#दुर्गाशक्ती भाग ५ ... वैज्ञानिक रोहिणी गोडबोले... विनीत वर्तक ©
चूल आणि मूल यांत रमणारी भारतीय स्त्री जरी घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभी राहायला शिकली, तरी तिच्यासाठी काही क्षेत्रांचा विचार करणं शक्यच नव्हतं. काही क्षेत्रांत पुरुषांची मक्तेदारी होती. अश्या एखाद्या क्षेत्रात एखाद्या स्त्रीने प्रवेश करून, त्यात आपलं स्थान निर्माण करणं हा भाग तर दूरच पण अश्या एखाद्या क्षेत्रात काम करणं हा विचार पण क्रांतिकारी होता. मुलींनी शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभं रहावं अशी पुढारलेली विचारसरणी असलेल्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात रोहिणी गोडबोले यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांना गणित आणि भौतिकशास्त्राची आवड होती. मुलींसाठी असणाऱ्या शाळेत शिकताना तिकडे विज्ञान हा विषय त्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट नव्हता, त्यामुळे स्कॉलरशिपसारखी परीक्षा देऊन विज्ञानाचा अभ्यास त्यांनी केला. गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांतून शिकून त्यात कारकीर्द होऊ शकते हे त्यांच्या ध्यानीमनी पण नव्हतं. गणितात गोडी वाढवण्यासाठी एखादी शिकवणी लाव, हा त्यांच्या शिक्षकांनी दिलेला सल्ला त्यांनी पाळला आणि गणित या विषयातली त्यांची आवड अजून वाढली. गणितज्ञ होऊन आपल्याला नोकरी मिळेल की नाही याची शंका वाटल्याने त्यांनी आपलं लक्ष भौतिकशास्त्राकडे वळवलं.
पुण्याच्या परशुरामभाऊ कॉलेज मधून बी.एस.सी.ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण मुंबई आय.आय.टी. मधून केलं. आपल्या विज्ञानातील अभ्यासाला पुढे नेण्यासाठी त्यांनी कण-भौतिकशास्त्राची (particle physics) निवड केली. कण-भौतिकशास्त्रात डॉक्टरेट ही पदवी त्यांनी प्रतिष्ठित अश्या स्टोनी ब्रुक इथल्या न्यूयॉर्क विद्यापीठातून मिळवली. अमेरिकेत पुढे संशोधन करण्याची संधी असतानासुद्धा त्या १९७९ साली भारतात परत आल्या. भारतात आल्यावर त्यांनी टी.आय.एफ.आर. (Tata Institute of Fundamental Research) इकडे प्राध्यापक म्हणून काम सुरु केलं. त्यानंतर १९८२ ते १९९५ त्या मुंबई विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक होत्या. १९९८ पासून त्यांनी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स, बंगळुरू इकडून प्राध्यापक म्हणून आपलं काम सुरु ठेवलं आहे. या सर्व काळात त्यांनी जवळपास १५० पेक्षा जास्ती शोधप्रबंध लिहीले आहेत, तर अजून १५० पेक्षा जास्ती शोधप्रबंधांमध्ये त्या सहकारी आहेत.
कण-भौतिकशास्त्रातील महत्वाचा शोध मानल्या गेलेल्या हिग्स-बोसॉन हा कण शोधण्यासाठी गेली ३० वर्ष त्यांनी संशोधन केलं आहे. त्यांच्या या संशोधनामुळे त्यांना,
International Detector Advisory Group (IDAG) for the International Linear Collider at the European research lab, CERN
या जगातील अतिशय आघाडीच्या भौतिक विज्ञानातील संशोधकांच्या ग्रुपचं मानद सदस्यत्व प्राप्त झालं आहे. भौतिक शास्त्रातील स्टॅंडर्ड मॉडेल ज्यात प्रोटॉन, फोटॉन, न्यूक्लिअस अश्या कणांवर त्यांनी संशोधन आणि अभ्यास केला आहे. याशिवाय भौतिकशास्त्रातील हाय एनर्जी कोलायडरमधून नवीन कणांच्या निर्मितीसाठी त्यांनी आपलं योगदान दिलं आहे.
२००२ साली जगातील भौतिकशास्त्रात संशोधन करणाऱ्या स्त्रियांच्या परिषदेसाठी पॅरीस इकडे जाण्याचा बहुमान मिळालेला आहे. (International Conference on Women in Physics) पॅरीस इथे गेले असताना स्त्रियांना या क्षेत्रात काम करण्यासाठी समाजाची मानसिकता जागतिक पातळीवर आणि भारतात किती संकुचित आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यासाठी समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याचं ठरवलं. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आपले सहकारी रामकृष्ण रामास्वामी यांच्या सोबत "Lilavati’s Daughters: The Women Scientists of India" हे पुस्तक लिहीलं. या पुस्तकाचं नावही त्यांनी भारताचे प्रसिद्ध गणितज्ञ भास्कराचार्य यांच्या गोष्टीवरून ठेवलं आहे. भास्कराचार्य ज्याप्रमाणे आपल्या गणितातील अडचणी मुलगी लीलावतीशी बोलत असत, त्याप्रमाणे या पुस्तकात भारताच्या स्त्री संशोधकांचा प्रवास लिहलेला आहे. भारतीय स्त्री वैज्ञानिकांचा हा प्रवास, या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी भारतातील स्त्रियांना प्रोत्साहन देईल.
एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आपला प्रवास सुरू करून परदेशी संशोधन करण्याची संधी उपलब्ध असतानासुद्धा भारतातच राहून, कण-भौतिकशास्त्रात आपलं भरीव योगदान त्यांनी भारतासाठी दिलं. नुसतं संशोधनापुरतं मर्यादीत न राहता आपल्या लिखाणातून, मार्गर्शनपर भाषणांतून भारतातील अनेक स्त्रियांना संशोधन क्षेत्रात येण्यासाठी तसेच सन्मानाने वागणूक मिळवून देण्यासाठी त्यांचे अविरत प्रयत्न सुरु आहेत. आजवर अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी त्यांचा जागतिक पातळीवर गौरव झालेला आहे. भारत सरकारने त्यांच्या या कार्याची दखल घेताना त्यांना २०१९ साली पद्मश्री सन्मानाने गौरवलं आहे. स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च स्थान गाठू शकतात हे सिद्ध करताना वैज्ञानिक, प्राध्यापक रोहिणी गोडबोले यांनी दुर्गाशक्तीचं एक मूर्तिमंत उदाहरण भारतातील सगळ्याच स्त्रियांसमोर ठेवलं आहे. त्यांच्या या प्रवासाला माझा नमस्कार आणि पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा.
माहिती स्रोत :- रोहिणी गोडबोले पेज, गुगल
फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment