Wednesday, 13 May 2020

६००० वर्षापूर्वीचे दोन सूर्य... विनीत वर्तक ©

६००० वर्षापूर्वीचे दोन सूर्य... विनीत वर्तक ©

भारताच्या प्राचीन संस्कृतीचे दाखले आजही अनेक ठिकाणी सापडतात. काश्मीर मधील बुर्झाहामा ठिकाणी एका दगडावर कोरलेल चित्र सुमारे ५० वर्षापूर्वी मिळाल. संशोधकांच्या मते ते जवळपास ६३०० वर्षापूर्वीच आहे. ह्या चित्रात दोन शिकारी, एक रेडा आणि दोन डिस्क दाखवल्या आहेत. आधीच्या संशोधनाप्रमाणे ह्या दोन डिस्क म्हणजे दोन सूर्य असावेत असा तर्क मांडला गेला. पण आकाशात एक सूर्य असताना दोन सूर्य दाखवण्यामागच प्रयोजन काही संशोधकांना मान्य नव्हत. इतक्या जुन्या काळातील हे चित्र प्रचंड काहीतरी ऐतिहासिक आणि महत्वाची घटना दाखवणार असावं अस त्यांना वाटत होत. म्हणून ह्या दोन सूर्याच्या पाठीमागच रहस्य शोधण्यासाठी भारतातून टी.आय.एफ.आर चे मयंक वाहिया आणि त्यांचे सहकारी आणि जर्मनी मधल्या संशोधकांनी अजून संशोधन केल.

संशोधकांना पक्क माहित होत कि दोन सूर्य दाखवण हि चित्रकाराची चूक नव्हती तर त्या वेळेला आकाशात काहीतरी अदभूत घडल असावं आणि त्यांना दोन सूर्य किंवा सूर्याच्या प्रखरतेइतपत काहीतरी दिसत असावं म्हणून ते दाखवल किंवा चित्रित करून पुढल्या पिढीला संदेश दिला गेला असावा. संशोधकांच्या टीम ने इतिहासाची पाने पुन्हा एकदा अभ्यासाला घेतली. सूर्याच्या प्रकाशाला तोडीस तोड अशी कोणती घटना आकाशात घडू शकते ह्याचा वेध आणी विचार करताना एका घटनेने त्याचं लक्ष वेधल. अवकाशात घडणारी पण हजारो वर्षात एकदा दिसणारी अशी घटना म्हणजे सुपरनोव्हा.

सुपरनोव्हा म्हणजे काय? तर जन्म होतानाच कोणत्याही ताऱ्याचा अस्त हा ठरलेला असतो. अणुप्रक्रियेमुळे निर्माण झालेली उर्जा किंवा बल आणि आपल्या वस्तुमानामुळे असलेल गुरुत्वीय बल हे जोवर समान तोवर ताऱ्याच आयुष्य. ज्या वेळेला ताऱ्याच आयुष्य संपुष्टात येत असते. तेव्हा नुक्लीयर फायर किंवा अणुकेंद्रीय विखंडन आणि गुरत्वीय बल ह्यांच्यातील एकसंधपणा संपुष्टात येतो. सूर्याच्या बाबतीत बोलायचं झालच तर १ बिलियन वर्षानंतर सूर्याच्या प्रकाशात १०% वाढ होईल. हि जास्ती नसली तरी तिचा पृथ्वीवर खूप मोठा परिणाम होईल. त्या नंतर सूर्याच आकारमान इतक वाढत जाईल कि बुध, शुक्र ग्रह तर आपली पृथ्वी पण त्याने गिळंकृत केलेली असेल. तो एक रेड जायंट तारा झालेला असेल. त्यानंतर त्याचा प्रवास व्हाईट डार्फ ताऱ्याकडे होईल.
प्रत्येक ताऱ्याच्या बाबतीत अस होईल अस नाही. ताऱ्याच्या वस्तुमानावर त्याचा शेवट काय होणार हे ठरलेल असते. सूर्यापेक्षा कित्येक मोठ्या असलेल्या ताऱ्यांच्या च्या बाबतीत ते वेगळ आहे. महाकाय ताऱ्यांन मधील रेडीयेशन बल इतक प्रचंड असते कि त्याच्या गुरुत्वीय बलाला वरचढ ठरते. ह्यामुळे त्यातील समतोल राखण ताऱ्याला आयुष्याच्या शेवटी अशक्य होत जाईल. रेडियेशन बल इतक प्रचंड होईल कि त्यामुळे ह्या ताऱ्याचा विस्फोट होईल. हा विस्फोट इतका प्रचंड असेल हजारो प्रकाशवर्ष दूरवर पण हा दिसेल. त्याचा प्रकाश किंवा त्यावेळी आकाशात हि घटना इतकी तेजस्वी असेल कि सूर्याच्या तेजामध्ये पण ह्याच अस्तित्व दिसून येईल. संशोधकांनी अशी कोणती घटना आकाशात घडली होती का ह्याचा शोध घेतला. त्यानंतर जे समोर आल ते थक्क करणार होत.

सुमारे ६००० वर्षापूर्वी एच.बी. ९ नावाच्या ताऱ्याचा असाच महास्फोट झाल्याच त्यांना आढळून आल. काश्मीर मध्ये मिळालेल्या चित्राचा कालावधी आणि ह्या महास्फोटाचा कालावधी हे मिळतेजुळते आढळून आले. हे समोर येताच संशोधकांनी अजून खोलवर ह्याच संशोधन केल. त्यावेळच आकाश कस असेल आणी भारताच्या काश्मीर मधून हा महास्फोट कुठे दिसला असेल ह्याचा अभ्यास त्यांनी केला. हा तारा ओरायन ह्या तारकासमुहात दिसला असेल ह्यावर एकमत झाल. ओरायन तारका समूह हा शिकारी शिकार करतानाच्या प्रतिकृतीचा समजला जातो. हेच सगळ चित्रातून दिसून येते. शिकारी हा सेटस ताऱ्यापासून तर त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या प्राणी हा अन्द्रोमेडा आणि पेगासुस दाखवतो. तर भाला हा तेजस्वी ताऱ्याचा रस्ता दाखवतो. हे पूर्ण चित्र जेव्हा आपण आकाशाशी जोडतो. तेव्हा आपल्या पूर्वजांनी बघितलेल्या अदभूत घटनेच साक्ष हे चित्र आजही ६००० वर्षांनी आपल्याला देत आहे.

संशोधकांच्या मते सगळ्यात जुनी अशी सुपरनोव्हा ची नोंद हि चीन मध्ये असून ती साधारण १००० वर्षापूर्वीची आहे. त्यामानाने काश्मीर च्या चित्रात बंदिस्त केलेला हा वैश्विक नजराणा तब्बल ६००० वर्ष जुना आहे. ह्या चित्राने आपली संस्कृती किती पुढारलेली आणि आपल्या आकाशात घडणाऱ्या अनेक गोष्टींच कुतूहल त्यांना वाटत होत ह्याची साक्ष देणार आहे. आपण अनुभवलेल्या गोष्टी त्याच सचोटीने पुढल्या पिढीकडे हस्तांतरण करण्यासाठी चित्राचा केलेला उपयोग खूपच अदभूत आहे. आज तो सुपरनोव्हा नष्ट झाला असला तरी त्याची आठवण हे चित्र ६००० वर्षानंतर पण दोन सूर्याच्या रुपात आपल्याला करून देते आहे.

ता.क. :- वरील माहिती संशोधकांनी मांडलेल्या तर्कावर आधारीत आहे. त्यामुळे ह्यात वेगळे तर्क वितर्क होऊ शकतात.

खाली दगडावर कोरलेल खर चित्र आणि बाजूच्या चित्रात आकाशात त्याची मिळतीजुळती स्थिती.

फोटो स्रोत :- गुगल 

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment