गाझी बाबाला ढगात पाठवणाऱ्या अधिकाऱ्याची गोष्ट... विनीत वर्तक ©
चित्रपटातील व्हिलन ची नावं तोंडपाठ असणाऱ्या भारतीयांना 'गाझी बाबा' हे नावं ऐकल्याची शक्यता नसेल. आपले हिरोच जिकडे आपल्याला माहिती नाहीत तिकडे व्हिलन बद्दल न बोललेलं बरं. तर कोण होता हा गाझी बाबा आणि भारताच्या इतक्या मोठ्या शत्रूला ढगात पाठवण्याची कामगिरी केलेले कोण आहेत ते भारताचे शूरवीर, पराक्रमी अधिकारी? गाझी बाबा हे एका अतिरेक्याचं टोपण नाव आहे. त्याच खरं नावं होतं 'राना ताहीर नदीम'. ह्याचा जन्म जगातील जवळपास सगळ्याच अतिरेक्यांचे जन्मस्थान असणाऱ्या आपल्याच शेजारील राष्ट्रात म्हणजे पाकीस्तान मधल्या बाहवाईपूर इकडे झाला होता. जैश ए मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेचा हा मुख्य कमांडर होता ह्याशिवाय हरकत- उल- अन्सर ह्या अतिरेकी संघटनेचा डेप्युटी कमांडर होता. गाझी बाबा ह्या टोपण नावाने अतिरेक्यांमध्ये प्रसिद्ध असलेला हा अतिरेकी भारताच्या संसदेवरील १३ डिसेंबर २००१ मधल्या हल्याच्या कटाचा मुख्य सुत्रधार होता. ह्या शिवाय जम्मू आणि काश्मीर मधील विधानभवनावर केलेल्या हल्यात आणि श्रीनगर मधल्या आर्मी हेडक्वार्टर वरील हल्यात सामील होता.
भारताच्या सगळ्यात खतरनाक असणाऱ्या अतिरेक्याने २००३ साली पंतप्रधानांच्या श्रीनगर दौऱ्यात बॉम्ब स्फोट करण्याची योजना आखली होती. संसदेतील हल्याचा मुख्य सुत्रधार म्हणून भारतीय तपास यंत्रणांच्या रडार वर तो होताच पण काही केल्या त्याचा शोध लागत नव्हता. ह्या अतिरेक्यांनी सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी एक अशी यंत्रणा तयार केली होती ज्याचा खुलासा त्यांच्याच एका माणसाला पकडल्यावर सुरक्षा यंत्रणांना झाला होता. श्रीनगर किंवा आसपासच्या भागात घर विकत अथवा भाड्याने घेऊन त्यात त्यांनी तळ निर्माण केले होते. ह्या तळांपर्यंत जायचा दरवाजा अतिशय सफाईदारपणे घरच्या फर्निचर मध्ये मिसळवायचा की पूर्ण घराचा कसून शोध घेतला तरी तळाचा रस्ता कोणाला सापडू नये. पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ने हे फर्निचर बनवणारा माणसाला पकडलं होतं. त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने जवळपास ३० पेक्षा जास्त घरात अश्या पद्धतीचं काम केल्याचं सांगितलं पण आपल्याला कोणत्या घरात नेलं गेलं आहे ह्याचा काहीच अंदाज त्याला नव्हता. त्याला फक्त एका घरा बद्दल माहीत होतं जिकडे एकदा त्याला सिगरेट पिण्याची संधी मिळाली होती. पंतप्रधानांच्या दौऱ्यात काही अनुचित घटना घडू नये ह्यासाठी ह्या सगळ्याच्या सुत्रधाराचा शोध अतिशय गरजेचं होता. त्यामुळे ह्या सर्व कारवाईची सुत्र बॉर्डर सिक्युरिटी फोर्स चे जाँबाज ऑफिसर एन.एन. डी. दुबे ह्यांनी आपल्या हातात घेतली होती.
बी.एस.एफ. ने पकडलेल्या सुताराला घेऊन त्यांनी आपल्या टीमसह ह्या घराचा ठावठिकाणा शोधला होता. आता मोहीम ठरली. वेळ ही ठरली. ह्या सगळ्यात त्या घरात कोण रहाते अथवा कोणते अतिरेकी आहेत ह्याची काहीच कल्पना नव्हती पण काहीतरी नक्कीच मोठं ह्या ठिकाणाशी निगडित होतं अशी खात्री एन.एन. डी. दुबे ह्यांना झाली होती. ३० ऑगस्ट २००३ च्या सकाळी ३ वाजता बी.एस.एफ. ने ह्या घराला चोहोबाजूने वेढलं. बी.एस.एफ. चे ऑफिसर एन.एन. डी. दुबे आणि इतर अधिकारी तसेच सैनिक ह्यांनी दरवाजा फोडून घरात प्रवेश केला. घराच्या तळ मजला आणि पहील्या मजल्यावर कोणीच आढळलं नाही. दुसऱ्या मजल्यावर ही सगळीकडे झडती घेतल्यावर काहीच हाताशी लागलं नाही हे बघून पुन्हा एकदा त्यांनी त्या सूत्राची कसून चौकशी केली तेव्हा तो फक्त 'शिक्षा' असं म्हणाला. पुन्हा सगळ्यांनी मोर्चा दुसऱ्या मजल्यावरील त्या एका छोट्या खोलीकडे वळवला जिकडे दोन आरसे होते. एन.एन. डी. दुबे आणि इतर अधिकारी आणि ८ जवान ह्यांनी आपल्या पोझिशन घेतल्या. त्यांनी खूण केल्यावर एका जवानाने आरश्यावर जोरदार प्रहार केला.
आरशाच्या काचा तुटून खाली पडत नाही तोच पलीकडून गोळ्यांचा वर्षाव सुरु झाला. काही कळायच्या आत त्या रूम मध्ये ग्रेनेड फुटला. ह्या सगळ्यात धुमश्चक्रीत काही गोळ्या बी.एस.एफ. चे ऑफिसर एन.एन. डी. दुबे आणि त्यांचा जवान बलबीर सिंग ह्यांना लागल्या. तश्या जखमी अवस्थेत ही त्यांनी आपली जागा सोडली नाही. त्यांनी त्या अतिरेक्यांच्या दिशेने गोळीबार करायला सुरवात केली. बराच वेळ हा झाल्यावर त्या लपवलेल्या रस्त्यातून एक अतिरेकी अचानक बाहेर आला व त्याने एन.एन. डी. दुबे ह्यांच्यावर हल्ला केला. त्याच्याजवळच्या पिस्तुली मधल्या सगळ्या गोळ्या त्याने त्यांच्यावर झाडल्या. एन.एन. डी. दुबे ह्यांचं शरीर त्या गोळ्यांनी पोखरून काढलं होतं. एक, दोन नाही तर तब्बल ८ गोळ्या त्यांच्या शरीरात घुसल्या होत्या. संपूर्ण शरीरातून रक्त वहात होतं. त्यांची अवस्था पाहून त्या अतिरेक्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. ८ गोळ्या लागलेला माणूस आपलं काय करणार? ह्या विचारात असलेल्या त्या अतिरेक्याने भारतीय सैनिकांचं शौर्य कमी लेखलं असं म्हंटल तर चुकीचं ठरणार नाही. कारण अंगात ८ गोळ्या असताना सुद्धा एन.एन. डी. दुबे त्याच्यावर तुटून पडले. पळणाऱ्या त्या अतिरेक्याला गाठून त्यांनी त्याला ढगात पाठवून दिलं आणि ते खाली कोसळले.
हॉस्पिटल मध्ये नेई पर्यंत आपण जगणार नाही असेच त्यांना वाटत होते. हॉस्पिटल ला नेताना सुद्धा आपल्या टीम ला ते ऑपरेशन च्या सूचना देतं होते. कारण अजून काही अतिरेकी दबा धरून बसलेले होते. त्यांनी खात्मा केलेला अतिरेक्याची नंतर ओळख पटली तो दुसरा तिसरा कोणी नसून भारताला हवा असणारा जैश ए मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेचा हा मुख्य कमांडर राना ताहीर नदीम उर्फ 'गाझी बाबा' होता. त्याच्या जाण्याने अतिरेकी संघटनांना आणि अतिरेकी कारवयांना खूप मोठा धक्का बसला. भारताने आपल्या संसदेवर झालेल्या हल्याचा बदला घेतला होता. बी.एस.एफ. चे ऑफिसर एन.एन. डी. दुबे हे तब्बल ८ गोळ्या लागून ही बचावले. पण अतिशय जवळून गोळ्या लागल्याने शरीराच्या हालचालीवर जवळपास ७५% टक्के बंधन आली. पण पुन्हा एकदा त्यांनी ड्युटी जॉईन केली. अतिरेक्यांच्या गोळ्या त्यांचं शरीर पोखरून गेल्या पण त्यांच्या पराक्रमाला त्या तसूरभर ही कमी करू शकल्या नाहीत. उलट गाझी बाबा ला ढगात पाठवल्याची आठवण म्हणून त्याने मारलेली एक गोळी त्यांनी आपल्या शरीरात कायम ठेवून घेतली आहे. त्यांच्या ह्या पराक्रमाची नोंद भारत सरकारने घेताना त्यांना शांततेच्या काळात देण्यात येणाऱ्या दुसऱ्या सर्वोच्च सन्मान किर्ती चक्राने २००४ साली सन्मानित करण्यात आलं.
आपल्या शरीरात ८ गोळ्या असताना पण आपल्या देशासाठी विरश्री संचारून आपल्या जीवाची तमा न बाळगता भारताच्या शत्रूला ढगात पाठवणारे सैनिक आणि अधिकारी आज भारताची सुरक्षा करत आहेत हे आपलं भाग्य आहे. आपण केलेल्या पराक्रमाची स्मरणिका म्हणून अतिरेक्याने शरीरात मारलेली गोळी आपल्या शरीरात आहे ह्याचा अभिमान बाळगणारे ऑफिसर हे वेगळ्या मातीचे आहेत. सर तुमच्या पराक्रमाची, देशप्रेमाची एक शतांश सर पण आम्हाला नाही. आम्ही इतके करंटे आहोत की त्या गाझी बाबा बद्दल इंटरनेटवर भरभरून बातम्या आणि रकाने भरून माहिती आहे. पण तुमचा एक साधा फोटो मिळवणं आणि माहिती मिळवण हे आमच्यासाठी कठीण आहे. सर तुम्ही दुसऱ्या रक्ताचे आहात. आमचे हिरो हे फक्त आणि फक्त पडद्यावर खोट्या गोळ्या झेलणारे आहेत. खरे गोळ्या झेलणारे हिरो आम्हाला कधी समजलेच नाहीत हे आमचं दुर्दैव. एका गोळीची किंमत कळायला ती शरीरावर झेलावी लागते. तुमच्या पराक्रमाला माझा कडक सॅल्यूट. भारताचा शत्रू 'गाझी बाबा' ला ढगात पाठवण्यासाठी प्रत्येक भारतीय तुमचा ऋणी आहे.
जय हिंद !!!
फोटो स्रोत :- गुगल
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment