Thursday 14 May 2020

एका विस्मरणात गेलेल्या मराठी सैनिकाची गोष्ट... विनीत वर्तक ©

एका विस्मरणात गेलेल्या मराठी सैनिकाची गोष्ट... विनीत वर्तक ©

२७ नोव्हेंबर २००६ चा दिवस होता. दूरचित्रवाणीच्या प्रत्येक बातम्यांच्या चॅनेलवर सगळ्या ब्रेकिंग न्यूज मध्ये एकच गोष्ट चालू होती. आमच्या देशात नको त्या लोकांना हिरो करायची घाई मिडीया सकट भारतीयांना झालेली आहे. त्यामुळेच सकाळी सकाळी एके. ४७ बाळगणारा निरागस, गोंडस बाळ आता जेल मधून कधी सुटणार?, कधी घरी येणार? ह्याची बाईट घेण्यासाठी सगळ्यांची चढाओढ सुरु होती. आता कसा तो भाई वगळून मुन्ना झाला ते रात्रभर त्याच्या चाहत्यांना कशी झोप लागली नाही ह्यावर चर्चा सुरु होत्या. त्याने दाढी केली का? त्याने जेल मध्ये खाल्लं का? ते आता त्याचा कार्यक्रम कसा असणार आणि त्याला अश्रू कसे अनावर झाले? अश्या प्रत्येक गोष्टीवर बाईट घेण्याचं काम एका हिरोसाठी मिडिया रात्रंदिवस करत होती. अर्थात त्याला ना बातमी देण्याऱ्या लोकांचा आक्षेप होता न ते चवीनं बघणाऱ्या प्रत्येक भारतीयाचा. कारण विचार करण्याची प्रवृत्ती आपण हरवून बसलो आहोत. तो एकदाचा बाहेर आला आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. कारण आता वाल्याचा वाल्मिकी झाला होता. लोकांनी अगदी संतपद द्यायला सुद्धा मागेपुढे बघितलं नाही. पण त्याच रात्री भारताच्या एका सैनिकाने आपल्या जिवाचं बलिदान देऊन भारताच्या दुष्मनांना ढगात पाठवून दिलं होतं. आपल्या जखमी सहकाऱ्याला वाचवण्यासाठी त्याने गोळ्यांच्या वर्षावात उडी घेतली आणि स्वतःच्या जिवाचं बलिदान दिलं पण ना त्याच्या बलिदानाची दखल कोणत्या मिडिया ला घ्यावी वाटली न कोणत्या ब्रेकिंग न्यूज मध्ये त्याला स्थान द्यावसं वाटलं.

मुंबई जवळच्या ठाण्यात राहणाऱ्या एका मुलाला लहानपणापासून सैन्यात जाण्याची आवड होती.  शाळेत अभ्यासात हुशार असणाऱ्या त्या विद्यार्थ्यांने दहावीला ९०% जास्त गुण  मिळवले. साहजिक आई- वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलाने डॉक्टर, इंजिनिअर बनवून कुटुंबाचं नाव मोठं करावं. पण त्या मुलाच्या मनात काही वेगळचं होतं. त्या हिरव्या रंगाच्या गणवेषाने ,डोक्यावर असणाऱ्या कॅप आणि छातीवर अभिमानाने दिसणाऱ्या त्या मेडल नी त्याच जग बदलवून टाकलं होतं. आपल्या निर्णयावर तो ठाम होता. शेवटी शाळेतील शिक्षकांना मध्यस्थी करावी लागली. त्याला त्याच्या स्वप्नांचा पाठलाग करू द्या हे शिक्षकांनी सांगितल्यावर आई- वडिलांना त्याच ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. त्या मुलाने आपल्या हुशारीने पुण्याच्या NDA (National Defence Academy) एन.डी.ए मध्ये प्रवेश मिळवला. हा अभ्यासक्रम पूर्ण करून त्याने Indian Military Academy (IMA) मधून सैनिकी शिक्षण पूर्ण करत १९९६ मध्ये भारतीय सैन्यात प्रवेश घेतला. काही काळ भारतीय सैन्यात घालवल्यानंतर त्याने भारतीय सेनेच्या अतिशय प्रतिष्ठेच्या आणि जगात नावाजलेल्या पॅरा स्पेशल फोर्सेस मध्ये प्रवेश केला. वयाच्या ३१ वर्षाआधी त्याला भारतीय सैन्यात मेजर ह्या हुद्यावर बढती मिळालेली होती. आपल्या पराक्रमाने आणि बहादुरीने त्याने भारतीय सैन्यात हे स्थान मिळवलं होतं. जवळपास १० वर्षाच्या भारतीय सेनेच्या सेवेत 'मेजर मनीष हिराजी पितांबरे' ह्या नावाने आपला दबदबा निर्माण केला होता.

मेजर मनीष पितांबरे ह्यांनी भारतीय सेनेच्या अनेक ऑपरेशन्स मध्ये भाग घेतला होता. आपल्या पराक्रमाने त्यांनी ७ दशतवाद्यांना कंठस्थान घातलं होतं आणि त्यांच्या आपल्या देशात अशांतता माजवणाच्या प्रयत्नांना मोडीत काढलं होतं. २००६ मध्ये मेजर मनीष पितांबरे भारतीय सेनेच्या ३ पॅरा स्पेशल फोर्सेस मध्ये कार्यरत होते. नोव्हेंबर २००६ ला त्यांना हिझबुल मुजाहुद्दीन चा एक खतरनाक अतिरेकी सुहैल फैझल लपला असल्याची बातमी मिळाली. २७ नोव्हेंबर २००६ च्या रात्री मेजर मनीष पितांबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ह्या अतिरेकेल्या आणि त्याच्या साथीदारांना एका कोपऱ्यात बंदिस्त केलं. सुटकेचा कोणताही मार्ग नाही हे पाहून अतिरेक्यांनी गोळीबार करायला सुरवात केली. कित्येक तास चाललेल्या ह्या धुमश्चक्रीत त्या खतरनाक अतिरेकी सुहैल फैझल ला मेजर मनीष पितांबरे ह्यांनी ढगात पाठवलं. पण अजूनही गोळीबार सुरूच होता. अजून काही लपलेले अतिरेकी भारतीय सैनिकांवर गोळीबार करत होते. त्यांच्या गोळीबारात त्यांच्या टीम मधला एक सैनिक घायाळ झाला. मेजर मनीष पितांबरे ह्यांनी मागचा पुढचा विचार न करता त्याला वाचवण्यासाठी गोळ्यांच्या वर्षावात उडी घेतली. त्यांनी आपल्या साथीदाराला तर वाचवलं पण शत्रूच्या गोळ्यांनी त्यांचा वेध घेतला होता. शत्रूच्या गोळ्यांनी भारताच्या एका पराक्रमी आणि बहादूर सैनिकाचा बळी घेतला. भारताचे आणि ठाण्याचे सुपुत्र मेजर मनीष पितांबरे देशासाठी शहीद झाले. त्यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी आणि पराक्रमासाठी त्यांना शांततेच्या काळात देण्यात येणाऱ्या दुसऱ्या सर्वोच्च सन्मान 'किर्ती चक्राने' सन्मानित करण्यात आलं.

त्या दिवशी दिवसभर एके ४७ बाळगून कायद्याच्या तरतूदीतल्या पळवाटा वापरून बाहेर पडणाऱ्या पडद्यावरच्या हिरोसाठी संपूर्ण मिडिया २७ नोव्हेंबर २००६ ला व्यस्त होता तिकडे देशासाठी रक्त सांडणाऱ्या, आपल्या जिवाचं बलिदान देणाऱ्या खऱ्या हिरोला एका क्षणाची जागा आणि ब्रेकिंग न्यूज मिळाली नाही. कारण आम्ही करंटे भारतीय.  आपले सो कॉल्ड सुजाण प्रेक्षक, बातम्या सांगणारे, दाखवणारे सगळेच टी.आर.पी. साठी आणि ब्रेकिंग न्यूज साठी एकवेळ आपणाला काय वाटलं ? हे विचारत एखाद्या आय,सी.यु. मध्ये पण घुसतील पण त्या सैनिकांची अथवा त्याच्या कुटुंबीयांची आठवण काढण्याचा विचार ना आमच्या मनात येत न आम्हाला त्याची काही जाणीव होते. एका खूप मोठ्या पदावरील एका निवृत्त सैनिकाने मिडिया बद्दल म्हंटलेलं आहे,

"जवळपास सगळ्या मिडियासाठी सैनिकांच्या बातम्या म्हणजे काही स्त्रियांना भारतीय सेनेत दुय्यम स्थान मिळते, सैनिकांच्या जेवणाचे प्रश्न आणि फार फार तर भारतीय सेनेत चांगल्या ऑफिसर ची कमी आहे इथवर मर्यादित आहे."

आपण भारतीय म्हणून कुठेतरी नक्कीच विचार करायला हवा की नक्की आपण कोणाला हिरो बनवतो आहोत? आपल्या सहानभूती आपण कोणासाठी व्यर्थ घालवतो आहोत? आपल्याला वाटते तो किंवा ती व्यक्ती खरच आपल्या देशाची नागरीक बनण्याच्या लायकीची आहे का? मिडिया असल्या गोष्टी दाखवतो कारण आपण त्या तश्या बघतो. जर डिमांड तशी असेल तर सप्लाय तसाच होणार.  सुरवात आपल्यापासून करू या. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण ह्या गोष्टीचा विरोध करू शकतोच. आपण काय बघायचं ह्याच रिमोट कंट्रोल आपल्या हातात घेऊ शकतो. मिडिया मध्ये काय दाखवायचं किंवा काय लिहायचं हे ही आपल्याच सारख्याच मिडियामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या हातात आहे. आज आपण इतके करंटे झालो आहोत की देशद्रोह करणारा जेल मधून बाहेर आला ह्याचा आनंद होतो आणि ज्याने देशासाठी रक्त सांडलं त्याची गणती आणि आठवण पण आपल्याला नसते.

मेजर मनीष पितांबरे ह्यांना माझा कडक सॅल्यूट आणि त्यांच्या स्मृतीस माझा साष्टांग नमस्कार. सर तुम्ही वेगळ्या मातीचे होता आणि आज एक भारतीय म्हणून आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत ह्याची लाज आणि खंत ही मला वाटते. मी माझ्या परीने हे देशाचे खरे हिरो नक्कीच प्रत्येक भारतीयांसमोर आणण्याचा प्रयत्न करेन ह्याच शब्दावर थांबतो.

जय हिंद!!!

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


2 comments:

  1. मनस्वी धन्यवाद दादा आपल्या या प्रामाणिक प्रयत्नाबद्दल😇😇😇

    मी संदेश पितांबरे,
    हुतात्मा मेजर मनीष पितांबरे माझे काका आहेत😇

    ReplyDelete