Wednesday 16 September 2020

ओझोन... विनीत वर्तक ©

 ओझोन... विनीत वर्तक ©

१६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. ओझोन हा शब्द सामान्य माणसाला ऐकून माहीत असतो. पृथ्वीच्या वातावरणात ओझोन नावाच काहीतरी असते आणि त्याची टक्केवारी कमी झाल्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो अथवा प्रदुषण हे त्याच प्रमुख कारण असते इतकच  ज्ञान सामान्य माणसाला असते. पण आपल्या पृथ्वीवरच्या अस्तित्वात अतिशय महत्वाची भुमिका बजावणारा ओझोन नक्की काय आहे? अचानक असं काय झालं की जगभर ओझोन बद्दल चिंता वाटू लागली? चांगला ओझोन आणि वाईट ओझोन म्हणजे काय? आजच्या दिवशीच ओझोन दिवस साजरा का करायचा? आपण एक सामान्य माणूस म्हणून ओझोन च्या संवर्धनासाठी काय करू शकतो? अश्या अनेक गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात. आजचा ओझोन दिवस हा तुमच्या आमच्यासाठी नाही तर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. 

ओझोन हा एक रेणू आहे. ऑक्सिजन चे ३ अणू मिळून ओझोन चा एक रेणू तयार होतो. Ozone (O3) हे त्याच रसायनशास्त्रातील नाव आहे. पृथ्वीच्या वातावरणात ह्याच प्रमाण इतर वायूंच्या तुलनेने खूप अत्यल्प असलं तरी पृथ्वीवरील सजीव सृष्टीसाठी अतिशय महत्वाच आहे. ओझोन नक्की करतो काय? हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं पृथ्वीच्या वातावरणाचे थर समजून घ्यायला हवेत. जमिनीपासून ते साधारण १० किलोमीटर उंचीवरच्या वातावरणाला ट्रोपोस्पियर असं म्हणतात. १० किलोमीटर ते ५० किलोमीटर उंचीवर असणाऱ्या वातावरणाला स्ट्रेटोस्पियर तर ५० किलोमीटर ते ८० किलोमीटर उंचीवर असणाऱ्या वातावरणाला मेसोस्पियर म्हणतात. ह्या सगळ्यात ओझोन असतो साधारण २५ किलोमीटर उंचीवर स्ट्रेटोस्पियर मध्ये. ओझोन काय करतो तर सूर्यापासून निघालेले (अल्ट्राव्हॉयलेट) अतिनील किरण जेव्हा ह्या स्ट्रेटोस्पियर मधून प्रवास करतात. तेव्हा त्यांची ऊर्जा वातावरणातील ऑक्सिजन अणू शोषून घेतात आणि त्यांची साखळी तुटते. ऑक्सिजन हा दोन अणूपासून बनलेला असतो (O2). जेव्हा ही साखळी तुटते तेव्हा त्याला ऍटोमिक ऑक्सिजन असं म्हणतात. 

हे विलग झालेले ऑक्सिजन चे अणू आजूबाजूच्या ऑक्सिजन च्या अणू सोबत आपली मैत्री करतात. त्यांच्या मैत्रीतून जन्माला येतो ओझोन (O3). आता हा ओझोन जेव्हा पुन्हा एकदा सूर्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने ऊर्जा घेऊन येणाऱ्या (अल्ट्राव्हॉयलेट) अतिनील किरणांची ऊर्जा शोषून घेतो. ऊर्जा मिळाली की पुन्हा एकदा ओझोन आपली मैत्री तोडतो. ह्यात ऑक्सिजन तयार होतो म्हणजे (O2) आणि एक मोकळा ऑक्सिजन चा अणू. आता हा मोकळा ऑक्सिजन चा अणू पुन्हा एकदा दुसऱ्या ऑक्सिजन च्या अणू शी मैत्री करतो आणि पुन्हा ओझोन (O3) तयार होतो. थोडक्यात काय तर ओझोन-ऑक्सिजन सायकल चालू रहाते. पण ह्या सगळ्यात जी महत्वाची गोष्ट घडते ती म्हणजे सूर्याकडून आलेल्या (अल्ट्राव्हॉयलेट) अतिनील किरणांची सगळी ऊर्जा ह्या ओझोन- ऑक्सिजन खेळात संपून जाते. पृथ्वीवरील सजीवांसाठी अत्यंत हानिकारक असलेले हे अल्ट्राव्हॉयलेट किरण पृथ्वीच्या जमिनीवर पोहचू शकत नाहीत. हाच ओझोन जेव्हा पृथ्वीच्या वातावरणाच्या खालच्या थरात येतो म्हणजे ट्रोपोस्पियर मध्ये तेव्हा तो आपल्या फुफुसांना आणि वनस्पतींना अपायकारक ठरतो. म्हणून ओझोन-ऑक्सिजन च प्रमाण वातावरणात व्यवस्थित राहणं अतिशय गरजेचं आहे. 

 गेली लाखो वर्ष हा खेळ पृथ्वीच्या वातावरणात सुरळीत चालू होता. जितक्या ओझोन ची निर्मिती होतं होती. तितका ओझोन पुन्हा नष्ट होत होता. ह्यामुळे ओझोन च पृथ्वीच्या वातावरणातील प्रमाण हे व्यवस्थित होतं. मानवाने जेव्हा पृथ्वीच्या खालच्या वातावरणात जेव्हा प्रदूषण करायला सुरवात केली तेव्हा ह्यातील काही कण हे पृथ्वीच्या ह्या वरच्या वातावरणात येऊन पोहचले. त्यातील एक महत्वाचा घटक होता  chlorofluorocarbons (CFCs) क्लोरोफ्लुरोकार्बन. हा घटक वातानुकूल संयंत्रात, एअर फ्रेशनर,  वापरला जात होता. हा घटक जेव्हा ओझोन शी आपली मैत्री करू लागला तेव्हा ओझोन च अस्तित्व धोक्यात येऊ लागलं. जेव्हा सी.एफ.सी. ओझोन सोबत मैत्री करतात तेव्हा ते ओझोन ला संपवून ऑक्सिजन ची निर्मिती करतात. ह्यामुळे ओझोन चा थर झपाट्याने कमी होऊ लागला. ओझोन कमी झाल्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांना पृथ्वीवर येण्याचा रस्ता मोकळा झाला आणि ह्याचे परीणाम पृथ्वीवर दिसायला सुरवात झाली. पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवावर जिकडे अतिशीत तापमान असते तिकडे सी.एफ.सी. ने झपाट्याने ओझोन चा खात्मा केला. पृथ्वीच्या ध्रुवावर अक्षरशः ओझोन च होल तयार झालं. 

कुठेतरी ओझोन ला वाचवण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत हे लक्षात आल्यावर जगातील सर्व देशांनी १६ सप्टेंबर १९८७ ला The Montreal Protocol on Substances that Deplete the Ozone Layer (the Montreal Protocol) ह्या प्रोटोकॉल ची अमंलबजावणी केली. ह्या नुसार chlorofluorocarbons (CFCs) क्लोरोफ्लुरोकार्बन चा वापरावर पूर्णतः बंदी आणण्यासाठी प्रत्येक देशाने प्रतिबद्ध व्हाव अशी रचना केली गेली. ह्या कायद्यात अनेक पुढचे बदल करताना ग्रीन हाऊस गॅसेस आणि सी.एफ.सी. च्या वापरावर अनेक प्रकारे निर्बंध आणले गेले. ह्या कराराचा परीणाम म्हणून ओझोन चा थर आता आपला पर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे. युनायटेड नेशन च्या अंदाजानुसार २०५० पर्यंत तो थर आपल्या १९८० च्या पातळीवर पुन्हा एकदा जाईल असा अंदाज आहे. ओझोन चा थर घटल्यामुळे माणसाला कॅन्सर, मोतीबिंदू सारखे आजार होण्याचा धोका खूप प्रमाणात वाढला आहे.     

आपण एक सामान्य नागरीक म्हणून ह्या ओझोन च्या थराला वाचवण्यासाठी आपलं योगदान देऊ शकतो. आपल्या घरातील वातानुकूलित संयंत्र व्यवस्थित ठेवणं, हेअर स्प्रे, रूम फ्रेशनर आणि इतर कोणत्याही गोष्टी ज्या वातावरणात सी.एफ.सी. सोडतात त्यांचा वापर पूर्णपणे बंद करणं आपल्या हातात आहे. २०१० पूर्वीच्या ए.सी. मध्ये आर २२ नावाचा गॅस वापरला गेला आहे जो सी.एफ.सी. वातावरणात सोडतो. अशी युनिट बंद करून नवीन ए.सी. युनिट ज्यात आर ४१० नावाचा गॅस वापरला जातो ते आपण बसवू शकतो. ओझोन ला नष्ट होउ न देणं आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे तेव्हा ती आपण आपल्या परीने पूर्ण करायला हवी. आजच्या ओझोन दिवसाच्या निमित्ताने ओझोन ला वाचवण्यासाठी आपण वचनबद्ध होऊयात. 

फोटो स्रोत :- नासा, गुगल 

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment