अरोरा... विनीत वर्तक ©
आपल्याला उघड्या डोळ्याने आकाशात दिसणाऱ्या काही अविश्वनीय अश्या गोष्टींपैकी एक म्हणजे 'अरोरा'. अरोरा ला अनेक नावं आहेत अनेकदा ह्याला 'अरोरा बोरेलीस' किंवा 'अरोरा ऑस्ट्रेलीस' असेही म्हंटल जाते. पृथ्वीच्या ज्या गोलार्धातून हे दिसते त्याप्रमाणे हे ओळखलं जाते. ह्याला 'नॉर्दन लाईट' अथवा 'सदर्न लाईट' पण म्हंटल जाते. तर नक्की हे अरोरा म्हणजे काय? ते केव्हा दिसते? ते त्याच्यात जी रंगांची उधळण होते त्या मागचं विज्ञान जाणून घेणं खूप महत्वाचं आहे.
अरोरा म्हणजे रंगांची उधळण. पृथ्वीच्या ध्रुवीय भागातून निसर्गतः रंगांची उधळण बघायला मिळते त्याला अरोरा असं म्हणतात. उत्तर ध्रुवा च्या आर्टिक जवळील भागात आणि दक्षिण ध्रुवावरील अंटार्टिक भागात निसर्गतः ही रंगांची उधळण आपल्याला नुसत्या डोळ्यांनी बघता येते. हिरव्या रंगाचं नक्षीकाम पूर्ण आसमंतात निसर्ग करत असतो. त्याच्यात सोनेरी रंगांच्या छटा त्याच सौंदर्य अजून वाढवतात. लाल, निळ्या, जांभळ्या रंगाने आसमंत उजळून जातो. हे सगळं अनुभवणं म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव असतो. तर नक्की हे रंग येतात कुठून? तर हे रंग आणि अरोरा समजून घ्यायला आपल्या पृथ्वीला ऊर्जा देणाऱ्या सूर्याबद्दल आणि पृथ्वीचं संरक्षण करणाऱ्या चुंबकीय क्षेत्राबद्दल जाणून घ्यावं लागेल.
सूर्य अग्नीचा गोळा आहे आणि सतत ऊर्जेची निर्मिती करत असतो. पण ही निर्मिती एका विशीष्ठ वेगाने होत नाही. त्यात सतत बदल होतं असतात. कधी कधी सूर्य अचानक जास्ती आग ओकतो तर कधी कधी त्याची भट्टी थंड होते. आता हे वाचायला सोप्प वाटलं तरी जेव्हा सूर्याच्या ह्या ऊर्जा निर्मितीत अचानक वाढ होते आणि तो आग ओकायला लागतो तेव्हा ती जवळपास २० मिलियन अणू बॉम्ब एकदम फुटल्यावर निर्माण होणाऱ्या उर्जे इतकी प्रचंड असते. ह्यालाच कॉरोनल मास इजेक्शन किंवा सी.एम. ई. असं म्हणतात. ह्या प्रचंड ऊर्जेमुळे तप्त झालेला गॅस सूर्याच्या पृष्ठभागावरून अवकाशात फेकला जातो. ज्याला प्लाझ्मा असं म्हणतात. ह्या प्लाझ्मा मधून बिलियन टन मटेरियल सूर्याच्या पृष्ठभागावरून अवकाशात ढकललं जाते. ह्याचा वेग हा प्रचंड असतो. १.६ मिलियन किलोमीटर प्रति तास ह्या वेगाने हा प्लाझ्मा सूर्याकडून अवकाशात प्रवास करायला लागतो. अनेकदा ह्या कॉरोनल मास इजेक्शन किंवा सी.एम. ई. च्या रस्त्यात आपली पृथ्वी येतं नाही. पण जर का हे आपल्या पृथ्वीच्या दिशेने असेल तर एक वादळाचा झंझावात सोलार विंड च्या रूपात पृथ्वीवर चाल करून येतो.
आपली पृथ्वी आणि त्या वरचे आपण खूप भाग्यवान आहोत की ह्या वादळापासून संरक्षण करण्याची रचना निसर्गतः पृथ्वी ने आपल्या चुंबकीय क्षेत्राच्या रूपाने केली आहे. सूर्यापासून निघालेलं हे वादळ पृथ्वीवर यायला साधारण २ ते ३ दिवसांचा कालावधी लागतो. जेव्हा हे पृथ्वीच्या जवळ येते तेव्हा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी त्याची टक्कर होते. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या लहरी ह्या एका ध्रुवाकडून दुसऱ्या ध्रुवाकडे प्रवास करत असतात. विषुवृत्ताकडे त्यांचा प्रभाव त्यामुळे जास्ती असतो. ह्या कारणाने सूर्याचे सोलार विंड पृथ्वीपासून बाजूला ढकलले जातात आणि प्रुथ्वीचं आणि त्यावरील प्राणिमात्रांचे संरक्षण होते. पण ध्रुवीय प्रदेशात ह्या चुंबकीय लहरींचा प्रभाव कमी होतो आणि ह्या सोलार विंड मधील प्रभारीत कण हे पृथ्वीच्या वरच्या वातावरणात प्रवेश करतात.
प्रभारित कणांनी पृथ्वीच्या वरच्या वातावरणात प्रवेश केला की त्यांचा सामना आता पृथ्वीच्या वातावरणातील कणांशी सुरु होतो. पृथ्वीच्या वातावरणातील नायट्रोजन आणि ऑक्सिजन च्या कणांशी ह्यांची टक्कर होते आणि ह्यातून जन्म होतो प्रकाश देणाऱ्या फोटॉन कणांचा. हे कण म्हणजेच 'अरोरा'. अरोरा कोणत्या रंगाचा असेल हे त्या प्रभारीत कणांची टक्कर कोणाशी झाली आहे ह्यावर अवलंबून असते. ऑक्सिजन च्या कणांशी सामना झाला तर हिरवा आणि लाल रंगछटा निर्माण होतात आणि जर नायट्रोजन च्या कणांशी सामना झाला तर निळा आणि जांभळ्या रंगछटा निर्माण होतात. आधी म्हंटल तसं ध्रुवीय प्रदेशातच हे प्रभारीत कण चुंबकीय क्षेत्राला मात देऊ शकत असल्याने अरोरा ला अनुभवण्यासाठी आपल्याला ध्रुवीय प्रदेशात जावं लागते. इतर ठिकाणी पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र कोणाला आत मध्ये घुसू देतं नाही. सूर्याचे सोलार विंड प्रत्येक सजीवांसाठी खूप घातक असतात. ह्यातून प्रचंड प्रमाणात रेडिएशन लागू शकते. त्यामुळे पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र खरे तर त्यांना रोखून आपलं रक्षण करत असते. ह्या कणांचा प्रभाव पृथ्वीवर जाणवत नाही. पण अवकाशात असणाऱ्या लोकांना आणि तिथल्या उपकरणांना प्रचंड प्रमाणात रेडिएशन लागू शकते. आपल्याला संरक्षण देणारं पृथ्वीचं वातावरण नसल्याने हा धोका असतो.
अरोरा म्हणजे खरं तर सजीवांच्या अस्तित्वासाठी पृथ्वीच्या वातावरणाने आणि चुंबकीय क्षेत्राने केलेली लढाई असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. अरोरा च्या रंगाचा खेळ मात्र आपल्या डोळ्याचे पारणे फिटेल असा असतो. जर कधी संधी मिळाली तर अरोरा बघण्याची संधी कधीच चुकवू नका. निसर्गाच्या ह्या सुंदर आविष्काराला बघून मनोमन आपण त्या अनंत विश्वाच्या एका छोट्या रुपाला आपल्या डोळ्यात बंदिस्त करू.
फोटो स्रोत :- गुगल, नासा
No comments:
Post a Comment