Monday 7 October 2019

ऑर्बिटर च्या नजरेने... विनीत वर्तक ©

ऑर्बिटर च्या नजरेने... विनीत वर्तक ©

चंद्रयान २ च ऑर्बिटर आपल्या कक्षेत परीक्रमा करत असुन विक्रम ल्यांडर च्या सॉफ्ट लॅण्डिंग च्या अपयशानंतर ऑर्बिटर च्या वैज्ञानिक उपकरणांनी आपलं काम करायला सुरवात केली आहे. ऑर्बिटर वरील एक उपकरण क्लास ( Chandrayaan 2 Large Area Soft X-ray Spectrometer ) ने नुकतेच 'चार्ज पार्टीकल' ओळखल्याची घोषणा इसरो ने काही दिवसांपूर्वी केली आहे. नक्की हे 'चार्ज पार्टीकल' म्हणजे काय? चंद्रयान २ च्या क्लास ने नक्की काय वेध घेतला? ह्या सगळ्याचा विज्ञानाशी काय संबंध? असे अनेक प्रश्न सामान्य लोकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. ह्याच प्रश्नांचा एका नव्या नजरेतुन मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न.

आपल्या पृथ्वीवर जिवसृष्टी अस्तित्वात यायला जसं इथलं वातावरण, पाणी, तापमान कारणीभुत आहे तसं ह्या वातावरणाचं रक्षण करणार एक अदृश्य कवच ही तितकच जबाबदार आहे. हे कवच म्हणजेच पृथ्वीचा मॅग्नेटोस्पियर. पृथ्वी ही खुप मोठ्या चुंबका सारखी आहे. पृथ्वीच्या गर्भात होणाऱ्या डायनॅमो च्या उलथापालथीमुळे ह्या चुंबकाच्या चुंबकीय लहरी पृथ्वीच्या ध्रुवावरून निघुन पृथ्वीच्या बाजूने प्रवास करत असतात. आपला सुर्य प्रकाशासोबत अनेक अतिनील किरणे ही सौर मंडलात पाठवत असतो. जवळपास १ मिलियन मैल प्रति तास ह्या वेगाने ही किरणे पृथ्वीवर आदळतात. पण त्यांच्या रस्त्यात आडवी येतात त्या पृथ्वीच्या चुंबकीय लहरी. ह्या लहरी ह्या किरणांना पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू देतं नाही. त्यामुळेच पृथ्वीवरील सजीव सृष्टीचं रक्षण ह्या अतिनील किरणांपासुन होते. तब्बल ४.२ बिलियन वर्षांपूर्वी मंगळ ग्रहावर ह्याच चुंबकीय लहरींच अस्त्तिव नष्ट झालं आणि मग मंगळावरील वातावरणाला सुर्याच्या अतिनील किरणांनी नष्ट केलं. त्याचा परीणाम म्हणुन मंगळ ग्रह आज एक दगड धोंड्यांचा ग्रह बनुन राहिला आहे. एखाद्या वेगात जात असलेल्या वाहनावर ज्याप्रमाणे हवेचा प्रतिरोध दिसुन येतो त्याच प्रमाणे ह्या चुंबकीय लहरींचा प्रभाव वेगाने जाणाऱ्या अतिनील किरणांवर पडतो. एक अंडाकृती अदृश्य असं कवच पृथ्वीच्या भोवती तयार होते. ह्या कवचाची उंची पृथ्वीच्या त्रिजेच्या ३-४ पट असुन सूर्याच्या विरुद्ध दिशेला ह्याचा प्रभाव पसरलेला असतो आणि कमी होतं जातो. ह्या प्रभावाची नक्की लांबी माहित नसुन साधारण १००० पट पृथ्वीच्या त्रिजेच्या ह्याची लांबी असावी असा एक अंदाज आहे. हे चुंबकीय क्षेत्र आणि त्याचा प्रभाव सुर्याच्या अतिनील किरणांवर अवलंबुन असतो.

पृथ्वीच्या मागच्या बाजूला म्हणजेच सूर्याच्या विरुद्ध दिशेने असणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाला जिओटेल असं म्हणतात. ह्याचा प्रभाव चंद्राच्या कक्षाच्या पलीकडे पण जाणवतो. चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करत असताना तो साधारण प्रत्येक २९ दिवसांनी ह्या जिओटेल च्या क्षेत्रातुन प्रवास करतो. चंद्र साधारण ६ दिवसात ह्या जिओटेल च्या दोन्ही बाजुंना छेद करून पृथ्वीच्या भोवती परिक्रमा करतो. चंद्रयान २ चं ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत स्थापन झाल्यावर त्याच्या वरच्या क्लास ह्या उपकरणाने चंद्रासोबत ह्या पट्यातून जाताना ह्या अतिनील किरणातील कणांचा अभ्यास केला. क्लास हे उपकरण अनेक मूलद्रव्यांचा शोध घेण्यास सक्षम आहे. ते Na, Ca, Al, Si, Ti, and Fe अश्या मूलद्रव्यांच अस्तित्व शोधु शकते. क्लास ह्या उपकरणाने ह्या क्षेत्रातील चार्ज असणाऱ्या पार्टीकल चा अभ्यास केला. ज्यामुळे नक्की ह्या चुंबकीय क्षेत्रामुळे त्यांच्यावर काय प्रभाव पडतो? ह्या रहस्यावर प्रकाश पडणार आहे. तसेच ह्या बद्दलची महत्वाची माहिती जागतिक संशोधनासाठी उपलब्ध होणार आहे. चंद्र जेव्हा जेव्हा ह्या जिओटेल मधुन जाईल तेव्हा तेव्हा क्लास ह्या क्षेत्राचा अभ्यास करणार आहे. (विनीत वर्तक ©)

क्लास च्या अभ्यासामुळे पृथ्वीच्या सुरक्षाकवचाच्या एकूणच प्रक्रियेचा अभ्यास करता येणार आहे. तसेच सूर्याच्या अतिनील किरणांचा प्रभाव कसा बदलतो ह्या बद्दल ही माहिती मिळणार आहे.

“Dance of electrons to the music of magnetic fields”

ह्या गोष्टीचा अभ्यास येत्या काही काळात क्लास आणि पर्यायाने इसरो करणार आहे. चंद्रयान २ चं ऑर्बिटर येत्या काळात चंद्राच्या तसेच पृथ्वीच्या काही रहस्यांवर प्रकाश टाकेल अशी अपेक्षा आणि विश्वास इसरो ला आहे.

फोटो स्रोत :- गुगल



सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment