Friday 18 October 2019

स्वप्नांच्या नजरेतुन बघणारी प्रांजल... विनीत वर्तक ©

स्वप्नांच्या नजरेतुन बघणारी प्रांजल... विनीत वर्तक ©

सप्तरंगाच्या दुनियेत अनेक रंगांच्या छटा बघताना देवाने आपल्याला दिलेल्या अमुल्य देणगीचा विचार आपण कधीच करत नाही. ज्या दोन डोळ्यांमुळे आपण ह्या निसर्गाच्या, माणसाच्या तसेच विश्वाच्या अनेक रंगांना अनुभवु शकतो त्याचा विसर आपल्याला पडतो. समजा ह्या दोन डोळ्यांनी काम करणं बंद केलं तर समोर येणाऱ्या अंधाराचा सामना आपण करू शकतो का? हा विचार आपण दोन क्षण जरी केला तरी त्याच महत्व आपल्याला समजुन येईल. पण यदाकदाचित हे डोळे कायमचे आंधळे झाले तर आपल्या स्वप्नांचं काय? असाच प्रश्न एका मुंबईकर असलेल्या मराठमोळ्या मुलीला पडला. आयुष्यात अंधार समोर दिसत असला तरी त्याने आयुष्य अंधारमय न करून घेता आपल्या स्वप्नांच्या नजरेतुन आयुष्यात आपली स्वप्न साकार करणाऱ्या प्रांजल पाटील हिने सगळ्यांच्या समोर एक आदर्श ठेवला आहे. भारतातील पहिली महिला आय.ए.एस. ऑफिसर होण्याचा मान तिने पटकावला आहे. डोळ्या समोरचा अंधार तिची दृष्टी आंधळी करून गेला पण आपल्या जिद्दीच्या जोरावर तिने एका अविश्वनिय अश्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवलं आहे. (विनीत वर्तक ©)

उल्हासनगर इथल्या प्रांजल पाटील ने २०१६ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पुर्ण देशात ७७२ वा क्रमांक मिळवला. आय.आर.एस. ची संधी असताना सुद्धा पुन्हा एकदा तिने २०१७ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली त्यात पुर्ण देशातुन तिने १२४ वा क्रमांक मिळवला. तिच्या ह्या यशाने तिला आय.ए.एस. बनण्याचे दरवाजे आपोआप उघडले. ( The Indian Administrative Service (IAS) is the top and most prestigious administrative civil service of Government of India.). वयाच्या ६ व्या वर्षी आपली दृष्टी गमावलेल्या मराठमोळ्या प्रांजल पाटील ने नुकताच आपल्या ट्रेनिंग चा भाग म्हणुन सहाय्य जिल्हाधिकारी एर्नाकुलम, केरळ इकडे पदभार स्विकारला. त्या सोबत भारतातील पहिली नेत्रहिन आय.ए.एस. अधिकारी म्हणुन आपलं नाव भारताच्या इतिहासात नोंदवलं आहे.

प्रांजल पाटील ला लहानपणापासुन डोळ्यांनी अंधुक दिसत होतं. वयाच्या ६ व्य वर्षी तिची दृष्टी पूर्णपणे गेल्याच निदान झालं. ह्या नंतर प्रांजल पाटील ने मुंबईतील दादरच्या नेत्रहीन लोकांसाठी असणाऱ्या कमला मेहता शाळेतुन आपलं शिक्षण पुर्ण केलं. त्यानंतर तिने मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेज मधुन पॉलिटिकल सायन्स मधुन बी.ए केलं. ह्या नंतर आपल्या पुढल्या शिक्षणासाठी तिने दिल्ली गाठलं. दिल्ली च्या जे.एन.यु. मधुन तिने एम.फील आणि पुढे डॉक्टरेट साठी च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारी साठी तिने कोणत्याही क्लास ला प्रवेश घेतला नाही. आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर, अभ्यासावर विश्वास ठेवल्यामुळे ती अनावश्यक स्पर्धेपासुन लांब राहिली. तिच्या शब्दात सांगायचं झालं तर, (विनीत वर्तक ©)

“Occasionally I would doubt if my level of preparedness was enough, but I let the sincerity of my effort lead me,”

आपली गेलेली दृष्टी परत मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न प्रांजल पाटील ने केले पण त्यात यश आलं नाही उलटं ह्या ऑपरेशन्समुळे अनेक शारीरिक तसेच मानसिक त्रासाला त्यांना सामोरे जावं लागलं.

“When the surgeries were done, I did suffer a lot. The pain did not subside until at least a year after the surgery,”

गेलेली दृष्टी आणि समोर असलेला असंख्य अडचणींचा पाढा अश्या सर्व बिकट परिस्थितीतुन वाट काढत मराठमोळ्या मुंबईकर प्रांजल पाटील ने भारतीय लोकसेवा आयोगाच्या इतिहासात एक नवीन अध्याय आपल्या जिद्दीने लिहिला आहे. दृष्टी गेल्यावर पण ब्रेल लिपी तसेच कॉम्प्युटर वरील जॉब एक्सेस विथ स्पीच सारख्या सॉफ्टवेअर च्या मदतीने तिने एक नवीन उंची गाठली आहे. एर्नाकुलम इकडे आपला पदभार स्विकारताना तिने काढलेले शब्द बरचं काही सांगुन जातात,

"We should never be defeated and we should never give up. With our efforts, all of us will get that one breakthrough which we want. I am feeling extremely glad and proud to take charge. Once I start working, I will have more idea about the sub divisions of the district and can have more plans to what to do for the subdivision,"

डोळ्यांनी अंधारमय केलेल्या आयुष्याला आपल्या स्वप्नांच्या नजरेतुन बघत मराठी माणसाचा अटकेपार झेंडा रोवणाऱ्या मराठमोळ्या प्रांजल पाटील ला माझा सलाम आणि तिच्या पुढल्या प्रवासाला खुप खुप शुभेच्छा.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment