Sunday 13 September 2020

ये नया हिंदुस्तान है... विनीत वर्तक ©

 ये नया हिंदुस्तान है... विनीत वर्तक ©

'ये नया हिंदुस्तान है, ये हिंदुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी'

गेल्या काही दिवसापासून भारत - चीन युद्धाचे ढग अधिकच गडद झाले आहेत. प्रत्येक पुढच्या क्षणाला काय होणार आहे ह्याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. अनेक बैठका प्रत्येक पातळीवर झाल्या आहेत. सुरु आहेत. पण ह्या सगळ्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. एकीकडे चीन चर्चेच गुऱ्हाळ लावतो आहे तर दुसरीकडे भारत - चीन सरहद्दीवर मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव करत आहे. नुकत्याच आलेल्या एका रीपोर्ट नुसार जवळपास ५०,००० सैनिक चीन ने पॅंगॉंग टेसो भागात आणले आहेत. ह्या सोबत खूप मोठ्या प्रमाणात रणगाडे, रडार, तोफा, लढाऊ विमान असा सर्व लवाजमा तैनात केला आहे. चीन चर्चेच गुऱ्हाळ लावून एकीकडे आपली सैन्य स्थिती मजबुत करत आहे. पण हे सगळं करून सुद्धा चीन च्या सैन्यात आत्मविश्वासाची कमी जाणवत आहे. 

कागदावर आपली ताकद दाखवून जगाला नमतं घ्यायला लावणाऱ्या चीन च्या सेनेच्या कमी आत्मविश्वासाला अनेक कारणे आहेत. कम्युनिस्ट असलेल्या चीन च्या राजकारणाची पकड चीन च्या सेनेवर आहे. राजकारणी लोकांची हीच पकड एखाद्या सेनेसाठी भारी पडते. आपला राजकीय फायदा आणि महत्वाकांक्षा पुर्ण करण्यासाठी केला जातो. त्यात आज चीन ची सेना कात्रीत पकडली आहे. एकीकडे कोरोना सारखी महामारी हाताळण्यात चीन चं नेतृत्व कमी पडलं अशी भावना चीन च्या लोकांमध्ये प्रबळ होते आहे. एकेकाळी राजकीय पटलावर आपलं वर्चस्व दाखवत पटलावर आलेले शी जिनपिंग ह्यांच नेतृत्व आज जागतिक पातळीवर टिकेचा धनी झालेलं आहे. ज्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा आणि आर्थिक वर्चस्वाचा चीन ला माज होता त्याला कोरोनामुळे कुठेतरी ब्रेक लागला आहे. त्याही पेक्षा ज्या पद्धतीने चीन च्या व्यापाराला अनेक देशांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे ती चीन ची खरी डोकेदुखी आहे. कारण अर्थव्यवस्थेचा वेग कमी जास्त होऊ शकतो पण तुमचा बाजार उठला तर तुमचा सत्यानाश व्हायला वेळ लागत नाही. आज चीन ज्यामुळे पुढे आला ती बाजारपेठ खुंटत जाते आहे. 

जपान, अमेरीका, ऑस्ट्रेलिया, भारत ह्या सारख्या मोठ्या बाजारपेठेत चीन च्या मालावर कडक निर्बंध टाकण्यात आले आहेत किंवा त्यांना पद्धतशीररीत्या बाहेरचा रास्ता दाखवला जात आहे. भारतासारखी बाजारपेठ गमावणं चीन ला परवडणार नाही. ह्यासाठीच कुठेतरी भारतावर अंकुश ठेवून आपलं स्थान चीन च्या राजकारणात बळकट करण्यासाठी चीन च्या राज्यकर्त्यांनी लडाख मध्ये आपलं सैन्य भारताच्या दिशेने घुसवणाच्या दिशेने पावलं टाकली. १९६२ च्या युद्धात ज्या पद्धतीने आपण भारतीय सैन्याला धुळ चारली आणि त्यांच्या आत्मविश्वासाला तडा दिला त्याच्या आठवणी अजुनही त्यांच्या मनात असतील असा विचार करून चीन च्या सैन्याने भारताच्या सिमेवर आपलं मार्गक्रमण सुरु केलं. चीनच्या गर्वाला तडा गेला तो गल्वान इकडे. भारतीय सैन्याला आणि सरकारला अंधारात ठेऊन भारताच्या भूमिवर कब्जा करण्याच्या चीन च्या स्वप्नांना भारतीय सैनिकांनी आपल्या पराक्रमाने उधळून लावलं. ह्या लढाईत भारताचे २० पराक्रमी सिंह वीरगतीला प्राप्त झाले पण चीन ने जवळपास ४३ ते ६० सैनिकांना गमावलं. 

गल्वान इकडे भारतीय सेनेने केलेला प्रतिकार चीनसाठी मोठा झटका होता. एकतर चीन चे सैन्य आणि चीन च्या राजकीय शक्तींनी भारताच्या अश्या प्रतिसादाचा विचार स्वप्नात सुद्धा केला नव्हता. त्यामुळे गल्वान नंतर चीन पूर्णपणे एक पाऊल मागे गेला. भारताला मदतीसाठी अमेरीका, जपान, फ्रांस सारखी राष्ट्र उभी राहीली. त्यामुळे चीन चोहोबाजूने कोंडीत अडकला. चीन ला भारतीय सैन्याच्या ताकदीचा थोडा अंदाज आला. चीन ला तयारीसाठी वेळ हवा होता मग त्याने नेहमीप्रमाणे चर्चेच गुऱ्हाळ सुरु ठेवलं. चर्चा करताना मागच्या बाजूने चीन ने आपल्या सैन्याची जमवाजमव सुरु केली. चीन दगाफटका करणार ह्याचा अंदाज भारतीय नेतृत्वाला होता. भारताचे जेम्स बॉण्ड म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित धोवाल ह्यांची निती भारताने अंगिकारली. ती निती म्हणजेच 'ऑफेन्सिव्ह डिफेन्स' आपण समोरच्याने काही करण्याची वाट बघण्यापेक्षा आपलीच भिती समोरच्याच्या मनात निर्माण करायची. ह्याचाच भाग म्हणून २९-३० ऑगस्ट ला भारतीय सेनेनी ब्लॅक टॉप सह इतर शिखरांवर भारताचा तिरंगा फडकावला. भारत असे काही करेल ह्याचा अंदाज चीन च्या सैन्याला अजिबात आला नाही. त्यांनी जोवर  प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तोवर भारतीय सैन्याने डाव कधीच पलटवला होता. 

भारताच्या आक्रमक भूमिकेने चीन च नेतृत्व पुन्हा एकदा त्यांच्या जनतेसमोर तोंडघाशी पडलं. शी जिनपिंग ह्यांना कसाही करून विजय हवा आहे. पण त्यासाठी त्यांनी ची पावलं टाकली त्यामुळे आता ते गोत्यात आले आहेत. एकतर चिनी सैन्याला युद्धाचा कोणताही अनुभव नाही. १९७९ च्या व्हिएतनाम युद्धात चीन च्या सैन्याला खूप मोठा पराभव चाखावा लागला होता. त्यात १९७९ ते २०२० ह्या मध्ये चीन चे सैनिक कोणतीच लढाई लढलेले नाहीत. अतिउंचावरील युद्धाचा चीन च्या सैनिकांकडे अनुभव नाही. त्यात पुढल्या महिन्यात थंडीमुळे इकडे युद्ध सोडाच पण उभं राहणं पण कठीण असेल. त्यामुळे वेळेचं बंधन चीनवर आहे. पुढल्या ३-४ आठवड्यात मर्यादित युद्ध करून भारताला मागे नेण्याचा चीन चा प्लॅन आहे. पण भारतीय सैनिक ज्या पद्धतीने समोर उभे आहेत ते बघता हे जवळपास अशक्य आहे. जशास तसे ह्याप्रमाणे भारताने आपले ५०,००० सैनिक, रणगाडे, क्षेपणास्त्र, रडार, लढाऊ विमाने असा सगळा फौजफाटा उभा केला आहे. भारतीय सैनिक आता उंचीवर आहेत तर खाली चीन आहे. त्यामुळे युद्ध झाल्यास भारताचं पारडं जड आहे ह्यात शंका नाही. चीन ला दोन्ही बाजूने अतिशय प्रतिकूल स्थिती आहे. एकतर त्यांचं सैन्य कमी उंचीवर आहे त्यात निसर्ग ज्या प्रमाणे बदलत जाणार आहे त्यात वर बसलेल्या भारतीय सैनिकांना टक्कर देणं जवळपास अशक्य आहे. 

चीन च नेतृत्व खरं तर भारताच्या ह्या भूमिकेमुळे पूर्णपणे कात्रीत सापडलं आहे. त्यामुळेच आपल्या पिळवळीला त्याने सक्रिय केलं आहे. ह्यातील काही भाग म्हणजे नेपाळ सरहद्दीवर केलेल्या कुरबुऱ्या आणि भारतातील सहिष्णुतेच कातड घेऊन उभी राहीलेली पिलावळ. पण सगळीकडे चीन ला मात देण्यात तूर्तास भारत यशस्वी झाला आहे. चीन च्या मालावर टाकलेले निर्बंध, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला वाढता पाठिंबा आणि लडाख च्या सरहद्दीवर चीन सैन्याचा उतरलेला माज ह्या सगळ्यामुळे चीन च्या नेतृत्वावर त्यांच्याच पक्षातून शंका उभ्या राहील्या आहेत. ज्या कागदावरच्या सैनिकी संख्येचा चीन ला माज होता तो कुठेतरी उतरला आहे. ह्याचे दूरगामी परीणाम चीन ला साऊथ चायना सी मध्ये भोगावे लागू शकतात. लडाख मधलं चीन च पाऊल ह्या नव्या भारताने सध्यातरी पूर्णपणे मागे घ्यायला लावलं आहे. चीन ला ह्या उलट आपला काही भूभाग गमावण्याची नामुष्की येऊ शकते अशी सध्या परीस्थिती भारतीय सेनेने चीन ची केली आहे. त्यामुळेच चीन ने आता काही केलं तरी ही चुक त्याला महागात पडणार हे निश्चित आहे.  

कमांडर्स, इंडियन आर्मी ने ये जंग शुरू नहीं की थी बट वी विल ब्लडी हेल फिनिश इट!...... 

जय हिंद!!!  

फोटो स्रोत :- गुगल 

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment