Friday 15 May 2020

इतिहासाच्या पानात हरवलेल्या एका स्वातंत्र्य सैनिकाची गोष्ट... विनीत वर्तक ©

इतिहासाच्या पानात हरवलेल्या एका स्वातंत्र्य सैनिकाची गोष्ट... विनीत वर्तक ©

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक व्यक्तींचं अमूल्य योगदान आहे. पण आजवर ह्याच इतिहासातील अशी काही पाने मुद्दामून फाडून टाकली गेली किंवा काळाच्या ओघात ती विस्मृतीत गेली. त्या प्रत्येक पानावरील अक्षरात अनेक लोकांचं बलिदान सामावलेलं होतं. अनेक लोकांनी आपलं आयुष्य भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात वेचलं. प्रसंगी अंगावर गोळ्या झेलल्या आणि आपलं रक्त सांडलं. भारताच्या पारतंत्र्यात ब्रिटिश सत्तेच्या हाताखालचं प्यादं बनणं त्यांच्या बाणाने कधीच स्वीकारलं नाही.  पण काही लोकांनी ह्याच ब्रिटिश महासत्तेचा भाग होऊन त्यांच प्याद बनून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिल्याचा आव आणला. कदाचित अश्याच लोकांची नाव इतिहासात जास्ती ठळकपणे लिहली गेली. पण ज्यांनी खरोखर त्याग केला त्यांची पाने एकतर विस्मृतीत गेली किंवा जाणून बुजून त्यांना फाडून टाकण्यात आलं.

भारताच्या गौरवशाली स्वातंत्र्य लढ्यात आझाद हिंद सेनेचं योगदान हे शब्दात मांडता येण्यापेक्षा मोठं आहे. एकेकाळी हतबल असणाऱ्या भारतीय समाजात आपण अन्याया विरुद्ध लढू शकतो ही जाणीव जर भारतीयांना कोणी दिली असेल तर आझाद हिंद सेनेचा त्यात सिंहाचा वाटा आहे. 'लोहा लोहे को काटता हैं '  हे तत्वच भारताला ह्या पारतंत्र्याच्या शापातून मुक्त करेल हा विश्वास आझाद हिंद सेनेने त्या काळी अनेकांना दिला होता. नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांच्या बाण्याने प्रोत्साहित होऊन कित्येक लोकांनी आपलं सामान्य जीवन सोडून ह्या लढ्यात भाग घेतला होता. पण आपलं दुर्दैव की आपलीच माणसे आपल्या विरुद्व लढली आणि एका तळपणाऱ्या तलवारीला जाणून बुजून म्यान केलं गेलं. ह्या सेनेत भाग घेतलेल्या लोकांना मुद्दामून स्वातंत्र्य मिळाल्यावर लांब केलं गेलं आणि त्यांची उपेक्षा केली गेली. ज्यांचे विचार वेगळे होते पण लक्ष्य एकच होतं ते म्हणजे भारताच स्वातंत्र्य पण अश्या लोकांच्या बलिदानाची दखल या ना त्या कारणाने घेतली गेली नाही. भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७ दशकांपेक्षा जास्त कालावधी झाला पण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आझाद हिंद सेनेत भरती होऊन आपलं रक्त सांडणारा एक सैनिक वयाच्या ९३ वर्षी सुद्धा त्या स्वातंत्र्याची किंमत मोजतो आहे. गेल्या ७० वर्षात सगळे सरकारी उंबरठे झिजवून पण हाताशी काही नसलेला तो सैनिक आज सुद्धा जेव्हा आझाद हिंद सेनेविषयी बोलण्याआधी आपला युनिफॉर्म घालून सुभाष चंद्र बोस ह्यांच्या प्रतिमेला एक कडक सॅल्यूट ठोकतो तेव्हा त्यांच्या डोळ्यातील ती चमक, तो आदर, तो आत्मविश्वास बघून आपल्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय रहात नाही. त्या ९३ वर्षीय सैनिकांच नाव आहे 'सी.एम. पंडिराज'.

१९४३ चं वर्ष होतं. नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांच्या देशासाठी लढण्याच्या हाकेने प्रोत्साहित होऊन एक सळसळत्या रक्ताचा तरुण आपलं घरदार सोडून मलेशिया मधून तडक आझाद हिंद सेनेच्या गोरिला टीम मध्ये सामील झाला. जपान च्या मदतीने आझाद हिंद सेनेची फौज ब्रिटिश आणि अमेरिकांच्या फौजांविरुद्ध दुसऱ्या महायुद्धात उतरली होती. जेव्हा ब्रिटिशांना त्यांचा सुगावा लागला तेव्हा त्यांनी सी.एम. पंडिराज ह्यांना पकडून तुरुंगात डांबलं. त्यांच्यावर अत्याचार केले. त्यांच्या मते हा त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात कणखर काळ होता. जवळपास ६ महिन्यांनी सिंगापूर रेडिओ वरून नेताजींनी सगळ्या सैनिकांना उद्देशून भाषण केलं. त्यांच्या भाषणात हरल्याची भावना होती कारण उत्तर पूर्व भारतातून घुसून ब्रिटिशांना पळवून लावण्याचा त्यांची मोहीम काही लोकांनी घरभेदी काम केल्याने फसली होती. सर्व सैनिकांना त्यांनी त्यांच्या घरी जाण्याचं आवाहन त्यांनी केलं. सी.एम. पंडिराज आजही सांगतात की, नेताजींचे ते शब्द ऐकून मी खूप रडलो होतो. मला ब्रिटिशांना भारतातून हाकलवून लावायचं होतं पण ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. पुढे १९४६ ला नेताजींचा अचानक मृत्यू झाल्याची बातमी आली आणि एका सूर्याचा अस्त भारताच्या क्षितिजावर झाला होता.

आझाद हिंद सेनेचा कदाचित जिवंत असणारा एकमेव सैनिक गेली ५५ वर्ष भाड्याच्या घरात राहतो आहे. गेली कित्येक दशके सरकारी उंबरठे झिजवतो आहे. पण सरकारी दरबारी त्याची दखल घेणारं कोणीही नाही. इतिहासाची कित्येक अशी पान मुद्दामून पुसली गेलेली आहेत. आज स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि अश्या कित्येक गोष्टींवर बोलणाऱ्या अनेकांना ह्याची किंमत ना कधी समजली न कधी समजेल. काही लोकांनी ह्याच बलिदानाच्या टाळूवरच लोणी खाऊन आपलं घर मोठं केलं. पण ज्यांच्यामुळे आपण मोकळा श्वास घेतो त्यांना मुख्य प्रवाहातून एकतर बाजूला काढण्यात आलं किंवा ते मुख्य प्रवाहात येणार नाही ह्याची सगळी काळजी घेतली गेली. आझाद हिंद सेनेतील कित्येक कथा अश्या आहेत ज्या इतिहासाच्या पानात लुप्त झाल्या. सी.एम. पंडिराज आजही जिवंत असतील अशी माझी भाबडी आशा आहे. ते असतील तर निदान आता तरी सरकारने त्यांच्या बलिदानाची कदर करावी हीच एक माफक अपेक्षा असेल.

आज त्यांचा फोटो बघताना वयाच्या ९३ + वर्षी त्या कडक सॅल्यूट मधून डोळ्यात दिसणारी चमक बघून मन कुठेतरी विषण्ण झालं. आपण आपल्याच लोकांची कदर आणि त्यांना योग्य  तो मानसन्मान देऊ शकलो नाही ही खंत कायम माझ्या मनात असेल. भारताच्या स्वातंत्र्यात बहुमूल्य योगदान देणाऱ्या पण इतिहासात हरवलेल्या सी.एम. पंडिराज ह्यांना माझा कडक सॅल्यूट. प्रत्येक भारतीय तुमचा ऋणी आहे. जर काही तुमच्यासाठी करता आलं तर तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा सन्मान असेल.

जय हिंद!!!

फोटो स्रोत:- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment