Monday 18 May 2020

ये नया भारत है... विनीत वर्तक ©

ये नया भारत है... विनीत वर्तक ©

कोरोना च्या लढाईत भारत आपल्याच आघाड्यावर लढतो आहे. १.३ बिलियन लोकसंख्येच्या मानाने भारतात कोरोना आपले हातपाय उशिरा पसरत असला तरी त्याचा वेग कोणत्याही क्षणी वाढू शकतो. लोकांनी जर काही गोष्टींचं पालन केलं तर कदाचित आपण चांगल्या पद्धतीने कोरोना विरुद्ध लढा देऊ शकतो. केंद्र सरकार आणि सगळीच राज्य सरकारे आपल्या पद्धतीने काम करत आहेत. काही गोष्टी दिलासा देणाऱ्या आहेत तर काही चिंताजनक आहेत. नुकतेच केंद्र सरकारने देशाच्या कोरोना लढाईसाठी जवळपास २६० बिलियन अमेरिकन डॉलर ची योजना केली आहे. (२० लाख कोटी रुपये) ह्यातील जवळपास २३ बिलियन अमेरिकन डॉलर हे गरिबांसाठी राखून ठेवलेले असून ४० बिलियन अमेरिकन डॉलर हे लघु उद्योगांना दिले जाणार आहेत. संपूर्ण योजनेचा आकडा जवळपास भारताच्या सकल उत्पनाच्या १०% आहे. जगातील सगळ्या प्रगतिशील देशांपेक्षा हा आकडा जास्ती आहे. प्रगत देश जसे अमेरिका १३% आणि जपान २१% सकल उत्पनाच्या इतकी रक्कम ह्या लढ्यासाठी देणार आहे. प्रगत देशांच्या जवळपास जाणार भारताने उचलेलं पाऊल हे नक्कीच प्रशंसनीय आहे. हे सगळे आकडे प्रचंड असले तरी ह्या योजनेचा लाभ आणि अमंलबजावणी कश्या तऱ्हेने केली जाते त्यावर ह्या योजनेचं यश अपयश अवलंबून असणार आहे.

एकीकडे आपल्या घरात कोरोना च्या लढाईतून उभारण्यासाठी मदत करताना भारताने जगाच्या लढाईत ही निर्णायक भूमिका घेतली आहे. आपल्या जवळील देशांना मदत केल्यावर भारत आता लॅटिन अमेरिका, कॅरेबियन बेटं आणि आफ्रिका अश्या देशांना मदतीचा हात देतं आहे. लॅटिन अमेरिकेतील जवळपास २८ देशांना आणि आफ्रिकेतील जवळपास १९ देशांना भारत मानवीय दृष्टिकोनातून वैद्यकीय मदत करत आहे. लॅटिन अमेरिकेतील  पेरू ह्या देशाला भारत ९००,००० एच.सी.क्यू. (Hydroxychloroquine HCQ) गोळ्या देतो आहे. व्हेनिझुएला ह्या देशाला ७४०,०००, गुंटेमाला ह्या देशाला ५००,००० तर बोलिव्हिया, क्युबा, हैती, आणि इक्वेडोर ह्या देशांना प्रत्येकी ३००,०००  एच.सी.क्यू. गोळ्या पुरवतो आहे. एकट्या लॅटिन अमेरिकेला ज्यात वरील देशांशिवाय ब्राझील, चिली , एल साल्वाडोर सह कोलंबिया देशांचा समावेश आहे त्यांना भारत तब्बल ५ मिलियन (५,०००,०००) इतक्या एच.सी.क्यू. (Hydroxychloroquine HCQ) गोळ्या देतो आहे. 

आफ्रिकेतील जवळपास १९ देशांना प्रत्येकी १००,००० एच.सी.क्यू. (Hydroxychloroquine HCQ) गोळ्या वैद्यकीय मदत आणि मित्रत्वाचं एक पाऊल म्हणून देतो आहे. भारताने आत्तापर्यंत जगातील १३३ देशांना जवळपास ४६६ मिलियन (४६६,०००,०००) इतक्या (Hydroxychloroquine HCQ) गोळ्या तर तब्बल १,५ बिलियन (१,५००,०००,००० ) इतक्या पॅरासिटॅमॉल च्या गोळ्यांची वैद्यकीय मदत मानवतेच्या दृष्टिकोनातून केली आहे. ह्या शिवाय जगातील तब्बल १६० देशांना कोरोना च्या लढाईत तेथील वैद्यकीय सेवा देणाऱ्या योद्धांना तयार करण्याचं प्रशिक्षण ज्यात डॉक्टर, नर्सेस, इतर मेडीकल स्टाफ ह्यांचा समावेश आहे तसेच कोरोना मध्ये काय करावे काय करू नये ह्याच प्रशिक्षण भारताने दिलं आहे. हिंद महासागरातील छोट्या देशांनकडे भारताने विशेष लक्ष दिलं आहे. एप्रिल महिन्यात भारतीय वायू दलाने ६.२ टन वजनाची वैद्यकीय मदत मालदीव ला दिली आहे. ह्याशिवाय १० मे ला भारताची युद्ध नौका आय.एन.एस. केसरी ने मालदीव, मॉरिशस, सेचेल्लेस, मादागास्कर आणि कोमोरॉस ह्या देशांसाठी वैद्यकीय, अन्नधान्य, तसेच भारताची आयुर्वेदिक औषधांची मदत घेऊन भारताचा किनारा सोडला आहे.

भारताच्या ह्या पावलांनकडे जग लक्ष ठेवून आहे. भारताने पूर्ण जगात केलेल्या ह्या मदतीचा उल्लेख मदत मिळालेल्या देशांनी केलेला आहे. आजवर खूप मोठी क्षमता असताना सुद्धा शांत असणारा भारताच्या सध्याच्या बदललेल्या कामगिरीची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. चीन सुद्धा अश्या मदतीत पुढे असला तरी कोरोनामुळे तसेच चीन च्या दडपशाही आणि भूभागावर कब्जा करून आपलं अस्तित्व वाढवण्याच्या महत्वाकांक्षामुळे त्यांच्या प्रतिमेला डाग लागलेला आहे. ह्या उलट जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असणारा भारत नेहमीच कोणत्याही महत्वकांक्षेशिवाय जगात मदतीचा स्रोत बनून 'वसुधैव कुटुंबकम' ह्या तत्वाला जागत पुढे येतो आहे.

येणाऱ्या काळात भारत महासत्ता बनेल की नाही ह्यावर अनेक मतांतरे असतील. येणारा काळच ह्याच उत्तर देऊ शकेल. पण अमेरिका- चीन ह्यांचे कोरोना नंतर ताणलेले संबंध, त्यांची जागतिक संबंधात वर्चस्व राखण्यासाठी होणारी रस्सीखेच ह्या सगळ्यात सगळ्यात जास्ती संधी भारताला चालून आली आहे. भारत आणि भारतीय ह्या संधीचा कसा फायदा घेतात हे कळेलच पण ज्या पद्धतीने भारताने आपली प्रतिमा गेल्या काही काळात उंचावली आहे त्याचा निश्चित फायदा भारताला आंतराष्ट्रीय पातळीवर होणार आहे. ह्या नया भारताची दखल आता जगाने घ्यायला सुरवात केली आहे ही गोष्ट भारतीयांसाठी खूप महत्वाची आहे.   

ता.क. :- ह्या पोस्टचा उद्देश भारताशी निगडित आहे. ह्याला कोणतेही राजकीय पंख लावू नयेत. परप्रांत्रीय,मजुरांचे प्रश्न आणि भारतात घडणाऱ्या इतर घडामोडी ह्यांचा संबंध ह्या पोस्टशी लावू नयेत ही नम्र विनंती.

फोटो स्रोत :- गुगल 

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment