Sunday, 6 September 2020

बर्फातले सिंह 'स्पेशल फ्रंटिअर फोर्स'... विनीत वर्तक ©

 बर्फातले सिंह 'स्पेशल फ्रंटिअर फोर्स'... विनीत वर्तक ©

२९-३० ऑगस्ट २०२० रोजी भारताने चीन विरुद्ध केलेल्या कारवाईमुळे चीन पूर्णपणे एक पाऊल मागे गेला आहे. ह्या कारवाई च श्रेय ज्या सैनिकांकडे गेलं आहे ते सैनिक आहेत 'स्पेशल फ्रंटिअर फोर्स'. चीनसह पाकीस्तान ने ह्या नावाचा धसका घेतला आहे. ह्यामागे काही कारण आहेत जी समजून घ्यायला आपल्याला त्यांचा इतिहास, कार्यपद्धती आणि हिमालयाच्या अतिउंचीवरील लढाईतील त्यांच महत्व लक्षात घेतलं पाहीजे. पाकीस्तान तर सोडाच पण चीन ला ही गेली ४० वर्ष भारतीय सेनेची अशी कुठली फोर्स अस्तित्वात आहे ह्याची भनक सुद्धा नव्हती. खरे तर इतके वर्ष भारतीयांना ही असं कुठलं भारतीय सेनेचा भाग असलेलं युनिट अस्तित्वात आहे ह्याची माहिती नव्हती. तर ही 'स्पेशल फ्रंटिअर फोर्स' म्हणजे नक्की काय आहे? भारतीय सेना असताना ह्या युनिट ची गरज आणि ह्याचा इतिहास? इतके वर्ष गुप्ततेत ठेवलेल्या ह्या युनिट ला आता जगाच्या पातळीवर आणण्यामागची भुमिका ह्या सगळ्या आपण समजून घ्यायला हव्यात. 

'स्पेशल फ्रंटिअर फोर्स' ची स्थापना १४ नोव्हेंबर १९६२ मध्ये झाली. १९६२ च्या युद्धानंतर भारत- चीन सिमेवर गुप्त सैनिकी कारवाया करण्यासाठी ह्याची स्थापना केली गेली. मेजर जनरल सुजान सिंग उबान हे त्याचे पहिले कमांडिंग ऑफिसर झाले. आधी ह्या युनिट च नाव 'एस्टॅब्लिश २२' असं ठेवण्यात आलं होतं. ह्या फोर्स चा इतिहास समजुन घ्यायचा असेल तर थोडं मागे जावं लागेल. १९५९ साली चीन ने तिबेटवर अनधिकृतरीत्या कब्जा केल्यावर तिबेटी धर्मगुरू 'दलाई लामा' ह्यांना भारत सरकारने भारतात आश्रय दिला. त्यांच्यासोबत आलेल्या अनुयायांना सुद्धा भारताने आश्रय दिला. आपलं घर, आपला देश, आपलं सर्वस्व गमावून बसलेल्या अनेक तिबेटी नागरीकांच्या मनात चीन विरुद्ध असंतोष खदखदत होता. १९६२ ला भारताने एक मोठा भूभाग चीन ला गमावल्या नंतर त्या रक्तरंजित आठवणी ताज्या असताना आय.बी. चे तत्कालीन डायरेक्टर बी.एन.मुलीक ह्यांनी ह्या तिबेटी लोकांची फोर्स बनवावी अशी कल्पना मांडली. अमेरीकेची गुप्तचर संस्था सी.आय.ए. च्या मदतीने ह्या असंतोषात धुमसत असलेल्या तिबेटी नागरीकांची एक सिक्रेट फोर्स बनवण्याला भारत सरकारने मान्यता दिली. त्यातून जन्म झाला 'स्पेशल फ्रंटिअर फोर्सचा'. ह्यांच चिन्ह आहे 'इन्सिग्निया' म्हणजेच 'बर्फातले सिंह'.  

ह्या फोर्स ची निर्मिती करताना त्याला पूर्णपणे स्वायत्तता देण्यात आली. त्याची गोपनियता राहावी म्हणून ह्यातील सर्व सैनिक हे तिबेटी नागरीक तर भारतीय सेना आणि एस.एफ.एफ. ह्या दोघांमध्ये समन्वय राहावा म्हणून ह्याची कमांड मेजर जनरल हुद्द्यावरील भारतीय सेनेच्या अधिकाराच्या हातात देण्यात आली. ही फोर्स भारताच्या  Intelligence Bureau (IB), Research and Analysis Wing (RAW),  intelligence agency  अश्या गुप्तचर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली काम करते. ह्याचे कमांडिंग ऑफिसर भारताच्या पंतप्रधानांना रीपोर्ट करतात. ह्याचा सरळ अर्थ आहे की ह्याच्या सर्व कारवायांची जबाबदारी आणि निर्देश हे पंतप्रधान कार्यालयातून दिले जातात. भारतीय सेनेचा भाग नसल्याने ह्यांच्या सर्व कारवाया ह्या अतिशय गुप्ततेने चालतात. ह्या 'स्पेशल फ्रंटिअर फोर्स' ची गुप्तता इतकी राखली गेली होती की अशी कोणती फोर्स भारताची आहे ह्याचा अंदाज चीन ला यायला ४० वर्षाचा कालावधी जावा लागला. 'स्पेशल फ्रंटिअर फोर्स' ची गणना जगातील सगळ्यात घातक समजल्या जाणाऱ्या फोर्स मध्ये होते. ह्यातील सैनिक हे मृत्यूलाही घाम फोडणारे असतात. कोणत्याही स्थितीत आपलं लक्ष्य पुर्ण केल्याशिवाय किंवा शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या ध्येयापासून ह्यांना कोणीही परावृत्त करू शकत नाही. ह्या फोर्समध्ये पुरुष आणि महिला असे दोन्ही सैनिक असून त्यांची संख्या क्लासिफाईड म्हणजे गुप्त ठेवलेली आहे.  

'स्पेशल फ्रंटिअर फोर्स' च चिन्ह म्हणजे 'बर्फातले सिंह' हे त्यांच्या अस्मितेचं प्रतीक आहे ज्याने चीन आणि पाकीस्तान च्या सैन्याला घाम फुटतो. ज्या प्रमाणे सिंह हा जंगलाचा राजा असतो त्या प्रमाणे हे सैनिक बर्फीय प्रदेशातील सिंह आहेत. अति उंचीवरील विरळ वातावरणात, बर्फीय प्रदेशात ह्या सैनिकांना कोणीही मात देऊ शकत नाही. ह्याच कारण त्यांची शारीरीक क्षमता. हे सर्व सैनिक तिबेट मधील आहेत. मुळातच ह्यांच्या अनेक पिढ्या १५०००-१६००० फुटावर राहत होत्या. ह्या कारणामुळे ह्याच्यात अनुवंशकीय असे बदल आहेत की ज्यामुळे हे सैनिक इतक्या अतिउंचीवर सहजरीत्या शारीरीकदृष्ट्या कठीण काम करू शकतात. त्यात ह्या सैनिकांना ट्रेनिंग आधी अमेरीकेच्या सी.आय.ए. आणि आता भारताच्या गुप्तचर संस्थेच्या निर्देशानुसार दिलेलं असुन हे कोणत्याही प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीत असामान्य कामगिरी करू शकतात. त्यामुळेच ह्यातील एक सैनिक हा शत्रुच्या १० सैनिकांच्या तोडीस तोड समजला जातो. १९७२. १९७५, १९९९ अश्या सर्व युद्धात ह्या फोर्स ने आपलं योगदान दिलेलं आहे पण त्यांच्या गुप्ततेमुळे सामान्य लोकांमध्ये ह्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. जेव्हा भारताने 'स्पेशल फ्रंटिअर फोर्स' ही भारत-चीन सरहद्दीवर तैनात केली आहे असं चीन ला समजल्यावर चीन च्या सैनिकांचा आत्मविश्वास तिकडेच गळून पडलेला आहे. 

इतके वर्ष अतिशय गुप्ततेने आपलं मिशन पुर्ण करणाऱ्या 'स्पेशल फ्रंटिअर फोर्स' आता जगाच्या रडारवर आणण्यामागे खुप सारे हेतू आहेत. चीन ज्या भागातून भारताविरुद्ध उभा आहे तो भाग ह्या सैनिकांची मातृभुमी आहे. आपल्या मातृभूमी ला पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ह्यातील प्रत्येक सैनिक हा आसुसलेला आहे. ह्या जमिनीचा कोपरा न कोपरा ह्या सैनिकांना माहीत आहे. त्याच शिवाय इथल्या वातावरणात म्हणजेच थंडीत हे लोकं गेली कित्येक दशके राहत आलेले आहेत. चीन आता भारतापुढे वाटाघाटीसाठी मागेपुढे करतो आहे. चीन इतका नमला आहे की त्याच्या संरक्षण मंत्र्यांना भारताच्या संरक्षण मंत्र्यांशी रशिया इकडे बोलण्यासाठी वेळ मागावी लागली. त्यांच्या हॉटेल ला जाऊन त्यांची भेट घ्यावी लागली. जो चीन मस्तवाल होऊन जगाला झुकवतो आहे त्याचा संरक्षणमंत्री भेटीसाठी वेळ मागतो आहे ह्यातच चीन किती पावलं मागे गेला आहे हे लक्षात आलं असेल. हे सगळं कशासाठी तर ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या थंडीचा सामना करण्याची ताकद चीन च्या सैन्याकडे नाही न त्यांच्याकडे तशी व्यवस्था आहे. उलट भारताची सेना कित्येक दशके ह्या तपमानात रहात आलेली आहे. त्यात 'स्पेशल फ्रंटिअर फोर्स' च्या येण्याने भारताची शक्तीत १००% वाढ झालेली आहे. अश्या प्रतिकूल परीस्थितीत आपली सेना बंदूक काय मागे पळायला पण शिल्लक राहणार नाही ह्याची पुर्ण जाणीव चीन ला आहे. 

'स्पेशल फ्रंटिअर फोर्स' च्या जागतिक पटलावरील उदयाने तिबेटी जनतेला भारताने एक संदेश दिला आहे. तिबेटी लोक भारताच्या सहकार्याने तिबेटसाठी उभी ठाकली आहेत. तिबेट ला जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर भारतासोबत या. हा संदेश चीन ला अस्वस्थ करणारा आहे. कारण तिबेटी लोकांच्या सहकार्याशिवाय आपला इकडे टिकाव लागणार नाही तसेच तिबेटी जनतेचा उठाव आपल्याला भारी पडू शकतो ह्याची पूर्ण जाणीव त्याला आहे. एकूणच काय तर 'स्पेशल फ्रंटिअर फोर्स' ने आपल्या पराक्रमाने तिबेट सोबत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवत ठेवला आहे. 'स्पेशल फ्रंटिअर फोर्स' मधील बर्फातील सिंहांना माझा कडक सॅल्यूट. त्यांच्या युद्धगीतामधील काही पंक्ती ज्यात भारताचा गौरव दिसून येतो त्या इकडे लिहितो आहे, 

“The Chinese snatched Tibet from us, and kicked us out from our home; Even then, India kept us like their own... Our young martyrs have no sadness whatsoever; Whether it is Kargil or Bangladesh; We will not lose our strength; Whenever opportunities arise; We will play with our lives.”

जय हिंद!!!

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.   



No comments:

Post a Comment