Sunday 27 October 2019

कोटीच्या कोटी उड्डाणे... विनीत वर्तक ©

कोटीच्या कोटी उड्डाणे... विनीत वर्तक ©

एकेकाळी काही देशांची मक्तेदारी असणाऱ्या अवकाश क्षेत्रात काही दशकांपुर्वी भारताने प्रवेश केला. आज त्या क्षेत्रात भारताने स्वतःच असं आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. हे स्थान ज्या कारणांसाठी महत्वाचं आहे ते म्हणजे 'फ्रुगल इंजिनिअरिंग'. जिकडे शक्य होईल तिकडे भारताने ह्याचा वापर करत एकापेक्षा एक अश्या खडतर मोहीम यशस्वी केल्या आहेत. रॉकेट प्रक्षेपणासाठी महत्वाचं असते ते त्याचं इंधन. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला भेदत उड्डाण लागणारं बल  देणार इंधन कोणत्याही उपग्रहाच्या अथवा रॉकेट च्या प्रक्षेपणात महत्वाची भुमिका बजावतं. सध्याच्या क्षणाला पृथ्वीच्या भोवती सुमारे ४००० उपग्रह फिरत असुन येत्या काही काळात त्यांची संख्या काही पटीने वाढणार आहे. अवकाश क्षेत्र हे खुप जोखमीचं आणि खुप खर्चिक असं क्षेत्र मानलं जाते. त्यामुळेच कमी खर्चिक आणि त्याच वेळेस सुरक्षित असणाऱ्या प्रणालींना पुर्ण जगात मागणी असणार आहे. स्वस्त, किफायतशीर आणि निसर्गाला कमीत कमी हानी पोहचवणारं इंधन ही पुढल्या काळाची गरज असणार आहे. त्यामुळेच येत्या काळात पर्यावरणाला पुरक इंधनावर संशोधन करण्यासाठी नासा, युरोपियन स्पेस एजन्सी, जॅक्सा  सारख्या संस्था पुढाकार घेतं असुन पुढील काही वर्षात पर्यावरण आणि हाताळण्यासाठी अत्यंत घातक असणारी इंधने बंद करण्याचे प्रयत्न करत आहे. भारत ही ह्या संशोधनात मागे नसुन एका मराठी मुलाने ह्या संशोधनात मराठी माणसाचे झेंडे अटकेपार फडकवले आहेत. तुषार जाधव हे ह्या तरुणाचं नाव असुन त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या 'मनस्तु स्पेस टेक्नॉलॉजी' ह्या कंपनीने 'आय बुस्टर' नावाची एक प्रपोलेशन प्रणाली तयार केली आहे. ही प्रणाली पर्यावरण पुरक असुन रॉकेट प्रक्षेपणासाठी लागणारं बल निर्माण करण्यात ही इतर प्रणाली पेक्षा जास्ती सक्षम आहे.   (विनीत वर्तक ©)

तुषार जाधव हा मुळचा नाशिक इथला असुन मुंबईच्या आय.आय,टी. मधुन त्याने पदवी घेतली आहे. डी.आर.डी.ओ. मध्ये काही काळ काम केल्यावर त्याने आपल्या साथीदारासोबत 'मनस्तु स्पेस टेक्नॉलॉजी' ची स्थापना केली. त्यानंतर उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी लागणाऱ्या प्रणाली, इंधनावर काम करून त्यांनी आय बुस्टर ची निर्मिती केली आहे. ह्या प्रणाली मध्ये हायड्रोजन पेरोऑकसाइड सोबत इतर घटकांचा वापर केला आहे. सध्या उपग्रह प्रक्षेपण करण्यासाठी ज्या रॉकेट चा वापर केला जातो त्यात 'हायड्राझैन' ह्या इंधनाचा वापर केला जातो. ह्या इंधनाचा स्पेसिफिक इम्पल्स फक्त २२० सेकंदाचा आहे.

(Specific impulse:- it is the total impulse (or change in momentum) delivered per unit of propellant consumed and is dimensional equivalent to the generated thrust divided by the propellant mass flow rate or weight flow rate.)

ज्याचा सोप्या भाषेत अर्थ असा की ते २२० सेकंड प्रज्वलित केलं जाऊ शकते. पण ह्याचवेळी हे इंधन अत्यंत ज्वालाग्राही आणि अत्यंत घातक निसर्ग आणि मनुष्य दोघांसाठी आहे. तुषार आणि त्याच्या कंपनी ने तयार केलेलं 'आय बुस्टर' च्या इंधनाचा स्पेसिफिक इम्पल्स हा २७५ सेकंदाचा आहे. ज्यामुळे हे इंधन २५% बचत इंधनाच्या क्षमतेत करते. त्याच सोबत हे इंधन 'हायड्राझैन' पेक्षा हाताळायला सोप्पे आणि पर्यावरणाला ४०% टक्के कमी हानी पोहचवणारं आहे. (विनीत वर्तक ©)

गणित करायचं झालं तर सध्या वापरात असलेल्या इंधनाने २ टन वजनाचा उपग्रह प्रक्षेपित करायला साधारण ४० मिलियन अमेरिकन डॉलर खर्च येईल तर तुषार ने निर्मण केलेल्या प्रणालीने हाच खर्च २८ मिलियन अमेरिकन डॉलर इतकाच येईल.(१२ मिलियन अमेरिकन डॉलर ची बचत ) ह्या शिवाय त्याच वजन ही १.५ टन इतकचं राहील. ह्यामुळे 'मनस्तु स्पेस टेक्नॉलॉजी' ही अवकाश क्षेत्रात येत्या काळात गेम चेंजर ठरणार आहे. ह्यामुळेच भारताच्या इसरो आणि डी.आर.डी.ओ. सारख्या संस्थांनी तुषार च्या संशोधनाची दखल घेतली आहे. नासा, युरोपियन स्पेस एजन्सी सारख्या संस्थांनी पुढल्या पिढीच्या तयार केलेल्या इंधनापेक्षा 'आय बुस्टर' जवळपास ६०% किफायतशीर आहे. नासा ने इंधन वापरासाठी आखुन दिलेल्या ९ मार्गदर्शक तत्वांपैकी आय बुस्टर ने ६ आधीच पुर्ण केली असुन उरलेली ३ तत्व ही येत्या २ वर्षात पुर्ण केली जातील असं तुषार जाधव अभिमानाने सांगतो.

नुकत्याच झालेल्या ड्रिम इनोव्हेशन स्पर्धेत त्यांच्या इनोव्हेशन ला तृतीय क्रमांकाच बक्षीस मिळालं तर जपान इकडे होणाऱ्या स्पर्धेसाठी त्यांनी निवड झाली आहे. ह्या स्पर्धेत विजेते ठरल्यास जवळपास ६५ लाखाच बक्षीस आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या संशोधनाला सन्मान मिळेल. तुषार जाधव ची ही उडी अनेक उद्योजग बनणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन तर देईलच पण त्या सोबत भारताच्या कोटीच्या कोटी उड्डाणात महत्वाची भुमिका बजावणार आहे.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment