जगाला वेड लावणाऱ्या दोन तरुणांची गोष्ट... विनीत वर्तक ©
१९८० च्या दशकात रशियाच्या विभाजनाआधी युक्रेन देशाच्या एका गावात एक गरीब कुटुंब आपल्या मुलासह रहात होतं. हाडं गोठवणाऱ्या युक्रेन च्या थंडीत त्यांच्या घरी साधी इलेक्ट्रिसिटी सुद्धा नव्हती. उणे तपमानात गरम पाण्याने अंघोळ करण्याची सोय सुद्धा नव्हती. सरकार आपलं संभाषण ऐकेल आणि आपल्यावर दडपशाही करेल ह्या भितीने एकमेकांशी संवाद करण्याचं फोन सारखं साधन सुद्धा त्यांनी वापरणं बंद केलं होतं. कुठेतरी ह्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी अमेरीका गाठली. १९९२ च्या त्या काळात तो मुलगा, आई आणि आजीसह अमेरीकेच्या केलिफोर्निया मध्ये दाखल झाला. दोन बेडरूम च्या खोली मध्ये त्यांनी आपलं घर उभं केलं. हा मुलगा एका दुकानात सफाई कर्मचारी म्हणून काम करायला लागला. त्याचवेळेस त्याची आई आया म्हणून काम करायला लागली. दोन वेळच्या जेवणाची कशीतरी सोय त्यातून होतं होती. रद्दीवाल्याकडे जमा होणारी पुस्तके हा मुलगा फावल्या वेळात वाचायला लागला. त्यात त्याला कॉम्प्युटर नेटवर्किंग ची गोडी लागली. पुढल्या दोन वर्षात त्याने ह्या क्षेत्रातली सगळी माहिती जमा केली होती. आता सगळं व्यवस्थित होते आहे असं वाटत असताना त्याच्या आईला कॅन्सर असल्याचं निदान झालं.
आपलं कॉम्प्युटर मधला अभ्यास त्याने आता एक पायरी वर नेला आणि त्याला कॉम्प्युटर प्रोग्रामिंग ची गोडी लागली. ह्याच काळात त्याने विद्यापिठात शिकण्यासाठी प्रवेश घेतला त्याच सोबत एका कंपनीत सिक्युरिटी टेस्टर म्हणून नोकरी सुरु केली. हे करत असताना आयुष्यातील सगळ्यात मोठी संधी चालून आली. याहू नावाच्या एका कंपनीने त्याला आपल्याकडे नोकरीला घेतलं. याहू हळूहळू वाढत गेली. त्याला ते काम आवडत असल्याने त्याने शिक्षण सोडून दिलं आणि आपल्या कामात स्वतःला जुंपून घेतलं. ह्याच काळात त्याचे वडील गेले. आईसुद्धा कॅन्सर च्या लढ्यात हरली. अचानक त्याच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली. त्याच काळात त्याला आधाराची गरज होती जो आधार त्याला त्याच्या एका मित्राने दिला. हा मित्र कॉम्प्युटर सायन्स चा पदवीधारक होता. याहू मधला ४४ वा कामगार होता. याहू मध्ये त्याची ओळख ह्या युक्रेन मधल्या तरुणाशी झाली होती. ह्याने करोडो डॉलर डॉट कॉम च्या बूम मध्ये गुंतवले आणि तो पूर्णपणे लुटला गेला होता. पण तरीही ह्या दोघांनी एकमेकांना साथ दिली. जवळपास ९ वर्ष नोकरी केल्यावर ह्या दोघांनी एकाच वेळेस याहू ला २००७ मध्ये रामराम ठोकला. ह्या काळात दोघांनी खूप पैसा कमावला होता. एक वर्ष त्यांनी फक्त मज्जा करायचं ठरवलं. साऊथ अमेरीका इकडे जाऊन ह्या दोघांनी एक वर्ष फक्त मज्जा आणि मज्जा केली. ह्या काळात दोघांनी फेसबुक ला नोकरीसाठी अर्ज केला. ह्या दोघांनाही फेसबुक ने बाहेरचा रस्ता दाखवला. एकाने तर ट्विटर मध्ये पण अर्ज केला पण तिकडेही त्याला नोकरीत घेतलं गेलं नाही.
२००९ मध्ये ह्यातल्या एकाच्या डोक्यात सुपीक कल्पना आली. आपल्या कल्पनाशक्ती आणि आपलं ज्ञान वापरून त्याने एक ऍप तयार केलं. २४ फेब्रुवारी २००९ ला त्याने ह्या ऍप ला नाव दिलं 'व्हाट्स ऍप'. सुरवातीला ह्या ऍप मध्ये अनेक अडचणी येत होत्या. पण त्याच्या पुढल्या व्हर्जन मध्ये त्याने खूप सुधारणा केल्या. लगेच हे ऍप अमेरीकेत लोकप्रिय व्हायला सुरवात झाली. त्याचवेळेस आपल्या जुन्या मित्राची आठवण त्याला झाली. अजूनही तो नोकरी शोधतं होता. कुठेतरी त्याची गाडी तिकडेच अडकलेली होती. त्याने आपल्या मित्राला सोबत बोलावलं. एक काळ असा होता जेव्हा ह्याच मित्राने त्याच्या एकटेपणात त्याला साथ दिली होती. आज त्याची परतफेड त्याला करायची होती. दोघांनी मिळून ह्या ऍप ला अजून लोकांपर्यंत नेण्याचा चंग बांधला. पण पहिल्यापासून त्या दोघांनी ठरवलं होतं की काही झालं तरी आपल्या ऍप मध्ये,
“No ads! No games! No gimmicks!“
हे ऍप बनवणारा युक्रेन/अमेरीकेचा तरुण ज्याने व्हाट्स ऍप ची संकल्पना मांडली तो म्हणजे 'जॅन कॉम' आणि त्याला मदत करणारा त्याचा मित्र म्हणजेच 'ब्रायन ऍक्टन'.
इकडून सुरु झाला एक असा प्रवास ज्याने जगाची संभाषण आणि संवाद करण्याची परीभाषा पूर्णपणे बदलवून टाकली. व्हाट्स ऍप ची लोकप्रियता वाढत असताना त्याच वेळा फेसबुक ची लोकप्रियता कुठेतरी कमी होतं होती. अशातच फेसबुकच्या 'मार्क झुकेरबर्ग' चं लक्ष २०१२ ला व्हाट्स ऍपकडे गेलं. त्याने बोलणी सुरु केली आणि शेवटी २०१४ ला फेसबुक ने तब्बल १९ बिलियन अमेरीकन $ ला व्हाट्स ऍप खरेदी केलं. हे करताना सुद्धा जॅन आणि ब्रायन ने त्यांच्या तत्वाशी कोणतीही तडजोड होणार नाही तसेच व्हाट्स ऍप चे सर्व हक्क हे त्या दोघांकडे राहतील ह्या अटीवर ज्या फेसबुक ने त्यांना नाकारलं होतं त्यांना आपल्या पायाखाली नाक घासायला लावून इतके पैसे फेसबुक ला मोजायला लावले. फेसबुक कडे हे पैसे मोजण्याशिवाय आणि त्यांच्या अटी स्विकारण्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लक नव्हता कारण व्हाट्स ऍप ची लोकप्रियता. ज्या वेगाने ते वाढत होतं तो वेग थक्क करणारा होता.
२०१६ मध्ये १ बिलियन लोक (१०० कोटी) लोकं व्हाट्स ऍप वापरत होती. २०१८ मध्ये हाच आकडा (१५० कोटी) वर पोहचला. १२ फेब्रुवारी २०२० ला व्हाट्स ऍप ने (२०० कोटी) लोकांचा टप्पा पार केला आहे. व्हाट्स ऍप वापरणाऱ्या सगळ्या लोकांपैकी १०% हुन अधिक लोकं एकट्या भारतात आहेत. भारतात जवळपास ३० कोटी लोकं व्हाट्स ऍप वापरत आहेत. प्रत्येक दोन वर्षात व्हाट्स ऍप जवळपास ५० कोटी नवीन लोकांपर्यंत पोहचते आहे. हा वेग आजही कोणत्या ऍप ला गाठता आलेला नाही. एकेकाळी सफाई काम करणारा जॅन कॉम आणि एकेकाळी फेसबुक आणि ट्विटर ने डावललेला ब्रायन ऍक्टन ह्यांनी आपल्या प्रतिभेने पूर्ण जगाची संभाषण करण्याची परीभाषा बदलवून टाकली. ह्या दोन्ही विभूतींना माझा सलाम. तुमचा हा थक्क करणारा प्रवास येणाऱ्या कित्येक पिढयांना आपलं स्वप्न खरं करण्यासाठी प्रोत्साहित करेल.
फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment