एका कुलीची गोष्ट... विनीत वर्तक ©
सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं..... असं म्हणत अँग्री यंग म्यान अमिताभ बच्चन ने कुली चित्रपटातुन रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचे सामान उचलणाऱ्या असंख्य कुलींना रुपेरी पडद्यावर अजरामर केलं. आज त्याला अनेक वर्ष झाली. जग आज खुप पुढे निघुन गेलं तरी त्या कुलींचं आयुष्यात आज तितकासा फरक पडलेला नाही. आजही ट्रेन स्टेशन मध्ये शिरताच ती थांबण्याआधी डब्यात शिरून आपल्या लाल रंगाच्या शर्टाच्या बाह्या मागे करत गिऱ्हाईक शोधणारे कुली आपण अनेकदा प्रत्येक स्टेशन वर बघतोच. अनेकदा हे कुली अशिक्षित किंवा साधारण शालेय शिक्षण पुर्ण केलेले असतील असा एक अंदाज आपला असतो. पण ह्या अंदाजाला पार मोडीत काढण्याचा पराक्रम एका कुलीने केला आहे. ज्या स्पर्धा परीक्षेत पास होणं अनेक लोकांचं स्वप्न असते त्या यु.पी.एस.सी./ एम.पी.एस.सी. सारख्या परीक्षा एका कुलीने पास केली आहे. त्याच नावं आहे श्रीनाथ के. श्रीनाथ हा एर्नाकुलमं स्टेशन वर कुलीच काम करतो. हे काम करत असताना त्याने के.पी.एस.सी.(Kerala Public Service Commission) ची परीक्षा पास केली आहे.
श्रीनाथ हा केरळ मधील निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या मुन्नार मध्ये राहतो. तो उपजीविकेसाठी ५ वर्षांपासून आपल्या घराच्या जवळ असलेल्या एर्नाकुलम स्टेशन वर कुलीच काम करतो. हाय स्कुल पास असलेल्या श्रीनाथसाठी आयुष्यात एक वेगळं वळणं आलं ते 'डिजिटल इंडिया' माध्यमातुन. ह्या योजने अंतर्गत देशातील अनेक रेल्वे स्टेशन वर प्रवाशांच्या सोयीसाठी मोफत 'वाय-फाय' सेवा सुरु करण्यात आली. एर्नाकुलम स्टेशन हे त्यातील एक स्टेशन होतं. ह्या सुविधेमुळे श्रीनाथ च्या हाताशी पुर्ण जग आलं. प्रवाशांचे सामान उचलता उचलता श्रीनाथ ने त्याचवेळी 'वाय-फाय' च्या माध्यमातुन आपला अभ्यास सुरु केला. अभ्यासासाठी त्याला कुलीगिरी सोडता येणार नव्हती. कारण पुर्ण घराच्या उपजिविकेचा स्रोत तोच होता. पण ही प्रतिकुल परिस्थिती त्याला अभ्यास करण्यापासून रोखु शकली नाही. (विनीत वर्तक ©)
एर्नाकुलम स्टेशन वर मिळणाऱ्या २०-४० एम.बी.पी.एस. स्पीड च्या इंटरनेट चा वापर करत त्याने ऑनलाईन कोर्सेस मध्ये अभ्यास करायला सुरवात केली. स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तक पण तो ऑनलाईन वाचत असे. दिवसा आंगाखांद्यावर सामान उचलत असताना कानाला लावलेल्या हेड फोन मध्ये शिक्षकांचा तास ऐकत त्यांनी सांगितलेल्या गोष्टींची उजळणी तो रात्री करत असे. एक फोन, एक हेडफोन आणि रेल्वे स्टेशन चं फ्री वाय-फाय ह्या तिन गोष्टींची मदत घेतं श्रीनाथ ने के.पी.एस.सी. ची खडतर असणारी परीक्षा २०१८ साली पास केली आहे. त्याच्या शब्दात सांगायचं झालं तर,
"I will keep studying while I work as a coolie because I have the pressure of running my house... I will keep studying and appearing for exams. If I appear for enough exams, I am bound to get a good job".........
श्रीनाथ के ने 'इच्छा तेथे मार्ग' ह्या म्हणी ला खर करत लोकसेवा आयोगाच्या खडतर परीक्षेत बाजी मारली आहे. त्याच्या यशात सगळ्यात मोलाचा वाटा त्याच्या मेहनती नंतर श्रीनाथ डिजिटल इंडिया च्या फ्री वाय फाय सेवेला देतो आहे. ज्याच्यामुळे आज तो सन्मानाने आपलं आयुष्य जगत आहे. एकीकडे ह्याच फ्री वाय- फाय चा वापर पॉर्न साईट बघण्यासाठी केला जातो अशी ओरड होत असताना दुसरीकडे श्रीनाथ ने एक वेगळं उदाहरण सगळ्यांन पुढे ठेवलं आहे. कोणताही कोचिंग क्लास नाही, कोणताही मार्गदर्शक नाही, कोणीही गॉडफादर नाही अश्या सगळ्या प्रतिकुल परिस्थितीत ह्या एका कुलीची गोष्ट आपल्याला बरच काही सांगुन जाते. श्रीनाथ के.ला माझा कुर्निसात आणि त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.
फोटो स्रोत :- गुगल
No comments:
Post a Comment