अलीबाबा ची गुहा बांधणारा जॅक मा... विनीत वर्तक ©
लहानपणी जवळपास आपल्यातील प्रत्येकाने 'तिळा तिळा दार उघड' हे सांगणारी अलीबाबा आणि चाळीस चोरांची गोष्ट ऐकलीच असेल. खुप संपत्ती, दागदागिने, सोने असणारी अशी गुहा खरचं अस्तित्वात असेल का? असेल तर कुठे? ह्या प्रश्नाने अनेक लहान गोपाळांच्या मनात घर केल असेल. पण त्याच उत्तर मात्र कोणाला सापडलेलं नव्हतं. पण चीन च्या एका माणसाने अश्याच एका 'अलीबाबा' च्या गुहेचं स्वप्न पाहिलं आणि प्रत्यक्षात उतरवलं त्याच नाव आहे 'जॅक मा'. जॅक मा ने ४ एप्रिल १९९९ ला 'अलीबाबा' ग्रुप ची स्थापना केली. आज ह्या कंपनीच मार्केट कॅप जवळपास ४६० बिलियन अमेरिकन डॉलर असुन ५६ बिलियन अमेरिकन डॉलर (जवळपास ४०,००० कोटी भारतीय रुपये ) इतकं वार्षिक उत्पन्न आहे. (थोडक्यात सांगायचं झालं तर अलीबाबा ची किंमत फेसबुक पेक्षा जास्त आहे. अलीबाबा इ-बे आणि एमेझॉन हे दोन्ही एकत्र केल्यावर ही त्यांच्यापेक्षा जास्ती वस्तु आज बाजारात विकते.) एक लाखापेक्षा जास्त लोकं आज अलीबाबा मध्ये काम करतात. आज अलीबाबा वॉलमार्ट नंतर जगातील सगळ्यात मोठी 'इ कॉमर्स' कंपनी आहे. अलीबाबा आशियाच्या शेअर बाजारातील सगळ्यात विश्वासू कंपनी आहे. शुन्यातुन सुरवात करून अलीबाबा ची गुहा बांधणारा जॅक मा (जॅक मा सध्या चीन मधला सगळ्यात श्रीमंत आणि जगातील अति श्रीमंत व्यक्तीन मधील एक आहे. जॅक मा कडे आजच्या घडीला ४० बिलियन अमेरिकन डॉलर पेक्षा जास्त संपत्ती आहे. ) चा प्रवास सगळ्यांना प्रेरणा आणि खुप काही शिकवून जाणारा आहे. (विनीत वर्तक ©)
जॅक मा चा जन्म हांगझोऊ, कम्युनिस्ट असणाऱ्या चीन इकडे झाला. अतिशय सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या जॅक मा चे आई वडील तुटपुंजे पैसे कमवत असतं. जॅक मा अभ्यासात ही काही हुशार नव्हता. अपयशाचे काटे जणु काही त्याला लहानपणीच चिकटलेले होते. जॅक मा प्राथमिक शाळेत दोन वेळा नापास झाला. माध्यमिक इयत्तेत तर तीन वेळा नापासाचा शिक्का त्याच्या प्रगती पुस्तकात लागला. नकाराची परंपरा त्याच्या महाविद्यालयीन शिक्षणात सुरु राहिली. तीन वेगवेगळ्या कॉलेज ने त्याला शैक्षणिक प्रवेश नाकारला. शेवटी हांगझोऊ विद्यापीठातुन त्याने 'इंग्रजी' विषयांतून पदवी घेतली. आपलं शिक्षण सुरु असताना त्याने १० वेळा जगातील प्रतिष्ठित अश्या हार्वर्ड विद्यापिठात शिकण्यासाठी अर्ज केला आणि प्रत्येक वेळी त्याला नकाराला सामोरं जावं लागलं. पदवी मिळण्याआधीच त्याने हांगझोऊ विद्यापिठात इंग्रजी शिकवण्याची नोकरी मिळाली ती अवघ्या १२ अमेरिकन डॉलर / प्रति महिना. जॅक मा च्या आयुष्यातील अपयश इकडे संपत नाही तर त्या अपयशाचा प्रवास इकडुन सुरु होतो. पदवी मिळाल्यावर त्याने ३० पेक्षा जास्त ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला पण प्रत्येक वेळी नकार ऐकायला मिळाला. आपल्याला आलेल्या अपयशा बद्दल जॅक मा सांगतो,
"When KFC came to China, 24 people went for the job. Twenty-three people were accepted. I was the only guy who wasn’t.” He also one of the 5 applicants to a job in Police force and was the only one getting rejected after being told, “No, you’re no good.”
अपयशाचा डोंगर असा समोर असताना कोणीही हरलं असतं पण जॅक मा च्या मनात वेगळचं होतं. आपल्याला अपयश आलं तरी आपण थांबायचं नाही हे त्याने ठरवलं होतं. त्याच्या शब्दात,
“Well, I think we have to get used to it. We’re not that good.”
नोकरीत आणि शिक्षणात आलेल्या अपयशानंतर जॅक मा ने उद्योग काढायचं ठरवलं. १९९५ साली अमेरिकेत गेल्यावर 'इ - कॉमर्स' आणि कॉम्प्युटर बदलाचे वारे त्याने ओळखले. ह्या सगळ्यात चीन कुठे नाही हे त्याच्या नजरेतुन सुटलं नाही. १९९९ साली आपल्या १७ मित्रांना एकत्र आणुन त्याने 'अलीबाबा' नावाची कंपनी स्थापन केली. अमेरिकेतील कॉम्प्युटर क्षेत्राच हब असणाऱ्या सिलिकॉन व्हॅली मधील उद्योजगताला त्याने अलीबाबा ला उभारण्यासाठी मदत मागितली पण तिकडेही जॅक मा ला अपयश आलं. अलीबाबा दिवाळखोरीत निघण्याच्या मार्गावर पोहचली होती. उभारणीच्या पहिल्या ३ वर्षात अलीबाबा ने शुन्य रुपयाचा बिझनेस केला. (इकडे एका महिन्यात नफा नाही झाला तर लोकं उद्योग बंद करतात तर तिकडे जॅक मा तब्बल ३ वर्ष एकही रुपयाचा धंदा न करता आपलं अलीबाबा चं दुकान उघडुन बसला होता.) अपयशाची मालिका जॅक मा च्या आयुष्यात संपत नव्हती. पण जॅक मा ने चे शब्द खुप काही सांगुन जातात,
"The very important thing you should have is patience. Never give up. Today is hard, tomorrow will be worse, but the day after tomorrow will be sunshine."
जॅक मा चे शब्द खरे निघाले. जवळपास ३ वर्ष एकही रुपयाचा धंदा न केलेल्या आणि दिवाळखोरीकडे वाटचाल करणाऱ्या 'अलीबाबा' चे दिवस एका रात्रीत पलटले. बघता बघता पुर्ण जगात अलीबाबा हे नाव प्रसिद्ध झालं. ज्या अलीबाबा ला १९९९ साली कोणी एक डॉलर द्यायला तयार नव्हतं त्या अलीबाबा चा सप्टेंबर २०१४ ला एक शेअर अमेरिकन बाजारात ९२.७०$ ला विकत घेतला गेला. अलीबाबा चा शेअर अमेरिकेच्या शेअर बाजाराच्या इतिहासातला सगळ्यात मोठा आय.पी.ओ. ठरला. ( Initial Public Offering (IPO). जॅक मा चीन मधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनला. फोर्ब्स च्या जगाच्या पटलावरील पहिल्या १०० प्रभावी व्यक्तींमध्ये सलग ५ वर्ष जॅक मा समाविष्ट होता.
एकेकाळी सगळीकडून अपयशाचा सामना करणारा जॅक मा आज यशाच्या सिंहासनावर आरूढ झाला होता. पण त्या यशाची हवा मात्र जॅक च्या डोक्यात गेली नाही. ज्या वेळेस त्याची कंपनी आपल्या सर्वोच्च स्थानावर बिझनेस करत होती. तेव्हाच जॅक मा ने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. खरे तर अलीबाबा २००९ साली जेव्हा १० वर्षाची झाली तेव्हापासुन जॅक मा ने २०१९ ला निवृत्त होण्याचं नक्की केलं होतं. त्यासाठी पुढल्या १० वर्षात कंपनी च्या साच्यात बदल करताना आपल्या नंतर ही अलीबाबा च अस्तित्व आपल्यावरती अवलंबुन न राहता तितकचं राहिलं पाहिजे ह्यासाठी जॅक ने मेहनत घेतली. त्याच्या शब्दात,
It’s the culture, it’s the people, it’s the system that keeps a company alive for 102 years. It’s not only one person. You should never have a copy of Jack Ma. One Jack Ma is too much for the company,” So in the past 10 years, we tried to build up a system: A system that has the right leadership ... a system that can create, can make, and can discover, can train a lot of leaders.”
१० सप्टेंबर २०१८ ला जॅक मा ने वयाच्या ५५ व्या वर्षी अलीबाबा मध्ये २० वर्ष नोकरी करून सन्मानाने निवृत्ती घेतली. आता आपलं लक्ष त्याने समाजाच्या कल्याणासाठी दिलं असुन आपल्या संस्थेच्या माध्यमातुन अनेक समाजसेवेची कामं करत आहे. (विनीत वर्तक ©)
जॅक मा चा शुन्यातुन श्रीमंतीकडे झालेला प्रवास जितका प्रेरणादायी आहे तितकाच योग्य वेळी थांबण्याचा निर्णय ही खूप काही शिकवून जाणारा आहे. कुठे थांबायचं माहीत असलं की आपण व्यसनात ओढले जात नाही हे जॅक मा ने दाखवुन दिलं आहे. आपल्या करीअर च्या सर्वोच्च पदावर असताना पैसे, पद,सुख, समृद्धी हे सगळं बाजुला करून आपलं पुढलं आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण करण्याचा निर्णय किती मोठा आहे. अपयशाच्या गर्तेतुन फिनिक्स पक्ष्याप्रमाणे बाहेर निघत समृद्धीच्या एव्हरेस्ट वर निवृत्ती घेऊन अलीबाबा ची गुहा बांधणाऱ्या जॅक मा ला माझा सलाम.
फोटो स्रोत :- गुगल