Thursday, 3 October 2019

दुर्गाशक्ती भाग ६ (मल्लिका श्रीनिवासन)... विनीत वर्तक ©

दुर्गाशक्ती भाग ६ (मल्लिका श्रीनिवासन)... विनीत वर्तक ©

बिझनेस करणं तो वाढवणं, दूरदर्शी निर्णय घेणं ते आर्थिक बाबतीतल्या गोष्टी सांभाळून घेणं अशा सर्वच गोष्टींवर पुरुषी वर्चस्व राहिलेलं आहे. पुरुषाने घराबाहेर बघायचं तर स्त्री ने घर सांभाळायचं हे अनेक घरात ठरलेलं असते. पण ह्या सगळ्या पुरुषी वर्चस्वाला फाटा देत एका स्त्रीने अशा एका क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे ज्यात कधी स्त्रिया काम करतील असा विचार उद्योग जगताने केला नव्हता. त्यांच नाव आहे मल्लिका श्रीनिवासन!
 मल्लिका श्रीनिवासन ह्या टाफे (Tractors and Farm Equipment Limited) ह्या कंपनी च्या चेअरमन आहेत. टाफे ची वार्षिक उलाढाल १.५  बिलियन अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त असुन   टाफे जगातील तिसऱ्या क्रमांकाची ट्रॅक्टर निर्मिती करणारी कंपनी आहे. जेव्हा मल्लिका श्रीनिवासन ह्यांनी टाफे मध्ये प्रवेश केला तेव्हा त्याची उलाढाल फक्त ८५ कोटी रुपये होती. आज तिची उलाढाल १.५ बिलियन अमेरिकन डॉलर असून ती येत्या ३ ते ५ वर्षात ५ बिलियन अमेरिकन डॉलरवर नेण्याचं लक्ष्य मल्लिका श्रिनिवासन ह्यांनी आपल्या समोर ठेवलं आहे.

मल्लिका श्रीनिवासन ह्यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९५९ ला झाला. त्यांचे वडील हे ख्यातनाम उद्योगपती होते. त्या लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी मद्रास विद्यापीठातून आपलं पदवी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण Wharton School of Business affiliated to the University of Pennsylvania, USA  इथून पूर्ण केलं. त्यांचे पती वेणु श्रीनिवासन हे TVS Motors मध्ये चिफ मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. मल्लिका श्रीनिवासन ह्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांच्या मुलीने भाषेचा अभ्यास करावा. पण मल्लिकांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्यांनी व्यवस्थापन शास्त्रातल्या अभ्यासासाठी व्हार्टन बिझनेस स्कूल मध्ये प्रवेश मिळवला होता. त्या वेळेस त्या एका मुलीची आई होत्या पण आईपण त्यांचं शिक्षण रोखू शकलं नाही. भारतात परत आल्यावर आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून त्यांनी टाफे मध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम काम करण्यास सुरवात केली. आपले वडील उद्योगपती असल्याने आपल्याला गलेगठ्ठ पगार, मोठी केबिन मिळेल असं मल्लिका श्रीनिवासन ह्यांना वाटतं होतं प्रत्यक्षात मात्र त्यांना एक छोटी केबिन आणि अतिशय कमी पगारावर कंपनी मध्ये घेतलं गेलं. ह्यामुळे नाराज झालेल्या मल्लिका श्रीनिवासन ह्यांनी आपल्या वडिलांना म्हटलं की माझ्या सोबतच्या व्हार्टन बिझनेस स्कुल मधल्या अनेकांना खूप मोठा पगार आहे. त्यावर शांतपणे त्यांच्या वडिलांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं,

“Listen young lady, you might be an MBA from Wharton, but I don’t need one to run the company.”

ह्या उत्तरानंतर मल्लिका श्रीनिवासन ह्यांनी कंपनीत वाटचाल केली ती स्वबळावर. त्यांनतर मल्लिका श्रीनिवासन टाफे मध्ये एक- एक पायऱ्या वर चढत गेल्या. टाफे च्या Chief Executive Officer  बनल्यावर त्यांनी कंपनीत आमूलाग्रलाग्र बदल केले. अनेक कटू निर्णय त्यांना घ्यावे लागले त्यासाठी टिका ही सहन करायला लागली. एक स्त्री म्हणून जरी वडिलोपार्जित व्यवसाय असला तरी कंपनीची दिशा ठरवताना त्यांना अनेक अडचणी आल्या. पण सगळ्यावर मात करून त्यांनी काही धीट निर्णय ही घेतले. त्यापैकी एक म्हणजे २००५ ला आयशर मोटार च्या ट्रॅक्टर बिझनेस वर मिळवलेला ताबा. त्याकाळी ट्रॅक्टर क्षेत्र अतिशय मंदीचा सामना करत होतं. अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनात कपात केली होती. अशा कठीण काळात आपलं उत्पादन क्षेत्र वाढवण्याचा मल्लिका श्रीनिवासन ह्यांचा निर्णय उद्योग जगतात डोळे विस्फारून गेला. कारण मल्लिका श्रीनिवासन ह्यांनी घेतलेली ही खूप मोठी रिस्क होती. काही वर्षाने ह्याच निर्णयाने टाफे ला भारतातील ट्रॅक्टर क्षेत्राचा २५ % हिस्सा गाठून दिला. टाफे ही महिंद्रा एन्ड महिंद्रा नंतर ट्रॅक्टर उत्पादन करणारी भारतातली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनली. ट्रॅक्टर क्षेत्रात होणाऱ्या वाढीच्या दुप्पट वेगाने टाफे वाढत होती. टाफे ने मल्लिका श्रीनिवासन ह्यांच्या नेतृत्वाखाली आपलं क्षेत्र ट्रॅक्टरपुरती मर्यादित न ठेवता शेतीसाठी लागणाऱ्या अन्य उत्पादनावर वळवल ज्यात इंजिनिअरिंग प्लास्टिक, हायड्रॉलिक्स पंप, पॅनल इंस्ट्रुमेंटेशन अश्या वेगवेगळ्या उत्पादनांचा समावेश आहे. टाफे च्या ह्या सर्वांगीण प्रगतीमागे मल्लिका श्रीनिवासन ह्यांची दूरदृष्टी कारणीभूत होती.  

मंदीच्या काळात मल्लिका श्रीनिवासन ह्यांनी कंपनीच्या खर्चात प्रचंड कपात केली. पण त्याचवेळी त्यांनी कंपनी च्या रिसर्च एन्ड डेव्हलपमेंट ला हात लावला नाही. ह्याचा फायदा टाफे ला प्रचंड झाला. जेव्हा ट्रॅक्टर क्षेत्रातील मंदी ओसरली तेव्हा टाफे अनेक नवीन उत्पादन घेऊन बाजारात उतरलं. ह्या नवीन उत्पादनांच्या वेगवेगळ्या रेंज मुळे टाफे च्या विक्रीत कमालीची वाढ नोंदवली गेली. वेगवेगळ्या वस्तुंसाठी मल्लिका श्रिनिवासन ह्यांनी दोन स्तरीय योजना आखल्या होत्या. एकतर निर्माण होणारी नवीन वस्तू प्रभावी खर्चात ( cost effective) असली पाहिजे. दुसरं म्हणजे ती शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करणारी असली पाहिजे. ह्यासाठी अनेकदा मल्लिका श्रीनिवासन गावा गावात जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करत एखाद्या टपरीवर थांबून चहा पित कुठे काय कमी पडते आहे ह्याचा आढावा तिथल्या शेतकऱ्यांकडून घेतं असतं. ह्या अनुभवांचा सरळ फायदा टाफे ला आपली उत्पादन निर्माण करण्यात झाला. त्यामुळेच त्यांच्या उत्पादनांनी नुसत्या भारतात नाही तर विदेशात अतिशय कमी वेळात लोकप्रियता मिळवली.

उद्योग क्षेत्रात टाफे समूहाचं नाव जगभरात पोहचवताना मल्लिका श्रीनिवासन समाजाच्या प्रती असलेल कर्तव्य ही विसरल्या नाहीत. शंकरा नेत्रालय सारख्या संस्थेच्या उभारणीत त्यांचं मोलाचं योगदान आहे. दक्षिण भारतातील अनेक कॅन्सर हॉस्पिटल, शालेय संस्था तसेच हॉस्पिटल च्या उभारणीत त्यांनी भरीव योगदान दिलं आहे. ह्या सोबत कर्नाटकी संगीतासाठी ही त्यांनी काम केलं आहे. मल्लिका श्रिनिवासन ह्या भारतातील मोस्ट पॉवरफुल बिझनेस वुमन्स मध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. तर आशिया मध्ये पहिल्या ५० स्त्रियांमध्ये त्यांच नावं समाविष्ट आहे. त्यांच्या उद्योग जगतातील योगदाना बद्दल भारत सरकारने त्यांना २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे.

एका छोट्या उद्योग समूहाची धुरा आपल्या खांद्यावर घेतं त्या रोपट्याचं वृक्षात रूपांतर करून त्याची पायामुळं जगातील १०० देशात रोवताना मल्लिका श्रीनिवासन ह्यांनी त्याच सोबत एक आई, एक मुलगी, एक पत्नी अशा सगळ्याच भूमिका त्यांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत. त्यांचा हा प्रवास अनेक स्त्रियांना प्रेरणा देणारा तर आहेच पण त्याच सोबत स्त्री कोणत्याही क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने यशस्वी होऊ शकते व समर्थपणे उद्योग सांभाळू शकते हा संदेश पूर्ण जगाला दिला आहे. उद्योग जगतातील ह्या दुर्गाशक्तीस माझा सलाम! 

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment