Sunday, 31 May 2020

कोरोना सैनिक... विनीत वर्तक ©

कोरोना सैनिक... विनीत वर्तक ©

सिमेवर कोणत्याही प्रसंगात आपल्या जीवाची पर्वा न करता देशाच्या सीमांचे रक्षण करणारे सैनिक देशावर आलेल्या कोणत्याही आपत्तीमध्ये नागरिकांच्या रक्षणासाठी पण सगळ्यात पुढे असतात. ती आपत्ती नैसर्गिक असो वा कृत्रिम पण सगळं बाजूला ठेवत देशाच्या आणि देशातील नागरिकांच्या रक्षणासाठी सैनिक आपलं रक्त सांडायला कधीच मागे पुढे बघत नाहीत. गणवेश अंगावर असो वा नसो पण देशप्रमाचं बाळकडू अंगात भिनलेला सैनिक आपल्या कर्तव्याला कधीच चुकत नाही. कोरोना च्या लढाईत पण हा सैनिक मागे राहिलेला नाही ह्याच एक उदाहरण नुकतच पुढे आलं आहे.

मेजर प्रदीप आर्या, आय.आर.एस, एस. सी., कॅप्टन निल शाजी व्ही.एस.एम., मेजर संजय रावले ह्या भारताच्या प्रादेशिक सेनेच्या तीन सैनिकांनी मिळून मुंबई पोलीस तसेच नासकॉम च्या सहकार्याने मुंबई मधील वैश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना मदतीचा एक हात दिला आहे. कोरोनामुळे वैश्याव्यवसाय नाईलाजाने करणाऱ्या अनेक स्त्रियांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्राहक नसल्याने ह्या सगळ्यांच्या पुढे खूप कठीण समस्या उभ्या झाल्या आहेत. रात्रीच्या अंधारात शरीरसुखाची गरज भागवणाऱ्या स्त्रियांकडे आपलाच समाज दिवसाच्या उजेडात एका विशिष्ठ नजरेतून बघतो. अश्या एका नजरेतून की जिकडे त्यांना मुख्य प्रवाहापासून लांब ठेवलं जाते. त्यांच्याकडे काहीतरी पाप केल्याच्या नजरेतून बघितलं जाते. दिवसा पांढरे कपडे घालून मिरवणारा हाच समाज रात्रीच्या काळोख्यात आपलं तोंड काळ करायला त्याच स्त्रियांकडे जातो. पण कोरोनामुळे ह्या सगळ्यांवर खूप कठीण परिस्थिती आलेली आहे.

मुंबईच्या फॉकलंड रोड, कामाठीपुरा ह्या विभागात वैश्याव्यवसाय करणाऱ्या ह्या स्त्रियांच्या मदतीसाठी भारतीय सैनिक पुढे आलेले आहेत. पहिल्या टप्यात जवळपास ४५०० पॅकेट्स ज्यात दोन भाग आहेत. एक पॅकेट्स ज्या मध्ये ५ किलो तांदूळ, ५ किलो गव्हाचं पीठ, २ किलो तूर डाळ, हळद आणि मिरची पावडर अशी राशन सामुग्री तर दुसऱ्या पॅकेट्स मध्ये साबण, हॅन्ड वॉश, सॅनिटरी नॅपकिन, सॅनिटायझर असं सगळं असलेले हे पॅकेट्स त्या स्त्रियांना २२ मे ला देण्यात आले. अतिशय अडचणींचा सामना करणाऱ्या ह्या स्त्रियांपर्यंत पोहचण्याचं काम ह्या सैनिकांनी हाती घेतलं आहे. आता मुंबईतील इतर भागात जसे कॉटन ग्रीन, सायन- आग्रीपाडा, चर्नीरोड, कांदिवली ह्या भागात आपलं कार्य पुढे नेण्याचा मानस आहे.  आपल्या कामाबद्दल बोलताना मेजर प्रदीप आर्या म्हणतात,

“Our aim with this initiative is to support the vulnerable people and encourage them to stay home and not step outside to buy essentials. I always like to look on the optimistic side of life, but I am realistic enough to know that life is complex, more so during these trying times”

Major Pradeep Arya, IRS, SC.
Masters degree in Sociology,
Masters in Business Administration,
Masters in Law,
Masters in Taxation,
Phd (Doctorate ) in Sociology 
Commercial Pilot Licence (CPL)

मेजर प्रदीप आर्या हे इंडियन रेव्हन्यू ऑफिसर होते जेव्हा त्यांनी भारतीय प्रादेशिक सेनेत जाण्याचा निर्णय घेतला. ४ विषयात मास्टर पदवी आणि डॉक्टरेट असताना देशासाठी काहीतरी करण्याच्या इच्छने त्यांनी देशाच्या सुरक्षततेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांची नियुक्ती प्रादेशिक सेनेच्या ४ थ्या बटालियन च्या पॅराशूट रेजिमेंट स्पेशल फोर्सेस मध्ये झाली. २७ मे २०१७ ला अतिरेक्यांच्या एका तुकडीला निष्प्रभ करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या पराक्रमासाठी त्यांना शांतता काळात देण्यात येणाऱ्या तिसऱ्या सगळ्यात मोठ्या सन्मान 'शौर्य चक्राने' सन्मानित करण्यात आलं. इतक्या सगळ्या पदव्या आणि मानसन्मान मिळून पण मेजर प्रदीप आर्या आणि त्यांची टीम आज कोरोना योद्धा बनून समाजाने वाळीत टाकलेल्या स्त्रियांसाठी काम करत आहेत. देशासाठी लीडर प्रमाणे फ्रंट वर उभे राहून देशाचे रक्षण करणारे सैनिक आज कोरोना योद्धा बनून समाजतल्या सगळ्यात खालच्या घटकांना आपली मदत करत आहेत. त्यांच्या ह्या कार्याला माझा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Saturday, 30 May 2020

एका नव्या युगाची सुरवात... विनीत वर्तक ©

एका नव्या युगाची सुरवात... विनीत वर्तक ©

आज सकाळी एका नव्या युगाची सुरवात अवकाश क्षेत्रात झाली आहे. अमेरीकेच्या भूमीवरून माणसाच्या अवकाश सफारीला सुरवात झाली आहे. शीत युद्धाच्या काळात अमेरिकेने रशियावर कुरघोडी करण्यामागे अमेरिकेचा 'स्पेस प्रोग्रॅम' कारणीभूत होता. पूर्ण जगात तंत्रज्ञानाच्या बाबतीत आघाडी घेण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष 'निक्सन' ह्यांनी ५ जानेवारी १९७२ ला अमेरिका पुन्हा वापरता येतील अशा स्पेस शटल प्रोग्रॅम वर काम करत असल्याचं जाहीर केलं. जवळपास ९ वर्षांनी नासा ने १२ एप्रिल १९८१ ला कोलंबिया स्पेस शटलचं पहिलं उड्डाण करून आपण ह्या क्षेत्रात दादा असल्याचं पूर्ण जगाला दाखवून दिलं! 'स्पेस शटल प्रोग्रॅम' अंतर्गत कोलंबिया, चॅलेंजर, डिस्कवरी, अटलांटीस, एन्डेव्हर अशा पाच स्पेस शटलची निर्मिती केली. २१ जुलै २०११ ला शेवटचं उड्डाण भरेपर्यंत ह्या पाच स्पेस शटलनी जवळपास १३५ मिशन पूर्ण केले होते. पण कुठेतरी हा प्रोग्रॅम अमेरिका आणि नासा ह्या दोघांनाही डोईजड होता. ह्यातील प्रत्येक शटल हे १०० वेळा उड्डाण करण्यासाठी बनवलं गेलं होतं; पण चॅलेंजर, कोलंबिया ह्यांच्या अपघातातून ह्या स्पेस शटल वर असलेला विश्वास कमालीचा कमी झाला. १४ अंतराळवीरांना आपले प्राण गमवावे लागले ज्यात भारताच्या कल्पना चावला चा ही समावेश होता. पूर्ण स्पेस शटल प्रोग्रॅम मागचा नासाने केलेला खर्च जवळपास १९६ बिलियन अमेरिकन डॉलर इतका प्रचंड होता!! गणित केल्यास प्रत्येक मिशनसाठी जवळपास ४५० मिलियन अमेरिकन डॉलर नासाला मोजावे लागत होते. इतके पैसे मोजूनही जुनी झालेली शटल आणि त्यात वाढत्या अपघातांचं प्रमाण हे नासा ला अस्वस्थ करत होतं. नासा च्या पूर्ण बजेट मधील मोठा हिस्सा हा स्पेस शटल प्रोग्राम आणि आय.एस.एस. वर खर्च होतं होता.

'स्पेस शटल' सारखा पांढरा हत्ती जोपासणं नासाला भारी पडत होतं. त्यामुळे नाईलाजाने नासा ने हा प्रोग्रॅम बंद करत असल्याची घोषणा केली. पण ह्यामुळे नासा आणि अमेरिका आपल्या भूमीवरून पुढील एक दशक माणसांना अवकाशात घेऊन जाऊ शकणार नाहीत हे सत्य नासाला आणि पर्यायाने अमेरिकेला स्वीकारावं लागलं. आपला शत्रू राहिलेल्या रशियाकडे पैसे मोजून आपल्या वैज्ञानिक आणि संशोधकांना 'आय.एस.एस.'वर ने आण करण्यासाठी रॉकेट भाड्यावर घेण्याची नामुष्की नासा वर ओढवली. नासा सद्य स्थितीला एका माणसाला रशियाच्या सोयूझ रॉकेटमधून अवकाशात पाठवण्यासाठी जवळपास ७६,०००,००० अमेरीकन डॉलर मोजत होती. ह्यासाठीच नासा ने स्पेस शटल नंतर माणसांना अवकाशात ने- आण करणाऱ्या वाहनांच्या निर्मितीसाठी २०१४ साली   'स्पेस एक्स' ला २.६ बिलियन अमेरिकन डॉलरचं काम दिलं. एकदा मानवी उड्डाणासाठी सज्ज झाल्यावर तूर्तास नासा ने ६ उड्डाणाचं काम 'स्पेस एक्स' ला दिलं आहे.

२०१४ ला स्पेस एक्सला काम मिळाल्यावर स्पेस एक्सने ड्रॅगनच्या निर्मितीवर काम सुरु केलं. ड्रॅगन मध्ये दोन भाग करण्यात आले, 'एक जे सामान वाहून नेईल आणि एक जे माणसांना घेऊन जाईल.' एकदा उड्डाण भरून आय.एस.एस. ( इंटरनेशनल स्पेस स्टेशन ) ला डॉकींग झाल्यावर ते सोयूझप्रमाणे जास्तीत जास्त २१० दिवस राहून मग पृथ्वीवर पुन्हा परतणार आहे. पृथ्वीवर परत आल्यावर पुन्हा ते पुढच्या उड्डाणासाठी वापरता येणार आहे. 'स्पेस एक्स ड्रॅगन' हे ४ मीटर व्यासाचं असून ह्याची उंची ८.१ मीटर इतकी आहे. एका वेळेस ७ माणसांना अवकाशात नेण्याची ह्याची क्षमता आहे. उड्डाण भरताना हे आपल्या सोबत ६ टन वजन नेऊ शकतं.तर परत येताना ३ टन वजन सोबत घेऊन पृथ्वीवर उतरू शकतं. ह्यात 'कॅप्सूल' आणि 'ट्रंक' असे दोन भाग असून पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्याआधी ट्रंक मेन कॅप्सूल पासून विलग होतो. ड्रॅगन मध्ये आर.पी.१ इंधन म्हणून वापरण्यात येते. आजमितीला लिक्विड हायड्रोजन हे इंधन हे जास्त वजनाला अवकाशात घेऊन जाण्यासाठी वापरण्यात येते. पण लिक्विड हायड्रोजनचं इंधन खर्च खूप जास्त आहे. त्या तुलनेत आर.पी.१ स्वस्त आहे. ह्यात फ्रोझन ऑक्सिजन साठवला जातो. त्यामुळे इंधन टाक्यांना जागा कमी लागते तसेच सॉलीड इंधनाचा वापर न करता सगळीकडे क्रायोजेनिक इंजिनाचा वापर केलेला आहे. ह्याच्या पुढच्या व्हर्जन मध्ये लिक्विड मिथेन चा इंधन म्हणून वापर करण्यात येणार हे ज्यामुळे ह्याची कार्यक्षमता अजून वाढणार आहे. ह्यावर ८ सुपर ड्रको इंजिन असून प्रत्येक इंजिन ७१ किलोन्यूटनचं बल निर्माण करण्यात सक्षम आहे.

आज सकाळी स्पेस ड्रॅगन ने नासा चे अंतराळवीर बॉब बेहनकें आणि डॉग हार्ले ह्यांना घेऊन आय.एस.एस. साठी उड्डाण केलं आहे. ह्या यशस्वी उड्डाणाने अवकाश क्षेत्रात एक नव्या युगाची सुरवात झाली आहे. नासा च्या ह्या दोन्ही अंतराळवीरांना स्पेस शटल चालवण्याचा अनुभव आहे. स्पेस शटल आणि स्पेस एक्स ड्रॅगन ह्या दोन्ही अवकाश सफारीच्या वाहनात काही प्रमुख बदल आहेत ते खालील प्रमाणे.

१) स्पेस शटल मध्ये ह्याचा आकार विमानासारखा होता. पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यावर एखाद्या विमानाप्रमाणे ग्लाइड करत ते जमिनीवर उतरत असे. त्याला ग्लाइड करणं आणि जमिनीवर अचूकरीत्या उतरवणं हे खूप कठीण काम होतं. स्पेस एक्स ड्रॅगन पृथ्वीच्या वातावरणात शिरताना त्याचे नको असलेल्या भाग विलग करते. पॅराशूट च्या साह्याने आपला वेग कमी करत ते समुद्रात पाण्यावर ठरलेल्या ठिकाणी कोसळते.

२) स्पेस शटल मध्ये सॉलिड इंधनाचा वापर केला जात होता. ह्याची अडचण अशी होती की ह्या इंधनाच्या प्रज्वलनावर नियंत्रण ठेवणं कठीण जाते ह्यामुळे इंधन जळत असताना रॉकेट खूप मोठ्या प्रमाणावर कंप पावत असे. ( ह्या कंपनांमुळे फोम निखळून चॅलेंजर चा अपघात झाला होता) पण स्पेस एक्स ड्रॅगन हे द्रवरूप इंधन वापरत असल्याने अतिशय कमी प्रमाणात कंप पावते.

३) स्पेस शटल च्या उड्डाणात काही 'ब्लॅक झोन' होते. ब्लॅक झोन म्हणजे जिकडे आत असलेल्या लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला तरी त्यांना कोणताच पर्याय जीव वाचवण्यासाठी उपलब्ध नव्हता. चॅलेंजर घटनेच्या वेळी नासा च्या आधीच लक्षात आलं होतं की फरशी निखळून त्याला एक भोक पडलं आहे पण आतल्या अंतराळवीरांना वाचवण्याचा कोणताच पर्याय त्यांच्याकडे नव्हता. स्पेस एक्स ड्रॅगन ची निर्मिती करताना स्पेस एक्स आणि नासा ह्या दोघांनी खूप वेळ हे ब्लॅक झोन पूर्णतः नसणाऱ्या मॉडेलसाठी खर्च केले होते. आज स्पेस एक्स ड्रॅगन नो ब्लॅक झोन असणारं वाहन आहे. ज्यात कोणत्याही क्षणी म्हणजे रॉकेट उड्डाण भरताना अथवा पृथ्वीच्या वातावरणात शिरताना अंतराळवीरांना रॉकेट अथवा इतर गोष्टींपासून विलग होता येतं आणि त्यांचा जीव वाचवता येतो. 

४) स्पेस शटल मध्ये जवळपास २००० वेगवेगळी बटन होती. अंतराळयात्रींन कडून जर एखाद बटन चुकून दाबलं गेलं तर भलतच गोष्ट होऊन संपूर्ण मोहिमेला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. स्पेस ड्रॅगन मध्ये तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे टच स्क्रीन डिस्प्ले असून त्यामुळे अश्या चुका होण्याची शक्यता खूप कमी केली गेली आहे.

५) स्पेस शटल प्रोग्रॅम हा पूर्णतः नासा ने बनवला होता तर स्पेस एक्स ड्रॅगन ची निर्मिती एलोन मस्क च्या स्पेस एक्स आणि नासा ह्यांनी संयुक्तपणे केली आहे.

स्पेस एक्स ड्रॅगन च्या यशस्वी उड्डाणानंतर जवळपास १४ तासांनी ते आय.एस.एस. शी जोडलं जाईल. जेव्हा बॉब आणि डॉग आय. एस.एस. वर प्रवेश करतील तेव्हा मानवाच्या अंतराळ सफारीच एक नवीन वाहन त्यांनी अवकाशात जोडलेलं असेल. ड्रॅगन च्या यशस्वी उड्डाणासाठी स्पेस एक्स ची संपूर्ण टीम, अभियंते, वैज्ञानिक आणि नासा च्या टीम चं खूप खूप अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.

फोटो स्रोत :- गुगल, नासा - स्पेस एक्स

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Thursday, 21 May 2020

एका झाशीच्या राणीची गोष्ट... विनीत वर्तक ©

एका झाशीच्या राणीची गोष्ट... विनीत वर्तक ©

"मी माझी झाशी देणार नाही" असं सांगत १८५७ च्या ब्रिटिशांच्या विरुद्ध च्या उठावात लढा देणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई ह्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात एक रणशिंग फुंकले होते. त्यांच्या ह्या पराक्रमाने, शौर्याने भारताच्या त्या काळात अनेक स्त्रियांना प्रभावित केले होते. चूल आणि मूल ह्यात अडकलेली भारतीय स्री वेळप्रसंगी तलवार उचलू शकते आणि लढाईच मैदान गाजवू शकते हा विश्वास त्यांनी त्या काळी भारतीय स्त्रियांना दिला होता. ब्रिटिशांना जर भारतातून हकलवून लावायचे असेल तर हातात शस्त्र घेतल्याशिवाय पर्याय नाही हे नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांना पक्के ठाऊक होते. भारतीय स्त्रियांचा पराक्रम, ताकद आणि लढा देण्याची वृत्ती ह्यांचा वापर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात होऊ शकतो हे नेताजींनी आधीच ओळखले होते. त्यासाठीच त्यांनी आझाद हिंद सेनेत संपूर्ण स्री सैनिकांची एक ब्रिगेड तयार केली होती आणि त्याला नाव दिलं होतं 'झाशी च्या राण्या (रणरागिणी)" 

नेताजी आझाद हिंद सेनेसाठी पैसे आणि लोकांची जमवाजमव करत होते. त्यांच्या भाषणांनी अनेक तरुण लोकांना स्वातंत्र्याच्या ह्या लढाईत आपलं योगदान देण्यासाठी प्रेरित केलं होतं. जुलै १९४३ चा काळ होता नेताजी सिंगापूर इकडे भाषण देण्यासाठी आले होते. सिंगापूर इकडे जवळपास ५०,००० ते ६०,००० भारतीय लोक नेताजींचे भाषण ऐकण्यासाठी जमा झाले होते. त्यांच्या त्या शब्दांनी सर्वच भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य लढ्यात उतरण्याची इच्छा झाली. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी  एक १७ वर्षाची मुलगी आली होती. सिंगापूर मधल्या मध्यम वर्गीय सुखवस्तू कुटुंबातून आलेल्या त्या मुलीला बंड करायचं होतं. पारंपारीक पद्धतीने जमलेलं लग्न कोणत्यातरी अनोळखी माणसाशी करून संसाराचा गाडा हाकायची तिची इच्छा अजिबात नव्हती. सुभाष बाबुंचे शब्द तिच्या त्या कोवळ्या मनावर कोरले गेले होते. आता एकच लक्ष्य ते म्हणजे ब्रिटिश सत्तेचा नायनाट आणि भारताचं स्वातंत्र्य.

तिने मागचा पुढचा विचार न करता पहिलं पाऊल उचललं ते म्हणजे आपल्याजवळचे सगळे किमती दागिने आणि पैसे तिने आझाद हिंद सेनेला मदत म्हणून दान केलं. आपला पुढला निर्णय तिने जाहीर केला तो म्हणजे आझाद हिंद सेनेत भरती होण्याचा. आझाद हिंद सेनेत संपूर्ण स्री रेजिमेंट चा भाग होण्याचा तिचा निर्णय एका सुखवस्तू मध्यमवर्गीय कुटुंबासाठी धक्कादायक होता. पण ती मुलगी घरच्यांच्या दबावाला दबली नाही. आपल्या कुटुंबाला आपला निर्णय स्विकारण्याशिवाय तिने पर्याय ठेवला नाही. २२ ऑकटोबर १९४३ ला ह्या मुलीने आझाद हिंद सेनेच्या झाशीच्या राण्या ह्या रेजिमेंटच्या स्थापनेसोबत प्रवेश केला.

एका सुखवस्तू घरातून आलेल्या त्या मुलीला सैनिकी आयुष्य काय असते? हे माहित नव्हतं. देशासाठी सैनिक बनून स्वातंत्र्य लढ्यात तर उडी घेतली पण त्यासाठी लागणारी शरीराची कसरत, ते वातावरण, तो सराव सगळचं तिच्यासाठी नवीन होतं. रोज सकाळी लवकर उठून खडतर ट्रेनिंग, मार्चिंग, बंदुकीचा सराव हे सगळं कुठेतरी तिला मानवत नव्हतं पण मनात लक्ष्य एकच तो तिरंगा भारताच्या भूमीवर फडकवायचा होता आणि त्यापुढे हे सगळे कष्ट काहीच नव्हते. आपण ज्या रस्त्यावर निघालो आहोत तिकडून कदाचित आपण जिवंत परत येणार नाही ह्याची कल्पना असताना सुद्धा फक्त आणि फक्त भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य लढ्यात वयाच्या १७ व्या उडी घेणारी ती झाशीची राणी म्हणजे 'जानकी थेवर'.

जानकी थेवर ह्यांनी आपल्या कर्तृत्वाने आझाद हिंद सेनेत लेफ्टनंट पदापर्यंत मजल मारली होती. एप्रिल १९४४ मध्ये लेफ्टनंट जानकी थेवर ह्यांची नियुक्ती बर्मा (म्यानमार ) च्या झाशी राणी ब्रिगेड च्या कमांडरपदी झाली. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी एका स्री आर्मी चं नेतृत्व जानकी थेवर ह्यांच्याकडे आलं होतं. एक स्री सैनिकी नेतृत्व समर्थपणे करू शकते हे त्यांनी दाखवून दिलं. आझाद हिंद सेनेत नवीन स्त्रियांना भरती करण्यासाठी एका मलेशियन वृत्तपत्रात लिहिलं होतं,

“We may be the softer and fairer sex but surely I protest against the word ‘weaker’. All sorts of epithets have been given to us by man to guard his own selfish interests. It is time we shattered these chains of men along with the chain of Indian slavery."

आपल्या धारधार शब्दांनी त्यांनी त्याकाळी कित्येक स्त्री सैनिकांना प्रभावित केलं होतं. युद्धात आझाद हिंद सेनेची पिछेहाट होतं असताना पण ह्या रेजिमेंट ची एकही स्री सैनिक आपल्या रेजिमेंट मधून पळून गेली नाही. इतकं जबरदस्त समर्पण ह्या सर्वच स्त्रियांच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात होतं. ब्रिटिश सैनिकांनी रंगून (यंगून, म्यानमार ) इथल्या रेड क्रॉस हॉस्पिटलवर बॉम्ब हल्ला केल्यावर जखमी सैनिकांना त्यातून वाचवण्यात तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्या सोबत प्रत्येक सैनिकाला जंगलातून, दरी- खोऱ्यातून घरी पोहचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आझाद हिंद सेना युद्धात हरल्यानंतर त्यांनी इंडियन मेडिकल मिशन च्या माध्यमातून मलेशिया इकडे भारतीयांसाठी काम सुरु केलं. आझाद हिंद सेना संपली असली तरी त्यांचा बाणा कायम होता. स्त्रियांसाठी त्यांनी अनेक सामाजिक संस्थांमधून आपलं योगदान त्यांनी दिलं. त्यांच्या भरीव योगदानाची दखल मलेशिया सारख्या मुस्लिम राष्ट्राने घेताना त्यांना मलेशिया च्या अप्पर हाऊस मध्ये सांसद म्हणून निवडून दिलं. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मानाने त्यांचा गौरव करण्यात आला. भारत सरकारने उशिरा का होईना २००० साली त्यांना भारताच्या पद्मश्री सन्मानाने सन्मानित केलं. हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या अनिवासी भारतीय महिला होत्या. ९ मे २०१४ ला ह्या झाशीच्या राणीने शेवटचा श्वास घेतला आणि एका युगाचा अंत झाला.

वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी पुरुषी वर्चस्वा विरुद्ध बंड करत भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या जीवाची पर्वा न करता आपलं योगदान जानकी थेवर ह्यांनी दिलं. स्री कोणत्याही क्षेत्रात मागे नाही हे सांगताना एका स्री रेजिमेंट ची धुरा वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी समर्थपणे सांभाळली. आपला जाज्वल्य देशाभिमान, आपला बाणा, आपला पराक्रम ह्या जोरावर त्यांनी पाहिलेलं स्वातंत्र्य भारताचं स्वप्न त्या पूर्ण करू शकल्या नाहीत पण त्यांनी दिलेलं योगदान हे अमूल्य होतं. त्यांच्या स्मृतीस एका भारतीयाचा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार...

जय हिंद!!!

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Tuesday, 19 May 2020

#दुर्गाशक्ती भाग ७ पद्मश्री सुभासिनी मिस्त्री... विनीत वर्तक ©

#दुर्गाशक्ती भाग ७ पद्मश्री सुभासिनी मिस्त्री... विनीत वर्तक © (Re Posted)

कधी कधी कर्तुत्वाची उंचीच इतकी असते की सन्मानाचं वजन त्यामुळे वाढते. काहीसा हाच अनुभव २०१८ वर्षीच्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या सुभासिनी मिस्त्रीन मुळे पद्मश्री सन्मानाला आला आहे. सुभासिनी मिस्त्री वय वर्ष ७५ जेव्हा अगदी साध्या साडीत आणि स्लीपर घालून राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्यांच्याकडून पद्मश्री पुरस्कार स्वीकारत होत्या तेव्हा पूर्ण भारत काय पूर्ण जग अवाक होऊन बघत होतं. कारण एक स्त्री ठरवलं तर काय करू शकते ह्याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुभासिनी मिस्त्री.

अतिशय गरीब कुटुंबात जन्म झालेल्या सुभासिनी च लग्न अवघ्या १२ व्या वर्षी झालं. १२ वर्ष संसार आणि ४ मुल खांद्यावर असताना त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. ह्या अकाली मृत्यूला कारण होतं ते म्हणजे वेळेवर न मिळालेले उपचार. अतिशय गरीब आणि पैसे नसल्याने वेळेवर नवऱ्याला हॉस्पिटल मध्ये प्रवेश नाकारला गेला त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला. त्याच क्षणी सुभासिनी मिस्त्री नी आपलं आयुष्याच ध्येय निश्चित केलं ते म्हणजे आपण हॉस्पिटल काढायचं. असं हॉस्पिटल जिकडे सगळ्या गरजुंचे उपचार होतील. एकही माणूस उपचार नाही मिळाले म्हणून मृत्युमुखी पडणार नाही. ज्या गावात आपल्या नवऱ्याला मरण आलं तिकडे मी हॉस्पिटल काढेन अस त्यांनी निक्षून सांगितलं. लोक त्यांच्यावर हसले, समाजाने त्यांची टिंगल उडवली. एक २३ वर्षाची स्री अंगावर ४ मुलं ज्यात सगळ्यात मोठा ८ वर्षाचा तर लहान ४ वर्षाचा, अशिक्षित आणि गरीब असताना हॉस्पिटल काढायचं तर सोड पण स्वतःच घर नीट करून दाखव अशी लोकांनी तिची अवहेलना केली.

हरेल तर ती भारतीय स्री कुठली.... लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सुभासिनी मिस्त्री नी आपल्या लक्षाकडे वाटचाल सुरु केली. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी लोकांच्या घरी काम करायला सुरवात केली. ५ लोकांच्या घरी धुण्याभांड्याची काम करून त्यांना महिन्याला १०० रुपये मिळायला लागले. आपल्या मुलाला त्यांनी अनाथ आश्रमात ठेवलं आणि बाकीच्यांची जबाबदारी घेत भाजी विकायचा व्यवसाय सुरु केला. त्यांनी बँकेत आपलं खात सुरु केलं. आपल्या मुलांची शिक्षण आणि खर्च करून जे काही पैसे वाचले ते त्या बँकेत बचत करत गेल्या. तब्बल २० वर्ष हे प्रामाणिकपणे करत राहिल्या.

१९९२ साल उजाडल सुभासिनी मिस्त्री नी हन्सपुकुर ह्या गावात १०,००० रुपयांना जमीन खरेदी केली. हे तेच गाव होतं जिकडे त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता. २० वर्षात बरचं पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. त्यांच्या सगळ्यात लहान मुलाने आईच स्वप्न पूर्ण करण्याच निश्चित केलं होतं. त्यासाठी आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने कोलकत्ता मेडिकल कॉलेज मधून डॉक्टर ची पदवी मिळवली होती. जी लोक २० वर्षापूर्वी तिच्या स्वप्नावर हसली होती त्याच गावातील लोकांना आपण ही जमीन हॉस्पिटलसाठी दान देतं आहोत हे सांगताना गावकऱ्यांनी ह्या हॉस्पिटल च्या उभारणीसाठी आपलं योगदान द्यावं अस आवाहन त्यांनी गावातील लोकांना केलं. आपल्याच लोकांसाठी ह्याचा फायदा होईल हे बघून गावातील लोकं येत गेले आणि कारवा बनता गया. पुढील २-३ वर्षात ह्यूमॅनिटी हॉस्पिटल ने २५० लोकांना वैद्यकीय मदत दिली होती. ही सगळी मदत एकही रुपया न घेता तिथल्या डॉक्टरांनी केली होती. ज्यात सुभासिनी मिस्त्री ह्यांचा डॉक्टर मुलगा अजय मिस्त्री ह्यांचा समावेश होता.

ह्यूमॅनिटी हॉस्पिटल हे नाव आजूबाजूच्या गावात पसरलं. त्यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी अनेक लोक आणि संस्था पुढे आल्या. एका वर्षाच्या आत ह्यूमॅनिटी हॉस्पिटल ट्रस्टकडे १० पट पैसा जमा झाला जो हॉस्पिटल उभारणीच्या पहिल्या टप्प्यात गरजेचा होता. आज हे हॉस्पिटल पूर्णतः अद्यावत असून ह्यात ऑपरेशन थेटर, सोनोग्राफी, एक्स रे अश्या तसेच इतर विविध उपकरणांनी सुसज्ज आहे. ह्या हॉस्पिटल च एक युनिट त्यांनी प्रथारप्रतिमा, सुंदरबन इकडे सुरु केलं. ज्याचा उद्देश प्रत्येक माणसाला वैद्यकीय सेवा देणं हाच आहे.

अशिक्षित, गरीब आणि वयाच्या येन उमेदीच्या काळात ४ मुलांची आई असूनपण समाजातील प्रत्येकाला वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील एक एक पैसा वाचून ह्यूमॅनिटी हॉस्पिटल च स्वप्न बघून ते प्रत्यक्षात उतरवणं हे शब्दात व्यक्त करता येणार नाही इतकं मोठ काम त्यांनी केलं. भारताचा ४ था सगळ्यात मोठा नागरी सन्मान पद्मश्री मिळाल्यावर त्यांचे शब्द होते.

“I am very happy to get the award but I would like to request all hospitals in the world, please don’t refuse a patient who needs immediate medical attention. My husband died because he was refused admission and I don’t want anyone else to die in a similar way.”

पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना सुद्धा अगदी साध्या वेशात आणि स्लिपर वर सुभासिनी मिस्त्री राष्ट्रपती भवनात गेल्या होत्या. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यावर पण गर्वाचा एक लवलेश सुभासिनी मिस्त्री ह्यांच्या बोलण्यात नव्हता. त्यांच्या मते माझ्या कामाचा पुरस्कार मला तेव्हाच मिळाला जेव्हा आमच्या हॉस्पिटल मधून पहिला रुग्ण बरा होऊन घरी गेला. तेव्हा माझं स्वप्न पूर्ण झालं.

सुभासिनी मिस्त्री ह्यांना पद्मश्री देऊन सरकारने त्यांचा गौरव नाही केला तर त्या सन्मानाची शान वाढवली आहे. गरीब, अशिक्षित, उमेदीच्या काळात विधवा होऊन ४ मुलांची कर्तव्य वयाच्या २३ वर्षी असणारी एक स्री एक स्वप्न बघते की आपण हॉस्पिटल काढायचं आणि ह्या समाजात एकाही व्यक्तीचा मृत्यू हा वैद्यकीय मदतीशिवाय होता कामा नये. ते पूर्ण करण्यासाठी आपल्या आयुष्याची सगळी पुंजी त्यांनी हॉस्पिटल काढण्यासाठी लावून नुसतं हॉस्पिटल काढून न थांबता आपल्या मुलाला डॉक्टर करून समाजाच्या सेवेसाठी रात्रंदिवस कार्यरत राहण्याचे संस्कार त्यांनी केले. स्त्रीने ठरवलं तर तिला काहीच अशक्य नाही आणि कोणाच्या आधाराशिवाय ती आपली स्वप्न पूर्ण करू शकते हा आत्मविश्वास भारतात आणि जगातील सगळ्याच स्त्रियांना आपल्या विनम्र वागणुकीतून देणाऱ्या दुर्गाशक्ती पद्मश्री सुभासिनी मिस्त्री ह्यांना माझा दंडवत. त्यांना माझा कडक सॅल्यूट.

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.