Tuesday 15 October 2019

एक दुजे के लिये... विनीत वर्तक ©

एक दुजे के लिये... विनीत वर्तक ©

प्रेमाच्या आणाभाका कोणी कितीही घेतल्या तरी त्या सगळयांना निभावणं जमतेच असं नाही. खऱ्या निरपेक्ष प्रेमाला लग्न संस्थेची गरज भासत नाही किंवा जरी ते त्याचा भाग असले तरी त्या पलीकडे ते नातं जोडलेलं असते. लग्नाच्या गाठीने बांधलेल्या त्या दोन व्यक्ती तेव्हाच खऱ्या आयुष्याच्या जोडीदार होतात जेव्हा हे बंध तन, मन, धन ह्या पलीकडे काळाच्या कसोटीवर तसेच एकमेकांना साथ देतं राहतात. असच एक जोडपं ज्याचं प्रेम एक दशक नाही तर तब्बल ७ दशकापेक्षा अधिक काळ एकमेकांना साथ देतं राहिलं इतकच नाही तर आयुष्याचा शेवटचा श्वास सुद्धा दोघांनी एकाच दिवशी सोडला. त्यांच्या एक दुजे के लिये असणाऱ्या प्रेमाची ही गोष्ट आहे.

प्रिब्ले स्टावर आणि इसाबेल व्हाइटने ह्यांची ही प्रेम कहाणी. त्यांची कहाणी सुरु झाली ती १९४० साली. दोघेही पहिल्यांदा एकमेकांना भेटले ते आपलं शिक्षण पुर्ण करत असताना. तेव्हा एकमेकांबद्दल निर्माण झालेल्या प्रेमाच्या अंकुराचा पुढे वटवृक्ष होईल अशी कल्पना त्या दोघांनाही नव्हती. त्याच काळात दुसऱ्या महायुद्धाचे वारे वाहायला लागले होते. आपल्या ऐन तारुण्यात असणाऱ्या त्या दोघांनीही युद्धात भाग घेतला. इसाबेल नौदलात नर्स म्हणुन जखमींवर उपचार करायला लागली तर प्रिब्ले मरीन कमांडो म्हणुन लष्करात दाखल झाला. आपआपल्या बाजूने युद्धात आपलं योगदान देतानाही त्या कॉलेज जिवनात रुजलेल्या प्रेमाच्या अंकुराने आपलं स्थान दोघांच्याही आयुष्यात पक्क केलं होतं. १९४६ साली दुसऱ्या महायुद्धाची सांगता झाली आणि त्यानंतर अवघ्या ५ महिन्यात प्रिब्ले आणि इसाबेल ह्यांनी एकमेकांना आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणुन निवडलं.

लग्नानंतरच आयुष्य दोघांसाठी बदललं. दोघांना ५ मुलं झाली. इसाबेल एकीकडे त्यांच्या संगोपनात व्यस्त झाली तर प्रिब्ले आपल्या करियर मध्ये व्यस्त झाला. मुलं मोठी झाल्यावर इसाबेल ने पुन्हा आपलं नर्सिंग चं करीअर सुरु केलं. आयुष्याच्या अनेक चढ उतारातुन त्यांना जावं लागलं ज्यात अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेला त्यांचा मुलगा फुटबॉल खेळताना मृत्युमुखी पडला. ह्या कठीण क्षणात पण त्यांनी एकमेकांना साथ दिली. सात दशकाहुन अधिक काळ ह्या दोघांनी सुखाने संसार केला. त्यांच प्रेम, विश्वास काळाच्या कसोटीवर तसाच टिकुन राहिला. (विनीत वर्तक ©)

२०१३ ला इसाबेल ला dementia (मेंदूच्या ऐंद्रिय रोगामुळे उद्भवलेली कायम स्वरूपाची मानिसक र्हासाची अवस्था) झाल्याचं निदान झालं. ह्या रोगामुळे इसाबेल ला अनेक गोष्टींचा विसर पडत चालला होता. दिवसेंदिवस इसाबेल ची कमी होणारी स्मरणशक्ती बघुन प्रिब्ले च्या काळजाचा ठोका चुकत होता. प्रिब्ले हतबलतेने हे सर्व बघत होता. इसाबेल च्या खालावत चाललेल्या तब्येतीने प्रिब्लेची तब्येत खालावत चालली होती. प्रिब्ले ला फक्त एकच दिलासा होता की इसाबेल अजून त्याला विसरली नव्हती. इसाबेल आणि प्रिब्ले ला वेगवेगळ्या ठिकाणी उपचारासाठी ठेवण्यात आलं. इसाबेल पासुन चं दुरावण प्रिब्ले ला सहन होतं नव्हतं. आपल्या ९६ व्या वाढदिवसाला त्याने इसाबेल सोबत एकदा शेवटचं झोपण्याची इच्छा व्यक्त केली. प्रिब्ले च्या इच्छेखातर त्या दोघांना एकमेकांच्या बाजूला झोपण्याची तयारी त्यांच्या ६२ वर्षीय मुलीने केली. प्रिब्ले आणि इसाबेल शेवटचं एकमेकांच्या बाजुला पडून होते पण ते दोघेही काहीच बोलले नाहीत. फक्त एकमेकांचा हात हातात घेऊन झोपी गेले. त्यांच्या मुलीच्या शब्दात,

“There was not a single word spoken between the two of them. They held hands and just fell asleep. I told dad, ‘This is mom’s birthday present for you.’ He was just so happy that he got to take his nap with her.”

ह्या घटनेनंतर अवघ्या आठवड्यात इसाबेल ने ह्या जगाचा निरोप घेतला. तिच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाच्या वेळी प्रिब्ले ने इसाबेल च्या हात हातात घेतला. त्याला कळुन चुकलं की हा शेवटचा क्षण आहे. ज्या इसाबेल वर त्याने आयुष्यभर प्रेम केलं तब्बल ७ दशकाहुन अधिक काळ संसार केला ती इसाबेल आज त्याचा हात सोडुन दुर एका वेगळ्या प्रवासाला निघाली होती. ह्या भावुक क्षणाबद्दल त्यांच्या मुलीने सांगितलं, (विनीत वर्तक ©)

“He held her hand, and it was just so tender. I asked him if he wanted to stay after the prayers, and he shook his head. I said, ‘Okay, but you know that means you’re going to have to let go of her hand?’ I was crying, and he was crying,” .....

त्याच दिवशी संध्याकाळी प्रिब्ले ने पण ह्या जगाचा निरोप घेतला. ह्या आयुष्यात येताना १४ दिवसांच अंतर त्या दोघांमध्ये होतं तर जाताना १४ तासांनी ह्या दोघांनी ह्या जगाचा निरोप घेतला. एक दुजे के लिये असणारी त्यांची प्रेमकहाणी आपल्यामागे एक आदर्श ठेवुन गेली आहे. त्यांच्या मुलीच्या शब्दात,

“Mom and dad really lived out that, if you make a commitment, and even though life gets rough or life gets in the way, you work through life, and you live your life together.”

आज जिकडे निरपेक्ष प्रेम, वचनबद्धता, समजून घेण्याची क्षमता कमी होतं असताना इसाबेल आणि प्रिब्ले ह्यांची प्रेम कहाणी म्हणजे खर प्रेम काय असते हे सांगणारी आहे. आपलं सौंदर्य, आपलं शरीर, आपला पैसा, आपलं स्टेटस, आपला जात, धर्म आणि आपलं नागरिकत्व ह्या पलीकडे जाऊन आपल्या सुंदर भावनांना समजुन घेऊन निभावणं काय असते हे सर्वानीच इसाबेल आणि प्रिब्ले कडुन शिकण्यासारखं आहे. त्या दोघांच्या प्रेमकहाणीस माझा सलाम.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.






No comments:

Post a Comment