Friday, 23 October 2020

#दुर्गाशक्ती भाग ८ .. पद्मश्री आरती साहा .. विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती भाग ८ .. पद्मश्री आरती साहा .. विनीत वर्तक ©

१९४० साल होतं. भारताच्या स्वातंत्र्याचा लढा अंतिम टप्प्यात होता. त्या काळात कोलकाता इकडे एका बंगाली कुटुंबात आरती साहा यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांना पाण्याचं वेड होतं. त्या अवघ्या २ वर्षाच्या असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. आपल्या आजीकडे वाढलेल्या आरतीने आपल्या वडिलांसोबत पोहण्याचे प्राथमिक धडे गिरवले. आरतीची पाण्याची ओढ काहीतरी वेगळी आहे हे तिच्या वडिलांच्या चाणाक्ष नजरेतून सुटलं नाही. त्यांनी कोलकाता इकडे आरतीला पोहण्याच्या सरावासाठी पाठवलं. ज्याकाळी स्त्रियांनी घराच्या बाहेर पडणं मुश्किल होतं, त्याकाळी आरती पोहण्याचे धडे कोलकातामध्ये गिरवत होती. वयाच्या ५व्या वर्षी तिने पोहण्यातील पहिलं सुवर्णपदक जिंकलं. १९४६ ते १९५२ या काळात आरतीने पोहण्याच्या स्पर्धेत राज्यस्तरावर २२ बक्षीसे जिंकली.

आपल्या अंगभूत गुणांकडे लक्ष देताना आरती साहा यांनी आपल्या पोहण्यावर अजून मेहनत घ्यायला सुरवात केली. आपल्या खडतर परिश्रमाने त्यांनी १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये आपलं स्थान नक्की केलं. त्या १९५२च्या ऑलिम्पिकमधल्या भारतीय चमूतील वयाने सगळ्यात लहान स्पर्धक होत्या. ऑलिम्पिकमध्ये पदकाविना त्यांना भारतात यावं लागलं पण ऑलिम्पिकमधली जगातील सर्वोत्तम स्पर्धकांसोबतची स्पर्धा त्यांना अनुभवसंपन्न करून गेली. ऑलिम्पिकमधून परत आल्यावर त्यांनी आपलं लक्ष क्षमतेकडे केंद्रित केलं. आपली क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी रोज सरावाची मर्यादा वाढवत नेली. गंगा नदीच्या पात्रात लांब पल्ल्याच्या पोहण्याच्या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. १९५८ साली बांगलादेशच्या ब्रोजेन दास यांनी इंग्लिश खाडी पार करणारा आशिया खंडातील सर्वप्रथम  जलतरणपटू असा मान मिळवला. ब्रोजेन दास यांच्या पराक्रमाने आरती साहा प्रभावित झाल्या होत्या. त्यांनी ब्रोजेन दास यांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलं. याचवेळी ब्रोजेन दास यांनी, आपण जे मिळवलं ते तू पण मिळवू शकतेस, असा विश्वास व्यक्त केला.

ब्रोजेन दास तिकडेच थांबले नाहीत, तर त्यांनी आरती साहा यांचं नाव Butlin International Cross Channel Swimming Race या स्पर्धेसाठी स्पर्धा आयोजकांना सुचवलं. आरती साहा यांचं नाव पोहणाच्या स्पर्धेत भारतात गाजलेलं होतं. या स्पर्धेसाठी त्यांना सगळ्यांचा पाठिंबाही मिळत होता, पण मुख्य अडचण होती पैश्याची. या स्पर्धेसाठी, इंग्लंडला जाण्यासाठी लागणारा पैसा उभं करणं त्यांना शक्य नव्हतं. यावेळी आरती साहाची अडचण पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांनी, भारताचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या कानावर घातली. पंतप्रधानांच्या हस्तक्षेपानंतर आरती साहा यांचा या स्पर्धेसाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

१७ ऑगस्ट १९५९ रोजी फ्रांसमधील केप ग्रिस नेझ ते इंग्लंड च्या सॅण्डगेट इथलं जवळपास ६५.५ किलोमीटर अंतर कापण्यासाठी आरती साहा यांनी सुरूवात केली. आपली पायलट बोट वेळेत न आल्याने आरती साहा यांची अमूल्य अशी ४० मिनीटे वाया गेली. सर्वांपेक्षा उशिराने सुरूवात केल्यामुळे त्यांना इंग्लंडच्या तीरावर पोहोचण्याआधी पाण्याच्या उलट प्रवाहाचा सामना करावा लागला. इंग्लंडच्या तीरापासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर असताना पाण्याच्या उलट प्रवाहामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. पण म्हणतात ना,

"लहरों से डर कर नौका पार नहीं होती,कोशिश करने वालों की हार नहीं होती"

इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा आरती साहा यांनी मनाशी चंग बांधला होता. पुन्हा एकदा त्यांनी २९ सप्टेंबर १९५९ रोजी इंग्लिश खाडीत उडी घेतली. तब्बल ६५.५ किलोमीटरचं अंतर त्यांनी अवघ्या १६ तास २० मिनिटात पूर्ण करताना इंग्लिश खाडी पोहून जाणारी आशिया खंडातील पहिली महिला होण्याचा मान मिळवला. आपली स्पर्धा संपवून पाण्यातून बाहेर निघताच भारताचा तिरंगा त्यांनी इंग्लंडच्या आसमंतात फडकावला. त्यांचा हा विजय भारतीय खेळासाठी आणि एकूणच भारतीयांसाठी अविस्मरणीय असा होता. या अभूतपूर्व पराक्रमाची नोंद घेताना भारत सरकारने त्यांचा १९६० साली पद्मश्री सन्मानाने गौरव केला. खेळासाठी पद्मश्री सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. यानंतर भारतीय पोस्टाने त्यांच्या सन्मानार्थ १९९६ साली ३ रूपयांचा पोस्टल स्टॅम्प वितरित केला. तर गुगलने २०२० साली त्यांच्या ८०व्या वाढदिवसाचं निमित्त साधत त्या दिवशीचं डुडल त्यांच्या नावावर ठेवलं होतं.

ज्यावेळी भारतीय स्त्री चूल आणि मूल यात अडकलेली होती, त्या काळात पोहण्यासारख्या पारंपारिक खेळात प्राविण्य मिळवून आशियामधील इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली स्त्री होण्याचा मान मिळवणाऱ्या आरती साहा या दुर्गाशक्तीचं एक प्रतीक आहेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने भारतीय स्त्री आणि भारताची शान संपूर्ण जगात वाढवली होती. त्यांच्या या कार्याला माझा साष्टांग नमस्कार आणि त्यांच्या स्मृतीस वंदन.

माहिती स्रोत :- गुगल, बेटर इंडिया

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment