Saturday 24 October 2020

#दुर्गाशक्ती भाग ९ .. लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर .. विनीत वर्तक ©

 #दुर्गाशक्ती भाग ९ .. लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर .. विनीत वर्तक ©


आयुष्यात आपण आदर्श कोणाला मानतो, यावर आपण आपली आयुष्यातली वाटचाल कोणत्या दिशेने करणार हे ठरलेलं असतं. १९२०च्या काळात पुण्यात सरलादेवी खोत (त्यांना अक्कुताई चिटणीस या नावाने ओळखलं जात होतं) नावाच्या डॉक्टर होत्या. त्यांच्या आयुष्याचा डॉक्टर होण्याचा खडतर प्रवास त्यांच्या नातीच्या बालमनावर कोरला गेला होता. आपली आजी वयाच्या दुसऱ्या वर्षी अनाथ झाली, वयाच्या ८व्या वर्षी विधवा झाली पण अश्या परिस्थितीमध्येही ती डॉक्टर झाली होती, ही गोष्ट त्या छोट्या मुलीच्या मनात घर करून गेली होती. १९७८चा काळ होता, दोन लाल शेंड्या बांधलेल्या त्या मुलीने डॉक्टर बनण्याचं नक्की केलं होतं. सी.बी.एस.सी.च्या परीक्षेत देशातून प्रथम आणि नॅशनल सायन्स टॅलेन्ट स्पर्धेत सर्वोत्तम राहिलेल्या त्या मुलीला देशातल्या सगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकत होता पण तिच्या मनात त्या हिरव्या गणवेशाने केव्हाच घर केलं होतं. पुण्याच्या रस्त्यावर दिसणाऱ्या त्या हिरव्या गणवेशातल्या सैनिकांनी आणि त्यांच्या शिस्तीने तिला कधीच आपलंसं केलं होतं. घरच्या विरोधाला न जुमानता त्या मुलीने पुण्याच्या Armed Forces Medical College (AFMC) मध्ये डॉक्टर बनण्यासाठी प्रवेश घेतला. ती मुलगी म्हणजेच लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर.  

आपल्या एम.बी.बी.एस.च्या अभ्यासक्रमात त्या तिन्ही टप्प्यांवर पुणे विद्यापीठात पहिल्या नंबरमध्ये राहिल्या होत्या. त्यासाठी त्यांना राष्ट्रपती सुवर्ण पदकासोबत अभ्यासाशिवाय सर्व क्षेत्रात अव्वल कामगिरी केल्यामुळे कलिंगा ट्रॉफीनेही सन्मानित केलं गेलं. १९८२ साली ज्या कॉलेजमधून आपली पदवी घेतली, त्याच कॉलेजच्या डीन बनण्याचा बहुमान त्यांनी २०१७ साली मिळवला. १९९० मध्ये त्यांनी बालरोगतज्ज्ञ या विषयात एम.डी. केलं. यानंतर त्यांनी लहान मुलांच्या किडनी विकारांवर दिल्लीच्या एम्स (All India Institute of Medical Sciences) इकडे ट्रेनिंग घेतलं. त्यांना National University Hospital; Singapore, Great Ormond Street Hospital; London आणि Foundation for Advancement of International Medical Education and Research (FAIMER) यांसारख्या मानाच्या संस्थांच्या शिष्यवृत्याही मिळाल्या होत्या. भारतीय सैन्याच्या वैद्यकीय सेवेत पहिला किडनी बालविभाग स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच त्या The Indian Society of Pediatric Nephrologyच्या अध्यक्ष होत्या.

१९८३ पासून लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर भारतीय सैन्याचा भाग असून तब्बल ३७ वर्ष देशाची सेवा करत आहेत. आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी भारतीय सेनेत अनेक महत्वाची पदे भूषवलेली आहेत. त्या General Armed Forces Medical Services च्या डेप्युटी डायरेक्टर राहिलेल्या आहेत.  याशिवाय भारतीय सेनेच्या नॉर्दर्न कमांड, उधमपूरच्या मेजर जनरल मेडिकल राहिलेल्या आहेत. २०१७ मध्ये त्यांनी पुण्याच्या Armed Forces Medical College (AFMC) येथे डीन आणि उपसंचालक म्हणून पदभार स्वीकारला होता. २९ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांची बढती भारतीय सेनेत लेफ्टनंट जनरल या पदावर झाली. भारतीय सेनेच्या थ्री-स्टार रँक असणाऱ्या त्या तिसऱ्या महिला आहेत. भारतीय सेनेत त्यांनी दिलेल्या अत्युच्च सेवेबद्दल त्यांना २०१८ मध्ये अतिविशिष्ठ सेवा मेडल, २०१४ मध्ये विशिष्ठ सेवा मेडल आणि पाच वेळा  Chief of the Army Staff Commendation Cardने सन्मानित करण्यात आलं आहे. त्या पंतप्रधानांच्या Science, Technology and Innovation Advisory Council (PM-STIAC)च्या एकमेव डॉक्टर सदस्य आहेत.

१९७८ साली त्यांचे ऋणानुबंध एन.डी.ए. (National Defence Academy) आणि आय.एम.ए. (Indian Military Academy) मधून पास झालेल्या राजीव कानिटकर यांच्याशी जुळले, ते कायमचे. लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर नुकतेच भारतीय सेनेतून निवृत्त झालेले असून भारतीय सेनेच्या इतिहासात लेफ्टनंट जनरल हे थ्री-स्टार पद मिळवणारी ही नवरा- बायकोची एकमेव जोडी आहे. लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांचा भारतीय सेनेतील प्रवास तसा सोप्पा नव्हता. त्यांचे जोडीदारही भारतीय सेनेत असल्याने अनेकवेळा ते भारताच्या सरहद्दीच्या रक्षणासाठी व्यस्त असायचे. अश्या वेळी आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळत त्यांना देशाच्या रक्षणासाठीही त्याच तत्परतेने सजग राहावं लागत होतं. त्यांच्या जोडीदाराची साथ त्यांना नेहमीच आपलं सर्वोत्तम सगळ्या आघाड्यांवर देण्यासाठी लाभली. या यशस्वी संसारामागचं गुपित सांगताना त्या सांगतात, 

"आम्ही ठरवलं होतं,

‘'Let’s Grow Together without Growing Apart"."

त्यांच्या संसारात कसोटीचे अनेक क्षण आले. त्यांच्या पहिल्या बाळंतपणावेळी, त्यांच्या जोडीदाराला सकाळी ४ वाजून ३५ मिनिटांनी रिपोर्ट करण्याचा आदेश होता. सकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या मुलीचा जन्म झाल्यावर ५ व्या मिनिटाला त्यांचे जोडीदार देश रक्षणासाठी रवाना झालेले होते. आपल्या कुटुंबासोबत विदेशात जाण्यासाठी निघालेले असताना कारगिल युद्ध सुरू झाल्यावर, तातडीने आपल्या ड्युटीवर रुजू होण्याचे आदेश मिळाले. संपूर्ण ट्रीप अर्धवट सोडून देशरक्षणासाठी त्या आपल्या ड्युटीवर रुजू झालेल्या होत्या.

एका सर्वसामान्य मराठी कुटुंबातून डॉक्टर बनताना लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर देशेसेवेचं आपलं व्रत आजही निभावत आहेत. आपल्या जोडीदाराच्या सावलीखाली दबून न जाता त्याच तोडीने आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व आणि ओळख त्यांनी निर्माण केली. भारतीय सेनेतील दुसऱ्या सर्वोच्च पदावर पोहोचताना त्याचवेळी एक पत्नी, एक आई, एक डॉक्टर, एक प्राध्यापक, एक सेना अधिकारी अश्या सर्वच पातळीवर आपली छाप त्यांनी सोडली आहे. आज त्या The Director General Armed Forces Medical Services (DGAFMS) म्हणून भारतीय सेनेत कार्यरत आहेत. एक सामान्य मराठी स्त्री आपल्या स्वबळावर देशाच्या संरक्षणात त्याच ताकदीने योगदान देऊ शकते हे त्यांनी आपल्या दुर्गाशक्तीच्या रूपातून दाखवून दिलेलं आहे. त्यांच्या या प्रवासाला माझा साष्टांग नमस्कार आणि त्यांच्या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा.  
 
जय हिंद!!!

माहिती स्रोत :- गुगल

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment