Wednesday 9 September 2020

हायपरसॉनिक भारत... विनीत वर्तक ©

 हायपरसॉनिक भारत... विनीत वर्तक ©

काही दिवसांपूर्वी भारताच्या डी.आर.डी.ओ. ने यशस्वीरीत्या (hypersonic technology demonstrator vehicle (HSTDV) स्वनातीत वेगाने जाणाऱ्या प्रक्षेपाची चाचणी केली. अमेरीका, रशिया आणि चीन नंतर असं तंत्रज्ञान स्वबळावर बनवणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे. मुळातच हायपरसॉनिक प्रक्षेपक म्हणजे काय? हायपरसॉनिक तंत्रज्ञान अवगत केल्यामुळे नक्की काय संदर्भ बदलले आहेत? ह्या तंत्रज्ञानाचा वापर भारत कुठे आणि कसा करू शकतो? तसेच ह्या तंत्रज्ञानाचे दूरगामी फायदे हे सगळं आपण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे.

स्वनातीत वेग हा ध्वनीच्या हवेतील वेगाशी निगडित आहे. ध्वनी हवेतून साधारण १२२५ किलोमीटर/ तास ह्या वेगाने प्रवास करतो. जेव्हा एखादी वस्तू ह्या वेगाच्या पुढे प्रवास करते तेव्हा त्याला स्वनातीत असं म्हणतात. ध्वनीच्या १ ते ५ पट स्वनातीत वेगात ज्याला मॅक असही म्हणतात जेव्हा एखादी वस्तू प्रवास करते तेव्हा त्याला सुपरसॉनिक असं म्हणतात. सुपरसॉनिक वेग हा जास्तीत जास्त ६१७४ किलोमीटर / तास इतका असू शकतो. ह्याच्या पलीकडे जेव्हा एखादी वस्तू प्रवास करायला लागते तेव्हा त्या वेगाला हायपरसॉनिक असं म्हंटल जाते. १९९८ साली भारत आणि रशिया ह्या दोघांनी करार करून सुपरसॉनिक वेगाने जाणारं क्षेपणास्त्र बनवण्याच्या कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला. ह्याचेच फळ म्हणजे जगातील सगळ्यात वेगाने जाणारं सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र 'ब्राह्मोस'. ब्राह्मोस साधारण मॅक ३ वेगाने ३७०० किलोमीटर / तास वेगाने प्रवास करते. हा वेग ह्या क्षेपणास्त्राला सगळ्यात घातक बनवतो. कारण इतक्या प्रचंड वेगाने जाताना जेव्हा हे आपल्या लक्ष्याचा वेध घेते तेव्हा त्याच्या क्षमतेपेक्षा कित्येक पट आघात हा त्याच्या गतिशील उर्जेमुळे (कायनेटिक एनर्जी) होतो. 

ब्राह्मोस क्षेपणास्त्राने हा वेग गाठणं हे अतिशय किचकट तंत्रज्ञान आहे. सुपरसॉनिक वेग गाठण्यासाठी इंधनाचे ज्वलन पण त्याच वेगाने होणं गरजेचं असते. इंधनाचं ज्वलन वेगाने होण्यासाठी हवा म्हणजेच ऑक्सिजन ही त्याच वेगाने इंजिन मध्ये जाणं अपेक्षित असते. अश्या प्रचंड वेगासाठी जी इंजिन वापरण्यात येतात त्यांना रॅमजेट इंजिन म्हणतात. ह्या इंजिनामध्ये क्षेपणास्त्राच्या वेगामुळे आत येणाऱ्या हवेचा वेग कमी करून त्याचा  प्रज्वलनासाठी वापर केला जातो. ह्याचा अर्थ रॅमजेट इंजिन ही एका विशिष्ठ वेगानंतर वापरली जाऊ शकतात. ब्राह्मोस मध्ये आधी जेट इंजिनाचे प्रज्वलन करून एक विशिष्ठ गती क्षेपणास्त्राला दिली जाते. त्यानंतर ब्राह्मोस च रॅमजेट इंजिन प्रज्वलित होऊन त्याला त्याचा स्वनातीत वेग देते. रॅमजेट इंजिन साधारण मॅक ५  (६१७४ किलोमीटर / तास) एखाद्या क्षेपणास्त्राला वेग देऊ शकते. त्यापुढे ही वेग हवा असल्यास ह्यावर मर्यादा येतात. 

ध्वनी पेक्षा ५ पट अधिक वेगाने जाण्यासाठी तंत्रज्ञानातील एक वरचं पाऊल टाकावं लागते ते म्हणजे स्क्रॅमजेट इंजिन. स्क्रॅमजेट इंजिन हे रॅमजेट इंजिना प्रमाणे काम करते पण ह्यात एक वेगळी गोष्ट असते ती म्हणजे हे इंजिन सुपरसॉनिक वेगाने आत येणाऱ्या हवेला वापरून इंधनाच प्रज्वलन करत जवळपास मॅक १५ म्हणजे जवळपास १८,५२२ किलोमीटर / तास इतका प्रचंड वेग गाठू शकते. भारताच्या डी.आर.डी.ओ. ने यशस्वीरीत्या (hypersonic technology demonstrator vehicle (HSTDV) चाचणी केली. ह्यात ह्या प्रक्षेपकाने हायपरसॉनिक म्हणजे जवळपास मॅक ६ पेक्षा ( ७४०० किलोमीटर / तास ) अधिक वेगाने यशस्वी प्रवास केला. ह्यामुळे भारताने अतिशय किचकट असं स्क्रॅमजेट इंजिन तंत्रज्ञान मिळवलं आहे. ह्याचा वापर भारत आंतरखंडीय क्षेपणास्त्र तसेच ब्राह्मोस २ मध्ये करणार आहे.  

हायपरसॉनिक वेगाने क्षपणास्त्राची घातकता कित्येक पट वाढणार आहे. उदाहरण द्यायचं झालं तर एक ध्वनीच्या वेगाने म्हणजे मॅक १ वेगाने लक्ष्यावर आदळणार क्षेपणास्त्र जेव्हा मॅक ६ वेगाने लक्ष्यावर आदळेलं तेव्हा त्याने केलेल्या हानीची तीव्रता तब्बल ३६ पट जास्त असेल. म्हणजे ३६ क्षेपणास्त्र सोडण्याऐवजी एकच क्षेपणास्त्र मॅक ६ वेगाने तितकाच आघात करू शकत. आता लक्षात आलं असेल की जेव्हा ब्राह्मोस २ हायपरसॉनिक वेगाने आपल्या लक्ष्यावर प्रहार करेल तेव्हा विध्वंसाची तिव्रता किती प्रचंड असेल. इतक्या प्रचंड वेगाने जाणाऱ्या क्षेपणास्त्राला शोधणं आणि त्याला निष्प्रभ करणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळेच आज भारताने हायपरसॉनिक युगात प्रवेश केला आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. 

ता. क. :- ब्राह्मोस १ हे जगातील सगळ्यात घातक आणि सगळ्यात वेगाने जाणारं क्षेपणास्त्र असून असं क्षेपणास्त्र आकाश, जमीन, पाणी अश्या सर्व स्तरातून डागता येणारा भारत जगातील एकमेव देश आहे. ब्राह्मोस मॅक ३ वेगाने जमिनीपासून अवघ्या १० मीटर उंचीवरून आपल्या लक्ष्याचा वेध घेऊ शकते. आजवर ह्या क्षेपणास्त्राच्या ७० पेक्षा अधिक चाचण्या झाल्या असून ह्याच्या अचूकतेने अनेक देशांना अचंबित केलेलं आहे. ब्राह्मोस २ हे हायपरसॉनिक पुढलं व्हर्जन असून ते तब्बल मॅक ७ ( ८६०० किलोमीटर / तास ) वेगाने लक्ष्याकडे कूच करण्यास सक्षम असेल. 

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




No comments:

Post a Comment