ते सामान्य लोकांच्या आयुष्याचा भाग झाले. चिल यार!!... म्हणत आमची पिढी एका वेगळ्याच मृगजळाकडे धावायला लागली. आज जेव्हा ह्याच प्रतिमेला तडा जातो आहे तेव्हा कुठेतरी आपण आपल्या पुढच्या पिढीकडे हिरो आणि आदर्श देण्यात चुकलो तर नाही न असं वाटायला लागलं आहे. प्रत्येकाला आयुष्यात मोठ, समृद्ध, सुखी व्हायचं असते आणि कोणाचं तरी समृद्ध, सुखी आयुष्य बघून आपण तसं निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. असं आयुष्य जगत असलेल्या व्यक्ती आपल्यासाठी हिरो असतात. पण खायचे दात वेगळे आणि दिसणारे दात वेगळे ह्यातला फरक आता समोर उघडा पडला आहे. तो फरक आत्ता कळला असं नाही कारण तो आधीच माहीत होता पण प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची हिंमत कोण करणार? 

आम्ही हिरो म्हणून आम्ही आमच्या पुढल्या पिढीला आमचे कलाकार दाखवले पण आमचे खरे हिरो दाखवायला कुठेतरी कमी पडलो. खुप पैसे कमावणारे खूप सुखी आणि समाधानी असतात हे सांगताना समाधान हे पैश्यावर आणि ऐहिक सुखांवर कधीच अवलंबुन नसते हे सांगायला कमी पडलो. देशाच्या रक्षणासाठी सिमेवर रक्त सांडणारा भले लाखो रुपये कमावत नसेल पण आपल्या रक्ताचा थेंब आणि थेंब आपण देशासाठी दिला ह्याच समाधान शब्दात सांगता येत नाही न कोणता महाल बांधून दाखवता येते. कोट्यवधी रुपये कमावलेला बिल गेट्स जितका समाधानी असेल त्याच्या पेक्षा थोडं जास्तीच आमचे आमटे कुटुंब समाधानी आहे हे सांगण्यात आमची पिढी नक्कीच कमी पडली. आमचे हिरो हे फक्त पडद्यावर युरोप च स्वप्न दाखवत गाडीच्या मागे प्रेयसीसाठी धावणारे ठरले. आमचे हिरो हे पैश्यासाठी देश्याला विकणारे लोक होते पण देशासाठी रक्त सांडणाऱ्या कोणालाच आमच्या हिरोंच्या व्याख्येत स्थान मिळालं नाही. 

आज आमच्याच हिरोंच्या मृगजळाच्या प्रतिमेला तडा जाताना बघणं पण आम्हाला नको वाटते कारण त्यांच आयुष्य आमच्याच 'कुल' वाटणाऱ्या आयुष्याचा भाग झालं आहे. त्यामुळे आज आमचीच प्रतिमा आमच्या नजरेत उतरली आहे. पण ते स्वीकारण्याची आमची मानसिकता आहे का? आमचे हिरोच चुकले तिकडे त्या हिरोंकडून घेतलेले आदर्श तरी कसे चांगले असतील ह्याचा विचार आता तरी आपण करणार आहोत का? आता तरी खऱ्या हिरोंचे आदर्श आयुष्यात बाळगणार आहोत का? आता तरी पुढल्या पिढीला खऱ्या हिरोंची ओळख करून देणार आहोत का? हा प्रश्न तुमच्या आमच्या पैकी प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा कारण आपले हिरोच कुठेतरी चुकले आहेत......  

 सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे 

No comments:

Post a Comment