दुर्गाशक्ती भाग ३ .. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंग .. विनीत वर्तक ©
आकाशी झेप घे रे पाखरा, आकाशी झेप घे रे पाखरासोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा
हे गीत अनेकांनी आजवर ऐकलं असेल, पण त्या सोन्याच्या पिंजऱ्यातून निघून आकाशी झेप घेण्याची महत्वाकांक्षा आणि त्या स्वप्नांचा पाठलाग मात्र खूप कमी जण करतात. शिवांगी सिंगचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आपल्या आजोबांसोबत दिल्लीला एअरफोर्स म्युझिअम पाहायला गेलेल्या लहान शिवांगीला तिथली विमानं आणि हेलिकॉप्टर बघून एका वेगळ्याच स्वप्नांचं लक्ष्य गवसलं. घरी परत आल्यावरपण त्या निळ्या गणवेशाचं गारुड तिच्या मनातून कमी झालं नाही. मोठं होऊन त्याच निळ्या आकाशात झेप घेण्याचं तिनं ठरवलं. कितीही अडचणी समोर आल्या तरी आपलं लक्ष्य तिला साध्य करायचं होतं. अर्थात हा प्रवास तितकाच कठीण असणार होता याची जाणीवही तिला तितकीच होती.
आपल्या भावंडांसोबत गल्लीत क्रिकेट खेळणारी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शिवांगीने आकाशात भरारी घेण्यासाठी अभ्यासाकडे लक्ष द्यायला सुरवात केली. १०वी आणि १२वीच्या परीक्षा ती ९०% पेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झाली. नेहमीप्रमाणे सगळ्यांनी आता तू पुढे काय करणार? असे प्रश्न विचारायला सुरवात केली. तेव्हा शिवांगीचं उत्तर असायचं, मला आकाशाला स्पर्श करायचा आहे. त्यासाठी तिने बनारस (वाराणसी) हिंदू विद्यापीठात प्रवेश घेतला. तिकडून तिने आपले पुढचं शिक्षण पूर्ण करत भारतीय वायूदलात प्रवेश केला. वाराणसीमधली शिवांगी सिंग आता भारतीय वायुदलाच्या १७ नंबर "गोल्डन ऍरोज" स्क्वाड्रनचा भाग झाली. भारतीय वायुदलाने आपले दरवाजे लढाऊ वैमानिक म्हणून स्त्रियांसाठी खुले केल्यानंतर दुसऱ्या बॅचमध्ये शिवांगी सिंगचं स्वप्न प्रत्यक्षात खरं ठरलं.
भारतीय वायुदलाच्या १७ नंबर गोल्डन ऍरोज स्क्वाड्रनकडे मिग २१ बायसन या लढाऊ विमानांचं सारथ्य होतं. मिग २१ बायसन ही जवळपास ६ दशकं जुन्या असलेल्या विमानांचा भाग आहेत. भारताने रशियन Mikoyan-Gurevich MiG-21 मध्ये खूप सारे बदल करून मिग २१ बायसन विमान अजूनही वापरात ठेवलं आहे. ही विमानं चालवणं म्हणजे वैमानिकासाठी एक आव्हान आहे. एकतर ही विमानं खूप जुनी झाली आहेत, त्यात मिग २१ बायसनचा उड्डाण भरतेवेळी आणि उतरतेवेळी वेग हा जवळपास ३४० किलोमीटर/ तास असतो. त्यामुळे यांचं सारथ्य करणं हे खूप जिकीरीचं काम आहे. अश्या विमानांचे सारथ्य करण्याची संधी फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंगला २०१७ साली प्राप्त झाली. ''नभः स्पृशं दीप्तम्'' या शब्दांना खरं करत तिने आकाशाला गवसणी घातली. भारताचा प्रसिद्ध लढाऊ वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सोबत उड्डाण भरण्याची संधी फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंगला मिळाली.
१७ नंबर गोल्डन ऍरोज स्क्वाड्रनला आधुनिक बनवताना भारतीय वायुदलाने भारताच्या सगळ्यात आधुनिक आणि बहुचर्चित अश्या राफेल लढाऊ विमानांची जबाबदारी सोपवली. १६०० कोटी रुपये प्रत्येकी किंमत असणारं राफेल जगातील अत्याधुनिक आणि अतिशय प्रगत विमानात गणलं जातं. एकेकाळी जगातील सगळ्यात जुनी लढाऊ विमानं चालवणारी वैमानिक ते भारतातील सगळ्यात आधुनिक लढाऊ विमान चालवणारी वैमानिक हा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. एक लढाऊ वैमानिक बनणं अतिशय खडतर प्रवास आहे. शारिरीक तसंच मानसिक अश्या दोन्ही पातळ्यांवर तुम्हाला नेहमीच सर्वोत्तम रहावं लागतं. अतिशय अडचणीच्या काळात सुद्धा डोकं शांत ठेवून निर्णय घ्यावे लागतात. प्रत्येक लढाऊ विमान हे चालवण्यास वेगळं असतं याशिवाय त्याची रडार प्रणाली आणि इतर तंत्रज्ञान वेगळं असतं. हे सर्व आत्मसात करून अतिशय सहजतेने वापरता येणं अतिशय गरजेचं असतं. भारतीय वायुदलाला एक लढाऊ वैमानिक तयार करण्यासाठी १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. अश्या वैमानिकाच्या हातात जवळपास १६०० कोटी रुपयांचं लढाऊ विमान दिलं जातं तेव्हा त्याचं कौशल्य हे असामान्य असंच असतं.
फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंगने समाजाच्या चाकोरीतल्या जीवनाचा पिंजरा सोडत आकाशात भरारी घेतली आहे. सध्या ती मिग बायसन २१ ते राफेल या मधला प्रशिक्षणाचा प्रवास करत आहे. लवकरच आपलं प्रशिक्षण संपवून भारताच्या सर्वात आधुनिक आणि शत्रूच्या मनात धडकी भरवणाऱ्या राफेल विमानाचं सारथ्य करेल. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंगने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी भारताचं सगळ्यात जुनं लढाऊ विमान ते भारताचं सगळ्यात अत्याधुनिक लढाऊ विमानाचं सारथ्य करणे असा पल्ला गाठला आहे. हा पल्ला गाठणारी ती पहिली भारतीय महिला आहे. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंगने सर्वच भारतीयांसमोर आपल्या कर्तृत्वाने दुर्गाशक्तीचं एक वेगळं रूप समोर ठेवलं आहे. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंगच्या कर्तृत्वाला माझा सलाम आणि तिच्या पुढील प्रवासाला माझ्या खूप शुभेच्छा.
जय हिंद!!!
माहिती स्रोत :- गुगल
फोटो स्रोत:- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment