Saturday, 17 October 2020

दुर्गाशक्ती भाग २ .. पद्मभूषण डॉक्टर त्सेरिंग लांडोल .. विनीत वर्तक ©

 दुर्गाशक्ती भाग २ .. पद्मभूषण डॉक्टर त्सेरिंग लांडोल .. विनीत वर्तक ©

भारतात अनेकांना काही प्रदेश हा भारताचा हिस्सा आहे, हेच मुळात माहीत नसते. भारताची अतिपूर्वेकडील राज्यं किंवा भारताच्या उत्तरेकडील काही भाग यांची मुख्य भारताशी नाळ तशी तुटलेली आहे. अनेकदा इकडे राहणाऱ्या लोकांना आपण भारतीय पण मानत नाही. लडाख हा भारताचा असाच एक भाग. सध्या लडाख भारत चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगाच्या पटलावर प्रसिद्ध झाला आहे. लडाख इथलं वातावरण मानवी वस्तीसाठी प्रतिकूल आहे. थंडीच्या काळात पारा उणे ३० डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली जातो. बाकीच्या भागाशी संपर्क तुटतो. अश्या गोठवणाऱ्या थंडीत अतिउंचीवर असणाऱ्या विरळ हवा, ऑक्सिजनची कमतरता तसेच बोचऱ्या थंडीचा सामना करत जगणंच जिकडे एक युद्धासमान आहे तिकडे वैद्यकीय सेवा वगैरेबद्दल सगळा आनंदी आनंद असताना या भागातील एक मुलगी, आपल्या भागातील गरोदर स्त्रियांचं आयुष्य सुखकर बनवण्यासाठी असं एक शिवधनुष्य आपल्या खांद्यावर उचलते ज्याचा विचार करणंही क्रांतिकारी होतं. ते शिवधनुष्य नुसतं उचलूनच नव्हे तर समर्थपणे पेलून आपलं संपूर्ण आयुष्य लडाखमधील तब्बल तीन पिढ्यांच्या सेवेत घालवताना अनेक नवीन आयुष्यांना आकार देणारी ती स्त्री म्हणजेच "पद्मभूषण डॉक्टर त्सेरिंग लांडोल".

त्सेरिंग लांडोल यांचा जन्म लेह इथे, जिकडे शिक्षणाचा गंध पण पोहोचला नव्हता अशा ठिकाणी  एका सर्वसाधारण कुटुंबात झाला,६ भावंडांत त्या एक होत्या. शालेय शिक्षण झाल्यावर पुढे काय, या विचारात असताना लेह इकडे आलेल्या एका असिस्टंट डॉक्टरच्या गळ्यात अडकवलेला स्टेथोस्कोप पाहून त्यांना आपला मार्ग मिळाला. आपणही कधीतरी असा स्टेथोस्कोप गळ्यात घालून लोकांची सेवा करावी असं त्यांच्या मनाने ठरवलं. स्वप्न बघणं सोप्पं असतं पण लक्ष्याकडे प्रत्यक्ष वाटचाल करणं तितकंच कठीण असतं. त्सेरिंग लांडोल यांच्यापुढे साक्षात हिमालय उभा होता. लेहसारख्या दुर्लक्षित प्रदेशात जिकडे शिक्षणाची वानवा होती तिकडून संशोधन करण्यासाठी किंवा डॉक्टर होण्यासाठी कोणतेच पर्याय नव्हते. याशिवाय मोठी अडचण होती ती भाषेची. जिकडे बोली भाषा ही लडाखी, उर्दू होती तिकडे पुढला अभ्यासक्रम हा इंग्रजी भाषेतून होता. पण त्सेरिंग लांडोल मागे हटणाऱ्या नव्हत्या. भाषेच्या अडचणींवर मात करून वैद्यकीय अभ्यासक्रमाला त्यांनी प्रवेश घेतला. लेह-लडाख भागात शिक्षणाचा अभाव असल्याने खुळ्या समजुतींचा पगडा इथल्या समाजावर खूप मोठा होता.

थंड हवामानामुळे इथल्या भागातील लोक आंघोळ आठवड्यातून एखाद्या वेळेस करत. शारीरिक स्वच्छता तसेच मासिक पाळी, गरोदरपणात निष्काळजीपणामुळे अनेक स्त्रियांना आणि नवजात बाळांना आपले प्राण गमवावे लागत होते. अंधश्रद्धा, खुळचट समजुती यांमुळे स्त्रियांना खूप त्रासातून दिवस काढावे लागत होते. वैद्यकीय अभ्यास शिकताना त्सेरिंग लांडोल यांना याच क्षेत्रात लेह-लडाख इथल्या स्त्रियांना काहीतरी मदत करण्याची गरज आहे याची जाणीव झाली. त्यांनी स्त्रीरोगतज्ञ बनण्याचं नक्की केलं. १९७९ साली जेव्हा एक स्त्रीरोगतज्ञ बनून त्यांनी लेह-लडाख इकडे आपली सेवा सुरू केली, तेव्हा खूप साऱ्या अडचणी त्यांच्यासमोर होत्या. इथले वातावरण जे अनेकदा शून्याच्या खाली जात असते, त्यामुळे प्रसूतीच्या वेळेस अनेक अडचणींचा सामना डॉक्टर त्सेरिंग लांडोल यांना करावा लागत होता. प्रसूतीच्या वेळेस इथलं तापमान उबदार आणि योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी लाकडाच्या चुलीचा वापर केला जात होता. यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे नवजात शिशूंच्या जीवाला धोका होता.  डॉक्टर त्सेरिंग लांडोल यांनी अभिनव पद्धतीचा वापर करत प्रसूतीगृहाचं तापमान उबदार ठेवलं. ऑक्सिजनची कमतरता प्रसूती काळात जाणवू नये यासाठी त्यांनी स्थानिक आणि सरकारी पातळीवर प्रयत्न केले. प्रसूती आणि एकूणच स्त्रियांशी निगडित सगळ्याच वैद्यकीय अडचणी सोडवण्यासाठी सरकार, प्रशासन, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून निष्पक्ष पद्धतीने डॉक्टर त्सेरिंग लांडोल यांनी प्रयत्न केले.

लेह-लडाख इथल्या प्रतिकूल हवामानासोबत सगळ्यात मोठी अडचण डॉक्टर त्सेरिंग लांडोल यांच्या समोर होती, ती म्हणजे इथल्या स्त्रियांशी संवाद साधणं. अशिक्षितपणा, सामाजिक रूढींचा पगडा इथल्या स्त्रियांवर खूप जास्ती होता. त्यामुळे आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल एखाद्या डॉक्टरला सांगायला त्यांच्याशी खूप जास्ती संवाद गरजेचा होता. डॉक्टरच्या भूमिकेतून एका मैत्रिणीच्या, एका आईच्या, एका सखीच्या भूमिकेत उतरणं डॉक्टर त्सेरिंग लांडोल यांना गरजेचं होतं. गेली ४० वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी लेह-लडाखसोबत कारगिल इथल्या अनेकांच्या प्रसूतीत डॉक्टरच्या भुमिकेतून आपलं योगदान  दिलं आहे. डॉक्टर त्सेरिंग लांडोल यांनी फक्त इथवर न थांबता सामाजिक जाणिवेतून शाळा, कॉलेज, गाव इथल्या मुलींशी, स्त्रियांशी संवाद साधून मासिक पाळी, प्रसूती, लैंगिक समस्या यांवर समाजाला जागृत करण्याचं आपलं कार्य सुरु ठेवलं आहे. आज वयाच्या ७५व्या वर्षीसुद्धा त्यांनी आपलं कार्य सुरु ठेवलं आहे. डॉक्टर त्सेरिंग लांडोल यांच्या या भरीव योगदानाबद्दल भारत सरकारने २००६ साली पद्मश्री सन्मानाने त्यांचा गौरव केला. पद्मश्री मिळाल्यावरही त्यांनी आपल्या कार्याचा प्रवास असाच सुरु ठेवला. आज त्यांनी प्रसूती केलेल्या स्त्री/पुरुषांच्या नातवंडांची प्रसूतीही डॉक्टर त्सेरिंग लांडोल त्याच तन्मयतेने आणि सामाजिक भावनेने करत आहेत. भारताच्या अतिशय प्रतिकूल भागातील स्त्रियांचं आयुष्य सुखकर बनवणाऱ्या डॉक्टर त्सेरिंग लांडोल यांच्या कार्याचा सन्मान करताना २०२० साली भारत सरकारने त्यांना "पद्मभूषण" सन्मान दिला.

लेह-लडाखसारख्या दुर्गम भागात सामाजिक रूढी, प्रथा मोडत पहिल्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर बनून समाजातील प्रत्येक स्त्रीचं आयुष्य सुखकर बनवत तिला आत्मनिर्भर करण्यासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या डॉक्टर त्सेरिंग लांडोल या दुर्गाशक्तीचं एक रूप आहेत. पैसा, पद, प्रतिष्ठा, मान-सन्मान याच्यामागे न धावता ज्या समाजातून आपण आलो, त्या समाजाला माणुसकीच्या, विकासाच्या पथावर घेऊन जाण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या डॉक्टर त्सेरिंग लांडोल यांना माझा नमस्कार आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खुप साऱ्या शुभेच्छा.

माहिती स्रोत :- गुगल 

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.    




1 comment:

  1. खूप छान माहिती, सलाम या दुर्गारूपी स्त्रियांना

    ReplyDelete