Friday 9 October 2020

माणूस असलेला सुपरमॅन .. विनीत वर्तक ©

 माणूस असलेला सुपरमॅन .. विनीत वर्तक ©


लहानपणी अनेक काल्पनिक हिरोंनी माझ्यासोबत अनेकांचं बालपण समृद्ध केलं होतं. असामान्य शक्ती असणारी, नेहमीच लोकांच्या चांगल्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता लढणारी कितीतरी काल्पनिक पात्रे कॉमिक पुस्तकांच्या माध्यमातून जगभर प्रसिद्ध झाली. पण यातल्या काही पात्रांनी जगभरातील बालमनावर गारूड केलं. पुढे याच काल्पनिक पात्रांवर चित्रपट आले. आज  'ऍवेन्जर' सारख्या चित्रपटांनी तिकीटबारीवर अनेक विक्रम केले. आज यांतील प्रत्येक पात्रावर वेगळा चित्रपट आलेला आहे आणि काही पात्रं अजरामर झालेली आहेत. त्यातील एक म्हणजेच 'सुपरमॅन'. निळ्या रंगाचा कपडा त्याला मागे लाल रंगाची उडती झालर असा पोषाख घालून हवेत झेपावणारा सुपरमॅन. त्याचे ते घारे डोळे आणि त्या डोळ्यातून निघणारं तेज हे सगळंच आकर्षित करून घेणारं होतं. हा सुपरमॅन पडद्यावर साकारणारा कलाकार होता ख्रिस्तोफर रीव्ह. सुपरमॅनच्या भूमिकेने त्याला अजरामर केलं. पण पडद्यावर असामान्य आयुष्य साकारणारा ख्रिस्तोफर खऱ्या आयुष्यात मात्र जगण्यासाठी आयुष्यभर लढला. त्याच्या आयुष्यात आलेल्या एका वळणावर त्याचं संपूर्ण आयुष्य उध्वस्त झालं, पण हारेल तो सुपरमॅन कसला! ..

१० ऑक्टोबर १९७८ला सुपरमॅन नावाचं वादळ चित्रपटगृहांवर धडकलं. धडकताच तिकीटबारीवरचे सगळे विक्रम या चित्रपटाने मोडीत काढले. सुपरमॅन हा वॉर्नर ब्रदर्सचा त्या काळातला सगळ्यात यशस्वी चित्रपट ठरला. ६ फूट ४ इंच उंची, भरदार शरीरयष्टी आणि निळेशार डोळे असणारा ख्रिस्तोफर रीव्ह सर्व जगात प्रसिद्ध झाला. त्यानंतर येणाऱ्या सुपरमॅनच्या अनेक भागांनी ख्रिस्तोफर रीव्हची लोकप्रियता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरली.  या सगळ्या लाटेत त्याच्यातला कलाकार उपाशीच राहिला. लोक त्याला सुपरमॅनपलीकडे बघूच शकले नाहीत. लोकप्रियतेच्या शिखरावर असूनसुद्धा ख्रिस्तोफर रीव्ह कुठेतरी हरवलेला होता. त्याला घोड्यावर स्वारी करायला खूप आवडायची. घोड्यावर बसून अडथळ्याची शर्यत तो व्यावसायिकपणे करायचा. २७ मे १९९५  हा दिवस ख्रिस्तोफर रीव्हच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला. अश्याच एका शर्यतीत भाग घेतला असताना एका अडथळ्याजवळ त्याचा घोडा थांबला आणि त्याच्या पाठीवर बसलेला ख्रिस्तोफर डोक्यावर पडला. या धक्याने त्याच्या मानेवर संपूर्ण शरीराचं वजन आलं त्यामुळे पाठीचा कणा आणि मेंदू यांना जोडणारी यंत्रणा खराब झाली.

एकेकाळी हवेत उडणारा सुपरमॅन आता संपूर्ण आयुष्यासाठी जायबंदी झाला होता. डॉक्टरांनी त्याचे प्राण तर वाचवले पण संपूर्ण आयुष्य त्याला व्हीलचेअर वर काढावं लागणार होतं. जो सुपरमॅन दुसऱ्यांच्या मदतीला धावून जायचा त्यालाच आता कोणाच्या मदतीशिवाय एक क्षण सुद्धा जगता येणार नव्हतं. ख्रिस्तोफर रीव्हसाठी हा धक्का खूप मोठा होता. नशिबाने हवेत उडणाऱ्या सुपरमॅन ला कायमचं पिंजऱ्यात बंदिस्त केलं. पण सुपरमॅन हरला असला तरी माणूस म्हणून ख्रिस्तोफर हरला नव्हता. ख्रिस्तोफर रीव्हच्या सोबत त्याची पत्नी उभी राहिली. एका वेळेस आपलं आयुष्य संपवण्याचा विचार करणारा सुपरमॅन कुठेतरी आपल्या आत  पुन्हा आयुष्यात रंग भरण्याचा विचार करत होता. आपल्या जिद्दीच्या जोरावर तो नुसता आयुष्य जगला नाही तर फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतुन पुन्हा एकदा त्याने उंच भरारी घेतली. आपल्यासारखं प्रत्येक दिवशी जगण्यासाठी लढा देणाऱ्या व्यक्तींसाठी तो पुढे आला. त्यांना मदत करण्यासाठी त्याने ख्रिस्तोफर आणि डॅना रीव्ह फाउंडेशनची स्थापना केली. त्याने अश्या आजारांवर उपचाराच्या संशोधनासाठी तब्बल १३० मिलियन अमेरीकन डॉलर उभे केले. त्याच्या या मदतीतून जवळपास १ लाख लोकांना फायदा झाला.

या जीवघेण्या अपघातापुढे कोणीही हरलं असतं पण शेवटच्या श्वासापर्यंत दुसऱ्यांच्या मदतीसाठी लढणारा सुपरमॅन ख्रिस्तोफर रीव्ह खऱ्या आयुष्यात पण शेवटच्या श्वासापर्यंत दुसऱ्यांसाठी लढला. १० ऑक्टोबर २००४ साली हृदयविकाराच्या झटक्याने माणूस म्हणून जगलेला सुपरमॅन अनंतात विलीन झाला. चार दशकांनंतरही त्याने साकारलेल्या सुपरमॅनची मोहिनी कित्येक लोकांच्या मनावर आजही आहे. माणूस म्हणून जगलेल्या सुपरमॅनच्या स्मृतीस माझं अभिवादन आणि मला खात्री आहे की येणाऱ्या अनेक पिढयांच्या मनात हा सुपरमॅन घर करेल, पण त्याचवेळी कोणत्याही बिकट परिस्थितीमध्ये माणूस म्हणून आयुष्य जगण्याचं बळ देईल.  
 
फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment