एका शिपाई सैनिकाची गोष्ट... विनीत वर्तक ©
१९७१ चं भारत पाकीस्तान युद्ध सुरु होतं. ९ शिख रेजिमेंट ला जम्मू आणि काश्मीर मध्ये तुतमारी गली आणि नास्ताचून पास इथल्या काईन दरी ताब्यात घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. हा सगळा प्रदेश समुद्रसपाटी पासून जवळपास ११,००० फूट उंचीवर होता. थंडीचे दिवस चालू झाले होते आणि रात्रीच इथलं तपमान शून्याच्या खाली सरकत होतं. ५-६ डिसेंबर १९७१ ला भारताने शत्रूवर हल्ला करून जवळपास ४६ किलोमीटर क्षेत्रफळाचा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला होता. भारताचं ह्या भागावर सार्वभौमत्व दाखवण्यासाठी भारतीय सैनिकांनी ह्या भागात अनेक ठिकाणी रस्ते बंद केले होते. भारतीय सैनिक ह्या भागात अचानक गनिमी हल्ला करून शत्रूला नामोहरम करत होते. १४-१५ डिसेंबर च्या रात्री असाच अचानक हल्ला करण्यासाठी कॅप्टन करम सिंग विर्क ह्यांच्या नेतृत्वाखाली ९ शिख चे सगळ्यात तरुण कमांडो निघाले होते. जिकडे हल्ला करायचा होता त्या ठिकाणी जाण्याआगोदर त्यांच्याच टीम वर शत्रूने हल्ला केला. झालेल्या गोळीबारात भारतीय सैनिकांनी शत्रूला तर पिटाळून लावलं पण एका सैनिकाचा प्राण गेला आणि त्यांच्या टीम मधील सगळ्यात तरुण कमांडो शिपाई बलदेव सिंग ह्यांच्या हाता- पायात गोळ्या लागल्या.
शिपाई बलदेव सिंग ह्यांना अश्या अवस्थेत पुढे घेऊन जाणं अशक्य होतं आणि तिकडून माघारी फिरणं म्हणजे आपल्या उद्दिष्ठापासून दूर होणं. अश्या कठीण वेळी कॅप्टन करम सिंग विर्क ह्यांनी निर्णय घेतला की शिपाई बलदेव सिंग ह्यांना इकडेच सोडून मिशन फत्ते करायचं आणि परत येताना जखमी असलेल्या त्यांना परत बेसकॅम्प ला घेऊन जायचं. शत्रूच्या नजरेत येऊ नये म्हणून त्यांनी शिपाई बलदेव सिंग ह्यांना झुडपात एका दगडाला टेकून बसवलं. त्यांना आपल्या जवळचं पाणी, दोन संत्री आणि काही इमर्जन्सी राशन दिलं. शिपाई बलदेव सिंग ह्यांची अवस्था खूप वाईट होती त्यांना अश्या अवस्थेत आपली रायफल चालवता येणं शक्य नव्हतं म्हणून त्यांना कमांडर ने कार्बाईन बंदूक दिली. ह्यात फक्त ट्रिगर दाबायचा असल्याने एखाद्या बिकट परिस्थितीत त्यांना आपलं रक्षण करता येईल ह्याची काळजी कमांडर विर्क ह्यांनी घेतली व ते पुढच्या मिशनसाठी रवाना झाले. मिशन फत्ते केलं पण शत्रूंच्या गोळीबारामुळे आणि दबावाखाली त्यांना आपल्या ठरलेल्या रस्त्याने परत येणं अशक्य झालं. ते दुसऱ्या रस्त्याने परत बेस ला आले. पण कमांडर करम सिंग विर्क ह्यांना चिंता लागली होती ती आपल्या शिपायाची ज्याला आपण वचन दिलं होतं.
शिपाई बलदेव सिंग दगडाला टेकून बसले होते. रात्रीच तपमान शून्याच्या खाली उतरत होतं. पायाला, हाताला लागलेल्या गोळ्यांच्या जखमेतून रक्त वहात होतं पण निश्चय होता की मरायचं नाही. काही वेळ अतिशय सतर्क असणाऱ्या शिपाई बलदेव सिंग ह्यांची सतर्कता कमी होतं होती. तासांमागून तास जात होते आणि तासांचे दिवस झाले. त्यांच्याकडील पाणी आणि खाणं संपलेलं होतं. नियतीने त्यांच शरीर कमजोर केलं पण त्यांची खंबीरता, जिद्द तशीच कायम होती. आता भुकेने, रक्तस्त्राव झाल्याने तसेच हाडं गोठवणाऱ्या थंडीत शरीर साथ देतं नव्हतं. त्यांची ही अवस्था तिकडे असणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या लक्षात आली. बघता बघता भटके कुत्रे त्यांच्या आजूबाजूला जमा होतं होते. ते वाट बघत होते की कधी एकदा शिपाई बलदेव सिंग ह्यांचा प्राण जातो आणि ते हल्ला करतात. त्यांना दूर ठेवण्यासाठी काही वेळा त्यांनी बंदुकीतून गोळ्या ही झाडल्या. ४-५ दिवस झाले तरी कोणतीच मदत येतं नव्हती. हातापायातलं सगळं त्राण निघून गेलं होतं. डोळ्यांच्या पापण्या पण उघडायची शक्ती शिल्लक नव्हती.
इकडे १७ डिसेंबर १९७१ ला युद्धबंदी जाहीर झाली. जिकंलेला भाग पाकीस्तान ला परत देऊन लाईन ऑफ कंट्रोल सन्मान करण्याचं ठरलं. अडचण अशी झाली की ज्या भागात शिपाई बलदेव सिंग ह्यांना कमांडर करम सिंग विर्क ह्यांनी सोडलं होतं तो भाग आता पाकीस्तान चा भाग होता. त्यांनी पाकीस्तानी लेफ्टनंट कर्नल हक नवाझ कयानी ह्यांना विनंती केली. पाकिस्तानी सैनिकांची एक तुकडी त्यांचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आली पण त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. इकडे शिपाई बलदेव सिंग ह्यांची अवस्था खूपच बिकट होती. भटके कुत्रे त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी तयारीत होते. त्यांनी खूप लहानपणी ऐकलं होतं की काही झालं तरी जिवंत असलेल्या प्राण्याचं मास कुत्रे खात नाहीत. त्यामुळे कुत्र्यांना लांब ठेवायचं असेल तर आपण जिवंत आहोत हे त्यांना कळायला हवं अथवा आपल्यावर ते कधीही हल्ला करतील. हातांच्या बोटाची हालचाल शक्य होतं नसताना त्यांनी आपली तर्जनी नाकाला लावून त्याचा आधार घेतला होता. जेव्हा जेव्हा कुत्रे त्यांच्या जवळ हुंगायला यायचे तेव्हा आपली तर्जनी सरळ करत असत. ह्यामुळे कुत्र्यांना ते जिवंत असल्याचं कळत असे आणि ते हल्या पासून वाचले. तब्बल साडेसहा दिवस शिपाई बलदेव सिंग त्याच अवस्थेत होते. जेव्हा पाकीस्तानी सैनिकांना ते दिसले तेव्हा कुत्र्यांनी त्यांना घेरलं होतं आणि त्यांचा श्वास चालू होता.
त्यांना तिथून रावळपिंडी इथल्या सैनिकी हॉस्पिटलला नेण्यात आलं. थंडीमुळे आणि रक्त गेल्यामुळे त्यांची अवस्था खूप वाईट होती. डॉक्टरांना त्यांच्या दोन्ही पायाची बोटे कापायला लागली. ६ महिने हॉस्पिटल मध्ये राहील्यानंतर पाकीस्तान ने त्यांना भारताच्या हवाली केलं. भारतात आल्यावर त्यांची अवस्था खूप वाईट होती. हाता - पायांना गँगरीन झालं होतं. जीव वाचवण्यासाठी त्यांचे दोन्ही पाय आणि उजवा हात कापावा लागला. ह्यातुन बरं झाल्यावर शिपाई बलदेव सिंग ह्यांना एकदा विचारण्यात आलं की कसे काय तुम्ही ६.५ दिवस जिवंत राहिलात? त्यावर त्यांचं उत्तर होतं,
"मला पाकीस्तानी कुत्र्यांच्या भक्षस्थानी पडायचं नव्हतं. मला पाकीस्तानी कुत्र्यांचा स्पर्श सुद्धा माझ्या मेलेल्या शरीराला नको होता."
कुठून येतो हा देशाभिमान? कुठून येते हे धैर्य, दृढनिश्चयता? एक दोन दिवस नाही तर तब्बल ६.५ दिवस हाता पायात गोळ्या घुसलेल्या असतात अन्न, पाणी ह्यांच्याशिवाय उणे तपमानात जिवंत राहण्याची पराकाष्ठा का तर पाकीस्तानी कुत्र्यांनी सुद्धा आपल्याला स्पर्श करू नये? शिपाई बलदेव सिंग ह्यांची जिद्द बघून जिद्दीला सुद्धा नवीन धुमारे फुटले असतील असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. भारत मातेचे असे अनेक सैनिक इतिहासाच्या पानात असे लुप्त झाले की त्याची जाणीव न कधी देशाला झाली न देशवासियांना ज्यांच्यासाठी त्यांनी रक्त सांडलं. शिपाई बलदेव सिंग ह्यांच नाव तर सोडाच पण त्यांची साधी माहिती ही उपलब्ध नाही. अश्या शूर आणि पराक्रमी विरांच्या रक्ताने आज भारत देश अखंड आहे. त्यांच्या स्मृतीस माझा कडक सॅल्यूट आणि त्यांच्या चिकाटी आणि धैर्याला माझा साष्टांग नमस्कार. भारत आणि भारतीय तुमच्या सारख्या सैनिकांच्या ऋणातून कधीच मुक्त होणार नाहीत.
जय हिंद !!!
फोटो स्रोत :- गुगल
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment