आज जवळपास २ वर्ष झाली ह्या घटनेला पण गेल्या दोन वर्षात मी जगाच्या कोपऱ्यात कुठेही असलो तरी प्रत्येक १० दिवसाला साळुंके काकांचा फोन माझ्या मोबाईल वर वाजत असतो. गेल्या २ वर्षाच्या काळात विदेशात असताना सुद्धा काकांचे फोन मला येत होते. इंटरनॅशनल रोमिंग असो वा मुंबई काका नेहमीच आपल्या धारधार आवाजात सुरवात करतात. अहो वर्तक !.......
माणुसकी असलेला माणूस... विनीत वर्तक ©
अहो वर्तक ! मी पटकन मागे वळून बघितलं. व्हीलचेअर वर बसलेला एक ६० वर्षाचा तरुण मला हाक मारत होता. तरुणच ते एखाद्या तरुणाला लाजवेल असा उत्साह त्यांच्या प्रत्येक शब्दात आणि कृतीत मला जाणवून गेला. बाबा आमटे ह्यांनी सुरु केलेल्या आनंदवन प्रकल्पाला नुकतीच भेट दिली. आनंदवन प्रकल्पाला भेट देताना प्रकल्पाची माहिती देण्यासाठी आम्हाला साळुंके काका आले होते. पहिल्या नजरेत साळुंके काकांनी मला आपलसं केलं. पांढरी खुरटी दाढी, डोळ्यावर गॉगल, इस्त्री च शर्ट, इलेक्ट्रिक वर चालणारी त्यांची खुर्ची, त्यावर एका पायाची मांडी घालून त्यावर मस्त एक रुमाल आणि सगळ्यात आकर्षून घेतलं त्यांच्या आवाजाने.
एक जरब असणारा आवाज पण त्यात कुठेतरी आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगातून सावरून पायावर उभं राहून आयुष्य जगल्याच समाधान झळकत होतं. भेट होताच आनंदवनात कोणीच कामाशिवाय नसते. आयुष्यात कठीण प्रसंग आले तेव्हा माणूस म्हणून समाजाने इथल्या प्रत्येकाला वाळीत टाकलं. मग जे आमचं घर झालं ते म्हणजे आनंदवन. हे सांगताना आनंदवना बद्दलचा आदर प्रत्येक शब्दात दिसून येत होता. जुजबी ओळख झाल्यावर त्यांचा पहिला प्रश्न होता अहो वर्तक ! कुठले हो तुम्ही? मी म्हंटल मुंबई. मुंबई बोलताच डोळ्यात एक वेगळी चमक आली. अहो मी पण मुंबईचा. मग आमची गट्टी जमायला वेळ लागला नाही.
मी उरणचा. सामान्य आयुष्य जगताना नियतीच्या मनात वेगळच होतं. अचानक दिवस बदलले. समाजाने वाळीत टाकायला वेळ घेतला नाही. पण आनंदवनात मला घर मिळालं, माणसं मिळाली. बाबा देवमाणूस. माझ्यासारख्या किती लोकांना त्यांनी पुन्हा जगण्याची उर्मी दिली. कुष्ठरोग असो वा महारोग, अपंग असो वा समाजाने झिडकारलेला असो त्यांनी सगळ्यांना आपलसं केलं. आज २२ वर्ष झाली इकडे आहे. सगळ्यांना आनंदवन फिरवतो. मी आणि माझी इलेक्ट्रिक खुर्ची. बोलताना थरथरणारा आवाज आणि हात वयाची जाणीव ह्या तरुणाला करून देत होते. पण हरेल तर ते साळुंके काका कुठले? दुसऱ्या सेकंदाला पुन्हा एकदा त्यांचा ट्रेडमार्क आवाज, अहो वर्तक ! काय करता तुम्ही? म्हंटल लिहितो. लगेच मला तुमच पुस्तक हवं आहे. मी म्हंटल हो देतो. सोबत आणलेल्या काही कॉपीज आहेत त्यातली एक देतो.
आनंदवन पूर्ण फिरून झाल्यावर स्वरसंगीत कार्यक्रमाला जाताना माझ्या अभिविनीत पुस्तकाची एक कॉपी मी माझ्या जवळ ठेवली होती. साळुंके काका दिसताच त्यांना माझं पुस्तक भेट दिलं. पण काका लगेच पुन्हा एकदा त्याच आवाजात, अहो वर्तक ! ह्यावर तुमची स्वाक्षरी कुठे आहे? मी म्हंटल, अरे हो विसरलोच, लगेच स्वाक्षरी केली. पण त्यावर समाधान नाही झालं साळुंके काकाचं. पुन्हा एकदा, अहो वर्तक ! मला काहीतरी त्यावर लिहून द्या. मी म्हंटल, “आयुष्य जगलेल्या तरुणाला मी काय संदेश देऊ”? एक छोटीशी हास्य लकीर काकांच्या आणि माझ्या दोघांच्या चेहऱ्यावर बघताना आम्ही शब्दांशिवाय बोललो.
तिकडून निघालो तेव्हा परत एकदा आवाज अहो वर्तक ! मी म्हंटल काय झालं? तुमचा नंबर द्या. वाचून सांगतो पुस्तक कसं वाटलं ते. माझ्या मोबाईल मध्ये तुमच नाव आणि नंबर सेव करून द्या. माझा हात सतत हलतो त्यामुळे टाईप नाही करता येत. मी लगेच माझा नंबर त्यात सेव्ह करून दिला. काकांची रजा घेऊन मी पुढल्या प्रवासाला निघालो. दोन दिवस झाले. नागपूर वरून मुंबईच्या विमानात बसलो. विमान उड्डाण भरायच्या तयारीत होते. साधारण ५ मिनिटे होती. तेवढ्यात मोबाईल वर एक अनोळखी नंबर. कॉल घ्यावा की नाही? ह्या विचारात असताना नंबर बी.एस.एन.एल चा बघून कॉल घेतला. हेमलकसा इकडे ते एकमेव नेटवर्क चालू असल्याने तिथून कोणाचा असावा अस वाटून तो रिसीव्ह केला. समोरून तोच आवाज, अहो वर्तक ! मी साळुंके बोलतो आहे. माझी ट्यूब लगेच पेटली. मी म्हंटल कसे आहात काका? अरे ते सोड तू कुठे आहेस? म्हंटल आता निघत आहे मुंबई ला. प्रवास कसा झाला? तुझा कार्यक्रम कसा झाला? मी म्हंटल उत्तम. काका लगेच खुश झाले. अहो वर्तक ! काय पुस्तक लिहिलं आहे तुम्ही. खूप आवडलं. अजून अर्ध वाचून झालं पण तुम्हाला फोन करून दाद देण्याचा मोह आवरला नाही.
विमान आकाशात उडाल पण मनात मात्र साळुंके काका घर करून राहिले. आयुष्यात साक्षात मृत्यू आणि टोकाची अवहेलना झेललेला हा माणूस. शारीरिक व्यंगामुळे समाजाने वाळीत टाकून सुद्धा आज आनंदवन सारख्या संस्थांमुळे आयुष्य जगतो आहे. आयुष्य जगत नाही तर त्याचे रंग अनुभवतो आहे. कोण कुठचा मी? पण एका नजरेत त्यांनी मला ओळखलं. दुसऱ्या क्षणाला मला आपलसं केलं. पुस्तक मिळालं नाही म्हणून ओरड करणारे पुस्तक मिळालं तरी ते सांगण्याची तसदी घेत नसताना आपल्या शारीरिक व्याधीमुळे फोन वरील बटन दाबता येत नसताना अगदी आठवणीने पुस्तक वाचून अभिप्राय देणारे साळुंके काका कुठे? माणसाला माणुसकी शिकायला कोणत्या डिग्री ची गरज नसते. त्याला ते जाणवण्यासाठी ते जिवंत मन हवं. माणुसकी असणारा माणूस आपला व्हायला कोणतीही ओळख लागत नाही. शब्दांशिवाय संवाद पण माणुसकीची मन जोडू शकतो हे आज पुन्हा एकदा बघायला मिळालं.
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment