मनचला…मन चला तेरी ओर... विनीत वर्तक ©
सकाळच्या सूर्याची कोवळी तिरीप अंगावर झेलत त्या शांत आसमंताला अनुभवत वाळूच्या जमीनीवर आपली पावलं उमटवत माझा सकाळचा वॉक सुरु होता. निरभ्र आकाश अनुभवताना एक डोळा घड्याळ्यावर पावलं मोजत असताना कानात मात्र एक आवडत गाण सुरु होत. गाण्याचा आणि माझा संबंध तसा खूप लांबचा आहे. कारण सूर- ताल हे कधीच कळले नाहीत. जे मनाला भावत ते चांगल ही माझी आवड गाण्यापुरती मर्यादित आहे. त्या गाण्याच्या शब्दांनी मात्र कुठेतरी विचारात टाकलं. शफ़कत अमानत अली चा तो आवाज कुठेतरी आत साद घालत होता...
दुनिया जहां की बन्दिशों की ये कहाँ परवाह करे
जब, खींचे तेरी डोर, खींचें तेरी डोर
मनचला, मन चला तेरी ओर
आयुष्यात अशी अनेक माणस येतात आणि त्यांच्यासोबत येताना खूप सार चैतन्य आणि ऊर्जा घेऊन येतात. त्यांच येण कधीतरी रटाळ बनलेल्या आपल्या आयुष्याला असं काही वळण लावते की पुन्हा एकदा त्या निरस झालेल्या आयुष्यात रंग भरतात. कुठेतरी असं वाटते की आता जगण्यासाठी एक नवी उमेद मिळाली. ते क्षण आपल्या वाट्याला किती काळ असतील ह्याचा अंदाज मात्र कोणाला नसतो. अश्याच एखाद्या अवचित क्षणी आणि एखाद्या वळणावर ती व्यक्ती आपल्यापासून लांब जाते. तर कधी आपण त्या व्यक्तीपासून लांब होतो. कारणं काही असोत पण त्या क्षणाच्या आठवणी मात्र मनात घर करून राहतात.
पुलाखालून बरचसं पाणी वाहून जाते. एका नवीन वळणावर आणि आयुष्याचा प्रवासात अनेक नवीन फाटे फुटतात पण कधीतरी नकळत पुन्हा त्या आठवणी समोर येतात ह्या ओळींसारखीच,
खामोशियों की सूरतों में
ढूँढे तेरा शोर, ढूँढे तेरा शोर
सकाळच्या त्या शांततेत मी त्या व्यक्तीला पुन्हा शोधू लागतो पुन्हा एकदा माझं मन त्याच शेवटच्या क्षणाकडे थांबते जेव्हा मी तो प्रवास थांबवला होता. कोण चूक आणि कोण बरोबर ह्यापेक्षा आपल्या आयुष्याचा ती व्यक्ती भाग होती कुठेतरी काही क्षण का होईना आपल्या जवळ होती हे मनात कुठेतरी येत रहाते. आपण घेतलेला निर्णय चूक होता की बरोबर? घडलेला प्रसंग थांबवू शकलो असतो का? बदलवू शकलो असतो का? असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात ज्याची उत्तर ना आपल्याजवळ असतात ना त्याच्याजवळ. उत्तर देणारा काळ मात्र फक्त पुढे सरकत असतो. त्याच क्षणी पुढच्या ओळी आपल्या मनात रुंजी घालू लागतात.
सीखे फिर भी कभी नहीं साज़िशें
तेरे लिए आज खुद से ही भागे हैं
हिम्मत के टुकड़े बटोर
हो भागे ज़माने से छुप के दबे पाँव
जैसे कोई चोर, जैसे कोई चोर
त्या चोराप्रमाणे आपण हळूच मनाच्या त्या कोपऱ्यात मी गुपचूप जाऊन येतो. हाताशी पुन्हा एकदा काहीतरी नवीन घेऊन बाहेर येतो आणि स्वतःशी म्हणतो,
मनचला…मन चला तेरी ओर......
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment