Tuesday, 1 October 2019

दुर्गाशक्ती भाग ४ (अंजना ओम कश्यप)... विनीत वर्तक ©

दुर्गाशक्ती भाग ४ (अंजना ओम कश्यप)... विनीत वर्तक ©

भारतात एकेकाळी दूरदर्शन हे एकमेव चॅनेल दूरचित्रवाणीवर चालत असे. जसजशी तंत्रज्ञानात प्रगती झाली आणि भारताने खुलं धोरण स्विकारलं तसतशी दूरचित्रवाणी ची व्याप्ती वाढत गेली. एकेकाळी दिवसातुन एकदाच जगात काय घडामोडी सुरु आहेत ह्याचा अंदाज भारतीयांना येतं असे. रोज रात्री लागणाऱ्या ७.३० च्या अथवा ९.०० च्या बातम्या म्हणजे भारतात आणि जगात काय चाललं आहे हे जाणून घेण्याचं एकमेव साधन होतं. दूरचित्रवाणी क्षेत्रात ही खाजगी वाहिन्यांनी प्रवेश केला आणि एक स्पर्धा सुरु झाली. आधी काही तासासाठी लागणाऱ्या बातम्यान साठी आता २४ तास कमी पडायला लागले.

काही दिवसांनी दूरचित्रवाणी वर फक्त बातम्या देणारी न्युज चॅनेल सुरु झाली. बघता बघता ह्या न्युज चॅनेलचा आवाका प्रचंड वाढला. देशभरात तसेच जगात काय सुरु आहे ह्याच कुतुहूल भारतातील प्रत्येक नागरिकाला होतं. जशी दूरचित्रवाणी ची व्याप्ती वाढली तशी ह्या न्युज चॅनेल ची व्याप्ती अगदी घराघरात पोहचली. ह्या सगळ्या प्रसारात बातम्या सांगणे ही एक कला झाली. रोजच्या बातम्यांसोबत राजकीय, सामाजिक, आर्थिक अश्या वेगेवगेळ्या विषयांवर चर्चासत्र होऊ लागली. ह्या चर्चासत्रांना सांभाळणारे वृत्तनिवेदक त्या कार्यक्रमाचा चेहरा झाले. ह्यातील काही निवडक वृत्तनिवेदकांचा चेहरा प्रत्येक घराघरात प्रसिद्ध झाला. आपल्या संवाद शैलीने आपल्या आवाजाने ह्या वृत्तनिवेदकांनी प्रत्येक भारतीयांच्या मनात घर केलं. ह्यात स्री वृत्तनिवेदक ही मागे नव्हत्या. त्यातील एक नाव म्हणजेच आज तक सबसे तेज फेम 'अंजना ओम कश्यप'. (विनीत वर्तक ©)

अंजना ओम कश्यप ने आपल्या करियरची सुरवात डी.डी. न्युज पासुन केली. त्यानंतर झी न्यूज मध्ये काम केलं. नंतर न्युज २४ ह्या चॅनेल मध्ये काम केलं. नंतर तिचा प्रवास सुरु झाला तो आज तक ह्या वाहिनीवर जो आजपर्यंत सुरु आहे. अंजना ओम कश्यप ला लहानपणी डॉक्टर होण्याची इच्छा होती. आपलं शालेय शिक्षण पुर्ण केल्यावर तिने डॉक्टरी अभ्यासाच्या अनेक प्रवेश परीक्षा दिल्या पण तिला यश मिळालं नाही. दिल्ली विद्यापीठातुन पदवी मिळवल्यानंतर तिने यु.पी.एस.सी. साठी तयारी सुरु केली. दोन वेळा मुलाखत देऊन सुद्धा तिच्या वाट्याला अपयश आलं. ह्या नंतर तिने पत्रकारिकारितेच्या अभ्यासाला तिने प्रवेश घेतला. तो पुर्ण केल्यावर तिने वेगवेगळ्या बातम्यांच्या चॅनेल मधुन काम करायला सुरवात केली. कोणतेही यश एका रात्रीत मिळालं तरी त्यासाठी अनेक रात्री कष्टाच्या जाव्या लागतात. त्याच प्रमाणे अंजना ओम कश्यप ला ही संघर्ष करायला लागला. पुरुष वृत्तनिवेदकांच्या गर्दीत स्वतःच असं स्थान निर्माण करणं तसं सोप्प नव्हतं. पण अंजना ने तिला मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा घेतला. संघर्ष सुरु ठेवला. न्युज २४ ह्या चॅनेल वरील 'दो टुक' ह्या कार्यक्रमाने अंजना ओम कश्यप ला प्रसिद्धी दिली.

अंजना ओम कश्यप यशस्वी वृत्तनिवेदकाच्या एक एक पायऱ्या चढत गेली. त्या नंतर आलेल्या 'हल्ला बोल', 'बडी बहस', 'दिल्ली के दिल मैं क्या है', 'राजतिलक' सारख्या कार्यक्रमांनी तिचं नाव भारताच्या घराघरात पोहचवलं. आज तक सारख्या भारताच्या प्रथम क्रमांकाच्या न्युज चॅनेल मध्ये आज अंजना ओम कश्यप 'एडिटर इन चिफ' इतक्या महत्वाच्या पदावर कार्यरत आहे. अंजना ओम कश्यप चं यश हे तिच्या सर्वसामान्य माणसांशी जुळणाऱ्या बातम्या देण्यासाठी तसेच कोणत्याही चर्चेत एखाद्या बाजूला न झुकता दोन्ही बाजूंमध्ये सुरळीत चर्चा घडवुन आणण्यासाठी वाखाणलं जाते. आज अंजना ओम कश्यप भारतातील एक सुप्रसिद्ध वृत्तनिवेदिका आहे. प्रत्येक दिवसाच्या वृत्तनिवेदनासाठी जवळपास ५०,००० रुपये घेणाऱ्या अंजना ओम कश्यप ची वार्षिक मिळकत सुमारे २ कोटी रुपयांच्या घरात आहे. (विनीत वर्तक ©)

अंजना ओम कश्यप चा जोडीदार मंगेश कश्यप हा एक आय.पी.एस. अधिकारी आहे. ह्या दोघांना दोन गोंडस मुलं ही आहेत. एकेकाळी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात धडाडीने लोकांसमोर बातम्या ठेवताना अंजना ओम कश्यप ने लोकांची नस ओळखुन आपल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेलं आहे. 'आज तक' म्हंटल की जसं सबसे तेज ओठांवर येते त्याच सबसे तेज सोबत वृत्तनिवेदिका अंजना ओम कश्यप चा चेहरा लोकांच्या समोर येतो. आज तक च्या प्रसिद्धी मध्ये तिचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. राजकारण असो वा सामाजिक प्रश्न, खेळ असो वा विज्ञान सगळ्याच वेळी आपल्या कणखर आवाजात आज तक वर समोर येणाऱ्या अंजना ने एका वेगळ्या क्षेत्रात स्री दुर्गेचा ठसा उमटवला आहे. एक सर्व साधारण वृत्तनिवेदिका ते एडिटर इन चिफ हा तिचा प्रवास अनेक स्त्रियांना ह्या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. आपला जोडीदार एक आय.पी.एस. ऑफिसर असला तरी त्याच्या जोडीने आपलं करियर सांभाळत एक प्रसिद्ध वृत्तनिवेदिका, एक पत्नी, एक आई अश्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत आजही अंजना ओम कश्यप सबसे तेज बातम्या भारतातील लोकांसमोर मांडत आहे. आपल्या उत्कृष्ठ वक्तृत्त्व कलेने बातम्या सांगण्यात मापदंड निर्माण केलेल्या दुर्गाशक्ती अंजना ओम कश्यप च्या पुढील प्रवासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment