Wednesday, 2 October 2019

दुर्गाशक्ती भाग ५ (एअर मार्शल पद्मावथी बंडोपाध्याय)... विनीत वर्तक ©

दुर्गाशक्ती भाग ५ (एअर मार्शल पद्मावथी बंडोपाध्याय)... विनीत वर्तक ©
 
आयुष्यात घडणाऱ्या घटना कधी कधी आपल्या आयुष्याला असं वळणं देतात ज्यामुळे आपण पूर्ण बदलून जातो. हॉस्पिटल मध्ये सतत अंथरुणाला खिळलेल्या आईला बघुन पद्मावथी बंडोपाध्याय ह्यांनी आयुष्याचं ध्येय निश्चित केलं ते म्हणजे डॉक्टर बनून आपल्या आईसारख्या हजारो आजारी लोकांची सेवा करायचं. आपल्या शालेय आणि डॉक्टरकीच्या आधीच्या सर्व परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्याने पद्मावथी बंडोपाध्याय ह्यांना पुण्याच्या आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज मध्ये सहज प्रवेश मिळाला. आपल्या वैद्यकीय अभ्यासा दरम्यान पद्मावथी बंडोपाध्याय ह्यांना अनेक पुरस्कार, मेडल मिळाले. आपलं वैद्यकीय शिक्षण पुर्ण केल्यावर त्यांनी भारतीय वायु दलात प्रवेश केला. त्यांची नियुक्ती एअर फोर्स हॉस्पिटल, बंगळुरू इथे झाली. इकडे काम करत असताना त्यांची गाठ पडली ती फ्लाईट लेफ्टनंट सतीनाथ बंडोपाध्याय ह्यांच्याशी. ही गाठ जुळली ती आयुष्यभर.

१९७१ चं साल उजाडलं,भारत पाकिस्तान युद्धाचे पडघम वाजले. पद्मावथी बंडोपाध्याय ह्यांना आपल्या पतीसोबत 'हलवारा बेस, पंजाब'  येथे जाण्याचे आदेश मिळाले. दोघांनी १९७१ च्या युद्धात मोलाची भूमिका बजावली. पद्मावथी बंडोपाध्याय आणि सतीनाथ बंडोपाध्याय ह्या दोघांनाही 'विशिष्ठ सेवा मेडल' ने सन्मानित करण्यात आलं. हे मेडल युद्धात अतुलनीय कामगिरीसाठी दिलं जाते. भारतीय वायू दलाच्या इतिहासात पहिल्यांदा नवरा - बायको दोघांनाही एकाच वेळेस भारताच्या राष्ट्रपतीकडून 'विशिष्ठ सेवा मेडल' ने सन्मानित केलं गेलं होतं. ह्या नंतर पद्मावथी बंडोपाध्याय ह्यांना DIPAS (Defence Institute of Physiology & Allied Sciences ) इकडे पाठवण्यात आलं. अतिउंचीवरील तापमानामुळे सैनिकांच्या शारिरीक तसेच मानसिक स्थितीत जे बदल होतात त्यावर त्यांनी खूप संशोधन केलं. पूर्वेकडचा हिमालय असो वा पश्चिमेकडचा ह्या दोन्ही ठिकाणी पद्मावथी बंडोपाध्याय ह्यांनी राहुन बारकाईने सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. आपल्या पूर्ण प्रवासात त्यांनी २३ रिसर्च प्रबंध लिहले तर २७ पब्लिकेशन केली आहेत. (विनीत वर्तक ©)

पद्मावथी बंडोपाध्याय ह्या भारतातील पहिल्या स्री आहेत ज्यांनी उत्तर ध्रुवावर संशोधन केलं होतं. १९८० च्या दशकात पद्मावथी बंडोपाध्याय ह्या उत्तर ध्रुवावर चार महिने राहिल्या होत्या. भारतासारख्या विषुववृत्तीय देशातील लोकं जेव्हा ध्रुवीय प्रदेशात राहतात तेव्हा त्यांच्यावर ध्रुवीय प्रदेशातील अतिशीत तपमानाचे काय काय परीणाम होतात ह्याचा अभ्यास त्यांनी केला. HAPO (High Altitude Pulmonary Oedema) and HACO ( High Altitude Cerebral Oedema).ह्यावर अभ्यास करून सियाचिन सारख्या युद्धभूमीवर भारतीय सैनिकांचं राहणीमान कसं असावं ह्याचा आराखडा त्यांनी तयार केला. ह्यासाठी त्यांना इंदिरा प्रियदर्शनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या सैनिक होत्या. ह्या सोबत त्यांना Air Force Wives Welfare Association Trophy by AFWWA.ने ही सन्मानित करण्यात आलं. कारगिल युद्धात भारतीय वायूसेनेच्या सगळ्या फॉरवर्ड बेस ला भेट देऊन सैनिकांना लागणाऱ्या सर्व वैद्यकीय मदतीची तजवीज केली होती. ह्यासाठी त्यांना अतिविशिष्ठ सेवा मेडल देण्यात आलं.

पद्मावथी बंडोपाध्याय ह्या Indian Society of Aerospace Medicines, International Medical Society and New York Academy of Sciences अश्या मानाच्या संस्थेच्या मानद सदस्य आहेत. २६ जून २००० ला त्यांना मानाचं असं 'एअर व्हॉइस मार्शल' पद देण्यात आलं. ह्या पद मिळवणाऱ्या त्या भारतातील नव्हे तर पुर्ण जगातील एअर फोर्स मधील सगळ्यात पहिल्या महिला बनल्या. त्यांना Additional Director General Armed Forces Medical Services. चा पदभार देण्यात आला होता. ह्या पदावर ही त्यांनी भरीव कामगिरी केली. ह्याच कामगिरीने त्यांना पूर्ण जगातील पहिली महिला 'एअर मार्शल' बनवलं. १ ऑक्टोबर २००४ ला पद्मावथी बंडोपाध्याय ह्यांनी भारतीय वायू सेनेत 'एअर मार्शल' म्हणुन पदभार स्वीकारला ह्याच सोबत भारतीय सैन्यातील पहिल्या महिला Director General Medical Services बनल्या. २००६ साली त्यांना भारत सरकारने परम विशिष्ठ सेवा मेडल देऊन त्यांचा गौरव केला आहे. (विनीत वर्तक ©)

ज्या भारतीय स्री ला नेहमीच दुबळं समजलं गेलं त्याच भारतीय सस्त्री ने आपल्या कर्तृत्वाने जागतिक पटलावर वायु दलासारख्या प्रतिष्ठित आणि देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या दलात सर्वोच्च पद मिळवलेलं आहे. एअर मार्शल पद्मावथी बंडोपाध्याय ह्या जगातील पहिल्या अशा स्त्री आहेत ज्यांनी जगाच्या कोणत्याही वायु दलात असणाऱ्या पदात इतकी उंची गाठलेली आहे. हे पद त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने मिळवलेलं आहे. आपला जोडीदार पण वायूदलात असताना त्याच्या प्रतिमेखाली दबून न जाता आपली स्वतःची एक वेगळी प्रतिमा तयार केली. एअर मार्शल पद्मावथी बंडोपाध्याय ह्यांनी भारतीय वायू दलात आपल्या जोडीदाराच्या सोबत आपलं करिअर तसेच आपली सेवा ह्या भारताच्या रक्षणासाठी दिलेली आहे. त्यांच्या कर्तृत्वातील 'दुर्गाशक्ती' चा हा प्रवास येणाऱ्या कित्येक पिढ्यातील स्त्रियांना ऊर्जा देत राहील. भारताच्या पहिल्या एअर मार्शल 'पद्मावथी बंडोपाध्याय' ह्यांना माझा कडक सॅल्युट! 

जय हिंद!

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment